Separate agreement in Marathi Short Stories by Shabdbhramar books and stories PDF | वेगळा करार

Featured Books
Categories
Share

वेगळा करार

आमचं लव्ह कम अरेंज मॅरिज.. 😍
म्हणजे आम्ही दोघांनी घरी आमचं आहे हे सांगितल्यावर एक बारीकसा विरोध करण्याचा उभयपक्षांकडून हलकासा प्रयत्न झाला तसा मी माझ्या घरच्यासमोर डोक्याला लाल बावटा बांधून बंडखोर झालो. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला झुरळाला मारतात तसं कधी बेगॉन तर कधी पॅरागॉन अशा अस्त्रांनी नामोहरम करत हरवले. माझ्या विभावरीने पापा की परीवाली व्याकुळताभरी भूमिका तिच्या पप्पांसमोर घेत त्यांना पहिल्यांदा राजी केले. तिच्या आईचा पण सुरुवातीला विरोध होता पण, 
"तुम्ही आणि तुमची लेक काय ते बघून घ्या, उगाच माझ्यावर नंतर कसलं बालंट नको." असे म्हणून तिच्या इच्छेला नकळत पाठिंबा दिला. 

आमच्याकडून फार काही नातेवाईकांचे लुडबुड करणारे लटांम्बर नव्हतेच. त्यामुळे ती अडचण माझ्या वाट्याला आली नाही. पण तिचे घर मोठ्या खटल्याचे होते. त्यांना भावकी, पै पाहुणे सगळ्यांना उत्तरे द्यावी लागणार होती. विभावरीच्या स्थळासाठी पहिलेच काहीजण गावाकडून दबाव टाकत होते. म्हणजे अशी सुंदर, गुणी मुलगी आपल्याच नात्यात द्यावी असे तिचे काका, आजी, आजोबा वैगरे माझ्या भावी सासर्याना समजावू पाहत होते. मी एकतर नात्यातला ना गोत्यातला कसं काय आपल्या सोन्यासारख्या पोरीला कोणाच्याही हवाली करायचं? असं तिच्या आज्जीचं आणि पर्यायाने सर्वांचं म्हणणं होतं. त्यासाठी त्यांनी प्रयत्न देखील केला.🫤

एकदा ती संध्याकाळी ऑफिसवरून घरी आली तर समोर पाच सहाजण बसले होते. "दोन तिच्या वडिलांएवढे, एक माझ्या एवढा आणि दोन तिच्या आईएवढ्या बाया इतक्या माणसांची मोळी घरात पडली होती."😠  तिने तरी असं वर्णन केलं.

तिला पोहे बनवायला आणि तयार व्हायला तिच्या आईकडून सांगण्यात आलं. तिचे बाबा हळूच तिच्याकडे आतल्या खोलीत गेले. 
"अगं फक्त औपचारिकता आहे. तुझी आजी ऐकत नव्हती म्हणून म्हणलं ठीके बघायला येऊ देत. रागावू नकोस. पुढे काहीही होणार नाहीये." असं आश्वासन त्यांनी दिलं.

विभाने तोंड बारीक करून पोहे बनवले. पण तिच्या लटकलेल्या तोंडाची कडवटता त्या पोह्यांमधे उतरली होती हे तिच्या बाबासहित सगळ्याना समजले होते.
"चांगली बचकभर हळद टाकून दिली पोह्यात."🫤
असा पराक्रम मला तिने नंतर ऐकवला. पराक्रमी आहे तशी बायको माझी ! 😍

तर, शेवटी तिनेपण हट्टाची परिसीमा गाठत सगळ्यांना चित केले. मग आमचा कौटुंबिक भेटण्या आणि बघण्याचा औपचारिक कार्यक्रम पार पडला. लग्न ठरले. तारखा निघाल्या. सगळं मस्त, झकास,स्वप्नवत पार पडलं. आमची पूजा , हनिमून सगळं साग्रसंगीत झालं. मग काही दिवसांनी आला गावाकडून फोन तो हि मला, आणि तो हि विभाच्या आजीचा.😱

"हालो !! मी बोलतीये. विभाची आजी." आमची पहिल्यांदाच बोलायची वेळ होती. लग्नात पण बोलल्या नाही आजी माझ्याशी. 🙄 पण म्हातारी माणसे थोडी बालिशपणाकडे झुकतात हे माहित असल्यामुळे मी त्यांच मनावर कधीच घेणार नाही हे विभाला मी सांगितलं होतं.

" हा आजी बोला की! "

" आता लगीन लागून म्हयना झाला की, गावाला यायचं मनावर घ्या जावय. " त्या म्हणाल्या.

