तीन झुंजार सुना
श्रेय
मुखपृष्ठ चित्र सौ. शिल्पा पाचपोर
लेखनास सहाय्य डॉ. अनंत बिजवे
Adv. आनंद मुजुमदार.
पात्र रचना
श्रीपति पाटील कुटुंब प्रमुख, प्रगतिशील शेतकरी
यमुनाबाई श्रीपतरावांची बायको
प्रताप श्रीपतरावांचा मोठा मुलगा
निशांत श्रीपतरावांचा मधला मुलगा
विशाल श्रीपतरावांचा धाकटा मुलगा
मेघना श्रीपतरावांची मुलगी
सरिता प्रतापची बायको.
वर्षा निशांतची बायको
विदिशा विशालची बायको.
वासुदेवराव सुळे वर्षाचे वडील
विजयाबाई वर्षांची आई.
शिवाजीराव विदिशाचे वडील
वसुंधराबाई विदिशाची आई
आश्विन प्रताप आणि सरिताचा मुलगा
बालाजी आणि सदा शेत मजूर
बारीकराव शेत मजूर
कृष्णा आणि राघू शेत मजूर
दाजी, रखमा आणि सुरेश गोठ्यांची व्यवस्था पहाणारे मजूर.
रावबाजी ठेकेदार. बटाईदार.
रघुवीर आणि त्यांची गॅंग परदेशी मजूर.
रामशरण रघुवीरच्या गॅंग मधला मजूर.
मंजुळा सदाची बायको.
कार्तिक निशांतचा मुलगा.
भाग ३६
भाग ३५ वरून पुढे वाचा .................
“त्यानी भलताच हिशोब लावला आहे. तो म्हणाला की आपण बरड जमिनीवर गोठा आणि शेड हलवलं आहे, पाझर तलाव पण काढला आहे, आणि तो म्हणतो आहे की आपण ज्या पद्धतीने काम करतो आहोत त्या हिशोबाने आपल्याला गोठ्यांची जागा अजून खूप वाढवावी लागणार आहे आणि त्यासाठी बरड जमीन एकदम योग्य आहे. आणखी तो हे ही म्हणाला, की आपलं घर पण त्याच जमिनीवर हलवा म्हणजे तुमची अडकलेली सुपीक जमीन मोकळी होईल आणि तुम्हाला ती लागवडी खाली आणता येईल. आणखी तो म्हणाला, की त्या जमिनीवर तुम्ही एक पाझर तलाव पण खोदला आहे, त्यामुळे, पाण्याचं दुर्भिक्ष तुम्हाला कधीच जाणवणार नाही.” निशांत
“मग?” – बाबा.
“बाबा, तो म्हणाला ते अगदीच नाकारण्यासारखं नाहीये. पण हे सगळं करण्यात आपला पण आधीच बराच खर्च झाला आहे. आणि जर घर शिफ्ट करायचं म्हंटलं तर अजून येईल मग या हिशोबानी आपल्याला हा सौदा खूपच महागात पडेल.” – निशांत.
“मग, काय ठरवलं आहेस?” बाबांनी विचारलं.
“मी सगळी माहिती अगदी सविस्तर आपल्या सर्वांसमोर ठेवली आहे. यावर चर्चा अपेक्षित आहे. त्यानंतर सर्वानुमते जो निर्णय होईल तो त्याला मी कळवून टाकीन.” – निशांत.
“शिवराम काकांचा मुलगा जे म्हणाला त्यात तथ्य आहे. पण वर्षा मुळात आपली काय आर्थिक परिस्थिती आहे? आपण हे करू शकू का?” सरितानी वर्षाला विचारलं.
“हो नक्कीच.” वर्षा म्हणाली. “पण मला जरा खोलात जावून बघावं लागेल. ढोबळ मानाने सांगायचं झालं तर आपण साठ पर्यन्त खर्च करू शकू.”
“म्हणजे मी जे कॅलक्युलेशन केले होते ते बरोबर आहे.” निशांत म्हणाला.
“हो, पण ते त्याला पटत नाहीये ना” - विदिशा.
“बरोबर आहे. तोच प्रॉब्लेम आहे.” – निशांत.
