शेवटची सांज' या पुस्तकाविषयी
'आयुष्यातील शेवटची सांज' ही माझी एकशे दहावी पुस्तक असून एक्यांशीवी कादंबरी आहे. मी आयुष्यातील सांज ही पुस्तक लिहिण्यामागे प्रेरणा माझे मित्र सुनील वाडेचीच आहे. असं म्हणायला काहीही हरकत नाही. सुनील वाडे नावाच्या माझ्या मित्रानं बरेचसे असे शिर्षक सुचवले की त्या शिर्षकाअंतर्गत शिर्षकावरुन मी बऱ्याच पुस्तका लिहू शकलो. विशेष सांगायचं म्हणजे ही पुस्तक लिहिण्यापुर्वी मी वृद्धाश्रम नावाची पुस्तक लिहिली. ज्यात मला त्या कादंबरीतील शिर्षकावरुन संभ्रम होता. त्यावेळेस केवळ शिर्षक समर्पकता जोपासण्यासाठी माझे मित्र सुनील वाडेला फोन केला. त्यांना कथानक सांगीतलं व विचारलं की त्यांनी संदर्भीय कथानकावर आधारीत मला शिर्षक सुचवावं. तेव्हा त्यांनी आयुष्यातील शेवटची सांज नावाचं शिर्षक सुचवलं होतं व ते शिर्षक त्याला साजेसं होतं. परंतु मला ते शिर्षक आवडलं नसल्यानं मी त्या पुस्तकाला बोलका वृद्धाश्रम हे शिर्षक दिलं व ठरवलं की आपण आयुष्यातील शेवटची सांज या नावाची पुस्तक कधीतरी लिहावी. त्यानंतर मी आयुष्यातील सांज शिर्षकाअंतर्गत एक नवीन आगळीवेगळी पुस्तक लिहिली.
या पुस्तकातील शिर्षकावरुन शिर्षक आवडल्यानं आपण जेव्हा पुस्तक वाचायला बसतो. तेव्हा लक्षात येतं की यात एका शेतकऱ्याचं वर्णन असून शेतकरी आत्महत्याच आहे. तो शेतकरी आपल्या शेतातील नापिकीला कंटाळून आत्महत्या करीत असेल. परंतु प्रत्येक शेतकरी आत्महत्या या शेतीच्या नापिकीला कंटाळून नसतात. त्याची कारणं वेगवेगळी असतात. ज्यातील एक कारण मी टिपलं व त्याच्या आयुष्याची संध्याकाळ केली. आता ते नेमकं कारण कोणतं? हे ही पुस्तक वाचल्यानंतरच कळेल.
मी ई साहित्य प्रतिष्ठानचे आभार मानतो. कारण त्यांनी माझ्या बऱ्याच पुस्तका ई साहित्य माध्यमातून प्रकाशित केल्या. ज्या प्रत्येक ठिकाणी वाचल्या जातात व फोन येतात. एकदा तर मला एका तुरुंगातील कैद्याचा फोन आला होता. त्यानं तुरुंगातून सुटल्यानंतर दुसऱ्याच दिवशी फोन केला होता. म्हटलं होतं की त्यानं माझी बरीच पुस्तके कैदेत असतांना वाचली. कोणत्या माध्यमातून वाचलीत. असं विचारलं असता त्यानं ई साहित्य प्रतिष्ठानचं नाव सांगीतलं होतं. त्यावरुन कळलं की ई साहित्य प्रतिष्ठान हे तुरुंगातही पोहोचलंय. तसाच मी भाग्यशाली आहे की माझी पुस्तके ई साहित्य प्रतिष्ठाननं काढली.
माझी एवढी पुस्तके होण्यामागील कारण आहे ई साहित्य प्रतिष्ठान. कारण मी लिहित होतो व ई साहित्य प्रतिष्ठान माझी पुस्तके प्रकाशित करीत होतं. त्यामुळंच लिहिण्याचं बळ मिळालं. आज ई साहित्य प्रतिष्ठानाकडे बरीच पुस्तके प्रकाशित करायची असल्यानं ते माझी पुस्तके फारशी प्रकाशित करीत नाहीत. यावरुन ई साहित्य प्रतिष्ठानचा दर्जा कमी होत नाही. अन् माझी लेखणीही थांबलेली नाही. ती अविरतपणे चालत राहणार. भविष्यात ई साहित्य प्रतिष्ठान माझ्या पुस्तकांना न्याय देईलच.
