तोतया
प्रकरण 4
मी भालेकरवर कडाडल्यावर त्याचा चेहेरा बघण्यासारखा झाला होता.रागाने लालेलाल झाला. मजहर माझ्या मागे होता त्यामुळे त्याचा चेहेरा दिसला नाही पण त्याला ही आश्चर्य वाटलं असावं, पण भालेकरला मी ओरडल्यामुळेत्याला मनातून आनंद झाला असावा. भालेकर माझ्यावर काहीतरी ओरडणार होता पण मालविकाने त्याला हाताने खूण करून गप्प राहायला सांगितलं. ते दोघं निघून गेले आणि खोलीत आम्ही दोघंच होतो.तिने माझ्याकडे निरखून पाहिलं जणूकाही माझा अभ्यास केला आणि म्हणाली,
“ तुझा मास्क काढून टाक.तू कसा आहेस मला बघायचंय.” मी बाथरूम मधे जाऊन मास्क काढला.बाहेर आलो.मी टेबलाजवळ उभा होतो आणि ती माझ्याकडे बघत होती.खाटिक जसा त्याच्या समोरच्या प्राण्याकडे बघेल तशी नजर वाटली मला.
“ बस खाली.” ती म्हणाली.मुद्दामच मी न बसता खिडकी पर्यंत चालत गेलो आणि बाहेरची सुंदर बाग बघत बसलो. माझी पाठ तिच्याकडे किंचितशी वळली होती.
“ खाली बस.” पुन्हा ती आवाज वाढवून म्हणाली.
“ छानच आहे हा बंगला आणि एकूणच सगळा परिसर.” मी तिच्या कडे दुर्लक्ष करत म्हणालो.
“ मी जेव्हा एखाद्याला काही सांगते तेव्हा त्याने ते ऐकायचं असतं, निमूटपणे.” ती म्हणाली.
मजहरने मला या बाई बद्दल टिप दिली होती.मी ठरवलं होतं, तिला वरचढ होवून द्यायचं नाही.
“ मला रोज पाच हजार पगार मिळतोय, तुमच्या नवऱ्याचा तोतया म्हणून काम करण्यासाठी.मी सहकार्य करायचं ठरवलं आहे हे खरं असलं तरी याचा अर्थ असा होतं नाही की ज्या बाईला दुसऱ्याशी कसं बोलायचं याचे शिष्ठाचार पाळता येत नाहीत त्या बाईचं मी सगळं ऐकावं. भले मग ती बाई कितीही सुंदर असली तरी.”
तिने चमकून माझ्याकडे बघितलं.मी असं बोलेन अशी तिची अपेक्षा नसणारच.रागाने तिचा चेहेरा लालेलाल झाला. आणि अचानक ती एकदम हसली. सामान्य स्त्री प्रमाणे झाली.
“ ओह! प्लीज या इथे, माझ्या जवळ बसा.” ती उद्गारली.
मी तिला वाटत असेल त्यापेक्षा पोचलेला होतो.फिल्म इंडस्ट्रीने मला अनेक चढ उतर दाखवले होते.टोकाची फसवणूक आणि टोकाचं प्रेम मी अनुभवलं होतं.तिच्या या बदललेल्या रुपाला मी भुलणार नव्हतो.मी तिच्या जवळ आलो पण तिने सांगितल्याप्रमाणे तिच्या शेजारी बसलो नाही, तिच्या समोरच्या खुर्चीत बसलो.
“ तुझं थोबाड त्या माकड तोंड्या मजहर कडून सुजवून घ्यायला मला आवडलं असतं.” ती म्हणाली. तिच्या चेहेऱ्यावर हास्य होतं.
“ खुशाल बोलवा.माझ्या वाट्याला जायची हिंमत तो करणार नाही.अलरेडी एका बॉक्स मधे त्याला आडवा केलाय. दोन दिवसच झालेत त्याला. ”
मी हसलो.ती ही माझ्या हास्यात सामील झाली.
“तुम्हाला पळवून आणायची कल्पना माझी नव्हती.माझ्या सासूची होती.ती स्वत:ला डिक्टेटर समजते हिटलर सारखं.”
