तीन झुंजार सुना
श्रेय
मुखपृष्ठ चित्र सौ. शिल्पा पाचपोर
लेखनास सहाय्य डॉ. अनंत बिजवे
Adv. आनंद मुजुमदार.
पात्र रचना
श्रीपति पाटील कुटुंब प्रमुख, प्रगतिशील शेतकरी
यमुनाबाई श्रीपतरावांची बायको
प्रताप श्रीपतरावांचा मोठा मुलगा
निशांत श्रीपतरावांचा मधला मुलगा
विशाल श्रीपतरावांचा धाकटा मुलगा
मेघना श्रीपतरावांची मुलगी
सरिता प्रतापची बायको.
वर्षा निशांतची बायको
विदिशा विशालची बायको.
वासुदेवराव सुळे वर्षाचे वडील
विजयाबाई वर्षांची आई.
शिवाजीराव विदिशाचे वडील
वसुंधराबाई विदिशाची आई
आश्विन प्रताप आणि सरिताचा मुलगा
बालाजी आणि सदा शेत मजूर
बारीकराव शेत मजूर
कृष्णा आणि राघू शेत मजूर
दाजी, रखमा आणि सुरेश गोठ्यांची व्यवस्था पहाणारे मजूर.
रावबाजी ठेकेदार. बटाईदार.
रघुवीर आणि त्यांची गॅंग परदेशी मजूर.
रामशरण रघुवीरच्या गॅंग मधला मजूर.
मंजुळा सदाची बायको.
कार्तिक निशांतचा मुलगा.
भाग ४० (अंतिम )
भाग ३९ वरून पुढे वाचा .................
“हूं, वहिनी, विदिशा जे बोलते आहे त्यात दम आहे. यावर चर्चा व्हायला हवी.” – विशाल.
सगळेच, अगदी सरिता पण विचारात पडली. सगळ्यांना आपल्याच मार्गावर खेचून नेणं हे तसं अवघड काम होतं. थोड्या वेळाने निशांत म्हणाला “ वहिनी, सहकारी संस्था असेल, तर शेती च्या बदल्यात शेअर्स असं होऊ शकतं, पण सरकारची याला मान्यता नाहीये, त्यामुळे कलेक्टिव फारमिंग करावं लागेल. त्या साठी प्रत्येकांनी त्यांच्या शेतीत काय पेरायचं हे सर्वानुमते ठरेल. तुला समाजाचं उत्थान करायचं आहे की राजकारणात शिरायचं आहे? तुझी खात्री आहे का की त्या प्रकारच्या लीडरशिप क्वालिटीज तुझ्याजवळ आहेत म्हणून? नाही तर आपली शेती सुद्धा कोणी तरी बळकावून बसेल. बघ विचार कर.” आता मात्र प्रश्न गंभीर झाला होता. थोड्या वेळाने सरिता म्हणाली की –
“मग आता काय करायचं? तूच सांग, निशांत.”
“वहिनी, हा कलेक्टिव फारमिंग चा उद्योग बऱ्याच जणांनी करून पाहिला आहे. पण फक्त एकच उदाहरण आहे की जिथे हा प्रयोग यशस्वी रित्या राबवल्या गेला आहे. पण बाकी ठिकाणी हा प्रयोग गुंडाळावा लागला. याचं कारण एकच ते म्हणजे मतांमध्ये आणि विचारांमधे एक वाक्यता नाही. आता तूच ठरव, नाही तर ती म्हण आहे ना, “ कोयले की दलाली मे हाथ काले,” तसं व्हायचं. बघ विचार कर.” निशांतनी आपलं मत सविस्तर पणे मांडले.
सरिताला काही राजकारणात शिरायचं नव्हतं. तो तिचा पिंड नव्हता. मग आपली स्वप्न कशी साकार होणार? हाच प्रश्न तिला पडला. ती विचारात पडली. सगळेच गंभीर होते. मग पुन्हा निशांतच बोलला. “वाहिनी एक मार्ग आहे, बघ तुला पटतो का”
“काय आहे? सांग तर खरं, आता आपण सगळेच जमलो आहोत, विचार करू.” सरिता म्हणाली.
“आपण त्यांची जमीन कसायला मागू आणि नेहमी पेक्षा मोबदला, दुप्पट किंवा जेवढ्या जास्त प्रमाणात देता येणं शक्य असेल, तेवढा द्यायचं मान्य करू. ते लोकं जर तयार झाले, तर तुझं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. आणि वरतून पूर्ण कंट्रोल आपलाच राहील.” निशांतनी त्याची आयडिया सांगितली.
