होऊन बघा जरा 'सेंटी'..... २७/०७/२०१९
एका संध्याकाळी मी एकटीच बसलेली होते.एकटीच होते,कारण आता वेळ कोणाला असतो?.म्हणून मीच त्या रम्य
संध्याकाळच्या कुशीत स्वत:ला लपेटून घेतलं आणि जुन्या आठवणींची लाॅंगप्ले रेकाॅर्ड लावून एकटीच ऐकत बसले.आजकाल असं 'सेंटी' होणं म्हणजे हसण्याचा विषय असतो.पण मी त्या हसणा-यांना म्हणेन जरा काही वेळ असं सेंटी होऊन बघा.पुढचं सगळं आयुष्य सोप्प झाल्यासारखं वाटतं. आयुष्यातील किचकट गणितं पटापट सुटतील.मोठ्ठ एनर्जी पॅक तुम्हाला गिफ्ट व्हाऊचर म्हणून मिळालेलं असतं.खरतर सेंटी होणं हा मनाचा गुणधर्म आहे.प्रत्येक पदार्थ त्याच्या गुणधर्मानुसार वागतो.हे आपण फिजीक्स,केमेस्ट्रीमध्ये शिकतो नं मग मनाला वागू द्या नं त्याच्या गुणधर्मा प्रमाणे.मी आयुष्यातील प्रत्येक टप्पा जगतांना मध्येच सेंटी होण्याच्या एका तासाला हजेरी लावतेच.जगतांना आलेला थकवा कापरासारखा उडून जातो आणि मन नव्या ताज्या दमाचा खिलाडू बनून पुढला खेळ खेळायला पीचवर तयार उभा असतो.होऊन बघा जरा 'सेंटी 'थोड्यावेळ आणि बघा आयुष्य कसं बहरतं ते.
##मीनाक्षी वैद्य