आज माझी एक लेखक म्हणून ओळख झाली आहे, ती ई साहित्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून. लोकं माझी बरीच पुस्तके ई साहित्य प्रतिष्ठानच्या साईटवर वाचतात व फोन करतात. त्याबद्दल ई साहित्य प्रतिष्ठानचं विशेष आभार. महत्वपुर्ण बाब ही की ही पुस्तक माझी ई साहित्य प्रतिष्ठानच्या साईटवर प्रकाशित होवो अगर न होवो. ही कादंबरी प्रकाशित होणारच. तेव्हा ही कादंबरी प्रकाशित झाल्यानंतर आपण ती आवर्जून वाचावी व कशी वाटली, हे आवर्जून सांगावे ही विनंती. याबद्दल आपले विशेष आभार.
आपला नम्र
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०
आयुष्यातील शेवटची सांज
अंकुश शिंगाडे
१
ते खळं आज रक्ताळलेलं नव्हतं. परंतु त्या खळ्यानं एक श्वास कायमचा संपवलेला होता. एक बळी घेवून. लोकांना त्याची आत्महत्या पाहून असं वाटत होतं की त्यानं शेतीला कंटाळूनच आत्महत्या केली असावी. परंतु तसं त्यानं सांगीतलं नव्हतंच.
त्याचं नाव रामदास होतं. रामदासचा जन्म हा ग्रामीण भागातीलच. त्याचा जन्म घरीच झाला. दवाखाने आजुबाजूला नसल्यानं त्याच्या आईला त्याला घरीच जन्म द्यावा लागला. त्यातच त्याच्या आईचं दुखलं खुपलंही सांभाळायला कोणी नव्हतं. तसं पाहिल्यास घरी पिढीजात धंदा होता.
रामदास हा महार जातीचा होता. त्याच्या घरी विश्वकोटीचं दारिद्र्य होतं. थोडीशी शेती होती. जी पिकत नव्हती. तसं ते ठिकाण म्हणजे पावसाचं ठिकाण होतं. गावाला लागूनच जंगल होतं व त्या जंगलाच्या आणि डोंगरदऱ्याच्या माध्यमातून पाऊस दरवर्षीच जास्त यायचा. हे जरी खरं असलं तरी शेवटच्या क्षणी पाऊस जायचा.
रामदासचे वडील शेती करीत होते व त्या शेतीत ते धानाचं पीक न घेता इतर पावसाळी पीकं घ्यायचे. त्यासाठी ते आपल्या शेतात चरी तयार करायचे. परंतु कितीही चरी तयार केल्या तरी पाऊस हा शेतात थांबायचा नाही. ज्यातून पिकांना पाणी मिळेल व पीक भरपूर येईल. तीच ती आबाळ दरवर्षी सहन करीत करीत रामदासचे वडील जीवन जगत होते.
पाऊस हा त्या गावात भरपूर पडायचा. तो कधीकधी शेवटपर्यंत पडायचा. ज्यातून पीकं हमखास व्हायची. जरी शेतात पाणी गोळा राहात नव्हतं तरी. शिवाय शेतात पाणी गोळा न राहण्याचं कारण होतं, ती मुरमाड जागा व तो डोंगराळ भाग. रामदासच्या आईवडिलांनी डोंगर खोदून ती मुरमाड जागा सपाट केली होती. शिवाय त्या ठिकाणी असलेली लांबपर्यंतची झाडं तोडून त्या जागेत शेती तयार केली होती, आपलं आणि आपल्या लेकराचं पोट भागविण्यासाठी.
ती शेती डोंगरावर असल्यानं पाऊस संततधार असल्यानं काळानुसार बरी राहायची. तसा काळ बदलायला वेळ लागला नाही.
तो ग्रामीण भाग व त्या ग्रामीण भागात लहान मुलांची चांदीच असायची. त्यांना घरी राहतांना आनंदच वाटायचा. शिवाय असा आनंद व्यक्त करतांना फार फार मजा यायची.
गाव तसं पाहिल्यास अंधारलेलं असून गावात वीज अजुनपर्यंत पोहोचली नव्हती. गाव डोंगरकडेला असल्यानं तिथं अजुनही रस्ते बनलेले नव्हते. रस्ते बनवणं तसं पाहिल्यास कठीणच होतं. अशातच गावात जायचं असल्यास गावच्या चिखलाचा रस्ता तुडवत तुडवत जावं लागायचं. रात्रीच्या वेळेस गावात घरातून बाहेर पडणं कठीण जात असे. कारण हिंस्र श्वापदं रात्रीच्या वेळेस मुक्त संचार करीत असत.
