पापक्षालन भाग 2
इतिहासात झालेल्या घनघोर लढाया आणि यावनी सेनेचे हल्ले यामध्ये फार फार अंतर होते. साधन शुचितेचे ताळतंत्र नसलेले मदांध-दुष्ट यावनी हल्लेखोर! पादाक्रांत केलेल्या भागातील प्रजेवर अनन्वित अत्याचार त्यांनी केले. वृद्ध, बालके, स्त्रिया यांची निर्घृण कत्तल केली. स्त्रियांवर अत्याचार केले. मार्गातील मंदिरे, पाठशाला, विजयस्तंभ, शिलालेख, धर्मस्थळे, गुरुकुले,स्वागत कमानी उद्ध्वस्त करीत, सक्तीने धर्मांतरे करीत महान संस्कृतीची राखरांगोळी करीत हल्लेखोर मुसंडी मारीत विभवेच्या सीमेवर आले. सीमावर्ती भागातील प्रजाजनांवर होणाऱ्या अत्याचारांची वर्णने ऐकून मेघवत्साना अन्न गोड लागेना. या परचक्रात विभवेचे साम्राज्य अस्तंगत होणार असे भाकित राज ज्योतिषानीही वर्तविले. हल्लेखोरांच्या एक एक कारवाया एोकून महाराजांच्या काळजाचे पाणी झाले.
धर्मभंजक, संस्कृती उच्छेदक हल्लेखोर विभवेवर चाल करुन येण्यामागे राजसेवेतील फितूर उच्च पदस्थ, मंत्री यांचा हात आहे ही गोष्ट फार उशिरा मेघवत्सांच्या ध्यानात आली. होत असलेले अत्याचार-विध्वंस याला न कळत आपणच जबाबदार असल्याचे शल्य त्यांना टोचण्या देत राहिले. आपल्या सेवेतील लोक फितूर व्हावे अन् आपण गाफिलीने याची दखलही घेऊ नये ही बाब आपले अकर्तृत्व, अदूरदर्शित्व यांचे द्योतक आहे असा पश्चात्ताप त्यांना झाला. भग्न मनस्क महाराजांच्या मनात आत्मघात करण्याचे विचार थैमान घालू लागले. परंतु त्यांचे सुसंस्कारी मन या गोष्टीला धजेना. आत्मघात करणे म्हणजे तर भीरुतेची परिसीमाच झाली असती. स्वतःचे उत्तरदायित्व टाळून प्रजेला दुःखाच्या खाईत लोटून सहीसलामत सुटण्याचा तो निर्लज्ज प्रकार आहे असे त्यांना वाटले.
प्राप्त परिस्थितीतून कसा मार्ग काढावा याचा विचार महाराज करु लागले. या टोळधाडीपासून जे जे वाचविता येईल ते ते वाचविले पाहिजे. आज या झंझावाताने विभवेचे साम्राज्य हस्तगत केले असले तरी विभवेची अस्मिता कदापि लुप्त होणार नाही. आयते वैभव प्राप्त झाल्यावर शासक ऐषआरामात मग्न होतील, गाफील होतील त्यावेळी आपली ऐतिहासिक चूक दुरुस्त करण्याची संधी आपणास खचितच मिळू शकेल. आता त्या संधीची वाट पहाणे, विभवेला वेटोळयात पकडून तिचा ग्रास घेऊ पहाणाऱ्या या अजागराला संधी मिळताच चिरडून टाकायचे, तेच आता आपले जाीवन कार्य आहे अशा निर्णयाप्रत ते आले. आता त्यांनी निरवानिरव सुरु केली. राजभंडारातील मौल्यवान, हिरे, माणके, पाचू, सुवर्ण, रौप्यादिचे स्थलांतर करुन उत्तरेकडील स्वामीनिष्ठ निषाद, भिल्ल सरदारांच्या अंमलाखालील पहाडी प्रदेशात सुरक्षित स्थानी भूमीत पुरुन ठेवण्यात आले. नेमके विश्वासू सरदार आणि स्वतः महाराज यांनाच ती स्थाने ज्ञात होती.
हल्लेखोर राजधानीपर्यंत येईतो खजिन्याचे स्थलांतर पार पडले. धर्मभंजक हल्लेखोरांनी विभवेचे आराध्य दैवत असलेल्या अष्टभुजा महादुर्गेच्या मूर्तीचा विद्ध्वंस केला असता, तसे होते तर प्रजेने हाय खाल्ली असती. आक्रमक अधिकच शिरजोर झाले असते. म्हणून गाभाऱ्यातील मूर्ती हलवून मंदिरासमोरच्या अथांग जालाशयात पूर्व कोपऱ्यामध्ये विसर्जन करण्यात आली. नगरातील इतर मंदिरांमधील मूर्ती सुद्धा वाचाव्या या हेतूने देवालयातून हालविण्यात आल्या. स्वामीनिष्ठ भिल्ल, निषाद वीर जीवावर उदार होऊन शर्थीने लढले. पण मार्गातील असंख्य स्वार्थी हिंदू राजानी कुमक पुरविल्यामुळे यवन हल्लेखोरांचे सेनाबल प्रचंड वाढलेले होते. विभवेच्या सेनेचा पाडाव करुन यावनी हल्लेखोर नगराच्या तटबंदीजवळ येऊन थडकल्याचे वृत्त आले. महाराणी कर्णावतीसह राजपरिवारातील स्त्रियांनी अब्रु रक्षणास्तव अग्निकाष्ठ भक्षण केले. तेजदत्त त्यावेळी अवघे दोन संवत्सराच्या वयाचे. यावनी हल्लेखोरांच्या काचाट्यातून सुटण्यासाठी मेघवत्सानी गुप्त बेत आखला अन् ते अकस्मात भूमिगत झाले. दीन दीन करीत हल्लेखोर राजप्रासादात घुसले तेव्हा प्रासाद पूर्ण रिकामा आणि निर्मनुष्य होता. मग प्रासादालगत दिसेल त्याला जेरबंद करण्याचा सपाटा यवनानी सुरु केला.
