Teen Jhunzaar Suna - 17 in Marathi Fiction Stories by Dilip Bhide books and stories PDF | तीन झुंजार सुना. - भाग 17

Featured Books
Categories
Share

तीन झुंजार सुना. - भाग 17

            तीन झुंजार सुना

श्रेय  

मुखपृष्ठ चित्र               सौ. शिल्पा पाचपोर

लेखनास सहाय्य               डॉ. अनंत बिजवे

                           Adv. आनंद मुजुमदार.           

पात्र  रचना

 

श्रीपति पाटील                    कुटुंब प्रमुख, प्रगतिशील शेतकरी

कमला बाई                      श्रीपतरावांची बायको

प्रताप                          श्रीपतरावांचा मोठा मुलगा

निशांत                         श्रीपतरावांचा मधला मुलगा

विशाल                         श्रीपतरावांचा धाकटा मुलगा

मेघना                          श्रीपतरावांची मुलगी

सरिता                          प्रतापची बायको.

वर्षा                           निशांतची बायको

विदिशा                         विशालची बायको.

वासुदेव राव सुळे                  वर्षाचे वडील

विजया बाई                      वर्षांची आई.

शिवाजी राव                     विदिशाचे  वडील

वसुंधरा बाई                     विदिशाची आई  

आश्विन                        प्रताप आणि सरिताचा मुलगा

बालाजी आणि सदा                शेत मजूर  

बारीक राव                      शेत मजूर

कृष्णा आणि राघू                 शेत मजूर

दाजी, रखमा आणि सुरेश           गोठ्यांची व्यवस्था पहाणारे मजूर.

रावबाजी                        ठेकेदार. बटाईदार.

रघुवीर आणि त्यांची गॅंग            परदेशी मजूर.

 

 

 

 

भाग १७  

भाग १६  वरून पुढे वाचा .................

स्वयंपाक सगळ्यांच्या साठी सारखाच होता फक्त सरिता, बाबा आणि वर्षा, विदिशा साठी पोळ्या वेगळ्या बनायच्या. बाकीचे भाकरी खायचे. असं सगळं व्यवस्थित चाललं होतं. सरिता आणि बाबांच्या सकट सर्वांच्या साठी एकच स्वयंपाक बनत असल्याने एक प्रकारचं बॉंडिंग सगळ्यांच्या मधे निर्माण झालं होतं. आणि ते लाख मोलाचं होतं.

जून तसाच कोरडा गेला. जुलै चा पहिला  हप्ता पण कोरडाच गेला. बोरिंग च्या पाण्याने शेतीची पाण्याची गरज भागात होती. तशी चिंतेची बाब नव्हती. ड्रिप  इरीगेशन असल्यामुळे, पाणी कमीच लागत होतं. ज्वारी आणि तांदूळाचीच  काळजी होती. त्या पैकी ज्वारीचं तर भागून गेलं असतं पण तांदूळाचा प्रश्न होता. जुलै च्या दुसऱ्या आठवड्यात पावसाला सुरवात झाली, आणि तो पण प्रश्न मिटला.

आता वर्षा आणि विदिशा, सरितेच्या बरोबरीने शेतीत इंटरेस्ट घेत होत्या आणि सतत तिच्या बरोबर काम पण करत होत्या. स्वयंपाकाची जबाबदारी मजूरांच्या बायकांनी उचलली होती त्या मुळे त्या दोघी पण मोकळ्या झाल्या होत्या. त्या बायका आई, बाबांना काय हवं, नको ते बघायच्या आणि अश्विनला पण सांभाळायच्या. निशांत आणि विशाल ला हे आवडलं नव्हतं पण त्या ठरवून शेतावरच्या कामाचं रोजच्या रोज अपडेट द्यायच्या म्हणून ते काही बोलत नव्हते. त्यांना काय सांगायचं हे सरिताशी बोलूनच ठरायचं.

पावसाचा जोर जसजसा वाढायला लागला, तसे उंचवट्यावर केलेल्या वाफ्यांची माती ढासळायला लागली. ती पुन्हा पूर्ववत करणं भाग होतं. पाणी साचून चिखल  व्हायला लागला होता. पाण्याचा निचरा करणं पण फार जरुरीचं होऊन बसलं होतं.  जवळ जवळ दररोजचं  हे एक मोठंच काम होऊन बसलं होतं. सरीताला  पुन्हा एकदा जास्तीची माणसं ठेवल्याचा आनंद झाला. पाऊस थांबल्यावर खतं आणि फवारणीची कामं झाली. सगळं कसं ठरल्या प्रमाणे चाललं  होतं.  पावसाळा आता संपत आला होता. ऑक्टोबर चा महिना सुरू झाला होता आणि मुसळी आता ब्राऊन पडायला लागली होती. ज्वारी आणि तांदूळ कापणीला आले होते. सरिताने त्यांची कापणी  करायला घ्या असं सांगितलं.

“बारीक राव, जितक्या लवकर कापणी होऊन ज्वारी आणि तांदूळ गोदामात जाईल तेवढं चांगलं. त्यावर जातीने लक्ष द्या.” – सरिता. 