लहानगी मुलं खेळत असत. खेळतांना त्यांना तेव्हा मजा यायची. जेव्हा माकडांचा कळप गावात येत असे. अशा कळपाला ही लहानगी मुलं गुलेरीच्या साहाय्यानं हाकलून लावत असत. तसं पाहिल्यास शेतात येणाऱ्या हिंस्र प्राण्यांना गोफणीद्वारे मोठी माणसं हुसकावून लावत असत.
मोठी माणसं लहानपणापासूनच आपल्या मुलांना गोफणीच्या तालीमी देत असत. दांडपट्टे, तलवार चालवणे, लाठी चालविणे, यासारखे शिक्षण गावात लहानपणापासूनच मुलांना दिले जाई. त्यासाठी विशेष म्हणजे त्यांना आखाड्यात टाकलं जाई. उद्देश असायचा, हिंस्र प्राण्यांपासून आपलं संरक्षण करता येणं.
गुलेरनं माकडं पळविणे ही लहान मुलांची परीक्षाच असे. माकडं जर पळाली तर ती मुलं परीक्षेत पास झाली असं समजलं जायचं. तसं पाहिल्यास लाठी, दांडपट्टा लहानपणापासूनच शिकविलं जायचं. त्याचं कारण होते ते हिंस्र प्राणी. वाटायचं की कधी अशी वेळ येवू शकते की एखादा हिंस्र प्राणी लहान लेकराच्या पुढ्यात येवू शकतो. अशावेळेस आपल्या लेकरांनी त्या प्राण्यांना न घाबरता त्यांचा सामना करणं.
रामदासचे वडील सदाशिव. सदाशिव हा जातीनं महार होता. तसं पाहिल्यास या महार जातीला दांडपट्टा, लाठी, तलवार बाजी, तसेच गोफण शिकणं अनिवार्य होतं. त्याचं कारण म्हणजे त्यांना इतर उच्चभ्रू समाजानं दिलेलं कार्य. ही जात आधीपासूनच लढवय्यी होती व हिच जात संबंधीत लोकांचे हिंस्र श्वापदांपासून रक्षणही करीत होती. मात्र असं संरक्षण करतांना ही जात स्वतः झोपत नसे तर ही जात स्वतः जागत असे आणि उच्च जातीला बिनधास्तपणे झोपू देत असे.
महार समाज हा वेशीबाहेर राहून गावाचं रक्षण करणारा, शेतीच्या व गावांच्या सीमा सांगणारा, व्यापाऱ्यांना संरक्षण पुरवणारा, शेतसारा आणि राज्याचा खजिना नियोजित ठिकाणी सुरक्षीत पोहोचवणारा, असा समाजाचा रक्षक होता. तो अतिशय इमानदार होता. इमानीईतबारे तो आपल्याला सांगीतलेले कार्य पार पाडायचा. त्यात कसर सोडायचा नाही. समाजानं या समाजाला त्यांच्या कामाच्या स्वरूपामुळं त्यांना वेशीबाहेरच ठेवलं होतं. त्यांना सुखाची पुरेशी झोप हवी होती आणि ती झोप याच समाजामुळं लागत होती.
महार समाज हा गावकुसाबाहेर वास्तव्यास होता. हा समाज ग्रामरक्षणाचे कार्य करत होता. वेशीचे रक्षण करणे हे त्याचे नुसते कर्तव्यच नव्हते तर एक जबाबदारीही होती. चोर नाही सापडला तर चोरीची भरपाई महारांनाच द्यावी लागत असे. तसेच चोरांचा माग काढणे, गावात येणाऱ्या जाणाऱ्यांची नोंद ठेवणे, संशयितांना वेशीवरच अडवून ठेवणे हे महार समाजाचे कार्य होते.
महार समाज हा शेताच्या वा गावाच्या सीमांबाबत तंटे उद्भवले तर ते सोडवीत असे. त्याचीच साक्ष अंतिम मानली जात असे. त्याची स्वतंत्र चावडी असे आणि तिचा मान गाव-चावडीपेक्षाही मोठा होता. तसेच व्यापारी जेव्हा आपले तांडे घेवून गावातून निघत तेव्हा त्यांच्या रक्षणासाठी महारांची पथकेही त्याच्यासोबत निघत असत. कारण महार हे लढवय्ये होते. ते मालाचं व व्यापारी लोकांचं संरक्षण करीत असत.