उन्मत्त हल्लेखोर नगरातली मंदिरे धुंडाळू लागले. पण त्या धर्मभंजकांना मंदिरांमध्ये एकही मूर्ती सापडली नाही. चवताळलेल्या लांडग्यांप्रमाणे हल्लेखोर प्रवेशद्वाराच्या कमानीतून महादुर्गेच्या मंदिरात घुसले. गाभाऱ्यात मूर्ती नसल्याचे बघितल्यावर त्यांनी सर्वत्र कसून शोध घेतला. शेवटी पिसाट हल्लेखोरांनी मंदीराची पडझड करण्याचे सत्र सुरु केले. परंतु अजस्त्र, निर्भेद्य काळ्या पत्थरांनी उभारलेल्या बेलाग मंदिराच्या नक्षीवर साधा ओरखडाही त्यांना उठविता आला नाही. प्रवेशद्वारातली भव्य कमान कोसळताच घडीव काळवत्री पत्थरांचा पर्वतप्राय ढीग पडला. कमानीत बसविलेल्या दगडात कोरलेली गणेश मूर्ती असलेला दगडही त्या ढिगाऱ्यात कुठे लुप्त झाला तो हाती लागेना. पिसाट धर्मांधानी मंदिराच्या आवारातले शीलालेख, दीपमाळा,पितळी स्तंभ यांची मोड तोड केली आणि मंदिराला आग लावली.
हल्लेखोरांनी महाराज, महाराणी, राजपुत्र यांचाही कसून शोध घेतला. संपूर्ण नगरात धरपकड, छळसत्र आरंभिले. पण महाराज हाती लागले नाहीत. भूमिगत होण्यापूर्वी महाराजाांनी दाढी-मिशा सफाचाट केल्या. मस्तकीचा केशसंभार उतरुन तुळतुळीत श्मश्रू केली. कातडीचा वर्ण बदलण्यासाठी कसल्या तरी वनस्पतीच्या पानांचा रस स्वतःच्या आणि कुमारांच्या अंगाला लावला. चिंध्या झालेली जीर्ण-शीर्ण वस्त्रे परिधान करुन भयाने सैरावैरा धावणाऱ्या सामान्यांमध्ये ते मिसळून गेले. डोंगा भिल्लाने कुमाराना उचलून घेतले आणि त्यांना सोबत वागवित तो महाराजांच्या पाठलागावर फिरत राहिला. महाराजांच्या शोधापायी त्यांच्याशी हातमिळवणी करणाऱ्या काही अधिकाऱ्यांचाही यवनानी शिरच्छेद केला. पण महाराज सापडले. नाहीत. हल्लेखोरांनी जेरबंद केलेल्या प्रजाजनांना गुलाम म्हणून विक्रीसाठी सात समुद्रापार नेण्याच्या हेतूने बंदराच्या दिशेने हाकायला सुरुपात केली. त्या तांड्यात डोंगा भिल्ल गुपचूपपणे सहभागी झाला. महाराज जहाजावरच्या सेवक वर्गात मिसळले.
गुलामांना घेऊन निघालेले जहाज द्रविड प्रांतात थिरुकोट्टा बंदरात थांबल्यावर महाराजानी मोठ्या शिताफीने डोंगा भिल्ल , कुमार दत्त यांसह स्वतःची सुटका करुन घेतली. थिरुकोट्टा बंदरापासून दूर धर्मस्थलामध्ये त्यानी आसरा घेतला. तेथील मुख्य आचार्यांना त्यानी पूर्ववत्त कथन केले. उदार मनस्क आचार्यांनी महाराजाना आसरा दिला अन् महाराज कुमार दत्तांसह धर्मस्थळी - गुरुकुलात राहू लागले. पूर्ववृत्त ऐकून तेजादत्तांच्या नेत्रातून अश्रूधारा वाहू लागल्या. त्यांना शांत करीत महाराज म्हणाले, ” शांत व्हा दत्त....! एका अस्तंगत का होईना पण महान साम्राज्याचे तुम्ही वारस आहात. यावनी हल्लेखोरानी भ्रष्ट केलेल्या विभवेमध्ये आर्य संस्कृतीचे पुनरुत्थान करण्याची महान जाबाबदारी इतिहासाने तुम्हावर सोपविलेली आहे. गतकाळातील दुःख कुरवाळीत मूक अश्रू गाळणे वीरोचित नाही. तुम्ही मोठे व्हाल.... स्वसामर्थ्याने म्लेच्छांचा उच्छेद करुन विभवेच्या राजसिंहासनावर बसाल हे स्वप्न उराशी बाळगून वडवानलाच्या मुखातून तुम्हाला सुरक्षितपणे येथवर आणणारा, तुम्हावर पितृवत माया करणारा वृध्द डोंगा भिल्ल . . . . ! या परमुलुखात त्याची जाीवनयात्रा संपुष्टात आली. त्याची इच्छा वास्तवात आणण्याचे ऋण मी गेली बारा वर्षे तप मनात स्मरत आहे. विभवेला ग्रासणाऱ्या यवनाना सत्ताभ्रष्ट करुन माझ्या चुकीचे परिमार्जन मला करावयाचे आहे. केवळ त्यासाठी दीड तपांच्या या खडतर कालखंडात मी जीवन धारण करुन राहिलो आहे.”(क्रमश:)