ती जरा नमली होती.मी विचारलं, माझं हे सोंग तिला कसं वाटतंय म्हणून त्यावर तिने मनापासून समाधान व्यक्त केलं पण तिच्या म्हणण्यानुसार माझा आवाज अजून ‘तयार’ झाला नव्हता.त्यावर मी मेहेनत घ्यायला हवी होती.मी अभिनेता असल्याने मला इतरांच्या आवाजाची नक्कल करणे जमण्यासारखे होते.मी खऱ्या प्रजापती चा आवाज ऐकला नव्हता. तो ऐकला की मी ते करू शकेन असं तिला सांगितलं.तिच्याकडे तिच्या नवऱ्याच्या आवाजातल्या काही भाषणांचं रेकोर्डिंग होतं.त्यावरून मी सराव करावा असं तिने सुचवलं.मी तिला म्हणालो, “ तुम्ही तुमच्या नवऱ्याला काय म्हणता आणि नवरा तुम्हाला काय म्हणतो हे मला माहित नाही पण सुरक्षेच्या दृष्टीने आपण इथून पुढे एकमेकांना त्याच नावाने हाक मारत जाऊ असं मला सुचवायचं आहे.”
तिने आधी माझ्याकडे संशयाने पाहिलं पण विचार करून उत्तरली, “ मी त्याला प्रखर म्हणते आणि तो मावी म्हणतो मला.”
“ छान मावी.” मी मुद्दामच तिचा नवीन नावाने उल्लेख करून म्हणालो.ती बाहेर जातांना म्हणाली,
“ तुला ते रेकोर्डिंग ऐकून सराव झाला की मला भेट. ”
मला आता आत्मविश्वास आला की मालविका कडून मला काही प्रॉब्लेम येणार नाही.मी सराईतपणे बार कडे गेलो आणि स्कॉच घेतली. प्रजापतीचा मास्क तोंडावर नसतांना सुद्धा मला एवढा आत्मविश्वास कसा आला? माझं मलाच नवल वाटत होतं. थोड्या वेळाने मजहर आला, त्याने टेपरेकॉर्डर आणलं होता.त्यात त्याच्या बॉस च्या भाषणाच रेकोर्डिंग होतं. माझ्या हातात टेप देतानाच तो म्हणाला, “मॅड़म ना खुष केलंयस तू.” जातांना माझ्या कडून जेवणाची ऑर्डर घेऊन गेला.
मी टेप चालू करून चार पाच वेळा प्रजापतीचा आवाज ऐकला.तो एक वेगळाच आवाज होता.एक प्रकारची हुकुमत असलेला.ऐकताना माझं लक्ष त्याच्या शब्दांकडे नव्हतं, त्याच्या उच्चाराकडे होतं. तो थांबतो कुठे, हेल कसे काढतो, अशा सारख्या बाबी मी जाणून घेत होतो.हे रेकोर्डिंग म्हणजे प्रजापतीने आपल्या ब्रोकर ला दिलेल्या सूचना होत्या.कुठले शेअर्स घे, कुठले विक, या बद्दलच्या. थोडी कॅसेट रिकामी होती, म्हणजे त्यात काहीच रेकॉर्ड केलेलं नव्हतं.मी त्या जागी माझ्या आवाजात म्हणजे प्रजापतीच्या आवाजाची नक्कल करत, तशाच प्रकारच्या ब्रोकरला देण्याच्या सूचना रेकॉर्ड केल्या.नंतर मी पुन्हा संपूर्ण कॅसेट पहिल्या पासून शेवट पर्यंत ऐकली. तेवढ्यात मजहर जेवणाची ट्रॉली घेऊन आला. मी हुबेहूब प्रजापती चा आवाज काढून म्हणालो,
“ छान वास येतोय मजहर.”
“ माय गॉड ! तू आहेस होय! क्षणभर मला प्रजापती सर बोलत असल्याचा भास झाला. ” मजहर उद्गारला.
“ लौकर वाढ मजहर, खूप भूक लागल्ये मला.” प्रजापतीच्या आवाजात मी म्हणालो आणि मजहर पुन्हा हादरला.
