तीन झुंजार सुना
पात्र रचना
श्रीपति पाटील कुटुंब प्रमुख, प्रगतिशील शेतकरी
कमला बाई श्रीपतरावांची बायको
प्रताप श्रीपतरावांचा मोठा मुलगा
निशांत श्रीपतरावांचा मधला मुलगा
विशाल श्रीपतरावांचा धाकटा मुलगा
मेघना श्रीपतरावांची मुलगी
सरिता प्रतापची बायको.
वर्षा निशांतची बायको
विदिशा विशालची बायको.
वासुदेव राव सुळे वर्षाचे वडील
विजया बाई वर्षांची आई.
शिवाजी राव विदिशाचे वडील
वसुंधरा बाई विदिशाची आई
आश्विन प्रताप आणि सरिताचा मुलगा
बालाजी आणि सदा शेत मजूर
बारीक राव शेत मजूर
कृष्णा आणि राघू शेत मजूर
दाजी, रखमा आणि सुरेश गोठ्यांची व्यवस्था पहाणारे मजूर.
रावबाजी ठेकेदार. बटाईदार.
भाग १३
भाग १२ वरून पुढे वाचा .................
संध्याकाळी निशांत आल्यावर त्याच्याशी बाबा बोलले, तो म्हणाला की त्याची काळजी करू नका मी सगळं व्यवस्थित करेन. वहिनींना त्रास होईल असं काहीही रावबाजीला करू देणार नाही. “त्याला उद्याच ट्रॅक्टर द्यायला सांगतो. तुमचं झाल्यावर तो काम करेल. पाण्याचं बघू एक पंप वेगळा लाऊन घेऊ आणि पाइप लाइन इथपर्यंत आणून घेऊ. मग काही प्रॉब्लेम येणार नाही.”
“विशाल, एक सांगायचं होतं. दुधाची बिलं घ्यायला तूच जातोस ना,” – सरिता.
“हो. का ग ?” विशाल.
“आता यापुढे दुधाच्या बिलाची वसूली करायला दाजीच जातील.” – सरिता.
विशाल ला जरा आश्चर्य वाटलं पण तो काही बोलला नाही. “ठीक आहे” म्हणाला.
निशांत एवढं सगळं बोलला पण केलं काहीच नाही आणि नंतर फिरकला सुद्धा नाही.
दिवस वाया जात होते. निशांत नी प्रॉमिस केलं होतं पण सरिताला न ट्रॅक्टर मिळाला, नाही अवजारं. पाणी अजून लागणार नव्हतं म्हणून काही बिघडलं नाही. सरिता दोन दिवस प्रतापच्या लॅपटॉप वर बसून बरीच माहिती गोळा करत होती. स्वत:चं समाधान झाल्यावर ती बाबांना म्हणाली-
“बाबा, असं दिसतंय की आपल्याला शून्यातून सुरवात करावी लागणार आहे. आणि तसं जर करायचं असेल, तर बराच पैसा लागेल. आपली सध्याची परिस्थिती काय आहे ? बाबा, आजपर्यंत मी कधी हा प्रश्न विचारला नव्हता, पण आता विचारणं भाग आहे. सॉरी.”
“अग, सॉरी कशा बद्दल ?” बाबा म्हणाले. “आता जर तू भरारी घ्यायचं म्हणते आहेस, तर सगळी माहिती तुला असायलाच हवी. असं करू आपण, आज बँकेत जाऊ आणि प्रतापच्या जागी तुझं नाव टाकून घेऊ, म्हणजे तुला अकाऊंट ऑपरेट करतांना त्रास होणार नाही. पण सरिता ही गंगाजळी आहे. ही खर्च करतांना यात वाढ कशी होईल यांचा सतत विचार मनात असू दे. नाही तर लाखांचे बारा हजार व्हायला वेळ लागणार नाही.”
बाबा पुढे म्हणाले “आता आपली आर्थिक परिस्थिती काय आहे ? तर माझ्या आणि प्रतापच्या अकाऊंट मध्ये सध्या ३० ते ४० लाख रुपये असतील. म्हणजे तशी काळजी नाहीये. तू जर ठरवलं की काही करायचं नाही तरी सुद्धा ह्या पैश्यांच्या व्याजावर आयुष्य जाईल.”
