सराई सुरू झाली. पाऊस उडाला नी गवतं सुकली. कलमा़ंच्या तळ्या करुन दक्षिण धरून प्रत्येक कलमाला उन्हाचा चटका बसू नये म्हणून आंजणीचे टाळ बांधून शि़पण़ं सुरू झाल. गेल्या सिझनला भाऊ आणि:गंगावहिनीने आपल्या डोक्यावरून डबे वाहीले. यंदा दैन्य फिटलं, चार पैसे हातात आले. धकल्या नी त्याचा भाऊ याना शिपणं देऊन भाऊ बिनघोर झाले. दिवाळी पूर्वी काठ्यांचा पूर्ण हिशोब शामरावाने गोडावून कीपरकडे देऊन ठेवला. त्याने दादा खोतांमार्फत रक्कम पाठवली. दादा़ंचा भेटून जा असा निरोप आला म्हणून भाऊ गेले. ते गेल्यावर दादानी व्यापाऱ्याचं पत्र आणि रक्कम समोर टाकली…... भाऊ चाटच झाले.घरी गेल्यावर त्यानी रखमाचे पैसे बाजूला काढले. ते स्वत: जाऊन रखमाशी बोलू शकतनव्हते. काशी बाणी रखमाकडे कामाला जायची. महीना दोन महिन्यानी रखमा तिच्याकडे चारपाच कुडू तांदूळ धाडायची. तिला भेटून बळी बाहेर जायचा असेल तेव्हा वर्दी दे, गंगा वहिनीला रखमाची भेट घ्यायची आहे असं सांगितलं. पाच सहा दिवसानी तशी संधी आली आणि रक्कम घेवून गंगावहिनी काशीबरोबर रखमाला भेटायला गेली.
गंगावहिनीने रखमाला बाजूला घेवून रूपये दिले. “ मी खरां म्हनशीतर परत घेवसाटना पैशे दिलेले नाय. माझ्या घोवामुळा तुमच्ये वनवास सुरू झाले…. तां पाप फेडूसाटी दिले.” त्यावर “काठ्यांचे तीन ट्रक घातले. त्याचे चा़ंगले पैसे मिळाले.चार दिवसामागे सगळा हिशोब मिळाला.तुमचं मुद्दल देऊनखर्चवेत भागेल. तुम्ही येवून गेलात ते़ंव्हापासून तुमच्या पायगुणाने आमचे दिवस पालटले. चार घास सुखाचे मिळण्याएवढी आमदनी आहे. आता ईथून पुढे ता़ंदूऴ पण नका पाठवू. हे पैसे ठेवा.देव करो नी पुन्हा अशी वेळ न येवो, पणगरज पडली तर मी मोठ्या बहिणीच्या हक्काने तुमच्याकडून मागून घेईन” असं गंगा वहिनीने म्हटल्यावर तिला मिठी मारूनरखमा रडली. “तू भटीण असोन माज्याशी भैनीचा नाता लावलं, आता मी तुका आक्काम्हनतय नी तू पन माका म्हायारच्या सखू ह्या नावान बोल. त्या नात्यान सा़ंगतय. हे पैशे आता घोवाक पण दखल न देता तुज्याहारीच ठेव. माका येऴ पडात तवा मी तुज्यारसून मागॉन घ्येयन.” तीने मग जरीकाठी खण आणिपाच नारळानी गंगा वहीनीची ओटी भरली. ऊठता ऊठता गंगावहीनी म्हणाली, “सखू, एखद्याचो लय गैर फायदो घेणां ह्यां पाप हा. ह्येंका तर मुऴीच आवाडणार नाय. तुका माजी शपथ हा.तू आमची नड भागवलंस. आता माका पैशे घ्येवची गळ नुको घालू. तू एकदा जेवक् माज्या घरी ये. बऴी भावजींक आक्काकडे जातय असा़ सांगोन राजरोस ये.”
