**********************
१०
स्वानंदला वाटत होतं की ती स्नेहल, ज्या स्नेहलनं फार दुःख भोगलं. तिला जीवनभर सुखच मिळालं नाही. विवाहापुर्वी आणि विवाहानंतरही. तिचा पहिला विवाह फसला होता. ज्यातून तिच्या पतीनं तिला घरातून हाकलून लावलं होतं आणि जेव्हा तिनं स्वानंदसोबत विवाह केला होता. तेव्हाही तिनं यातनाच भोगल्या होत्या. आठवत होता तोही एक प्रसंग. ज्यावेळेस स्नेहल गरोदर होती. तेव्हा तिला गर्भातच समस्या आल्या होत्या. डॉक्टरांनी सांगीतलं होतं की आपण एक बाळ वाचवू शकतो नाहीतर आई. तसं स्वानंदचं तिच्यावर प्रेम असल्यानं त्यानं स्नेहलला वाचवा असं म्हटलं होतं. ते तिच्यासमोरचेच बोलणे होते स्वानंदचे. परंतु ते ऐकताच स्नेहलनं बाळाला वाचवावं असं म्हटलं होतं. मात्र सुदैवानं दोघंही वाचले व ती अगदी म्हातारी होईपर्यंत स्वानंदच्या घरी राहिली. मुलांसाठी सर्व केलं होतं तिनं. मुलांनी मात्र तिच्यासाठी काहीही केलं नव्हतं.
स्नेहलशी विवाह झाल्यानंतरचे लहान लहान प्रसंग. ज्यातून तिच्या आयुष्याची परिक्षा झाली व त्याच्याही आयुष्याची परिक्षा. तो जातीबाहेरील त्यांचा विवाह. त्या विवाहानं व जातीनं संपुर्ण आयुष्यभर त्यांना जातीच्या बाहेरच ठेवलं. जातीत मिळू दिलं नाही. तसेच दहा वर्ष नोकरी करुनही स्नेहलचा काहीही दोष नसतांना शालार्थ आय डी घोटाळ्यातून तिला घरीच बसविण्यात आलं. त्यानंतर न्यायालयाची तारीख चालली. न्यायालयातही तारीखवार तारखेनं ती परेशान होत होती एवढंच नाही तर शेवटीही तिला न्याय मिळाला नाही. तो खटला हारावा लागला. मात्र त्या खटल्यात सुनावणी झाली असली तरी तिचा त्यात दोष नाही, असा न्यायालयानं निकाल दिल्यानं तिला न्यायालयानं अटक केली नसल्यानं ती सुदैवानं वाचली व न्यायालयातून बा इज्जत बरी झाली. परंतु आयुष्याच्या न्यायालयात फसली व वृद्धाश्रम नावाचा तुरुंग मिळाला.
तो संस्थाचालक....... त्या संस्थाचालकानं त्यांचा विवाह करुन दिला होता. त्याचे उपकार होते स्वानंदवर. त्यानंच जणू त्यांचा संसार बसवला होता. परंतु नंतर त्यांच्या संबंधात वितुष्ट आलं. काही दिवस संस्थाचालकासोबत चांगलं पटलं स्वानंदचं. परंतु काही दिवसानंतर संस्थाचालक व स्वानंदचं पटेनासं झालं. वाद मुख्याध्यापक पदावरुन झाला. संस्थाचालकाला आपली नातेवाईक मुख्याध्यापक पदावर बसवायचा होता. परंतु स्वानंद सेवाजेष्ठ असल्यानं त्याची मुख्याध्यापक पदी वर्णी लागणार होती. त्याचेपुर्वी बाकीची सेवाजेष्ठ असलेली सर्व शिक्षक मंडळी निवृत्त झाली होती.
ते मुख्याध्यापक पद. त्या पदाच्या नियुक्ती संदर्भात एक दिवस संस्थाचालकानं स्वानंदची भेट घेतली. तसा तो आदिवासी समाजातून असल्यानं व सेवाजेष्ठ असल्यानं त्याला वाटत होतं की त्यालाच मुख्याध्यापक पद मिळावं आणि मिळणारही. कारण त्याचे संस्थाचालकासोबत चांगले मधूर संबंध आहेत. परंतु जेव्हा संस्थाचालकानं त्याची भेट घेतली व म्हटलं की आपण मुख्याध्यापक पद घेण्यास इच्छुक नाही, असं त्यानं लिहून द्यावं. त्यावेळेस स्वानंदचे धाबे दणाणले. त्यानंतर त्यानं ताबडतोब सांगीतलं की सर, असं होणार नाही. तसं करणं म्हणजे त्याच्या हक्कावर गदा येणं होय. त्यावर संस्थाचालक म्हणाले,
"हे बघा, मी तुमचा संसार बसवलाय."