महार हे ग्राम, नगर, राज्यात गुप्तहेराचे काम करत. काहीही संशयास्पद वाटले तर त्याची खबर गावप्रमुखाला देत असत. शिवाय गावात काही बाहेरील मंडळी राहायला आली वा त्यांचा अधिवास हा गावाच्या परिसरात अल्पकाळासाठी असला तरी त्यांची इत्यंभूत माहिती ही तो समाज गावप्रमुखास देत असे व तसे करण्याला तो आपले कर्तव्यच समजत असे. शिवाय हा समाज शेतसारा, खजिना योग्य ठिकाणी पोहोचवण्याची जबाबदारीही स्विकारत होता. एकंदरीत सांगायचं म्हणजे हा समाज आजच्या पोलीस, गुप्तचर आणि महसूल विभागाशी निगडीत कार्य करीत होता.
महार लोकांना पुर्वी भरपूर खाणारे अशी उपमा होती तर काही लोकं मेलेल्या प्राण्यांचे मांस खाणारे असेही म्हणत असत. ही मंडळी भरपूर जेवन करायची. त्याचं कारण होतं, त्यांचं बलदंड शरीर. ते आपल्या शरीरावर अतिशय विलक्षण अशी मेहनत घ्यायचे. त्यांचं दररोज आखाड्यात जाणं सुटायचं नाही. त्यातच आखाड्यात जावून दंडबैठका काढणं. दांडपट्टे चालविणं, या गोष्टी व्यायामात मोडत होत्या. ज्यातून शरीराची मेहनत व्हायची व भूक फारच लागायची. तसं पाहिल्यास अशा गोष्टी इतर समाज करीत नव्हता. या गोष्टी एक महारच समाज होता की जो करायचा नव्हे तर त्याला तसं करणं भाग होतं. शिवाय तद्नंतरच्या काळात त्याचा उल्लेख मेलेल्या जनावरांचे मांस खाणारा केलेला आहे. त्याचं कारण आहे, तथाकथित समाजानं त्याचेवर लावलेली बंधनं. ती बंधनं म्हणजे त्याला मिळणारं अन्न. त्याच्या अन्न खाण्यावरही तथाकथित समाजानं बंधनं आणली होती. म्हणूनच नाईलाजास्तव त्याला मेलेल्या प्राण्यांचे मांसही प्राशन करावे लागले. ज्यात तद्नंतरच्या काळात भेदभावानं शिरकाव केला होता.
महारांमध्ये जी आडनावं आहेत. तीच आडनावं इतरही उच्चवर्णीय समाजात आहेत. याचाच अर्थ असा की सर्व समान आडनाव असणारे समाजघटक कधीतरी एकत्र होते. व्यवसायाच्या विभागण्या जसजशा होत गेल्या, तसतशा एकाच समाजघटकातून वेगवेगळ्या जाती विभक्त झाल्या. जाती जन्मावर आधारीत बनत गेल्याने जातीधर्मात आणि समाजधर्मात काही विभाजन झाले. तसं पाहिल्यास याही समाजात पुर्वी शिव, विष्णू, विठ्ठल, महालक्ष्मी इत्यादींची पुजा केली जात असे. परंतु जेव्हा भेदभाव आला. तेव्हा मात्र या समाजाला अस्पृश्य मानलं गेलं व त्याच काळात अन्य मंदिरात स्थान आणि प्रवेशच नसल्यानं धार्मिक कल्पनांनुसार लोकदैवते विकसीत झालीत.
महार हे ग्रामाचे ग्रामरक्षक होते. चोऱ्या, दरोडे आणि आक्रमणंही परतावून लावण्यासाठी त्यांची नियुक्ती झालेली होती. गावाचे रक्षण करण्यासाठी त्यांना रात्रंदिवस वेशीबाहेर राहणे आवश्यकच बनले होते. त्यांच्यामुळेच गावातील लोक बिदधास्तपणे झोपू शकत होते. त्यामुळे गाव चावडीपेक्षा महार चावडीचे महत्त्व मोठे होते. त्यांनाच भूमिपुत्र मानले जात होते. महारांची ख्याती ही नेहमीच इमानी, प्रामाणिक आणि लढवय्या अशी होती. म्हणजेच गावाचे, व्यापाऱ्यांचे रक्षण हे त्यांचे आद्य कर्तव्य आणि कार्य होते.