“ मानलं तुला.” मजहर पुन्हा म्हणाला, आणि माझ्या हातात त्याने पाच हजाराचा ड्राफ्ट ठेवला.
***
दुपार नंतरची वेळ मजहर बरोबर टेनिस खेळलो.माझ्याकडे मालविका खेळत असताना बघत होती.मी तिच्याकडे बघितलं तर ती खिडकीत नव्हती. मजहरने नंतर मला सराव व्हावा म्हणून त्यांच्या घरातल्या नोकर मंडळींच्या दृष्टीस पडेल अशा पद्धतीने घरातून फिरवून आणलं. मी त्यांच्याशी थेट न बोलता त्यांच्या समोर मजहरशी काहीतरी बोलत राहिलो, प्रजापतीच्या आवाजात. नोकरांपैकी कुणालाच संशय आला नाही.मी माझ्या खोलीत परतलो.मजहर ही गेला.संध्याकाळी सात वाजता माझा इंटरकॉम वाजला.मी प्रजापतीच्या आवाजात कोण बोलतंय याची चौकशी केली.ती मालविका होती.
“ तू जबरदस्तच जमवलं आहेस.” ती म्हणाली. “ आपण आज नऊ वाजता डायनिंग हॉल मधे भेटू.भालेकर असेलच.मजहर सांगत होता की तू सगळ्या नोकर मंडळीना वेडं केलंस.कुणालाही संशय आला नाही.ही खूप मोठी टेस्ट झाली तुझी.” फोन बंद झाला.
मला ड्रिंक घ्यायची इच्छा झाली.बर्फ कुठे आहे मला सापडलं नाही.मजहरने मला त्या बंगल्यातल्या किचन विभाग, नोकरांच्या खोल्या या सगळ्यांचे इंटरकॉम नंबर देऊन ठेवले होते.मी किचन मधे फोन लावला.
“दक्ष बोलतोय सर.” पलीकडून आवाज आला.
“ मला बर्फ हवाय ड्रिंक साठी.” माझ्यातला प्रजापती चा आवाज म्हणाला.
“ निळ्या फ्रीज मधे खालच्या बाजूला आहे सर.मी येतो लगेच.” दक्ष म्हणाला. आणि फोन ठेवला गेला.
मी मास्क घातला नव्हता.
माझा अति आत्म विश्वास माझा घात करणार होता.त्याला येऊ नको सांगेपर्यंत त्याने फोन ठेवला होता.
दक्ष आला की आधी फ्रीज मधला बर्फ काढायला जाईल म्हणून मी तो यायच्या आत दार आतून उघडून ठेवलं. आणि फ्रीज पासून दूर फ्रीज कडे पाठ करून मी उभा राहिलो.दक्ष येताच मी प्रजापतीच्या आवाजात त्याला म्हणालो.
“ मी माझं ड्रिंक स्वत: घेईन.बर्फ काढून तिथेच फ्रीज शेजारी ठेव, आणि जा.मला काही खाजगी फोन करायचेत.”
दक्ष त्याच काम करून गेला.
वाचलो.
रात्री आठ वाजता मजहर आला.ताने मला मास्क घालून तयार राहायला सांगितलं आणि कपाटातून एक हटके ड्रेस काढून मला घालायला दिला.
“ डिनर साठी वेगळा ड्रेस घालायची इथे पद्धत आहे.” मजहर म्हणाला.
मी ड्रेस चढवला.
“ अजून महत्वाच्या टिप्स देऊन ठेवतो. प्रजापती सर फार जेवत नाहीत. तेव्हा अधाशा सारखे खाऊ नको.दक्ष वाढायला येईल.त्याच्या बरोबर मदतीला काही मुली असतील पण त्याची काळजी करू नको.दुसरी गोष्ट म्हणजे बॉस अबोल आहेत. नोकरांबरोबर तर ते संभाषण करतच नाहीत. उगाचच त्या मुलींबरोबर बोलायचा प्रयत्न करू नको. तिसरी गोष्ट म्हणजे बॉस ड्रिंक सुद्धा घेत नाहीत किंवा स्मोकिंग करत नाहीत.”
