Chapter 3: मौली आजीचं इशारा
चेतनच्या गायब झाल्यानंतर गावातल्या लोकांचा धीर ढासळला होता. झाडाजवळ सापडलेल्या पायाच्या विचित्र ठशांनी आणि मोबाईल, टॉर्च फेल होण्यामुळे पोलिसही संभ्रमात पडले होते.
दत्ता काका मात्र काही बोलायला तयार नव्हते. ते शांत होते, पण त्यांच्या डोळ्यांत काहीतरी लपलेलं होतं – एखादं जुनं रहस्य… किंवा अपराध?
त्या संध्याकाळी गावात एक बातमी वाऱ्यासारखी पसरली – "मौली आजी परत आली!"
मौली आजी – गावाची वेडी की काहीतरी जास्त?
गावातल्या एका मोडकळीस आलेल्या झोपडीत राहणारी मौली आजी अनेक वर्षांपूर्वी गावातून गायब झाली होती. लोक म्हणत असत की ती भोंदू, तांत्रिक प्रकार करणारी, झाडाशी काहीतरी संबंध असलेली बाई होती. पण काहीजण म्हणायचे, ती आपल्याला वाचवण्यासाठी झगडतेय.
त्या दिवशी रात्री, चंद्र धूसर होता. गावकरी आपापल्या घरात लपलेले. आणि मौली आजी गावाच्या मंदिरासमोर उभी होती.
"ते जागं झालंय..." तिचा खर्जातला आवाज कानावर येताच लोकांनी खिडक्यांच्या पडद्यामागून डोकावलं.
"ते झाड आता झोपेत नाही. त्याला आठवतंय… त्याच्या मुळांखाली काय गाडलं गेलं होतं. आता ते त्याचं घ्यायला बाहेर पडलंय!"
गावातल्या काही जणांनी तिला वेडीच ठरवलं.
"बाई, शांत रहा! गावात घाबराट पसरवू नका!" सरपंच ओरडले.
पण मौली आजी मात्र स्थिर उभी राहिली.
"मी गेल्या वर्षीही सांगितलं होतं... जे झाडाजवळ गेले ते नाही परतले. आणि आता चेतन... त्याला वाचवायचं असेल, तर झाडाचं गुपित उघड करावं लागेल."
"कसलं गुपित?" प्रियंका समोर आली. तिचा आवाज धीट होता.
मौली आजी तिला बघून थोडी वेळ शांत राहिली. मग धीम्या आवाजात बोलू लागली,
"त्या झाडाखाली एक वेळची भयंकर चूक गाडलेली आहे. जेव्हा मला त्याचा शोध लागला, तेव्हा लोकांनी मला वेडी समजलं. पण आता वेळ जवळ आली आहे..."
आजीकडून एक वस्तू
त्या रात्री, मौली आजीने प्रियंकाला तिच्या झोपडीत बोलावलं. झोपडीचा दरवाजा अर्धा तुटलेला. आत प्रचंड धुरकट वास. घरात वाद्यं, लिंबू-मिरच्या, आणि जुनी पिशवी.
"ही घे..." आजीने प्रियंकाला एक काळ्या दोऱ्याची गुंडी दिली.
"ही गुंडी, चेतनचा आत्मा जिथे अडकला असेल, तिथं हलकं लुकलुकणारं तेज दाखवेल. पण लक्षात ठेव – तू त्या झाडाशी जवळ गेलीस, तर मागं वळून पाहायचं नाही!"
"आणि चेतन?" प्रियंकाने विचारलं.
"तो अजून जिवंत असेल... तर फक्त एक संधी आहे. आणि ही संधी ही झाड स्वीकारतंय... त्याच्या भुकेसाठी."
दुसऱ्या दिवशीचा शोध
प्रियंका दुसऱ्या दिवशी पहाटेच उठून झाडाकडे गेली. गावाला न सांगता. तिच्या गळ्यात आजीची गुंडी. हातात एक जुनं लोखंडी आरसासारखं साधन – ज्याच्यावर आजीनं काहीतरी मंत्र केलं होतं.
झाडाकडे जाताना वातावरण बदलू लागलं. पक्षी नव्हते. वाऱ्याचा आवाजही थांबलेला. जणू पूर्ण जंगलच श्वास रोखून पाहतंय.
ती झाडाजवळ पोहोचली... आणि थांबली.
गुंडी तिच्या गळ्यात थरथरू लागली – अगदी ओझं झाल्यासारखी.
अचानक तिला झाडाच्या मागे काहीतरी हलताना जाणवलं.
"चेतन?" तिनं हळू आवाजात हाक मारली.
पण उत्तर मिळालं नाही.
तेवढ्यात मागून एक आवाज आला...
"प्रियंकssssa..."
ती दचकली. पण मौली आजीची एकच सूचना आठवली – "मागं वळून पाहू नकोस!"
तिनं डोळे मिटले. ओठांनी हळूच गुणगुणलं – "हे झाडा... मला त्याला परत दे... मी काही घेतलेलं नाही..."
गुंडी लुकलुकू लागली – एका विशिष्ट दिशेला. झाडाच्या मुळाशी असलेल्या एका खड्ड्याकडे.
ती झपाटल्यासारखी तिकडे गेली... आणि अचानक जमिनीवर एक गोष्ट चमकली.
चेतनचा लॉकेट!
ती ते उचलताच गुंडी थांबली.
त्याच क्षणी, झाडाची एक फांदी हलली... आणि वरून एक सडा टाकल्यासारखी काळी सावली झपाट्याने तिच्यापर्यंत पोहोचली.
शेवटचा क्षण...
प्रियंका किंचाळली, मागं वळलीच नाही. फक्त लॉकेट घट्ट पकडून डोळे बंद केले.
झाड हललं, वाऱ्याचा वेग वाढला, आणि एक आवाज झाडाच्या आतून ऐकू आला...
"अजून एक बळी बाकी आहे..."
अचानक सगळं शांत झालं.
प्रियंका डोळे उघडते...
ती एकटी उभी होती. झाड शांत. गुंडी आता काळी नाही, फिकट राखट झाली होती.