सात वर्षं मागे पडली.केसचा निकाल लागला. निकाल हरीच्या बाजूनेलागला. बळीच्या सांगण्यावरून सांगण्यावरून कोर्टात केस दाखल झाल्यावर जबानी देण्यासाठी हरी काष्टी लावून त्यावर अर्ध्या बाहीचं मुंडं घालूनकोर्टात हजर झाला. काष्टी म्हणजे दोन हात औरस चौरस मांजरपटाचा तुकडा त्याचं एक टोकदोन कुल्ल्यांच्या फटीतून पाठीमागच्या बाजूला आंबाड्याच्या तिपेडी करदोट्यात खोचून घेऊन गाठ मारायची.पुढच्या बाजूने संपूर्ण फडका करदोट्यातून वर ओढून रूंद करून उजव्या बाजूचे टोक गोलाकार फिरवून पाठीमागच्या बाजूला शेवटेल त्या ठिकाणी करदोट्यात खोचायचं. यात पुढचा भाग मांड्यांपर्यंत झाकला जात असे मात्र मागील बाजूला फक्त अर्धा कुल्ला झाके आणि अर्धा उघडा राहत असे. हरी बापुडवाणा चेहरा करून जबानी द्यायला पिंजऱ्यात चढल्यावर त्याला बघून जज्ज साहेबांच्या मनात अपार करुणा दाटून आली. वकील आणि भगवत गीतेवर हात ठेवून शपथ घ्यायला सांगितल्यावर कसनुसा चेहरा करीत हरी म्हणाला," पण मी न्हावन् ईलेलो नाय. पोतयेक हात लावलो तर आपड होयत ना?"
त्यावर वकील म्हणाले "ही पोथी नाही. ही भगवत गीता आहे तुम्ही यावर हात ठेवून मी सांगतो
तशी शपथ घ्या." पक्षकार काय म्हणतात अशी जज्ज साहेबांनी पृच्छा केल्यावर वकीलानी सांगितलेलं स्पष्टीकरण ऐकून कोर्टालाही हसू आवरलं नाही. हरीआणि वकिल यांच संभाषण पुढे दिल्याप्रमाणेघडलं.
वकील- तुमचं पूर्ण नाव सागा.
हरी बेलीफाकडे निर्देश करीत म्हणाला , त्या लाल डगले वाल्यांनी सांगितलंनी ताच....
वकील- तुम्ही स्वतःच्या तोंडाने तुमचं संपूर्ण नाव सांगा
हरी -हरी नळेकार
वकील- अहो संपूर्ण नाव म्हणजे तुमचं नाव वडिलांच नाव आणि आडनाव असं सांगा.
हरी सखाराम नळेकर
वकील- तुम्ही मामलेदार समोर रस्त्याला जागा देणे तुम्हाला मान्य आहे म्हणून डाव्या हाताचा अंगठा निशाणी कशी काय दिलात ?
हरी- तवा काय झाला पोलीस पाटील, दादा खोत, मामलेदार, तेंचो पटेवालोआशी मोटीमोटी मानसा ईलेली.... नी आमी सगळे जमीनवाले. तीस चाळीस मानूस जमलेला.... तेनी सांगलानी काय जग दुनियेची सोय व्हनार हा तवा तुमीकाय तक्रात करू नुको.... तवा किती जागा देवची नी काय माजी समज पडली नाय..... तवा माका काय सुदरला नाय.... येकादो भांगो असात म्हनू मी गप ऱ्हवलय. मगे कागदार कायतरी लिवोन आमका सांगलानी काय हय आंगटे करा..... बाकीच्या़ वांगडा मी पन आंगटो दिलो
वकील - कागदावर आंगठा घेण्यापूर्वी काय लिहीलेलंआहे ते वाचून दाखवलं होतं ना?
हरी- ता एवडा माका आता आटवत नाय...जज्ज साहेबांकडे मोहरा वळवून हात जोडून डोकं झुकवीत हरी पुढे सा़गायला लागला.. मी अडानी मानुस....आमी कुळवाड भाशा बोलनारे.....भटा बामनाची भाशा आयकोन माजी समज पडत नाय....
वकील – मग त्या वेळी तुम्हाला कळलं नाही तर तसं तुम्ही सांगायला पाहिजे होतं.
हरी- नाय म्हंजे तुमी म्हणतास तां बरोबर पनत्ये वक्ती मी भा़ंबारलं हुतय. माका तवां येवजलां नाय. ते ईच्यारनारे सायब् म्हंजे लय कडक नी बोलणां म्हंजे तरडावल्या सारका ….. तेंच्या सामनी बोलताना माका निस्ती कापरी भरली ……
वकिल-बरं मग आता आता तुमची काय तक्रार आहे?
हरी – आदी पैलो रस्तो हयसून नवतो. तो येगळया बाजून व्हतो. बानघाटीत्सून मळ्यात येवचो हुतो. तेच्या लोकानी तेंची जमीन वगऴू साटना काय काय खटपटी करून रस्तो फुडे न्हेवन् आमच्या घाटीत्सून खाली घाटे भाऊचा आगार मुळम वाडी नी आमच्ये वाडीत फिरवून मग्ये मळ्यात न्हेवचो येवजलानी. (क्रमश:)