**************************
११
स्नेहल आज जगात नव्हती. ती गेल्यापासून स्वानंद नेहमी निराश असायचा. त्याच्या जीवनात आनंद नसायचाच. ती वृद्धाश्रमाची पायरी. त्या पायरीवर बसून स्वानंद नित्यनेमानं विचार करीत असायचा. आपण कोणतं पाप केलं असेल की आपल्याला वृद्धाश्रम मिळालं. त्यातच त्याला आठवण यायची स्नेहलची. जी आज अजिबात जीवंत नव्हती. तशीच त्याला आठवण यायची ती त्याच्या मुलांची. कधी मुलगा भेटायला येईल असं सारखं वाटायचं. त्यातच त्याला बंधनही होतं. ते बंधन म्हणजे त्याला स्वतःचे निर्णय घेवून परवानगी न घेता फिरायला कुठेही जाता येत नसे.
आज त्याला घरची आठवण आली होती. ती आठवण तीव्र झाली होती. त्यातच त्याचा जीव कासावीस झाला होता. तोच तो विचार करीत होता की हा देह. या देहाचा आपल्याला किती लोभ आहे. आपण आपल्या देहाची एक फुटी कवडीही कोणाला दान देत नाही. तसा आपला देह कोणत्या कामाचा? मृत्यूनंतर आपला देह हा कोणाच्याच कामात येत नाही. तो जळतो व त्याची राख बनते. मुलं ती राख उचलतात. क्षणभर रडतात. मग ती राख पाण्यात शिरवतात व घरी येतात. त्यानंतर ते तिसरा दिवस साजरा करतात. कोणी तेरवी चौदावीही. त्यानंतर सगळं विसरतात. ते विसरतात आपल्या आईवडिलांना. मात्र त्यांची मालमत्ता विसरत नाहीत ते. ती मालमत्ता आधी पाहिजे त्यांना. मायबाप नकोत त्यांना.
आपलंही कदाचीत तसंच होणार. आपल्या मृत्यूनंतर आपली मालमत्ता ही आपली मुलं परस्परात वाटून घेणार. आपल्या मृत्यूनंतर आपल्या देहाला आपली मुलं अग्नी देणार. आपला मृतदेह जळणार. त्याची राख बनणार. ती राख गंगेला मिळणार. मग आठवणार बाप. अन् ती माझी मालमत्ता. किती मुल्य आहे त्याचे ठरवले जाणार. त्यानंतर वाटप होणार. एखाद्याला कमी वाटा मिळाला की शिव्या मिळणार. बाप मेल्यावरही बापालाच आणि आता मी जीवंत आहो तरी मलाच शिव्या मिळतात. प्रत्येक मायबाप लेकराची आस करतो आपल्या म्हातारपणावरुन. वाटतं की माझा मुलगा म्हातारपणात माझा सहाध्यायी बनावा. एक आधार द्यावा मुलानं. म्हणूनच त्याला उन्हातून सावलीत नेणं, शिक्षण शिकवणं व मुलांना आत्मनिर्भर करणं सुरु असतं, बापाचं. परंतु मुलं मायबापाच्या म्हातारपणात आधार बनतात का? याचं उत्तर नाही असंच आहे. माझंही तसंच झालेलं आहे. मलाही वाटत होतं तरुणपणात की माझी मुलं माझा आधार बनतील. परंतु नाही. ती आधार बनली नाहीत माझी. त्यांनी मलाच माझ्या घरात राहू दिलं नाही आणि ती स्वतः माझ्या घरात राहात आहेत आणि मीही त्यांना तिथं राहू देत आहे. कारण आहे, माझा देह. मला वाटते की मी मेल्यानंतर त्यांनी माझ्या देहाला अग्नी द्यावा. म्हणूनच आजही मी गप्प.
