तीन झुंजार सुना
श्रेय
मुखपृष्ठ चित्र सौ. शिल्पा पाचपोर
लेखनास सहाय्य डॉ. अनंत बिजवे
Adv. आनंद मुजुमदार.
पात्र रचना
श्रीपति पाटील कुटुंब प्रमुख, प्रगतिशील शेतकरी
यमुनाबाई श्रीपतरावांची बायको
प्रताप श्रीपतरावांचा मोठा मुलगा
निशांत श्रीपतरावांचा मधला मुलगा
विशाल श्रीपतरावांचा धाकटा मुलगा
मेघना श्रीपतरावांची मुलगी
सरिता प्रतापची बायको.
वर्षा निशांतची बायको
विदिशा विशालची बायको.
वासुदेवराव सुळे वर्षाचे वडील
विजयाबाई वर्षांची आई.
शिवाजीराव विदिशाचे वडील
वसुंधराबाई विदिशाची आई
आश्विन प्रताप आणि सरिताचा मुलगा
बालाजी आणि सदा शेत मजूर
बारीकराव शेत मजूर
कृष्णा आणि राघू शेत मजूर
दाजी, रखमा आणि सुरेश गोठ्यांची व्यवस्था पहाणारे मजूर.
रावबाजी ठेकेदार. बटाईदार.
रघुवीर आणि त्यांची गॅंग परदेशी मजूर.
रामशरण रघुवीरच्या गॅंग मधला मजूर.
मंजुळा सदाची बायको.
कार्तिक निशांतचा मुलगा.
भाग ३८
भाग ३७ वरून पुढे वाचा .................
“शक्य तितक्या लवकर. डॉक्टर म्हणाल्या की आता वेळ वाया घालवू नका. आणि हे पण म्हणाल्या की घाबरू नका, आता यावर खात्रीशीर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत. सगळं ठीक होईल. तुमच्या दोघांमध्येही दोष नाहीये, तेंव्हा तुम्हाला बाळ होणारच. चिंता करू नका.” विशालनी सांगितलं.
“ठीक आहे. डॉक्टर जर असं म्हणाल्या असतील तर काळजीचं काहीच कारण नाहीये थोडा वेळ लागेल पण ठीक आहे, वर्षा कम्प्युटर बद्दल बोलते तेंव्हा बऱ्याचदा म्हणते की या दोन गोष्टी compatible नाहीयेत. तसंच यात सुद्धा मला compatibility issue दिसतो आहे. It will be sorted out. Just don’t worry. तुम्ही जाल तेंव्हा मी पण तुमच्या बरोबर येईन. म्हणजे तुम्हाला भीती वाटणार नाही.” सरितानी त्यांना धीर दिला. सरिताचं बोलणं ऐकून दोघांनाही, नाही म्हंटलं तरी खूपच हायसं वाटलं.
दोन दिवसांनी विदिशा, विशाल आणि सरिता नागपूरला गेले. तिथे डॉक्टरांनी काही टेस्ट केल्यात. विदीशाची सोनोग्राफी पण केली. रीपोर्ट दोन दिवसांनी मिळणार होता म्हणून त्यांनी दोन दिवसांनी यायला सांगितलं. दोन दिवसांनी जेंव्हा हे लोकं नागपूरला पुन्हा गेले तेंव्हा डॉक्टर त्यांची वाटच बघत होत्या. डॉक्टरांचा चेहरा गंभीर होता. “हे बघा, थोडा प्रॉब्लेम आहे. तसे तुम्ही दोघंही आपापल्या परीने एकदम ओके आहात. पण तरीही जर दिवस राहत नसतील तर आमच्या टर्म मधे आम्ही याला “unexplained infertility असं म्हणतो. आता विशालरावांची सीमेन टेस्ट म्हणजे वीर्य परीक्षा करावी लागणार आहे. ती आपण करू. त्यांचे रिपोर्ट आल्यावर ठरवू शकू की काय करायचं ते. पण तुम्ही काळजी करू नका. या गोष्टींना जरा वेळ लागतो पण तुमच्या बाबतीत यश मिळेल अशी खात्री वाटते आहे. विशालराव तुम्ही आमच्या लॅब मधे जाऊन ही टेस्ट करून घ्या. रिपोर्ट आल्यावर मी तुम्हाला फोन करेन.”