ते संस्थाचालकाचं बोलणं. ते ब्लॅकमेल करणारं बोलणं. ते काही स्वानंदला पटलं नाही व त्यानं संस्थाचालकाला ठणकावून सांगीतलं की सर, आजपासून तुमचा मार्ग वेगळा व माझा मार्ग वेगळा. मग सुरु झाला संघर्ष. संस्थाचालक त्याला पत्रावर पत्र देत होता आणि स्वानंद त्याची उत्तरं. संस्थाचालक त्याला निलंबित करण्याच्याही गोष्टी करीत होता आणि दोन वर्ष तर त्याचेवर आरोप लावून त्याचं वेतनही बंद करुन टाकलं होतं. परंतु स्वानंद काही घाबरला नाही. त्यानंही कायद्याचा एक अधिकार वापरला. ज्याला माहितीचा अधिकार म्हणत. तो अधिकार वापरुन त्यानं अशी माहिती मिळवली की ज्यातून त्याला कायद्यानुसार मुख्याध्यापक पद मिळालं. परंतु तरीही तो सुखी नव्हता.
स्वानंदला मुख्याध्यापक पद मिळालं होतं. त्याचं वेतन वाढलं होतं. परंतु आता काळ बदलला होता. नवीन बदलत्या काळानुसार शिक्षण क्षेत्रात ऑनलाइन कामाच्या पद्धतीनं प्रवेश केला होता. या ऑनलाइन कामात वर्ग शिकवावा देखील लागत असे आणि शाळेची माहितीही ऑनलाइन स्वरुपात भरावी लागत असे. त्यातच तीच माहिती कागदावर भरुन कार्यालयात नेवूनही द्यावी लागत असे. या सर्व बाबी कटकटीच्या होत्या व त्यातून ते मुख्याध्यापक पद सोडावंसं वाटत असे. परंतु स्वानंदला वाटायचं की ते मुख्याध्यापक पद सोडलं तर आपलीच नाचक्की होईल. शाळेतील मंडळी व खासकरुन संस्थाचालक आपल्यावर पोट धरुन हसेल.
ते मुख्याध्यापक पद सांभाळतांना नाकीनव येत होतं. कारण संस्थाचालक विरोधात असल्यानं तो पत्रच पत्र पाठवायचा. ते पत्रही त्याला परेशान करणारेच होते. त्यातल्यात्यात कार्यालयातील कामाचीही पत्र यायचीच. तिही माहिती ऑनलाइन स्वरुपात भरावी लागायची. त्यातच पालकही कधी येवून शाळेची बदनामी करण्याच्या गोष्टी करीत. कधी विद्यार्थीही कुरकूर करीत. हे सर्व सांभाळून स्वानंद वाट काढत होता. त्याला घरी आल्यावरही टेंशनच असायचं. मात्र या सर्व संकटांच्या प्रसंगात स्नेहल त्याला मदत करीत होती. त्याचं या काळात घराकडे लक्ष नसायचं. त्याचवेळेस स्नेहल घर सांभाळत होती. मुलांकडे लक्ष देत होती. त्यांचा अभ्यास व त्यांची शाळाही सांभाळत होती. तिनं घरच्या कोणत्याही प्रसंगात कधीच कुरकूर केली नाही.
आज त्याच आईला की जिनं त्या कठीण प्रसंगात आपल्या मुलांना सांभाळलं. तिलाही तिच्या मुलांनी वृद्धाश्रमात टाकल्याचं दुःख त्याला होतं. त्याला वाटत होतं की ज्या आईनं आपल्या मुलांचे दुःख शोषले. त्यांचा अभ्यास सांभाळला. शाळा सांभाळली. निदान त्या आईला आपल्या मुलांनी वृद्धाश्रमात टाकायला नको होतं. परंतु विपरीत घडलं होतं.
ते वृद्धाश्रमातील दिवस. तेथे गोडवा होता. सर्व वृद्धाश्रमवाशी एकमेकांवर प्रेम करीत असत. ते सकाळीच उठत. एकमेकांना फुल देत. प्रेमाची दोन शब्द बोलत असत. एकमेकांच्या सुखदुःखाबाबत बोलत. एकमेकांना सांत्वना देत. ज्यातून त्यांच्या जीवनात आनंद भरला जात होता. परंतु कधीकधी आठवायचं ते पुर्वाश्रमीचं जीवन. ज्या जीवनात रस होता. तेव्हा असं वाटत नव्हतं की पुढील आयुष्य आपल्याला वृद्धाश्रमात घालवावे लागतील. परंतु तशी वेळ आली होती स्वानंदच्या जीवनात.
