तीन झुंजार सुना
श्रेय
मुखपृष्ठ चित्र सौ. शिल्पा पाचपोर
लेखनास सहाय्य डॉ. अनंत बिजवे
Adv. आनंद मुजुमदार.
पात्र रचना
श्रीपति पाटील कुटुंब प्रमुख, प्रगतिशील शेतकरी
कमला बाई श्रीपतरावांची बायको
प्रताप श्रीपतरावांचा मोठा मुलगा
निशांत श्रीपतरावांचा मधला मुलगा
विशाल श्रीपतरावांचा धाकटा मुलगा
मेघना श्रीपतरावांची मुलगी
सरिता प्रतापची बायको.
वर्षा निशांतची बायको
विदिशा विशालची बायको.
वासुदेवराव सुळे वर्षाचे वडील
विजयाबाई वर्षांची आई.
शिवाजीराव विदिशाचे वडील
वसुंधराबाई विदिशाची आई
आश्विन प्रताप आणि सरिताचा मुलगा
बालाजी आणि सदा शेत मजूर
बारीकराव शेत मजूर
कृष्णा आणि राघू शेत मजूर
दाजी, रखमा आणि सुरेश गोठ्यांची व्यवस्था पहाणारे मजूर.
रावबाजी ठेकेदार. बटाईदार.
रघुवीर आणि त्यांची गॅंग परदेशी मजूर.
भाग २५
भाग २४ वरून पुढे वाचा .................
“असं कसं ?” निशांत अजूनही जरा चिडलेलाच होता. ”शेती ही शेती आहे, थोडा फार फरक असू शकतो पण जमीन अस्मान चा फरक, असं म्हणण म्हणजे फारच झालं. असं काही नसतं.”
“आता कसं पटवून द्यायचं तुम्हाला,” वर्षाच म्हणाली “गेले वर्षभर आम्हाला माहीत आहे की किती कष्टाचं काम आहे हे, किती उस्तवारी करावी लागते, केवढी काळजी घ्यावी लागते ते. त्या शिवाय, मालाला इतकी किंमत मिळत नाही.” वर्षा पोट तिडिकेने बोलत होती. तिचा स्वर पाहून निशांत थोडा नरमला. विशालला आता थोडी थोडी समज यायला लागली होती. त्याला पटायला लागलं होतं की या बायकांच्या बोलण्यात तथ्य असतं. तो म्हणाला “निशांत, अरे जरा नीट पूर्णपणे ऐकून तरी घे वहिनींना काय म्हणायचं आहे ते. त्यांचं झाल्यावर आपण साधक बाधक चर्चा करू आणि मगच फायनल करू. नाही तरी बाबा आत्ता असंच म्हणाले ना. मग काय हरकत आहे ?”
“ठीक आहे, सांगा वहिनी.” निशांत म्हणाला.
“निशांत, आता सरिताने बोलायला सुरवात केली. “आपण आपल्या शेतीत आता पर्यन्त कोणती पिकं घेत आलो आहे ? म्हणजे गेल्या २-३ वर्षात तुम्ही काय केलं ?
“काय हे वाहिनी, दर वेळी तुझं काही तरी तिसरंच असतं. तुला काय सांगायचं आहे ते सांग ना. आम्ही काय पिकं घेतली हे इथे अप्रस्तुत आहे.” निशांत कुरकुरला.
“ठीक आहे.” सरिताने सुरवात केली. “माझ्या माहिती प्रमाणे तुम्ही गहू, ज्वारी, तूर आणि कापूस ही पीकं प्रामुख्याने घेतली. बरोबर ?”
“हो, पण ..” पण मध्येच सरितानी निशांतला थांब अशी खूण करून थांबवलं.
“आता या पिकांना जमीन कशी लागते ? ही पारंपारिक पिकं असल्याने जमीन तशी जवळपास तयारच असते. दोनदा नांगरणी झाली की वखरणी मग काडी कचरा साफ सफाई मग शेणखत मिसळून पुन्हा वखरणी मग एक पाऊस पडला किंवा sprinkler नी माती ओली झाली की पेरणी. मग मधल्या मग मधल्या काळात पाणी देणे, खतं टाकणे, मधून मधून फवारणी बस. मग कापणी आणि धान्य गोदामात, झालं. असंच करता ना नेहमी ?” सरितानी निशांत आणि विशालला विचारलं.