ही शेवटची टिप मात्र मला फार धोकादायक वाटली.बॉस ड्रिंक घेत नाहीत ! आणि मी मात्र थोड्या वेळापूर्वी दक्ष ला ड्रिंक साठी बर्फ दे म्हणून सांगून बसलो होतो. आता होईल ते जाईल.कदाचित दक्ष ते विसरूनही जाईल.
“” ते काहीच करत नाहीत तर निवांत असतात तेव्हा काय करतात?”
मी मजहरला विचारलं.
“ मालविका आहे ना ” मार्मिक पणे मजहर म्हणाला.
नऊ वाजता आम्ही विशाल अशा डायनिंग हॉल मधे गेलो.मध्यभागी टेबल होतं.शंभर माणसं जेवायला सहज बसली असती एवढा हॉल होता.बिस्कीट कलरच्या इव्हिनिंग गाऊन मधे मालविका आली होती.मला बघताच तिने पुढे येऊन माझ्या गालावर तिचे गाल टेकवले.मला तिचा मादक परफ्यूम जाणवला.
“ आज तुझ्यासाठी दक्ष ने नवीन डिश बनवल्ये.” मालविका म्हणाली. इतका सुंदर वास येत होता सगळ्या पदार्थाचा की कधी एकदा मी ताव मारतोय असं झालं होतं. मला मजहर ने दिलेली टिप आठवली
“ मला फार खायचं नाहीये.” हे शब्द उच्चारायला मला फार श्रम पडले.
दक्ष ने माझ्यापुढे सलाड ठेवलं. मी खायला सुरुवात करणार तेवढ्यात मजहरने खोकून मला सावध केलं.
पण माझ्याच्याने मोह टाळता येईना. आणि मी संधी घायची असं ठरवलं.
“ मालविका मला डॉक्टरने जे औषध बदलून दिलंय ना, मार्टीनी मधून मिक्स करून घ्यायला सांगितलंय ते, त्यामुळे मला चक्क भुकेची जाणीव व्हायला लागल्ये.कारण मगाशीच मी ते घेतलं.मी ड्रिंक घेत नसलो तरी औषधासाठी घ्यावी लागली मला मगाशी मार्टीनी.. पण उपयोग झालाय असं दिसतंय.”
त्या नंतर दक्ष मला देत होता ते मी खात सुटलो. भालेकर मला अधून मधून धंद्याच्या गोष्टी सांगण्याचं नाटक करत होता आणि मी त्यावर काही बाही सूचना करत होतो.
“ छान चाललंय तुझं नाटक. ” माझ्या जवळून जात मालविका म्हणाली, “ आता तुझ्या खोलीत जाऊन विश्रांती घे.”
मी खोलीत आलो. म्हणजे,मजहर मला घेऊन आला. दार लावता लावता तो मला सांगायचा प्रयत्न करत होता,
“ मी तुला सांगत होतो......”
“ गप्प बस! तू कोण समजतोस स्वत:ला? प्रजापती ला काही सल्ला द्यायची तुझी हिंमतच कशी होत्ये?” मी म्हणालो आणि त्याच्या तोंडावरच दार आपटून बंद केलं.मला वाटलं होतं की तो पुन्हा येईल माझ्याशी बोलायला पण आला नाही.एकंदरित तो माझ्या नियंत्रणाखाली आला होता. मालविका सुद्धा माझ्या पुढे बोलत नव्हती उलट माझं कौतुकच करत होती. राहिला विषय भालेकरचा. तो नियंत्रणात आला नव्हता माझ्या पण पूर्वी सारखा सतत माझ्यावर वचक ठेवायचा प्रयत्न करत नव्हता. मला आजचा पूर्ण दिवस फलद्रूप झाल्यासारखं वाटलं.
मला रात्री गाढ झोप लागली. खूप गाढ.रात्री माझ्या स्वप्नात मालविका आली आणि आम्ही प्रणय केल्याची दृश्य मी पाहू लागलो. पहाटे मला जाग आली आणि पाहतो तर माझ्या बेड वर मालविका होती.....