ते पती पत्नी. दोघंही कैदेत पडल्यासारखे वृद्धाश्रमात होते. तशीच जेव्हापर्यंत स्नेहल त्याचेसोबत होती, तेव्हापर्यंत ते वृद्धाश्रमही बरं वाटायचं त्याला. ती त्याची जणू करमणूकच होती. परंतु जेव्हा ती मरण पावली. अन् जेव्हा तो एकाकी झाला व त्याला जगणं असह्य झालं. तेव्हा त्या वृद्धाश्रमातील भींती, तो परीसर त्याला खायला धावत होता. कधीकधी ती वयोवृद्ध मंडळी त्याला भेटायला यायची. ती फुल देवून जायची. कधी सांत्वन द्यायची. परंतु ते सांत्वनही त्याला दुखदायीच ठरत होतं. कारण ज्यांना त्यांनी लहानाचं मोठं केलं होतं, त्याच लोकांनी ऐन संकटाच्या वेळेस मायबापाला आधार न देता त्यांना वृद्धाश्रमात टाकलं होतं.
आज तो वृद्धाश्रमाच्या पायरीवर बसला होता. तशी त्याला आठवली ती सुनेची कटकट. तो किरकोळ कारणावरून झालेला वाद. ती सून म्हणाली होती. या दोघांना वृद्धाश्रमात टाका. 'सारखी वटवट करतात.' तेव्हा मात्र पायाखालची जमीनच सरकली होती स्वानंदच्या. वाटायला लागलं होतं की ही आई. ज्या आईनं यांना जन्म दिलाय. त्यांना कोणतंच दुःख दिलं नाही आणि तरीही ही मुलं आज आपला स्वार्थ पाहात म्हणत आहेत की यांना वृद्धाश्रमात टाका. ज्यांना उपकारही समजत नाहीत.
ते दुःख त्याला आठवत होतं. विचार येत होता की आम्ही असे कोणते वाईट कर्म केले की आम्हाला वृद्धाश्रम मिळालं. आम्हाला वृद्धाश्रमासारखी कैद झाली. ना आम्हाला इथं आमची नातवंड दिसत. ना कोणी मायेची माणसं इथं आम्हाला भेटायला येत. सर्व संघर्षच संघर्ष आहे आमच्या या जीवनात. लहानपणापासून तर आजपर्यंत. ना स्नेहलनं बालपणात सुख पाहिलं ना मी लहानपणापासून सुख पाहिलं. अन् ना आम्हा दोघांचं तरुणपण आनंदात गेलं. तरीही हे म्हातारपण. वाटलं होतं की म्हातारपणात तरी आपल्याला सुख लाभेल. परंतु छे! म्हातारपणही आमचं दुःखानंच भरलेलं आहे.
स्वानंद व स्नेहल शिकले होते. त्यांनी उच्च अर्हताही प्राप्त केल्या होत्या. त्यानुसार त्यांनी आपल्या मुलांनाही उच्च शिक्षण दिलं होतं. वाटत होतं की ती मुलं उच्च शिक्षित झाली व नोकरी लागली की आपलं कर्तव्य संपेल. मग आपण निवृत्त होवून मस्त आरामात नातवंडासोबत खेळत खेळत जीवन काढू. त्या म्हातारपणात कोणतंच दुःख आपल्या जीवनात येणार नाही. कारण मुलं शिकलेली आहेत. ते आपली सेवा उत्तमप्रकारे करतील.
ते स्वानंदचं सोचणं म्हणजे दगडाला पाझर फोडण्यासारखंच होतं. कारण तो आज वृद्धाश्रमात पडला होता, ऐन म्हातारपणात. ज्या म्हातारपणात त्यानं सुखाची कल्पना केली होती. सुखाचं स्वप्नच जणू पाहिलं होतं. आज त्याला वाटत होतं की सर्व आईवडीलांनी मुलांना जन्मासच घालू नये. त्यांना शिक्षण शिकवू नये. त्यांचा अभ्यास घेवू नये. त्यांना शाळेत पाठवू नये. कारण जी मुलं कमी शिकतात. ती मुलं आपल्या मायबापाला नक्कीच पोषतात. त्यांच्या आवडीनिवडी पुर्ण करतात. ते मायबापाला मायबाप समजतात आणि ही शिकलेली मुलं चक्कं आपल्या शिकलेल्या पत्नीच्या गळ्यातील ताईत म्हणून वागतात. ही शिकलेली मुलं. दोघंही नोकरी करतात. अन् मायबापांना न सांभाळता त्यांना वृद्धाश्रम दाखवतात. यापेक्षा मुलं शिकवलीच नाही तर बरं. म्हणतात की शिक्षण ही काळाची गरज आहे. त्यानुसार शिक्षणाचं महत्वही वाढलेलं आहे. आता प्रत्येक मुल शिकत आहे व ज्ञानाच्या कक्षा पार करीत आहे. शिवाय आजच्या काळात जे मायबाप आपल्या मुलांना शिकवीत नाहीत. त्यांना शिक्षाही शासन करु शकतो. ही निर्विवाद सत्य बाब आहे.