निशांत हे बोलल्यावर सरिताचा चेहरा जरा उजळला. ती काही बोलणार एवढ्यात विदिशा बोलली. “मला वाटतं की जर आपण अजून ३० -४० एकर शेती कसायला घेतली, तर बरीचशी समीकरणं बदलतील. त्याचा आधी सखोल विचार व्हायला हवा. आणि मगच किती मोबदला द्यायचा हे ठरू शकतं.” तिचं बोलणं ऐकून निशांत म्हणाला “ हीचं नेहमीच काहीतरी वेगळं मत असतं.” पण आता विशालला कळून चुकलं होतं की विदिशा म्हणते त्यात दम असतो. म्हणून तो म्हणाला-
“विदिशा तू नेमकं कशाबद्दल बोलते आहेस, हे जरा स्पष्ट करशील का?”
“बरेच मुद्दे आहेत, त्याचा सांगोपांग विचार होणे आवश्यक आहे. आपण आत्ताच ३० एकरांवरून ५५ एकरांवर गेलो आहोत आणि आपल्या मशीनरी आणि माणसांवर प्रचंड ताण पडतो आहे. शेती आणखी वाढवली तर या दोन्ही गोष्टी कोलमडून पडतील. म्हणजे आपल्याला दोन्ही गोष्टी वाढवायला लागतील. जे काही मटेरियल आपण बाहेरून घेतो आहे त्यात लक्षणीय वाढ होणार आहे. म्हणजे बियाणं, खत, शेणखत, रेती आणखी बऱच काही, या सर्व गोष्टींसाठी भरपूर पैसा इन्वेस्ट करावा लागणार आहे. त्यांची सोय प्रथम करावी लागणार आहे. परत वाढीव मजुरांचा खर्च, तो ही बघावा लागेल. आपल्याला टनावारी बियाणं, शेणखत आणि रेती लागणार आहे, मग मिळेल त्या भावाने घ्यावी लागेल, कारण आपला टाइम बाऊंड कार्यक्रम असतो. या सगळ्यांची सखोल गणितं मांडावी लागतील, आणि एखाद्या वर्षी जर अतिवृष्टी मुळे सगळ्या उभ्या पिकांची नासाडी झाली, तर ते नुकसान झेलायला, आपल्या जवळ तेवढी गंगाजळी आवश्यक आहे. या सगळ्यांचा पूर्ण विचार करून, मगच काय तो निर्णय घ्या. नाही तर स्वप्न साकार करता करता, झोपच उडून जायची. असं नको व्हायला.” विदीशानी आपला विचार सविस्तर सांगितला. आता मात्र सरिताचा चेहरा पडला. ती हिरमुसली. तिच्याकडे विशालला पहावलं नाही. “काय ग वाहिनी, चेहरा का पडला तुझा? अग आपण घेऊ शेती कसायला आणि मार्ग काढू, तू नको चिंता करू.”
“अरे तसं काहीही नाहीये विशाल.” सरिता म्हणाली. चेहरा गंभीरच होता. “मी शेती कशी कसायला घ्यायची या बद्दल विचार करतच नाहीये. ते काय व्यवस्थित प्लॅनिंग केल्यावर काहीच कठीण नाहीये. ते सोड.”
आता आश्चर्य करण्याची पाळी इतरांवर आली. निशांत म्हणाला “मग असं आहे, तर तुझा चेहरा का पडला.?”
“माझ्या मनात खूप सारे प्लॅन्स होते,” सरिता म्हणाली. “पण आता सहकारी संस्था काढता येत नाही म्हंटल्यांवर पुन्हा नव्याने विचार करावा लागणार आहे. त्याच विचारात होते मी.”
“आम्हाला सांग, म्हणजे सर्वच विचार करू आणि सोल्यूशन काढू.” निशांत म्हणाला.