म्हणजे रात्री मी जे अनुभवलं ते स्वप्न होतं की खरं?
दक्ष कॉफी घेऊन आत आला.
“ मी देते त्यांना.जा तू.” ती दक्षला म्हणाली.तिनेच दोन्ही कपात गरम पाणी आणि पावडर टाकून ढवळली आणि वरून नाममात्र दूध टाकलं. आपण चहाला घालतो तेवढंच. तिचा छान मूड बघून मी विचारलं,
“ प्रजापती कुठे आहे?”
“ माझ्या समोर आहे.” माझ्या जवळ सरकत ती म्हणाली.
“ खरा नवरा तुझा.” मी म्हणालो.
“ आता तुला सांगायची वेळ आल्ये चंद्रहास. ” ती म्हणाली.
मी ऐकायच्या तयारीत बसलो.
“चंद्रहास, खूपच अवघड आणि क्लिष्ट अशा परिस्थितीत आम्ही सापडलोय. माझा नवरा कोण आहे त्याची झेप किती मोठी आहे हे तुला सांगायची गरज नाही.”
“ मला कल्पना आहे.” मी म्हणालो.
“ मी तुला जे सांगणारे ते खूप गुप्त आणि खाजगी आहे.ऐक, माझा नवरा प्रखर एका मानसिक आजाराची शिकार झालाय दोन वर्षापूर्वी.असा आजार जो कधी बरा होणार नाही.त्याची सुरवात स्मृती कमी होणे, असंबद्ध बोलणे, निष्क्रियता अशा लक्षणापासून झाली. माझी आणि त्याची पहिली भेट झाली तेव्हापासूनच ही लक्षणं सुरु झाली होती पण मला वाटलं की मोठ मोठे अनेक व्यवसाय एकाच वेळी सांभाळावे लागत असल्याने डोकं चक्रावून जात असल्याने तो असा वागत असेल.मागच्या सहा महिन्यापासून या लक्षणात वाढ होतं चालल्ये.माझ्या आधी त्याच्या आईच्या हे लक्षात आलं.एका तज्ज्ञ डॉक्टरला आम्ही दाखवलं, त्याने निदान केलं की काही महिन्यातच हा पूर्ण होत्याचा नव्हता होईल.बरे होण्याची काहीही शक्यता नाही. त्याच्या सर्वदूर पसरलेल्या उद्योगांचा पसारा बघता ही बातमी बाहेर पसरणं धोकादायक होतं.भालेकर हा त्याचा उजवा हात असला तरी त्याला प्रखर करत असलेल्या मोठाल्या व्यवहारांची माहिती नाही.आधी जे घडून गेलय तेवढंच त्याला माहिती आहे. भविष्यात जे व्यवहार होणार आहेत, म्हणजे प्रक्रियेत आहेत ते पूर्ण करण्यासाठी प्रखर ची प्रत्यक्ष उपस्थिती आणि सह्यांची गरज आहे.तासाठीच तुला त्याचा तोतया म्हणून आणलं आहे.नाहीतर हे साम्राज्य बघता बघता ढासळेल.”
“ का? ढासळेल का?”
“ कारण काही मोठी डील्स पुरी करण्यासाठी त्याने अनेक बँकातून आणि सावकारांकडून मोठाले कर्ज घेतले आहे. या सर्वांना जर कळलं की प्रखर प्रजापती ला अशा प्रकारचा आजार झालाय तर त्याची बाजार पेठेतील पत संपेल आणि ते सर्व देणेकरी त्याच्याकडे पैसे मागतील.ते आम्हाला होऊन द्यायचं नाहीये.एकदा या सर्व डील्स वर प्रजापती च्या म्हणजे तुझ्या सह्या झाल्या आणि तू प्रजापती म्हणून सह्या करायला तिथे हजर झालास की आम्हाला काळजी नाही. नंतर तो आजारी पडल्याची बातमी समाजात लिक झाली तरी तो पर्यंत संचालक मंडळ भालेकरला सर्वाधिकार देईल आणि प्रजापती चं साम्राज्य अबाधित राहील.”