“बाबा असं जर आहे, तर निशांत आणि विशाल, आर्थिक परिस्थिती खराब आहे असं का म्हणताहेत ?” सरितानी मूलभूत प्रश्नाला हात घातला.
“माझा त्या दोघांवर काडीचाही विश्वास नाहीये.” बाबांनी कबुली दिली. “तेंव्हा आधी पासूनच मी येणाऱ्या पैशांचे चार वाटे करून त्या दोघांच्या अकाऊंट मध्ये त्यांचे त्यांचे हिस्से टाकायला सुरवात केली होती. माझं आणि प्रतापचं जॉइंट अकाऊंट होतं. घरखर्च आपल्याच खात्या मधून चालायचा. एवढं सगळं असून सुद्धा आपल्या जवळ जर ३० -४० लाख आहेत, तर परिस्थिती वाईट कशी ? त्यांना तर इतकं वर्षं काहीच खर्च नव्हता. म्हणून म्हणतो, जे काही करायचं विचार करशील तो स्वत:च्या हिमतीवर कर. त्यांच्या कडून मदतीची अपेक्षा करू नकोस.”
“बाबा, सरिता म्हणाली “एका विषयावर माझी आणि ह्यांची बरीच चर्चा झाली आहे. त्यांची फार इच्छा होती, औषधी वनस्पतीची शेती करायची. पण काही ना काही कारणांमुळे त्या वेळेला राहून गेलं. मी विचार करते आहे की नाहीतरी मला शून्यातूनच सुरवात करायची आहे, मग सरळ हर्बल फांर्मिंग का करू नये ? तुम्हाला काय वाटतं ?”
“या विषयावर माझं आणि प्रतापचं बोलणं पण बऱ्याच वेळेला झालं आहे. औषधी वनस्पतीची शेती जवळ जवळ तिप्पट चौपट फायदा देऊन जाते, असं म्हणतात. करून पाहायला हरकत नाही. नुकसान नक्कीच होणार नाही, फार तर फायदा कमी होईल किंवा होणार नाही. पण फील्ड नवीन असल्याने कष्ट भरपूर असणार आहेत. त्यातून तू मुळात शेत कामालाच नवीन. झेपणार आहे का तुला याचा विचार कर.” बाबा म्हणाले.
“मी आता शेतीच्या कामात स्वत:ला झोकून देणार आहे. जरा जास्तच खर्च करावा लागणार आहे कारण आपल्याजवळ साधनं काहीच नाहीयेत. म्हणून तुम्हाला विचारात होते.” – सरिता.
“तुला हवं ते कर. माझा फूल सपोर्ट आहे. माझा एक सल्ला आहे. तो मानलास तर गोष्टी सोप्या होतील.” – बाबा.
“सांगा न.” – सरिता.
दोन वह्या कर. एकात तारीख वार कोणची कामं करायची यांची नोंद करत जा आणि दुसऱ्या वहीत ती कामं कुठवर आलीत याची सुद्धा तारीख वार नोंद ठेव. म्हणजे सगळ्या गोष्टी रोजच्या रोज तुझ्या समोर असतील.” बाबांनी सूचना केली.
“अरे, खरंच की, माझ्या हे लक्षात आलं नव्हतं. तसं सर्व कामांच वेळेनुसार आठवण राहणं कठीणच झालं असतं. आज पासूनच सुरवात करते. बाबा, काही गोष्टी करायच्या आहेत.” – सरिता.
“कोणच्या ?” – बाबा.
“सर्वात प्रथम, अमरावतीला जाऊन, soil testing कुठे होतं ते बघायचं आहे. मग मातीची प्रत कळली की सफेद मुसळी आणि अश्वगंधा च्या साठी आपली जमीन तयार करून घ्यायची. एक power tiller घ्यायचं आहे. या दोन्ही पिकांना elevated beds लागतात ते नेमके कसे करायचे यांची माहिती कृषि महाविद्यालयात जाऊन घ्यायची आहे. मग तसे वाफे करून घ्यायचे. आणि हे सगळं ताबडतोब करायचं आहे. आपल्याजवळ फारसा वेळ नाहीये. मला जितकी माहिती आहे, त्या प्रमाणे हवे तसे बेड करायला तर मी सांगीतलंच आहे. आपल्या लोकांनी हातांनी शेत नांगरायला सुरवात तर केलीच आहे. TILLER केंव्हा मिळू शकतं ते पण बघावं लागणार आहे. तुम्हाला काय वाटतं बाबा ?” सरितानी आपली योजना सांगितली.