निशांतला कळेचना की वहिनी हे सगळं का सांगते आहे ते. तो म्हणाला “ हे सगळं आम्हाला माहीत आहे तू पुन्हा पुन्हा तेच का सांगते आहेस आम्हाला ?”
“मी सांगत नाहीये, नुसती उजळणी करते आहे. आणि ती बरोबर आहे का, असं विचारते आहे. ते सांग”
“बरोबर आहे.” निशांत म्हणाला.
“आता मुसळी साठी जमीन तयार करणं हे एक प्रोजेक्ट असतं. विदिशांनी डीटेल मधे सांगितलंच होतं पण मी पुन्हा सांगते” सरिता आता पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरली होती. “किमान तीन वेळा नांगरणी करावी लागते. माती कशी महीन असावी लागते जरा सुद्धा ढेकळं चालत नाहीत. मग त्याच्यात रेती आणि शेणखत यांच प्रमाण बरोबर आहे की नाही हे तपासून बघावं लागतं. हे सगळं झाल्यावर मग रोवणी, त्याच्या साठी बियाणं आधी निरनिराळ्या औषधांच्या सोल्यूशन मधे बुडवून ठेवावं लागतं, रोवणी सुद्धा विशिष्ट पद्धतीनेच करावी लागते. अश्या बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या अतिशय काळजीपूर्वक कराव्या लागतात. रोपं कापणीला येईपर्यंत अजूनही बऱ्याच गोष्टींवर लक्ष पुरवावं लागतं. कापणी झाल्यावर सुद्धा अनेक किचकट कामं असतात. आता तुम्हीच सांगा पारंपरिक शेतीमध्ये एवढ्या साऱ्या गोष्टी तुम्ही करता का ? नाही ना. म्हणजे दोन्ही शेती आणि पद्धती फार वेगळ्या आहेत हे आता तुम्हाला कळलं असेल असं धरून चालते.” दोघांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते बघण्यासाठी सरिता थोडी थांबली.
सरिता पुढे म्हणाली “ आता गव्हाची किंमत आपल्याला मिळते २० रुपये किलो. खर्च येतो साधारण ७ ते १० रुपये किलो . एकरी साधारण २० क्विंटल पीक येतं. आता सफेद मुसळी पीक येतं साधारण ३०० किलो, रेट मिळतो आपल्याला साधारण १२०० रुपये, म्हणजे झाले जवळ जवळ साडेतीन ते चार लाख. आता एवढा फरक आहे म्हंटल्यांवर कष्टही त्याच प्रमाणात असणार न. कुठलीही हयगय, आणि दुर्लक्ष, ही मिळणारा रेट कमी करते. त्यामुळे क्वालिटी वर खूप लक्ष ठेवावं लागतं. मला असं वाटतं की आता तुमच्या आयडिया क्लियर झाल्या असतील.”
निशांत अजूनही फसफसतच होता. सगळ्या सूचना सरिताच देते आहे आणि आपल्याला कुठल्याच बाबीत उणिवा काढता येत नाहीयेत, हे काही त्याच्या पचनी पडत नव्हतं. आपण काय होयबा बनून राहायचं का ? खरं तर प्रतापच्या मृत्यू नंतर तोच कुटुंब प्रमुख होता, पण त्याच्याच चुकीच्या वागण्यामुळे आणि निर्णयामुळे, आता सरिताकडे ती सूत्र आली होती, आणि ते त्याला पचवणं कठीण जात होतं. कनिष्ठ स्थानावर राहणं अवघड होतं, त्यामुळे तो अस्वस्थ झाला होता. त्यांची चुळबुळ सर्वांच्याच लक्षात आली. दोन मिनिटं शांतता होती. सर्व त्याच्याच कडे बघत होते. त्याच्या ते लक्षात आलं आणि तो अजूनच बावचळला.
“काय झालं निशांत, तू खूप अस्वस्थ झालेला दिसतो आहेस ?” बाबांनी विचारलं.