स्वानंद विचारच करीत होता. तोच त्याला आठवलं देहदान करणं. त्याला आठवलं की लोकं देहदान करतात. त्या देहदानात आपलं संबंध शरीर वैद्यकीय महाविद्यालय घेवून जातं. आपल्या शरीरावर लाखो जीवं शिक्षण शिकतात. साधे डोळेही आपल्या नातेवाईकांना मिळत नाहीत. तसं पाहिल्यास देहदान केल्यानंतर आपल्या शरीरावर रुग्णालयातील प्रशासनाव्यतिरीक्त कुणाचाही ताबा नसतो. आपल्या स्वलेकराचाही नाही. अन् का असावा त्यांचा ताबा आपल्या मृत्यूनंतर. मला इथं वृद्धाश्रमात टाकल्यानंतर माझ्या शरीराच्या कोणत्याच अवयवावर त्यांचा ताबा नसावा आणि ती माझी मालमत्ता. त्या मालमत्तेवरही कोणाचाच ताबा नसावा. तशी कागदपत्रच तयार व्हावीत. असं व्हावं की मेल्यानंतर मुलांना मायबापाची मालमत्ताच मिळू नये. शिवाय शरीरही मिळू नये. तरच ती मुलं आपल्या मायबापाच्या जीवंतपणी त्यांची सेवा करतील. निदान मायबापाची मालमत्ता मिळावी या उद्देशानं.
स्वानंद विचारच करीत होता. तोच त्यानं ती गोष्ट वृद्धाश्रम प्रशासनाला सांगीतली. त्यानं आपल्या शरीराचा देहदान संकल्पही सांगीतला. त्यानंतर रितसर त्यानं देहदानाचा फॉम भरला व आपलं शरीर मृत्यूनंतर रुग्णालयातील प्रशासनाला दान दिलं. शिवाय स्वानंदनं एवढंच केलं नाही तर त्यानं आपली संपुर्ण मालमत्ता वृद्धाश्रम प्रशासनाला दान दिली होती. त्या दानात त्यानं दोन एकर घेतलेली शेतीही दान दिली होती. ज्या शेतीवर त्यानं एक स्वप्न पाहिलं होतं. ते पुर्ण झालं नव्हतं नव्हे तर ते स्वप्न त्याला आयुष्यभर पुर्ण करता आलं नव्हतं. ते स्वप्न होतं, एक घर बांधून त्या घराला सुभद्राश्रम नाव देणं. ती गोष्ट सुद्धा त्यानं आपली शेती वृद्धाश्रम प्रशासनाला दान देतांना आवर्जून सांगीतली होती. ही गोष्ट मरेपर्यंत गुप्त ठेवण्याची विनंती त्यानं वृद्धाश्रम प्रशासनाला केली होती व तो मोकळा झाला होता. आता तो निवांत मरु शकत होता. आता त्याला कोणत्याच स्वरुपाची चिंता नव्हती. ना त्याला आपल्या शरीराच्या विल्हेवाटीची चिंता होती. ना त्याला त्याच्या मालमत्तेची चिंता होती.
एक दिवस स्वानंद परीसरात फिरत होता. तसा तो जसजसा वृद्धापवस्थेकडे जात होता. तसतशी त्याला चिंता वाटत होती. आजही तीच चिंता होती. तसं त्याला सकाळी त्याला रात्रीला पडलेलं स्वप्न आठवत होतं. रात्रीला त्याच्या स्वप्नात त्याची पत्नी स्नेहल आली होती. म्हणाली होती की ती उद्याच त्याला न्यायला येणार आहे. त्यानं तयार राहावं.
ती का बोलली व ते स्वप्न कशाचा संकेत देत असेल. यावर तो सकाळीच उठल्या उठल्या विचारच करीत होता. तोच तो धाड्कन खाली कोसळला. ते पाहून वृद्धाश्रम प्रशासनानं त्याला ताबडतोब रुग्णालयात हलवलं. डोक्याला गंभीर दुखापत झाली होती व डोक्याची नस फाटली होती. डॉक्टरांनी त्याला तपासलं व सांगीतलं की स्वानंदचा काळ आलेला आहे. त्याचे जे कोणी जवळचे नातेवाईक आहेत. त्यांना बोलावून घ्यावं. त्यामुळं डॉक्टरांच्या बातमीनुसार वृद्धाश्रम प्रशासनानं त्याची वार्ताही त्याच्या मुलांना कळवली. त्यानंतर मुलं जरा उशिराच रुग्णालयात पोहोचली.