“ भालेकर साठी ही मोठी संधी असेल.” मी म्हणालो.
“ अत्ता पर्यंत तू प्रखरचं सोंग खूप छान वठवलंस. काही क्षण तर तू स्वत:ला प्रखर मार्तंड प्रजापती समजलास.”
“ आम्ही अभिनेते कधीकधी भूमिकेत वाहून जातो.” मी म्हणालो.
तिने माझ्या वरून आपली नजर एखाद्या स्कॅनर सारखी फिरवली.
“ तू प्रखर होवू शकतोस.” ती अचानक म्हणाली.
“ मी नाहीये प्रखर.”
“ मी म्हणाले की तू असू शकतोस.”
मी तिला विचारलं की खरा प्रजापती कुठे आहे त्यावर ती म्हणाली याच इमारतीतल्या दुसऱ्या विंग मधे त्याला ठेवलंय.त्याच्या देखरेखीसाठी चौवीस तास एक माणूस ठेवला आहे. त्याला मोठा पगार दिला जातो.माझ्या मनात समीप आणि गंधार बद्दल आलेली बातमी आली.ज्यावेळी सर्व डील पूर्ण होतील आणि भालेकर ला प्रजापती चे अधिकार मिळतील तेव्हा प्रजापती ची सेवा करणाऱ्या माणसाचं तसच होईल. माझ्याशी रोमान्स करणाऱ्या प्रजापतीच्या या बायको बद्दल मला बिलकुल भरोसा नव्हता.त्यांच्या कुटुंबातील एवढं रहस्य तिने मला सांगितलं होतं तर त्यांची गरज भागल्यावर मला थोडंच जिवंत ठेवलं जाणार होतं !
अचानक तिने माझ्या गळ्यात हात टाकून माझा निरोप घेतला.
“ मी पुन्हा रात्री आले तर चालेल? ”
“ हे आपल्यात जे काही चाललंय त्याची मजहरला कल्पना आहे?” मी विचारलं.
“ त्याची काळजी करू नको.लक्षात ठेव, तू प्रखर होवू शकतोस. उद्या तुला भालेकर आपल्या ऑफिसात नेईल.”
नक्की काय म्हणायचं आहे तिला? तिचा काहीतरी मोठा प्लान चालू असणार.पण काय नेमका.मला अजून बरीच माहिती तिच्याकडून काढून घ्यायला लागणार होती.सध्या मला एवढंच समजलं होतं की प्रखर प्रजापती याचं अवाढव्य बंगल्यातल्या एका विंग मधे शेवटच्या घटका मोजत होता आणि या कुटुंबाचं हे साम्राज्य कर्जाऊ घेतलेल्या मोठ्या रकमेवर उभारलं गेलं होतं आणि प्रखर प्रजापती लौकरच संपणार आहे ही एकच बातमी हे साम्राज्य उध्वस्त करायला पुरेशी होती.
सकाळी मजहर मला तयार करायला आला. मला ऑफिस साठी खास सूट आणि पेन दिलं. गाडीत तो ड्रायव्हरच्या शेजारी बसला भालेकर आणि मी मागे. वाटेत भालेकर हातातल्या कागदपत्रावर नजर फिरवत होता.
“ आपण गाडीतून उतरल्यावर मजहरच्याच बरोबर रहा. प्रेस रिपोर्टर ऑफिसच्या इमारतीजवळ असतील.पण आपले बॉडी गार्ड त्यांना तुझ्याजवळ येऊ नाही देणार. मी प्रजापती सरांच्या आधीच्या सेक्रेटरी ऐवजी सानवी सेन नावाच्या नवीन मुलीला तुझी खाजगी सेक्रेटरी म्हणून नियुक्त केलंय.तिने प्रजापतीला पाहिलेलंच नाही त्यामुळे तुला काळजीचे कारण नाही. दुसऱ्या कुठल्याच स्टाफ ला भेटायची वेळ येणार नाही.” भालेकर म्हणाला.
“ तू म्हणशील तसं भूप ” मी मुद्दामच त्याचा नावाने उल्लेख करून म्हणालो.