अलिकडील काळात शिक्षणाला फार महत्व आलं आहे. ज्यातून त्या मुलांच्या आत्मनिर्भरतेची कल्पना केली जाते. मुलं आत्मनिर्भर बनावी व ते बनविण्यासाठी मुलांना शिक्षण महत्वाचं. असं शिक्षणाचं उद्दीष्ट्य आहे. पुर्वी असं नव्हतं. मायबाप मुलांना जन्म देत. त्यानंतर ती मुलं शाळेत गेलीच पाहिजे अशी अपेक्षा नसायची. याचा अर्थ ती मुलं शिकत नव्हती असे नाही. ती मुलंही शिकत होती. शास्त्रशुद्ध शिक्षण नाही तर ती मुलं व्यावसायिक शिक्षण शिकत होती. आपल्या कुटूंबात जो व्यवसाय असेल, ते शिक्षण त्या मुलांना येत होतं. शिवाय त्या शिक्षणातून त्यांना पोटंही भरता येत होतं. शिवाय त्याच शिक्षणातून मुलांना संस्कारही मिळत. आजचं शिक्षण काही तशा स्वरुपाचं नाही. आजच्या शिक्षणातून मुलं शिकतात. ती उच्चशिक्षीतही होतात. परंतु संस्कारी बनत नाहीत. कारण आजची जी मुलं उच्चशिक्षीत होतात. तीच मुलं आपल्या मायबापांना सांभाळून घेत नाही. त्यांनी केलेले उपकार त्यांना आठवत नाहीत. त्यांची थोडीशी कटकट त्यांना फार मोठी वटवट वाटते. ते विसरतात, मायबापांनी त्यांना उन्हातून सावलीत नेलेल्या गोष्टी. त्यांना घरी त्यांच्या बोटानं गिरविलेली अक्षरे. त्यांना शिक्षकांनी मारु नये, वेदना होतात, म्हणून शिक्षकांना वेठीस धरणे. त्यांना दररोज शाळेत पाठविणे. ते आजारी पडू नये, म्हणून त्यांना ताजं बनवून चारणे आणि स्वतः शिळे अन्न खाणे. कारण संस्कार हे आजची मुलं शिकतच नाहीत लहानपणापासून. शिवाय लहानपणापासूनच ते मायबापांशी मुजोरी करणं शिकतात. हे सगळं घडलं विभक्त कुटूंब पद्धतीमुळं. मुलांच्या वागण्यातून काही गोष्टी चुकत असतील तर त्यांनी ती चूक दुरुस्त करावी म्हणून आजचे मायबाप त्यांना बोलत नाहीत. तसेच संस्कार लावणारी वयोवृद्ध मंडळी ही घरात नसतात. ती कुठंतरी दूर अशा ठिकाणी वृद्धाश्रमात असतात. मायबापांनाही घरात मुलांना संस्कार लावता येत नाहीत. कारण तेवढा पुरेसा वेळच नसतो त्यांचेजवळ.