पहिल्यांदा त्यांच्याकडून मला हे संबोधन मिळालं होतं. 
"जावय" 😁

" हा येतो की." मी बोललो.😁

" बरं. बरं. " म्हणून त्यांनी फोन ठेवला.

" सुट्या झाल्या आहेत आत्ताच. तेव्हा विकेंडला प्लॅन करावं लागेल.. तुमची तब्येत कशी आहे.. लग्नात धावपळ झाली असेल ना... " वैगरे वाक्ये मी सुरु करताच माझ्या मनातच घुमली.🥴

विभा हेडफोनचा दुसरा प्लग कानात खुपसून ऐकत होती. 
ती माझ्याकडे बघून हसत सुटली. 
"आजीची आणि तुझी खुन्नस कायम राहणार असं दिसतंय.😂" ती म्हणत होती.

पुढल्या महिन्यात एका विकेंडला आम्ही त्यांच्या गावी गेलो. गावातल्या रस्त्यातच गाडीतून जाताना मला "काय पाव्हणं?" म्हणत हात दाखवणारे 2 डझन लोकं तरी भेटले. सगळ्यांना माहिती होतं मी पाटील आजीचा जावय. पण मला उगाच पेशल वाटत होतं. सेलिब्रेटीगत. 😁

संध्याकाळी मस्त त्यांच्या शेतावर फेरफटका मारून, स्पेशल चुलीवरच जेवणं केलं. त्यांच्या बंगल्याच्या गच्चीत. टिपूर चांदण्याखाली माझ्या मेव्हणे आणि मेव्हण्याच्या गराड्यात गप्पा मारत अंथरुणात पडलो होतो. शेजारी माझा मेहुणा आणि त्याच्यापलीकडे एका खाटेवर माझी बायको आणि मेव्हणी झोपले होते. काहीवेळाने निजानीज झाल्यावर माझ्या कानावर एक स्पर्श जाणवला. मला कळलं विभा खोड्या काढतीये. झोपताना माझ्या कानाची पाळी चूरगळायची सवय तिला लागली होती. पण तिच्या घरी पहिल्यांदा राहायला आल्यामुळे तिला जरा जास्तच ऊत आला होता. एवढ्या लांबून मला चॅलेंज करतीये.

मी पण तिच्या खोडीला उत्तर देणारं होतो. मुद्दाम मेव्हणीच नावं घेतलं आणि 
"आसावरी!! झोप शांत. विभा उठेल." असं मी तिला. म्हणालो तसं तिने जोरात माझा कान ओढला. मी कळवळलो.

"काय बया!!" 😬 असा आवाज आला,  तसं आम्हाला नीट झोपलोय की नाही हे बघायला आलेल्या आजीबाई पाठमोऱ्या जाताना दोघांना दिसल्या. जाताना डोक्याला हात लावून काहीतरी पुटपुटत होत्या. ते पहात विभा हसून हसून गुदमरली होती आणि मी डोक्याला हात मारून बसलो होतो. आजी काय विचार करत असतील? असं वाटत होतं मला.

"आपल्याच गावाकडच्या आजीच्या शिस्तबद्ध घरात आजीसमोरच हे किडे करायला मिळतील मला असं कधीच वाटलं नव्हतं मला. " असं ती म्हणाली.🤭🤭

सकाळी प्रसन्न वातावरणात जाग आली. पण मला काही झोपून राहावेसे वाटेना. सहा वाजलेले. मी वरतीच असलेल्या आम्हाला दिलेल्या खोलीत जाऊन फ्रेश झालो आणि शूज घालून जरा फिरून येऊ म्हणून बाहेर पडलो. बायको आणि बाकी सगळे ढाराढूर झोपले होते. विभाची आजी देवघरात काही करत होती. माझी चाहूल लागली तशी ती डोकावली. मी दिसताच परत आत तोंड घेतलं. त्या काही बोलल्याही नाही. मग माझंही गुडमॉर्निंग वर नव्हतं आलं. 😏 पण रात्रीचा प्रसंग परत डोळ्यासमोर सरकत अस्वस्थ करुन गेला. 

तो विचार झटकत, "येऊ तासाभरात कोणाला फरक पडणारे." असा निष्काळजी विचार करुन मी निघालो. गावातल्या शेताकडे जाणाऱ्या वाटा कालच संध्याकाळी पाहिलेल्या असल्यामुळे लक्षात होत्या. त्यात गावात जवळ जवळ सगळेच मला ओळखत होते. तेव्हा चुकलो तरी प्रॉब्लेम नव्हता. विभाच्या शेतावर फिरत फिरत आलो. शेतापलीकडे लांब नदी होती आणि त्या अलीकडे मधेच एक माळ होता. तिथे मैदान होतं. पोरं सकाळी सकाळीच तिथे क्रिकेट खेळत होती. मी तिकडे गेलो. तर विभाच्या भावकीतल्या एका पोराने मला ओळखलं. 
" दाजी! या खेळाय!!" ओरडून तो म्हणाला.