मुलं आली होती. त्यांनी आपल्या वडिलांची भेट घेतली. त्यातच स्वानंदनं मुलांकडे एका घृणीत नजरेनं पाहिलं व तो गतप्राण झाला.
स्वानंद गतप्राण झाला होता. तो गतप्राण झालेला पाहून त्याची दोन्ही मुलं धाय मोकळून रडत होती. त्यांच्या रडण्यावरुन असं वाटत होतं की त्यांनी आपल्या मायबापाची किती सेवा केली असेल. परंतु ते धांदात खोटं होतं.
स्वानंद मरण पावताच त्याच्या मुलानं त्याच्या प्रेताची मागणी वृद्धाश्रम प्रशासनाला व रुग्णालयातील प्रशासनाला केली. त्यावर त्यांनी नकार दिला व सांगीतलं की त्याच्या वडिलांनी देहदान केलेले आहे. शेवटी निराश होवून त्याची मुलं घरी परतली.
पुरते आठ दिवस झाले होते. वकिलानं बनविलेलं वकीलपत्र सोबत घेवून वृद्धाश्रम प्रशासन स्वानंदच्या मुलाच्या घरी आला. त्यांनी स्वानंदचं मृत्यूपत्र त्यांना वाचून दाखवलं. तोच त्यात लिहिल्यानुसार आदेश होता की सदर घर हे वृद्धाश्रम प्रशासनाला दान दिलेलं असून ते घर मुलांनी खाली करावं. कारण त्यांनी त्याची कोणतीच सेवा केलेली नसल्यानं ते घर स्वानंदनं वृद्धाश्रम प्रशासनाला दान दिलेलं आहे.
ते वकीलपत्र...... त्या पत्रानुसार स्वानंदच्या मुलाला ते राहात असलेलं व स्वानंदच्या नावावर असलेलं घर खाली करावं लागलं. त्या मुलांनी तद्नंतर न्यायालयात त्याबद्दल खटला दाखल केला. परंतु प्रत्यक्षात साक्षी पुराव्यानं वृद्धाश्रम प्रशासन जिंकलं. त्यानंतर वृद्धाश्रम प्रशासनानं स्वानंदच्या शेतीवर वृद्धाश्रमाची उभारणी केली. ज्याला सुभद्राश्रम नाव देण्यात आलं. आता त्या वृद्धाश्रमात स्वानंद व स्नेहलसारखी वृद्ध मंडळी येत. सन्मानानं राहात असत. त्यातच स्वानंद व स्नेहलचा गोडवा गात असत.
आज स्वानंद व स्नेहल शेतीतील वृद्धाश्रमाच्या रुपानं का होईना, मरुनही जीवंत होते. स्वानंदच्या मृत्यूनंतर त्याचे डोळे दान करण्यात आल्यानं ते दुसऱ्याला दिव्या गेले होते. तो आजही जग पाहू शकत होता. एवढंच नाही तर त्याचं ह्रृदय एका व्यक्तीला दान करण्यात आल्यानं त्याच्या ह्रृद्याचे ठोके आजही सुरु होते. ते थांबले नव्हते. तशीच त्याची किडनी आणि यकृतही दान केल्यानं तेही जीवंतच होते. शिवाय त्याच्या मृत शरीरावर कित्येक विद्यार्थी शिकत होते. कोणी वैद्यकीय क्षेत्रातील एम डी करीत होते तर कोणी एम बी बी एसही करीत होते. याशिवाय तोही एक परीवार सुधरला होता. जो परीवार आईवडीलांची सेवा करीत नव्हता. त्यांना वृद्धाश्रमात पाठवीत होता. कारण वृद्धाश्रम प्रशासनानं स्वानंदच्या मृत्यूनंतर वकीलपत्रातील लिहिलेल्या कलमेनुसार त्याच्या मुलाला घरातून हुसकावून लावलं होतं व तिच बातमी मोठ्या प्रमाणावर वर्तमानपत्रात छापून आणली होती. पुढं