पुर्वी असं नव्हतं. संयुक्त कुटूंब पद्धती होती व त्या कुटूबपद्धतीत संस्कार होते. जे संस्कार घरातूनच मिळत. एखादा लहान मुलगा वात्रटपणाने वागत असेल तर त्याला त्याचे आजोबा किंवा वडीलधारी मंडळी समजावून सांगत की त्यानं चांगलं वागावं. वात्रट वागू नये. त्यानुसार मुलंही चांगली वागत होती. ते आपल्यात संस्कार फुलवीत होती. संस्कारानं वागत होती. अन् हेच संस्कार जेव्हा विद्यार्थ्यात बालपणात फुलत, तेव्हा तेच संस्कार जीवनभर टिकायचे व त्याच संस्कारानं मुलं आपल्या मायबापाच्या म्हातारपणी त्यांची सेवा करीत असत. ते त्यांना अंतर देत नसत नव्हे तर त्यांना कधीच वृद्धाश्रमात पाठवीत नसत. त्यामुळंच म्हातारपणी मायबाप हे आपल्या नातवंडासोबत राहात व नातवंडासोबत राहात असतांना आनंद साजरा करत असत. ते नातवंडासोबत राहणं म्हणजे त्यांची दिवाळीही असे आणि दसराही. मात्र आज तसं नाही. आजचे मायबाप हे वृद्धाश्रमात असतात. त्यामुळं लहान मुलांवर संस्कार होत नाहीत. मुलं दिवसभर शाळेत जातात व मायबाप दोघंही नोकरी निमित्यानं कामाला जातात. दोघंही घरी नसतात आणि दोघंही मुलांवर संस्कार करु शकत नाहीत. कारण मुलांना सांभाळण्यासाठी आया असते. ती काही मुलांवर संस्कार करु शकत नाही. त्यातच मायबाप जेव्हा घरी येतात. तेव्हा ते थकलेले असतात. त्यांना मुलांशी बोलायलाही पुरेसा वेळ नसतोच. त्यातच मुलांशी बोलायचा प्रश्न आलाच तर ती मुलं मायबाप घरी आल्यावर झोपलेले असतात. कधीकधी मायबापाची मुलांशी आठवडा आठवडा मुलाखतच होत नाही. अशावेळेस मुलांवरच मायबापांकडून होणारे संस्कार कुठून होणार? ते होत नाहीत. कधी झालीच तर मायबाप मोबाईलवर असतात आणि मुलंही. शेवटी असे संस्कार न झाल्याने मुलं आपल्याच मायबापाला म्हातारपणी वृद्धाश्रमात नाही टाकतील तर काय? ते म्हातारपणात मायबापांना वृद्धाश्रमात टाकतातच. हे सत्य आहे.
सर्वात महत्वाचा असतो मुलांना पैसा. पैशासाठी सर्व सुरु असतं. ते विभक्त कुटूंब. त्यातच मायबापांना वृद्धाश्रमात टाकणं. आया लावणं. परंतु कामाला जाणं. ज्यातून कधी वाईट संगत मुलांना जडते. कधी कुविचार मनात शिरतात. मग तीच मुलं मोठी झाली की बस, आईवडीलांचं मुळात ऐकतच नाही. विचार करतात की मी जेव्हा लहान होतो, तेव्हा हेच माझे आईबाप मला सोडून कामावर जायचे. आता मीही आईवडीलांना सोडून कामाला जाणार. प्रसंगी त्यांना वृद्धाश्रमात ठेवणार. ती त्यांची इच्छा. मुलांचं नुकसान झालं तरी त्यांना चालतं. परंतु आईवडीलांचं साधं बोलणंही त्यांना चालत नाही. संस्कार त्यांना आवडत नाही. देव, धर्म, जात, चांगला पोशाख, चांगलं बोलणं, त्यांना आवडत नाही, तर आवडतात विभित्स प्रकारचे अर्धनग्न शरीर दिसणारे कपडे. आवडतं वात्रट बोलणं आणि आवडतो तो भ्रष्टाचार. कारण पैशाची हाव असते त्यांना. परंतु त्यांना माहित नसतं की हा पैसा भ्रष्टाचारी मार्गानं कमावतो ना. त्या पैशात कोणाच्या भावना असतात. त्या शाप देत असतात आणि शाप देत असतात ते मायबाप. ज्या मायबापाला आपण वृद्धाश्रमात टाकलेलं असतं.
स्वानंदला वाटत होतं की मुलांनी आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमात का पाठवावं. त्यांनी एवढं पाप केलं असतं काय? त्यांनी तर आपल्याला शिकविलेलं असतं. पाप केलेलं नसतं. त्यांनी उच्चशिक्षीत बनवून आपल्याला आत्मनिर्भर केलेलं असतं. आपलं पालनपोषण केलेलं असतं नव्हे तर आपल्याला उन्हातून सावलीत नेलेलं असतं. शिवाय आपल्यावर आलेली संकटं स्वतः शोषलेली आणि झेललेली असतात. मग आपण असे आपल्याच मायबापांनी आपल्यावर केलेले उपकार विसरु नयेत. त्यांची सेवा करावी. त्यांना वृद्धाश्रमात पाठवूच नये. कारण वृद्धाश्रम म्हणजे त्यांच्यासाठी कारागृहच असतं. परंतु त्यामध्ये जो जातो, त्यालाच ते कळतं. इतरांना नाही. म्हणूनच आपल्या मायबापांना वृद्धाश्रमात पाठवू नये म्हणजे झालं.