“आपण जी पिकं घेतो, ती तशीच्या तशी औषधांसाठी वापरता येत नाहीत. त्याला प्रोसेस करावं लागत. मला हे प्रोसेसिंग प्लांट टाकायचे आहेत. वॅल्यू अॅडिशन साठी. दुसरं म्हणजे मला चीज फॅक्टरी टाकायची आहे ज्यात निरनिराळ्या प्रकारचे चीज उत्पादन करता येईल. अश्या प्रकारच्या चीजला बाहेरच्या देशात बरीच मागणी आहे. त्यांच्यासाठी मिल्क प्रोसेसिंग यूनिट उभारावं लागेल ते ही करायचं आहे. आणि जमलच तर एक आयुर्वेदिक औषधांची फॅक्टरी पण टाकायची आहे. आणि हे सगळं यशस्वी होण्या साठी किमान २०० एकर शेती आवश्यक आहे असं मला वाटतं. अर्थात हे सगळे लॉन्ग टर्म प्लॅन्स आहेत, पण आता सुरवातच करता यायची नाही म्हंटल्यांवर सगळंच मुसळ केरात गेल.” सरितानी आपले प्लॅन्स सांगितले.
सगळे पुन्हा शांत. सरिताचे एवढे प्लॅन्स असतील आणि एवढी मोठी उडी घेण्याचा तिचा विचार असेल असं निशांत आणि विशाल आणि बाबांना सुद्धा वाटलं नव्हतं. पण आता विदीशानी बोलायला सुरवात केली.
“वहिनी, इतकी निराश का होते आहेस? अग या सर्व गोष्टींचा आपण या आधीच विचार केला आहे. तू विसरलीस का? आपण आता प्लान B चा विचार करू. माझ्या मते त्यानी सर्व गोष्टी साध्य होतील.”
“यस.” आता वर्षा बोलली. “वाहिनी, बऱ्याच दिवसांपूर्वी, आपण यावर बरीच चर्चा केली होती. आपली चर्चा झाल्यावर मी यात बरंच रिसर्च वर्क केलं आहे. आपण एक प्रायवेट लिमिटेड कंपनी स्थापन करायची. सुरवातीला प्रोसेसिंग यूनिट बद्दल प्रोजेक्ट रीपोर्ट तयार करायचा. याच्यासाठी बँक लोन देईल. शेतीचा मुद्दा निशांत हळू हळू सोडवेल. वर्ष, दोन वर्षात आपल्याला १०० – १५० एकर शेती सहज मिळून जाईल, कारण तो पर्यन्त आपलं आणि कंपनी चं नाव झालं असेल. सिम्पल आहे. अर्थात कोणालाच श्वास घ्यायला सुद्धा फुरसत मिळणार नाही हे ओघानेच आलं. कसं वाटतंय सगळ्यांना?”
सरिताचं बोलणं ऐकल्यावर सगळे आदर मिश्रित, आश्चर्याने तिच्याकडे बघत होते, पण आता वर्षांनी जे सविस्तर पणे उलगडून दाखवलं त्यामुळे सगळ्यांनाच आनंद झाला. सर्व शंकांचं निरसन झालं होतं. सर्वांनी आपापले हात पुढे केले. हातावर हात ठेवल्या गेले आणि सर्व एक मताने एका आवाजात म्हणाले, चला “आता लगीन कोंडाण्याचं.”
हे सगळं कसं साध्य करायचं याच विचारात सगळे गढून गेले.
****पूर्ण विराम .****
मनोगत : -
स्त्रियांची मानसिक स्थिती आणि त्यांच्या भावनांचं हृदयस्पर्शी चित्रण, त्यांच्यावरच्या, अन्यायाचा आणि अडचणींचा डोंगर, याचं कुठलंही रेखाटन न करता, लिहिलेल्या या कथेला पांच पन्नास वाचक तरी मिळतील का, अशी भीती माझ्या मनात पहिला भाग पोस्ट करतांना होती. पण माझ्या या आगळ्या वेगळ्या आणि धोपटमार्ग सोडून लिहिलेल्या कथेला सुद्धा वाचकांनी जो अभूतपूर्व प्रतिसाद दिला, त्या बद्दल मी सर्व वाचकांचा अतिशय ऋणी आहे. श्रीपत पाटिलांनी व्यक्त केलेला विश्वास त्यांच्या सुनांनी सार्थ ठरवला. सर्व पाटील कुटुंब एकत्र होऊन एकोप्याने काम करायला लागलं. सरिताच्या स्वप्नांना पूर्ण रूप देण्यात पाटील मंडळींना किती आणि कश्या अडचणी आल्यात आणि त्यांनी त्यावर कशी मात केली, हे सर्व मी वाचकांच्या कल्पनाशक्तीवर सोडतो आहे, आणि कथेच्या या पर्वाला पूर्ण विराम देतो आहे. शेवटी पुन्हा एकदा वाचकांना अनेक अनेक धन्यवाद.
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com
धन्यवाद.