“दोन दिवसांनी डॉक्टरांचा फोन आला. म्हणाल्या जमलं तर एक दोन दिवसांत येऊन जा.”
दुसऱ्याच दिवशी विशाल आणि विदिशा नागपूरला जाऊन डॉक्टरांना भेटले.
“काय रिपोर्ट आहे डॉक्टर?” विशालनी विचारलं.
विशालराव, विदिशा बाई तर पूर्ण नॉर्मल आहेत. तुम्ही पण आहात, पण थोडे कमी नॉर्मल. त्यामुळे दिवस राहण्यासाठी थोडा प्रॉब्लेम येतो आहे.” - डॉक्टर.
“म्हणजे डॉक्टर, फारसा गंभीर प्रश्न नाहीये. असं समजायचं का? मग इतका वेळ का लागतो आहे.?” विदिशा म्हणाली.
“हो फारसा गंभीर नाहीये, पण विशाल रावांनी आपल्या जीवन शैलीत थोडा बदल करायला हवा. त्यांचा लठ्ठ पणा कमी व्हायला हवा. स्पष्टच सांगायचं तर टेस्ट मधे असं आढळून आलं आहे की त्यांचा स्पर्म काऊंट कमी आहे. आणि लठ्ठ पणा हे एक कारण असू शकतं. दुसरं कारण म्हणजे तुम्ही शेतकरी आहात म्हणजे तुमचा किटकनाशक आणि फवारणीची औषधं असतात त्यांच्याशी सतत संपर्क येत असेल. त्यामुळे सुद्धा असं होतं. आपण त्यापासूनच सुरवात करू. आता लठ्ठपणा कमी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या सर्वच सवयी बदलाव्या लागणार आहेत. आता हाय प्रोटीन डायट घ्या. व्यायाम करा, आणि लठ्ठपणा कमी करा. मी तुम्हाला विटामीन e च्या गोळ्या लिहून देते. त्या नियमित घ्या. मी तुम्हाला एक औषध लिहून देते, त्यांनी फायदा होईल. हे औषध कसं घ्यायचं हे सविस्तर लिहून देते. हे खंड न पडता 20 दिवस घ्यायचं आहे आणि मग गॅप द्यायची आहे. अर्थात हे सर्व मी डीटेल मधे लिहिलं आहे, ते नीट कसोशीने पाळा. फवारणी वगैरेच्या औषधां पासून किमान एक वर्ष तरी दूर रहा. किंवा आवश्यक ती पूर्ण खबरदारी घेऊनच ते काम करा. अश्वगंधा सुद्धा यावर गुणकारी औषध आहे. ते पण घ्या. फायदा होईल. आपण सहा महीने हा प्रयोग करून बघू. हा सगळ्यात सोपा उपाय आहे नाहीच साधलं तर पुढची ट्रीटमेंट सुरू करू. तुम्ही दर महिन्यात एकदा ही टेस्ट करून घ्या. मला खात्री आहे की रिजल्ट मिळेल.”
“म्हणजे अजून सहा महीने वाया जाणार.” विशाल निराश झाला होता. त्याला वाटलं होतं की डॉक्टर औषध देतील आणि सगळं ठीक होईल.
“विशालराव, म्हणून याच कारणांसाठी आपली जुनी माणसं म्हणतात, की सगळं वेळच्या वेळी झालं की बरं असतं. पण असो. या सर्व प्रकाराला वेळ लागणार आहे. तुम्ही जर माझ्या सूचना कठोरपणे पाळल्या तर लवकर रिजल्ट मिळेल. विदिशाबाई, यांच्याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्या. ही तुमचीच जबाबदारी आहे. आणि तुम्ही पण जरा स्वत:कडे लक्ष द्या.” – डॉक्टर.
विशाल आणि विदिशा मोर्षीला परतले. प्रवासात त्यांचं आपसात बरंच बोलणं झालं. त्यानंतर विशाल सावरला, त्याला पण पटलं की डॉक्टरांच्या सल्या प्रमाणे वागण्यातच शहाणपणा आहे. त्यानी लगेच आपल्या आहारात डॉक्टरांनी सांगितल्या नुसार बदल केलेत आणि व्यायाम पण सुरू केला. दर महिन्यात तो नागपूरला जाऊन टेस्ट करून येत होता. तीन महिन्यात वजन १५ किलो कमी झालं होतं, त्यामुळे तो खुश होता. तसंही वजन कमी झाल्यामुळे, त्याच्या हालचालीत सफाई आली होती आणि कामाची गती वाढली होती. आधीचा चिडचिडा स्वभाव जाऊन, त्याचा मूळ हसरा, विनोदी आणि आनंदी स्वभाव दिसायला लागला होता. विदिशा त्याला हर एक प्रकारे उत्साहित करत होती, उत्तेजन देत होती. आणि या सगळ्यांची परिणीती त्याचा काऊंट वाढण्यात होत होती.