स्वानंदच्या मुलानं वृद्धाश्रम प्रशासनावर खटला देखील न्यायालयात दाखल केला. परंतु त्यातही न्यायालयानं वृद्धाश्रम प्रशासनाचीच बाजू घेत निकाल दिला व स्वानंदच्या मालमत्तेतील एक साधी कवडीसुद्धा स्वानंदच्या मुलाला मिळाली नाही. त्यामुळंच स्वानंदचा मुलगा दुःखी झाला होता. त्यातच तीच बातमी वर्तमानपत्रातून छापून आल्यानं स्वानंदच्या मुलाची बदनामीही झाली होती व त्याला नोकरीवरुनही काढण्यात आले होते. या सर्व प्रक्रिया चित्तवेधक होत्या. ज्याला वर्तमानपत्रातील संपादक, पत्रकार मंडळींनी उचलून धरलं होतं. त्याच गोष्टी वर्तमानपत्राच्या माध्यमातून प्रसारीत झाल्यानं त्याची जाहिरातच झाली होती. म्हणूनच आता कोणताच व्यक्ती आपल्या मायबापाला वृद्धाश्रमात पाठवीत नसे वा पाठविण्याची हिंमत करीत नसे. मात्र काही महाभाग आजही असे होते की जे त्याची पर्वा करीत नसत. ते आपलं काय होणार असा विचार करुन जबरदस्तीनं आपल्याच मायबापांना वृद्धाश्रमात पाठवीत असत. ते मायबापामुळं आत्मनिर्भर बनले असले तरी. हे प्रमाण शिकलेल्या लोकांमध्येच जास्त होते.
आज स्वानंदचा मुलगा गरीब बनला होता. त्यातच तो दारुही प्यायला लागला होता. त्याचं व्यसन वाढलं होतं. त्यातच त्याचं वाढतं दारुचं व्यसन पाहून त्याची पत्नीही त्याला सोडून माहेरी निघून गेली होती. आता त्याला कुणाचाही आधार नव्हता.
दुसऱ्या मुलाला विदेशात भ्रष्टाचारात गोवलं होतं व त्याला त्याच देशात तुरुंगात खडी फोडायला पाठवलं होतं. त्याचीही नोकरी गेली होती व त्याचाही परीवार गरीब झाला होता. हे पातक आईवडिलांची सेवा न केल्यानं घडलं होतं.
ते आता पश्चाताप करीत होते स्वतःच्या कर्तृत्वावर. आज त्यांचे डोळे उघडले होते. वाटत होतं की जर आम्ही आमच्याच आईवडीलांना वृद्धाश्रमात पाठवलं नसतं तर..... तर आज आमची अशी परिस्थिती झाली नसती. परंतु आता पश्चाताप करुन काहीच उपयोग नव्हता. कारण जे कर्म घडलं होतं. ते वाईटच कर्म होतं. ते कर्म सुधरविण्यासाठी परत कधीच वेळ येणार नव्हती. ना स्नेहल परत येणार होती, ना स्वानंद परत येणार होता. दोघंही अतृप्त इच्छेनं कितीतरी दूर निघून गेले होते, पुन्हा कधीही परत न येण्यासाठी. पुन्हा कधीही न परतण्यासाठी. सगळा संसार, मालमत्ता, राग, द्वेष, मध, मत्सर सोडून. कारण मृत्यूनंतर त्या गोष्टींचा त्यांना कोणताच फायदा नव्हता. मात्र त्यांनी जगाला एक शिकवण दिली होती. त्यासाठी मृत्यूनंतर का होईना, एक पाठशाला उभारली गेली होती. जिचं नाव होतं, सुभद्राश्रम. सुभद्राश्रम ही आजही वृद्धांची सेवा करण्याच्या गोष्टी शिकविणारी एक पाठशाळा ठरली होती.
******************************************************समाप्त*********