“निशांत तू पुन्हा एकदा त्यांच्याशी बोलून पहा, कदाचित काही मार्ग निघेल. बोलणी करण्यात तुझा हातखंडा आहे. बघ प्रयत्न करून.” वर्षा म्हणाली.
“आत्ताच लावतो फोन, साडे सात वाजले आहेत, आला असेल तो घरी.” – निशांत.
जवळ जवळ अर्धा तास निशांत शिवरामच्या मुलाशी बोलत होता. तो ये पर्यन्त सगळे नुसतेच बसून होते. तो आल्यावर म्हणाला की “ तो म्हणतो आहे की एकदा शेत विकल्यावर त्याच्या जवळ काहीच राहणार नाही आणि घरांत ते पैसे घातल्यावर अडी अडचणीला पण काही फार उरणार नाहीयेत.”
“त्याचं म्हणण खरं आहे पण आपण एवढी मोठी उडी नाही घेऊ शकत.” वर्षानी आपली बाजू स्पष्ट केली.
“वहिनी, आपण जर ही रिस्क घेतली, तर आपल्या शेतांमध्ये १५ एकरांची वाढ होईल. ही वाढ कायमची असणार आहे. मी पुन्हा एकदा बोलतो शिवराम च्या मुलांशी, पण माझ्या मते ७० पर्यन्त जरी सौदा तुटला तरी आपल्याला फायदाच आहे. याचं कारण असं की गोठा, आणि शेड आणि जर ठरवलं तर, आपलं घर, यासाठी बरड जमीनच योग्य आहे. आता पर्यन्त हे सगळंच सुपीक जमिनीवर होतं. पहा विचार करू आपण आणि ठरवू.” विकासनी एक लांब लचक भाषण केलं.
विकासच्या बोलण्यावर बरीच चर्चा होऊन शेवटी निशांतनी पुन्हा एकदा बोलावं असं ठरलं.
“ठीक आहे, मी उद्या त्यांच्याशी बोलतो.” निशांत म्हणाला.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मीटिंग भरली तेंव्हा निशांत म्हणाला “ शिवराम च्या मुलांशी बोलणं झालं. असं ठरलंय की आता आपण ६० द्यायचे. ५ आपण आधीच दिले आहेत, ते मिळून ६५ होतात. पुढच्या वर्षी अजून ५ द्यायचे. मी सौदा फायनल करून टाकला आहे. आता पुढच्या आठवड्यात तो आणि शिवरामकाका येतील आणि आपण रजीस्ट्री करून टाकू.”
थोडा वेळ शांततेत गेला. प्रत्येक जण आपापल्या परीने या निर्णयाच्या मुळे काय काय परिणाम होतील त्याचाच विचार करत होते.
“वर्षा,” सरितानी कोंडी फोडली. “जरा सर्व दृष्टीनी हा व्यवहार बघ, निशांत नी फायनल केलं आहे म्हणजे तो व्यवहार फायनलच आहे. पण आपल्याला रोजच्या कामाला पैसे कमी पडणार आहेत का? आणि तसं जर असेल तर नेमके कुठे आणि त्यावर कोणचा उपाय आपण योजू शकतो, याबद्दल तुझ्याकडून आम्हाला पूर्ण रिपोर्ट ची अपेक्षा आहे. तेवढं बघ.”
“मी उद्या सर्व बाबी तपासते आणि सांगते. पण तसंही बॅलन्स शीट बनलेली आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी अगदी माझ्या डोळ्या समोर आहेत. आणि माझ्या मते हा व्यवहार पूर्ण करायला हरकत नाहीये, थोडी पैशांची चणचण भासू शकते पण जर आपण काटेकोर कामं करून खर्चावर नियंत्रण आणलं तर काही प्रॉब्लेम येणार नाही. पण तरीही उद्या मी पुन्हा एकदा सर्व तपासून बघते.” वर्षा नी दिलासा दिला. ती पुढे म्हणाली “ विशालच्या बनवलेल्या यंत्रांमुळे आपली बरीच बचत होते आहे. त्यांनी अजून प्रयत्न करून आणखी काही गोष्टींसाठी जर यंत्र बनवू शकला तर अजून वेळेची आणि खर्चाची बचत होऊ शकेल.” वर्षा म्हणाली.