विशालनी एकदा डॉक्टरांना विचारलं “तुम्ही म्हणाला होता की या पद्धतीने रिजल्ट नाही मिळाला तर पुढचा उपाय करू म्हणून. म्हणजे नक्की काय करावं लागेल?”
“असं आहे, आम्ही मग आर्टिफिश्यल इनसेमिनेशन चा सल्ला देतो यांचे दोन प्रकार असतात. AIH आणि IVF त्यापैकी AIH कमी खर्चाची असते पण IVF ला बराच जास्त खर्च येतो. तसंही आधी AIH केल्यावर रिजल्ट मिळतात. नाही मिळाले तर IVF चा पर्याय उरतो. पण तुम्ही एवढा विचार करू नका आणि काळजी तर मुळीच करू नका. तुमचा काऊंट चांगला सुधारतो आहे.
विशाल त्या दिवशी खूप आनंदात घरी आला. घरच्या सगळ्यांना कळल्यावर सर्वांनाच बरं वाटलं. विदीशाला तर अस्मानच ठेंगणं झालं. आता त्या दोघांमधील भांडणं सुद्धा जवळ जवळ बंद झाली होती. आता जवळ जवळ वर्ष होत आलं होतं रोड झाल्यामुळे विशाल जास्तच स्मार्ट दिसत होता.
विदिशा, जिने पूर्वी शेतीच्या कामात स्वत:ला झोकून दिलं होतं आणि विशालशी संवाद जवळ जवळ नाहीच, इतका कमी झाला होता, तिने सुद्धा स्वत:ला बदललं होतं. ती स्वत:कडे लक्ष द्यायला लागली होती. मुळचीच सुंदर आणि slim and trim विदिशा आता विशालच्या नजरेला पुन्हा एकदा, एखाद्या परी सारखीच वाटायला लागली होती. मजूर ट्रेंड झाल्यामुळे, विदीशाला शेतात, खूप मेहनत करावी लागत नव्हती. नवपरिणीत दांपत्याचे जसे प्रेमाचे दिवस असतात ते पुन्हा परत आले होते. आणि या सगळ्यांचा परिणाम म्हणून एक दिवस ज्याची सगळे आतुरतेने वाट बघत होते, ती गुड न्यूज आली. गावातल्याच त्यांच्या नेहमीच्या डॉक्टरांनी त्यांना ही आनंदाची बातमी दिली.
त्या दिवशी सर्वांनाच गोडाची मेजवानी होती. सर्वांनाच खूप आनंद झाला होता. सर्व मजूर एक मतांनी विदीशाला म्हणाले, “छोट्या वहिनी साहेब आता तुम्ही शेतात येऊ नका आम्ही सगळं सांभाळून घेऊ. तुम्ही बस आराम करा.” तरी सुद्धा दुसऱ्या दिवशी विदिशा नेहमी प्रमाणे शेतावर जायला निघाली पण मजुरांच्या बायकांनी तिला अडवलं आणि घरी वापस जायला लावलं.
दिवसभर शेतात झोकून देवून काम करणाऱ्या विदीशाला हे जरा अवघडच होत होतं. ती सरिताला म्हणाली सुद्धा की “मी अर्धा दिवस जाते शेतात, वहिनी, तुझ्यावर कामाचा फार बोजा पडेल, मी नसतांना.”
“काही जरूर नाही, माझी काळजी तू करू नकोस, घर आणि विशालला सांभाळ तेवढं पुरे आहे.” सरिता म्हणाली.
“पण वहिनी, घरात बसून बसून कंटाळा येईल हो. आणि अश्या अवस्थेत कामं करावी असं म्हणतात न” – विदिशा
“ठीक आहे, घरातली कामं कर. जरा हलकाई राहील आणि वर्षाला मदत करू शकतेस तू. ते कर. झालं. मातीत हात घालायलाच पाहिजे असं काही नाही.”
क्रमश:..
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com
धन्यवाद.