“वहिनी साहेब, आता तर पाऊस नाहीये, इतकी घाई कशा करता ?” – बारीकराव.

“ती जागा नीट साफ सुफ करून त्यावर ताडपत्र्या  पसरायच्या आहेत.” – सरिता.

“आपल्या जवळ ताडपत्र्या नाहीयेत. पण त्या कशाला ?” बारीकरांव आश्चर्याने बोलला.

“ताडपत्र्या वर मुसळी पसरून ठेवायची आहे. मी विद्यापीठातल्या एका माणसाला बोलावलं आहे. तो आपल्याला नीट समजावून सांगेल की नेमकं काय करायचं आहे ते. म्हणून आपल्याला ती जागा नीट साफ करून छान एका लेवल मध्ये आणायची आहे. तेवढं बघा. मग मोज माप करून तेवढ्या ताडपत्र्या घेऊन या. जितक्या लवकर मुसळी पसरता येईल तेवढं चांगलं. आणि जमीन तयार झाल्या शिवाय मुसळी खुडता येणार नाही, तेंव्हा लगेच कामाला लागा.” – सरिता. 

“करतो वहिनी साहेब.” – बारीकरांव.

समतल झालेल्या जागेवर ताडपत्र्या अंथरून  मुसळी नीट पसरून झाली. एक्स्पर्ट येऊन बघून गेला त्यांनी सांगितल्या प्रमाणे. काड्या, मुळं आणि पानं व्यवस्थित पसरून ठेवली. तांदूळ आणि ज्वारी कोठारात भरून झाली. मुसळी आता सुकायला लागली होती.

सरिता आणि विदिशानी दोघींनी मिळून कोण कोण खरेदीदार आहेत याची बरीच माहिती जमा करून ठेवली होती. पसरलेल्या मुसळीचे  बरेच फोटो काढले.

एक दिवस वर्षाने निशांत ला पटवलं आणि गाडी आणि ड्रायव्हर घेऊन त्या दोघी नागपूर ला गेल्या. निशांत ने आधी गाडी द्यायला बरीच खळखळ केली.

“वर्षा, त्या वहिनींची तुम्हा दोघींना भुरळ पडली आहे म्हणून तू सारखी त्यांच्या मागे मागे करते आहेस. मला ते अजिबात आवडत नाहीये.” – निशांतचा स्वर जरा चढाच होता. त्यांची नाराजी स्पष्ट जाणवत होती.

“निशांत जर आपल्याला, त्या नेमकं काय करतात यांची इत्थंभूत माहिती हवी असेल तर हे करावंच लागेल. या माहितीची तुम्हालाच जरूर आहे. नको असेल तर आम्ही जाणं थांबवतो.” वर्षा निर्वाणीचं बोलली.  

“नाही, नाही तू म्हणते आहेस ते बरोबर आहे. पण एवढी सगळी माहिती देवूनही तो रावबाजी काहीच रिजल्ट्स देत नाहीये याचीच चिंता आहे.” पुन्हा निशांत म्हणाला.

“कंट्रोल तुमच्याच हातात आहे, मग त्याला जरा झाड झटक करा. आम्ही आमचं काम चोख करतो आहोत, तुमचं बघा. बरं गाडी देतो आहेस की टॅक्सी करून जाऊ ?” वर्षा बोलली.

“घेऊन जा गाडी.” – निशांत.  

रात्री दोघी परतल्या. नागपूरच्या एका कंपनी शी व्यवहार फायनल झाला होता. त्यांची माणसं शेतावर येऊन बघून जाणार होती मग त्या नंतरच रेट फायनल होणार होता.

त्यांची माणसं आली आणि समाधान व्यक्त करून निघून गेली. कंपनीचीच  माणसं आली आणि सगळा  माल वेगवेगळया पोत्यांमधे भरून ट्रक मधून घेऊन गेली.

एक प्रकरण संपलं होतं. आता अश्वगंधाची  रोवणी सुरू झाली होती. आता सर्व जण तयार झाले  होते आणि सराईता सारखी बिन बोभाट कामं चालली होती. मुसळी उचलली गेल्या मुळे ती जागा रिकामी झाली होती. आणि आता तिथे गहू लावायला सुरवात केली होती. तुरीची कापणी  झाल्यावर तिथे हरभरा लावायचा होता.

आता वर्ष संपत आलं होतं. ज्वारी, तूर डाळ तांदूळ आणि गहू केवळ घरातली गरज भागावण्या साठीच लावला होता. ते पुरेसं आलं होतं. त्यामुळे चिंता नव्हती. एक दिवस सकाळी, वर्षा, विदिशा, सरिता आणि बाबा सगळे बसले. वर्षा हिशोब करत होती. ती म्हणाली

“मुसळी आणि अश्वगंधा विकून जवळ जवळ  १८  लाख रुपये मिळाले.  गहू, तांदूळ, डाळ आणि ज्वारीचं सर्वांना वर्ष भर पुरेल इतकं पीक घेतलं होतं, त्या मुळे येणाऱ्या वर्षी  त्याचा खर्च होणार नव्हता. दूध, दही  अंडी हे सुद्धा घरचंच  असणार होतं त्याचा सुद्धा प्रश्न नव्हता. सुरवातीचा झालेला खर्च हा बाबांच्या कडून घेतलेल्या पैशातून झालेला असल्याने त्यांना त्यांचे पैसे परत करायचे आहेत ना ?”