“मुख्य म्हणजे आपण एवढी सारी रक्कम capital expenditure मधे घालणार, तेंव्हा आपल्याला खेळत्या भांडवलाची चण चण भासायला नको. हे फार महत्वाचं आहे. आपली कामं पैशा अभावी अडकून राहायला नकोत.” – सरितानी आवश्यकता विशद केली.
“हो वहिनी, अगदी बारकाईने तपासते.” – वर्षा.
“वर्षा,” विशाल म्हणाला “ आणखी एक यंत्र तुला बनवून हवं आहे असं म्हणत होतीस, तर जरा डीटेल मधे तुझी requirement काय आहे ते सांग.”
“त्याच्या बद्दल विदिशा म्हणत होती. तीच सांगेल.” वर्षा म्हणाली.
“काय म्हणतेस विदिशा तू?” विशालनी विचारलं.
“आपण मुसळी काढून आणण्याचं यंत्र तर बनवलं. मुसळी क्लायंट ला पाठवायच्या अगोदर त्यांची मुळं आणि काड्या साफ कराव्या लागतात. आपण जसा कच्चा बटाटा सोलणी ने सोलतो, तसं सोलावं लागतं. त्यात वेळ आणि माणुसबळ खूप खर्च होतं. हे सोलणी यंत्र तू जर बनवू शकलास तर खूप फरक पडेल. ही माणसं दुसरीकडे वापरता येतील. आपण अजून काही एकर शेती कसायला घेऊ शकू आणि ते ही माणसं न वाढवता.” विदिशानी तिला काय हवं ते सांगितलं.
“ओके. ती प्रोसेस मला माहीत आहे. मी त्या दिशेने प्रयत्न करतो. तसंही या वर्षांचं काम झालच आहे, म्हणजे माझ्या हातात किमान ३ ते ४ महीने आहेत. मी त्याच कामाला लागतो.” विशालनी आश्वासन दिलं.
“विदिशा,” निशांत म्हणाला “तू जे म्हणालीस त्यावरून अजून एक अर्थ निघतो आणि तो म्हणजे आपल्याला अजून काही एकर शेती हवी आहे. खरंच आपल्याला तशी जरूर आहे का? जे आहे ते पुरेसं नाहीये का?”
आता सरिता बोलली. “ फक्त आपल्या साठी नक्कीच पुरेसं आहे. पण आम्ही असा विचार करतो आहोत की आपल्याला हर्बल शेतीचं हे गणित चांगलं जमलं आहे, मग आपल्या बरोबर जर आणखीही काही लोकांचा आर्थिक फायदा झाला तर चांगलंच आहे. आपण त्यांना बोनस म्हणून काही रक्कम एक्स्ट्रा देऊ शकलो तर त्यांना पण आनंद होईल. आपल्या मजूरांना सुद्धा आपण जास्त पगार देऊ शकू. सर्वे सुखिना संतू, सर्वे संतू निरामया. असा विचार आहे. बाकी सर्वानुमते जे ठरेल तेच करू.”
“पण वहिनी, आत्ताच तर तू म्हणालीस की शेतीत पैसा गुंतवल्यामुळे working capital कमी होण्याचा धोका आहे आणि त्याचा उत्पादनावर आणि गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. आणि आता तू जास्त शेती घेण्याचं समर्थन करते आहेस. ही दोन्ही परस्पर विरोधी विधानं आहेत. असं नाही का तुला वाटत?” निशांत बोलला.
“मघाशी मी working capital बद्दल जे बोलले ते आत्ताची परिस्थिती लक्षात घेऊन बोलले. आत्ता मी जे बोलले, तो फक्त एक विचार आहे, स्वप्न आहे. समाजाचं आपल्यावर काही ऋण असतं, ते अंशत: तरी फेडता यावं, हाच एक उद्देश आमच्या मनात आहे. कदाचित पुढच्या वर्षी मला हवी तशी परिस्थिती होईल मग त्यावेळेस आपण याचा विचार करू.”
“आपल्या जवळ पैसा आला की लोक समाजाला, आपण काही देणं लागतो हे विसरतात, पण सरिता तू विसरली नाहीस. तुझे विचार स्तुत्य आहेत. मला आनंद वाटला तुझं बोलणं ऐकून.” बाबांनी समाधानाने त्यांचं मत सांगितलं.
क्रमश:..
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com
धन्यवाद.