वाह!! असं आमंत्रण आपल्याला थांबवतंय होय. त्यांच्यासोबत लागलो खेळायला. काही वेळाने मी रमलो आणि वेळ विसरून गेलो. मधेच मला कोणीतरी नावाने हाक मारली. मी दचकून पाहिलं. इथे कोण मला ओळखणारे? 😳

तर ऍक्टिवावर वर एकजण बसून मैदानाजवळच्या रस्त्यावरून हाका मारत होता. 🙋‍♂️
मी थोडा जवळ गेलो आणि उडलोच.
" चंदू.. चंद्रकांत.. माझा पुण्यातला मित्र." 🤩

"चंदू तू इकडे कसा? " मी विचारले.

"अरे शेजारीच गाव आहे की माझा.. बोलणं झालेलं की आपलं. साल्या प्रेमाच्या तगड्या कॉम्पिटिशन मध्यें जिंकल्यामुळं आमच्या गावाकडची अशी ट्रॉफी मिळालीये तुला बोललेलो ना मी 😂😂.. असो.. अरे इकडे बऱ्याच विकएंडला वारी असती की माझी. काय योगायोग राव?  बरा सापडलास. चल चहा घेऊ. पाचच मिनिटावर घर आहे माझं." तो म्हणाला. मी त्याला टाळू शकलो नाही आणि चहा मलाही हवा होता. 😊

चंद्या आणि माझ्या गप्पा काय संपत नव्हत्या. तासाभरासाठी फिरायला गेलेला मी तीन तासांनी मित्राच्या ऍक्टिवावर पाटलांच्या बंगल्यासमोर आलो. सकाळचे दहा वाजले होते. समोर बघतोय तर विभाची आजी पायऱ्यांवर केसं मोकळी सोडून बसली होती. विभाने मान खाली घातलेली. तिचे चुलते चुलत्या आणि माझे मेव्हणे कम्पनी. पण चिंताग्रस्त होती. गाडीचा आवाज ऐकून सगळ्यांनी मान वर केली. तशी विभा जवळजवळ धावत माझ्याकडे आली. मी गाडीवरून उतरलो.

" काय झालं विभा? " मी म्हणालो.

" कुठे गेला होतास? फोन पण बंद आहे तुझा." ती रडवेल्या स्वरात म्हणाली.

आयला खरच की. रेंज कमी म्हणून बॅटरी उतरलेला फोन चार्जिंगला लावून मी तो न घेताच निघालो होतो. लक्षात नाही आलं. 

" अगं फिरायला गेलेलो. त्यात हा चंद्रकांत भेटला. त्याच्याकडे गेलो चहाला. फोन डिसचार्ज आहे घरातच पडलाय की. सॉरी यार खूपच लेट झाला." मी सांगितलं. तेवढ्यात गेटमधून आत आसावरी येताना दिसली. तिला घेऊन विभा मागे फिरली आणि आजीकडे गेली.

"आसावरी तू कुठे होतीस? " तिने विचारलं.

" प्रतीक्षाकडे गेलेले. सकाळचा ग्रुप स्टडी करतो आम्ही त्यासाठी.  रोजच जाते की, का ग? " ती म्हणाली.

" झालं? आता मी आणि माझा नवरा एक क्षणही थांबणार नाही इथे. खूप झालं तुझं आजी. " ती ओरडून म्हणाली.

मला काहीच कळलं नाही काय झालं ते. 
" अगं अगं!!  असं काय बोलतीये? मला काहीच कळेना काय झालंय. सांगशील का जरा? "

" ह्या माझ्या आजीला गैरसमज झालेला तू आणि आसावरी कुठंतरी बाहेर गेले एकटे. तुझ्यावर नाही तसले आरोप करतीये." ती म्हणाली.

मला धक्काचं बसला. कालचं मस्करी प्रकरण अंगलट आलेलं.

" कार्टे जाताना आजीला नाहीतर मला आवाज देऊन जाता आला नाही का तुला? " विभाच्या काकू म्हणाल्या.

"काल रात्री केलेली मस्करी बहुतेक आजींच्या मनात वेगळाच अर्थ समजावून गेलेली दिसतीये. " मी तिला म्हणालो.

"पण गरज काय आहे? ती तिच्या रुटीन मध्यें आहे ना? तुम्हाला पण माहिते की. मान्य आहे नाही ओळखत तुम्ही माझ्या नवऱ्याला. पण मी ओळखते ना? माझ्या विश्वासावर पण विश्वास नाही तुम्हाला. ते जाऊदे. आसावरी तिच्यावर पण नाही? मला अजिबात नाही खपलेलं आजीच वागणं. काहीपण बोलावं का माझ्या नवऱ्याबद्दल तिने?  जिथे त्याचा रिस्पेक्ट नाही तिथे मी नसते थांबत. निघालो आम्ही आणि परत पाऊल ठेवत नसते मी इथे. " रागावून निर्वाणीच बोलू लागली. 