“ आजूबाजूला दुसरं कोणी नसेल तर मला भालेकर म्हणायचं तू.तुला सांगितलं होतं मी. ”
“ गप्प बस.” मी प्रजापतीच्या आवाजात ओरडून म्हणालो.तो काहीतरी गुरकवायला गेला.पण मीच त्याला म्हणालो,
“ नीट ऐक, मी प्रजापती आहे, बॉस आहे तुझा.जास्त दमात घ्यायला बघशील तर मी इथून बाहेर पडल्यावर लगेच प्रेस समोर जाईन, माझा बुरखा काढेन आणि मी कोण आहे हे त्यांना ओरडून सांगेन.माझं काय व्हायचंय ते होवो. तुमच्या साम्राज्याचं काय होईल ते बघ आणि मुख्य म्हणजे तुला येऊ घातलेल्या संधीचं काय होईल याचा विचार कर.”
भालेकर ला हे अनपेक्षित होतं.त्याने डोळे वटारून माझ्या डोळ्यात बघितलं.मला मालविकाचे शब्द आठवले,
‘ तू प्रखर होवू शकतोस.’ आणि माझी भीड चेपली. मी ही त्याच्या नजरेला नजर भिडवली.भालेकरने त्याची नजर दुसरीकडे वळवली. माझा जय झाला होता.भालेकर हळूहळू माझ्या कह्यात यायला लागला होता.
***
खाली उतरल्यावर भालेकर म्हणाला त्या प्रमाणे प्रेस रिपोर्टर आले होते पण बॉडी गार्ड नी त्यांना लांबच ठेवले.मजहर मला लिफ्ट ने चोविसाव्या मजल्यावर घेऊन गेला.लिफ्ट चं दार थेट प्रजापतीच्या केबिन मधेच उघडलं. भालेकरने मला प्रजापतीच्या खुर्चीवर बसवलं एखाद्या बिलियर्डसच्या टेबला एवढं टेबल होतं आणि त्यावर बऱ्याच फायली आणि कागदपत्र ठेवली होती.
“ आज तुला बऱ्याच सह्या करायच्या आहेत.सर्व महत्वाची अशी कागदपत्र आहेत.” मला सूचना देऊन भालेकर बाहेर गेला.जातांना मजहरला जबाबदारी देऊन गेला. मी एक रफ पेपर घेतला आणि त्यावर सराव होण्यासाठी एक सही केली.बरोब्बर जमली होती. मी तो कागद फाडून डस्ट बिन मधे टाकला. आता मला कामाला सुरुवात करायची होती. मी माझ्या कडच्या सोनेरी केस मधून सिगारेट बाहेर काढली आणि एक झुरका मारला.
“ बॉस स्मोकिंग करत नाहीत.” मजहर म्हणाला.
“ नव्या सेक्रेटरीला, सानवीला ते माहित नाहीये.” मी त्याला फटकारलं
पाठोपाठ सानवी हातात काही फाईलआणि कागदपत्र घेऊन आली. चिकणी चोपडी पोरगी होती.मी तिच्याकडे बघतच राहिलो.गुड मॉर्निंग म्हणून तिने माझ्या समोर पेपर्स ठेवले.आणि ती जायला निघाली तेवढ्यात भालेकर आला.त्याच्या समोर मी मुद्दामच तिला उद्देशून म्हणालो,
“ मला ते अॅग्रीमेंट टाईप करून आणून दे.”
“ यस सर. ” ती म्हणाली आणि बाहेर गेली.
“ मला पुन्हा एक नमुन्याची सही दाखव ” भालेकर म्हणाला. मी भालेकर ला एका कागदावर प्रजापतीची सही करून दाखवली.त्याने मान डोलावली.
“ मजहर, त्याच्या बाजूला बसून सगळ्या कागदपत्रावर सह्या घे.” भालेकर म्हणाला आणि बाहेर पडला.