“माझ्या पैशांची फार काळजी करू नका. तुम्हाला पुढच्या वर्षांच्या खर्चाची पण तरतूद करायची आहे त्याचा आधी विचार करा. पिकांची विक्री झाल्या शिवाय पैसे मिळत नाहीत त्या मुळे ती सोय तुम्हाला आधी करायची आहे. धान्य जरी घरात असलं तरी बरेच खर्च असतात त्याला रोख पैसे लागतात. वर पगार पाणी आहे, या सगळ्यांचा विचार करा. त्याची तरतूद करा आणि मग उरलेल्या पैशातून मला किती देता येतात ते बघा.” बाबांनी त्यांचे विचार मांडले.

“बाबा, तुम्ही आम्हाला ९ लाख दिले आहेत. ते तुमचे तुम्हाला दिल्यावर उरलेल्या  त्या पैशांची कशी विभागणी करायची  ते ठरवू. आणि मग पुढे जर जरूर पडलीच तर तुम्ही पुन्हा आमच्या मदतीला आहातच.” वर्षा नी तिला काय वाटतं ते सांगितलं.

“म्हणजे  तुम्हाला असं म्हणायचं आहे का की तुम्ही माझ्या कडून जी रक्कम घेतली ती कर्ज म्हणून घेतली. आणि आता तुम्हाला ते कर्ज फेडायचं आहे ?” इति  बाबा

“हो अगदी तसंच.” वर्षानीच  उत्तर दिलं.

“मग तुम्ही दर वर्षी तीन  लाख असे वापस करा. म्हणजे चार  वर्षात कर्ज फिटून जाईल आणि तुमच्या जवळ पण खेळत्या भांडवलाची कमी भासणार नाही.” बाबांनी सुचवलं.

आता सरिता बोलली “उरलेल्या रकमेची काय व्यवस्था करायची आणि पुढच्या वर्षांच्या खर्चाची तरतूद किती करायची हे आता ठरवावं लागेल.”

१००० रुपये सर्व लोकांना बोनस म्हणून वाटले होते. सर्वच जणं त्यामुळे खुश होते. आणि नवीन वर्षांच्या पिकांच्या तयारी साठी जोमाने लागले होते.

सरिताने सुरवातीलाच वर्षा आणि विदीशाला सांगितलं होतं की “आपल्याला लपवून काहीही ठेवायचं नाहीये. त्यामुळे तुम्हाला निशांत आणि विशालला जे सांगायचं आहे ते सांगा.” पण तरी सुद्धा रोज सरिताशी बोलून मगच काय सांगायचं ते ठरायचं. आज सुद्धा सरितानी सांगितलं होतं की “जे खरं आहे ते सांगा. कदाचित पुढच्या वर्षी रावबाजीला कॉंट्रॅक्ट देण्या बद्दल ते दोघं पुनर्विचार करतील. म्हणजे, आपण अशी आशा करू.”

त्या दिवशी रात्री जेवणं झाल्यावर निशांत नी विचारलं की

“झाला का हिशोब ? कळलं का काय पोजिशन आहे ती ?”

“हो कळलं. वर्षांनीच तर सगळे हिशोब ठेवले होते. तिनेच सर्व केल.” विदीशा  बोलली. “खरं सांगते आहेस तू ?” – विशाल.

“निशांत, आम्ही वहिनींच्या बरोबरीने खटलो आहे तिकडे. आता तर आम्हाला सुद्धा शेतीची इतकी माहिती झाली आहे की आम्ही सुद्धा शेतकरी झालो आहोत. तो रावबाजी किती  पैसे देणार आहे तुम्हाला ? अजून दिले नाही ना ?” वर्षा म्हणाली.

“नाही अजून नाही दिले.” – निशांत.

“केंव्हा देणार आहे ? कॉंट्रॅक्ट प्रमाणे, आत्ता पर्यन्त तर त्यांनी तुम्हाला तुमचा वाटा देवून तुम्हाला शेतीचा, परत ताबा द्यायला हवा होता.” – वर्षा.

“तो तर आम्ही घेउच. पण मला सांग, की तू आणि विदिशा वहिनींच्या  बरोबरीने कष्ट करत होता तर तुम्हाला किती पैसे दिले वहिनींनी ?” – निशांत.

“आम्ही नोकर म्हणून गेलो नव्हतो. वहिनी एकट्या होत्या म्हणून त्यांना मदत करायला गेलो होतो. वरतून तुम्हाला सगळी माहिती देत होतो. तुमच्याच परवानगीने गेलो होतो ना ! तिथे मग पैश्यांचा प्रश्न कुठे येतो ?” – विदिशा.

“तरी पण कष्टाचा मोबदला तर मिळायलाच हवा. साधी गोष्ट आहे.” – निशांत. 

 

 

क्रमश:..

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com