मग काका मध्यें पडले. 
"विभा अगं तिची चूक झाली. एवढा गैरसमज नव्हता करुन घ्यायचा तिने. मी पाव्हण्यांची माफी मागतो, सोडून दे इतकं रागावू नकोस. " ते समजवत होते.

शेवटी तिची आजी उठली आणि माझ्यासमोर आली.
"जावय माफ करा. खरच चूक झाली. मला मेलीला सरळ सरळ जे वाटलं ते बोलून मोकळी झाले ओ." 

"ठीके ठीके शान्त व्हा सगळे. काही नाही झालेलं. विभा शांत हो. आजी चला जरा." त्यांना मी बाजूला घेऊन घरात नेलं.

"आजी मला माहित आहे, की मी ओळखीतल्या माणसातला नाही. नात्यातला नाही म्हणून मी तुम्हाला विभाचा नवरा म्हणून तितका पटलो नाही. आता पदरी पडलं म्हणून पवित्र झालं असं समजून स्वीकारा, असं पण मी म्हणणार नाही. पण कसंय ना आजी,  विभा माझ्यावर खूप प्रेम करते आणि तुम्ही विभावर. तिच्यासाठी आणि तिचं मन मोडू नये म्हणून तुम्ही लग्नाला तयार तर झालात. पण नातं अजून काही तुमच्या मनाने स्वीकारलं नाहीये. हेच तुमच्या ओळखीतला कोणी मुलगा असता आणि त्याच्यावर तुम्ही असा आरोप लावला असता तर आत्तापर्यन्त मध्यस्ती करायला लोकांना मध्ये पडावं लागलं असतं एवढं प्रकरण पुढं गेलं असतं. पण हे लग्न मी आणि विभाने ठरवलंय तेव्हा आम्हीच ते कसही करुन निभावणार हा आमचा न बोलता झालेला करार आहे. विश्वासाचा अतूट धागा लग्नाआधीच आम्ही आमच्यात बांधून घेतलाय. 

आजी नात्याला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. विभाचं बघितलंत ना? माझ्यासाठी तुमच्या सगळ्यांशी ती भांडू शकते. माझंही तसंच आहे. पण मला भांडायला नाही आवडत. त्यापेक्षा भांडायचा जोर तुमचं मन जिंकन्यासाठीचा प्रयत्न करायला मला लावायला आवडेल. तुम्ही काल जे काही पाहिलंत तो आमच्या नात्यातला मोकळेपणा आहे. विभा मला नीट समजू शकते आणि मी तिला नीट समजून घेऊ शकतो. त्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असतो. तुम्ही निर्धास्त रहा. मी आजवर तुम्हाला अनोळखी होतो. पण इथून पुढे नसेल. त्यासाठी एकच गोष्ट करायची तो म्हणजे बोलणं ठेवायचं. तुम्ही बोलणंच ठेवलं नाही तर कसं जमणार? 
तर एक करार आपल्यातही करू. विभाला कॉल केलात की दोन शब्द माझ्याशी पण बोलायचे? काय?"
मी त्यांना बोलून गेलो.

"व्हय तुम्ही म्हणताय ते बरोबर हाय.. चुकलंच खरं माझं. वयानी आणि जगातल्या व्यवहारांनी सगळीकडं करडं बघायची सवय लागलीये मला. ती मोडायला हवी. विभाला समजवा जावय. परत एकदा तुमची माफी मागते. माणूस म्हणून सोनं असलेल्या जावयावर न्हाय तसला आरोप लावला. शिवाय सोताच्या लेकराला बी दुखवलं. " त्या म्हणाल्या.

"नका आता मनाला लावून घेऊ फार आजी. तिला मी समजावतो. हा!! पण एका अटीवर. आम्ही निघताना आमच्यासोबत तुम्हीपण आमच्या घरी काही दिवस राहायला चालायचं. मनात लेकीच्या घरी कशी राहू वैगरे विचार आणायचे नाहीत. तरच तिला समजावेन. " मी म्हणालो.

आजींच्या डोळ्यात नक्षत्र पसरलं होतं. त्यांच्या दृष्टीला किंतु गळून साफ झाला होता. माझ्या विभाच मन शान्त केलं की वातावरण परत प्रसन्न होणारं होतं. ते कसं करायचं मला चांगलंच ठाऊक होतं. 😊😊🍁🍁


- शब्दभ्रमर 🍁🍁