“आपल्या शेतातली माती उत्तम प्रतीची आहे. आपण साधारण प्रत्येक वर्षी टेस्टिंग करून घेतो. आता मागच्या वर्षी या लोकांनी केलं आहे की नाही माहीत नाही. तू टेस्टिंग ला पाठवून दे. आपण रासायनिक खतं फार कमी, अगदी जरूरी पुरतेच वापरतो. बाकी सगळं शेण खत आणि कंपोस्ट खत आपण घालत असतो. त्या मूळे मातीची काळजी करू नकोस. आता सफेद मुसळी आणि अश्वगंधा या दोन्ही पिकांना थोडी जास्त रेताड जमीन लागते. त्या प्रमाणे तुला शेत नांगरणी झाल्यावर काळी रेती आणि शेण खत भरपूर टाकावं लागेल. त्याची व्यवस्था कर म्हणजे झालं.” बाबांनी माहिती पुरवली.
“बाबा, तुम्हाला तर सगळीच माहिती आहे.” – सरिता.
“अग मी शेतकारी आहे. जे तू आज करायचं म्हणते आहेस, त्याचा विचार आम्ही दोन तीन वर्षांपूर्वीच केला होता. पण नाही जमलं. आता तू कर. मी आहे. बारक्याला सगळं माहीत आहे त्याला सांग तो रेती आणि शेण खतांची व्यवस्था करेल.” – बाबा.
“बाबा, आपल्याकडे 40 गुरं आहेत मग आपल्याला बाहेरून शेण खत घेण्याची काय जरूर आहे ?” – सरितानी गोंधळून विचारलं.
“पहिल्या वर्षी जास्त खत लागतं आपल्याकडे जेवढं आहे, ते पुरेल असं वाटत नाही. जुनं पूर्ण वाळून तयार झालेलं खत लागतं, या पिकांना. त्याला तयार करण्याची एक पद्धत असते. बारक्याला मी सांगेन. तो करेल. पुढच्या वर्षी आपल्याला बाहेरून आणायची जरूर भासणार नाही.” – बाबा.
“ठीक आहे मग आता उद्या मी अमरावतीला जाते samples घेऊन. आणि परवा आपण नागपूरला जाऊ. TILLER ची चौकशी करायला.” - सरिता.
दुसऱ्या दिवशी नागपूरला जाऊन पूर्ण चौकशी करून आणि अटॅचमेंट बघून ते tiller बूक करून आले. 15 दिवस तरी लागणार होते मिळायला. हे झाल्यावर सफेद मुसली चं बीज पण घेतलं. आता पुन्हा नागपूर ला यायची जरूर पडणार नव्हती.
दुसऱ्या दिवशी सरिताने बारक्या ला बोलावलं.
“बारीक राव, टिलर मिळायला 15 दिवस लागणार आहेत. आपल्या जवळ एवढं थांबायला वेळ नाहीये. तुम्ही असं करा की 15-20 मजूर मिळताहेत का ते बघा. सध्या मजुरीचा काय रेट आहे ?” - सरिता
“300 रुपये रोज.” – बारीकराव.
“तुम्ही त्यांना 500 ते 600 रेट द्या. पण कामसू माणसं आणा. कामात कसूर नको.” सरितानी सांगितलं. अजून एक गोष्ट. “सगळे वाफे तयार व्हायला हवेत. तुम्ही जाड रेतीची व्यवस्था करणार होता त्याचं काय झालं ?”
“जाड रेतीची चौकशी करून झाली आहे, हे बघावं लागेल की आपल्याला किती लागणार आहे, ते ठरलं की लगेच मागवतो.” – बारीकराव
क्रमश:..
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com
धन्यवाद.