“मला ही हर्बल शेतीची कल्पनाच मान्य नाही. छोट्या प्रमाणावर ठीक आहे, पण इतक्या मोठ्या प्रमाणावर हर्बल शेती करायची म्हणजे, तोंडघशी पडण्याचा चान्स खूपच जास्त आहे असं मला वाटतं. ५ एकरात ठीक आहे पण पूर्ण शेती हर्बलचीच, no, never. किती पैसा ओतावा लागणार आहे याची थोडी तरी कल्पना आहे का तुम्हाला ? सगळी गंगाजळी संपून जाईल आणि काही गडबड झाली तर, आणि तुमचे अनुमान चुकले, तर सर्वांनाच रस्त्यावर येण्याची पाळी येईल. वहिनी तुला एकदा अगदी घवघवीत यश मिळालं, कबूल आहे. पण तुला जगाचा अनुभव नाहीये, एका छोट्याशा यशावर तुम्ही लोकं इतका मोठा डोलारा रचता आहात, हा माझ्या मते सपशेल चुकीचा निर्णय आहे.” निशांत नी त्याच्या मनातली सगळी मळमळ बाहेर काढली.
इतकं सगळं वहिनीनी सविस्तर समजावून सांगितलं तरी निशांतचं आपलं येरे माझ्या मागल्या. विदिशाला जरा रागच आला. ती जरा चढया आवाजातच म्हणाली “तो रावबाजी कबूल केलेले, उरलेले १० लाख देणार आहे का ?”
“त्याचा काय संबंध आहे इथे, चर्चा कशावर चालली आहे आणि तू विचारतेस काय ? आणि मुळात, मोठे लोकं बोलत असतांना लहानांनी मधे बोलायचं नसतं ही साधी अक्कल तुला नाही का ?”- निशांत जरा रागानेच बोलला.
पण आता विशालला राग आला. कीती झालं तरी विदिशा त्याची बायको होती, आणि खरं म्हणजे त्याला आता सरिताचं बोलणं पटायला लागलं होतं. सरिता जे काही बोलते ते पूर्ण अभ्यास करूनच बोलते याची त्याला आता खात्री पटली होती. याच कारणांमुळे त्याला निशांतचं बोलणं आवडलं नव्हतं. तो म्हणाला-
“निशांत विदीशाची अक्कल काढायची तुला काहीच जरूर नव्हती. ती अशिक्षित नाही, आणि मूर्ख तर नक्कीच नाही. वहिनींच्या बरोबरीने या दोघींनी शेती सांभाळली आहे. ती लहानही नाहीये, आपण सगळे बरोबरीचे आहोत, हे तू मान्य करूनच या पुढे बोलत जा.”
“विशाल हे तू बोलतो आहेस ?” तो पुढे आणखी काही बोलणार होता पण सरितानी त्याला
हाताच्या इशाऱ्याने थांबवलं. विशालला सुद्धा तू बोलू नकोस या अर्थाची खूण केली. सगळे गप्प झाल्यावर सरिताने बोलायला सुरवात करणार होती, पण बाबांनी तिला थांबवलं. सरिता प्रश्नार्थक मुद्रेनी त्यांच्याकडे पाहत होती. पण आता बाबांनी बोलायला सुरवात केली.
“विदिशा, रावबाजीनी निशांतला दिलेली जखम अजून भळभळते आहे, तू त्यावर काहीही कारण नसतांना मीठ चोळलेस, हे तुझं चुकलंच. तू त्याची माफी माग.”
“सॉरी निशांत. माझी चूक झाली, हे माझ्या पण, लक्षात आलंय. प्लीज मला माफ कर.” विदिशानी माफी मागून टाकली आणि विषय संपवला.
“उत्तम” बाबा पुढे म्हणाले “ आदल्या दिवसाच्या कामाचा आढावा आणि आजच्या दिवसाचं प्लॅनिंग यावर चर्चा करण्यासाठी आणि त्यानुरूप निर्णय घेण्यासाठी आपण रोज बैठक घेण्याचं ठरवलं आहे. ज्या कोणाला काही शंका असतील त्याचं निराकरण करण्या साठी सुद्धा ही बैठक आहे. आता निशांतला आपल्या योजनांबद्दल काही शंका आहेत. सरितानी त्याचं निरसन करण्यासाठी बराच प्रयत्न केला, पण अजूनही निशांतचं पूर्ण समाधान झालेलं दिसत नाहीये. सरिता यावर तुझ्या जवळ याचं काही उत्तर आहे का ?”
क्रमश:..
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com
धन्यवाद.