त्या नंतर मी जवळ जवळ पन्नास कायदेशीर दस्त आणि शंभरच्या आसपास पत्रावर सह्या केल्या असतील.त्यात काय लिहिले आहे मला कळायला मार्ग नव्हता पण मी चलाखीने हा पत्र व्यवहार किंवा करार कोणाशी होत आहेत त्याचे नाव आणि तारीख लक्षात ठेवली. दुबई सरकारच्या इन्फ्रास्ट्रक्चर मंत्रालयाशी हे पत्र व्यवहार किंवा करार होत होते. त्यांना प्रजापती कंपनीतर्फे कोणतेतरी इन्फ्रास्ट्रक्चर उभारून देण्यात येणार होते. सर्व सह्या झाल्यावर मजहरने इंटरकॉम वरून सेक्रेटरीला बोलावावून घेतलं आणि फायली घेऊन जा म्हणून सांगितलं.जातांना मी तिला कॉफी पाठव म्हणून सांगितलं. ती हो म्हणून बाहेर गेली.मजहरने त्यावर नाराजी व्यक्त केली.
“ बॉस कधीच कॉफी घेत नाहीत.” तो म्हणाला.
“ हे तिला कुठे माहित्ये? माझ्या सारखी ती नवीन आहे.” मी म्हणालो.थोड्या वेळातच सानवी सेन आली.माझ्या कपात कॉफी ओतली.मला तिच्याशी एकांतात बोलायची इच्छा होती पण हा गोरिला जवळ असल्याने ते शक्य नव्हतं.
भालेकर आत आला.
“ तुला आता काही फोन कॉल्स करायचे आहेत.कोणाशी काय बोलायचं ते मी लिहून देईन.त्या बाहेर काही बोलायचं नाही. समजलं?” भालेकर म्हणाला. “ अर्थातच प्रजापतीच्या आवाजात.”
“ तू म्हणशील तसं भूप.”
त्याने अमोघ अंगारे नावाच्या एका मध्यस्ताला फोन लावला.आणि मला बोलायला लावलं. फोन स्पीकर वर ठेवल्याने अमोघ काय बोलतोय ते भालेकरला समजात होतं आणि मी काय बोलायचं ते तो पटकन लिहून देत होता. अमोघ हा कर्ज मिळवून देणाऱ्या एका फर्म चा प्रमुख होता. तो माझ्याशी म्हणजे प्रजापती शी गेले काही दिवस संपर्क करायचा प्रयत्न करत असल्याचं त्याने सांगितलं. कर्ज मिळणे कसं अवघड आहे हे तो मला सांगायला लागला.भालेकर ने लिहून दिल्या नुसार मी त्याला म्हणालो,
“ अमोघ, हे सगळ तू भूपशी बोल.कर्ज मिळवणे वगैरे तोच बघतो. तुला तीनशे कोटी कर्जावर तुझं ५% कमिशन सोडायचं असेल तर मी दुसरा एजंट बघतो. ” मी म्हणालो आणि फोन कट केला. भालेकरने मला तसंच करायला सांगितलं होतं.
या नंतर आणखी काही फोन मी प्रजापतीच्या आवाजात केले. भालेकरच्या चेहेऱ्यावर समाधान दिसले.
“ आता घरी जा.” भालेकर म्हणाला
आजचा दिवस छान गेला होता.मला सानवी सेन भेटली होती.तिच्याशी एकांतात जरी बोलता आलं नसलं तरी ती मला आवडली होती.तिच्यात काहीतरी खास होतं.सारखे तिचे विचार मनात येत होते.आणखी विचार येत होते ते म्हणजे प्रजापती ची कंपनी मोठ्या रकमेचे कर्ज उभारण्याचा तयारीत होती. खरा प्रजापती मरणासन्न अवस्थेत याच इमारतीच्या दुसऱ्या भागात शेवटच्या घटका मोजत होता हा तिसरा विचार !
“ चंद्रहास, तू प्रखर होवू शकतोस.” मला मिसेस प्रजापती चे शब्द आठवले.पट्ट्या, तू जरा सर्व नीट जमवलस तर तू प्रखर प्रजापती होऊ शकतोस.
विचारांच्या नादात मी घरी कधी पोचलो ते कळलंच नाही.
( प्रकरण ४ समाप्त.)