महार ही जात फक्त महाराष्ट्र आणि आसपासच्या प्रदेशातच अस्तित्वात होती. ज्या भूभागावर सातवाहनांनी साडेचारशे वर्ष इतका प्रदीर्घकाळ राज्य केले. सातवाहनांनी महाराष्ट्री प्राकृत हीच आपली शेवटपर्यंत राजभाषा ठेवली. त्यामुळे जातीनामांवर महाराष्ट्री प्राकृताचा प्रभाव असणे स्वाभाविक आहे. रक्षणाचे कार्य करणारे रक्ख आणि त्यांचे प्रमुख ते महारक्ख ही उपपत्ती रठ्हांचे प्रमुख ते महारट्ठ, जे नंतर मराठे म्हणून ओळखले जावू लागले. त्यानंतर त्यांची स्वतंत्र जात बनली. या उपपत्तीची पदे आलटून-पालटून असल्याने सर्वांनी महारक्ख हे नाव धारण करुन कालौघात क्ख चा लोप होऊन फक्त महार हा शब्द जातीनाम म्हणून कायम झाला.
महार समाज हा रक्षणकर्ता होता व तो जी सामाजिक कर्तव्ये पार पाडत होता. त्यावरुन त्यांना महारक्ख हेच पदाभिनाम होते. जी कर्तव्ये तत्कालीन राजकीय अस्थिरता, धामधूम तर कधी पूर्ण अराजकतेच्या स्थितीत अत्यंत महत्वाची होती. त्याशिवाय ग्रामधारीत समाजव्यवस्था जीवंत राहूच शकत नव्हती.
महार समाजाचा जात म्हणून उदय कधी झाला याचे भौतिक, लिखित पुरावे आज आस्तित्वात नाहीत. परंतू जेव्हा नागरी व्यवस्था आकाराला येते, तेव्हाच समाज आपल्यातूनच लढवय्या व्यक्तींना नागर रक्षणासाठी नियुक्त करतो. युद्धातील सैनिक आणि नागर रक्षक यात मुलभूत फरक असतो. सैनिकाला फक्त युद्धकाळात शत्रू सैन्यावर तुटून पडण्याचे काम असते. परंतू ग्रामरक्षकाला तेच कार्य रात्रंदिवस करावे लागते.
शत्रूच्या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी गाव, शहराभोवती कोट बांधण्याची प्रथा सिंधू काळापासून आहे. रात्री समजा कोटाची दारे जरी बंद केली तरी हल्ल्याची खबर, अगदी तटावरचे रक्षक असले तरी, लवकर लागावी म्हणून रक्षकांनी गाव, शहराबाहेरच मुक्काम ठोकावा अशी रीत निर्माण झाली असावी. याचे कारण तत्कालीन अर्थव्यवस्था मुख्यतः कृषिप्रधान होती. शत्रू नगर, गावांवर आक्रमण करताना प्रथम शेती जाळतच येत असे. ही प्रथा अठराव्या शतकापर्यंत तरी भारतात अस्तित्वात होती, हे सर्वविदितच आहे. त्यांना आधीच रोखण्याचा प्रयत्न करणे हे तर्कसुसंगत होते. त्यामुळे वेशीबाहेर या बहाद्दर असणाऱ्या रक्षकांची वस्ती केली गेली असावी. सुरुवातीला तरी या पथकांचा प्रमुख महारक्षक (महारक्ख) पद भूषवत असणे स्वाभाविक आहे. परंतु महारट्ठी (रट्ठांचे प्रमुख) जसे नंतर मराठा या एका जातीत परिवर्तीत झाले तद्वतच महारक्षक हीच एक जात बनली. संक्षेपाने तीच जात महार म्हणून ओळखली जावू लागली असे दिसते.
त्या काळात प्रत्येक गावाभोवती तटबंदी, कोट असत. रात्री त्यांचा मुख्य दरवाजा बंद केला जाई. याचे कारण सत्ता कोणाचीही असो, गावे सुरक्षीत नसत. शिवाय गावात लुटालूटी, जाळपोळ करत शिरणे हा आक्रमकांचा आणि दरोडेखोरांचाही प्रमुख धंदाच बनला होता. गावाच्या आत राहून गाव रक्षीले जाईल, अशी सोय उत्तरोत्तर कमी होत गेली. महार जात ही मात्र धोका पत्करुन, स्वतः आणि कुटूंबाला उघड्यावर असुरक्षीत ठेवत गावाचे रक्षण करीत असे. सर्वच वेळी त्यांना यश मिळणे शक्य नव्हते. अशा वेळी त्यांना प्राणांचे बलिदानही द्यावे लागले. आजही गावोगावी जे भडखंबे सापडतात ते अशाच संरक्षक लढायांत मारल्या गेलेल्या महार लोकांचेच भडखंबे नव्हे तर स्मारके असावीत. महार समाज प्राचीन काळी नसला तरी उत्तरकाळात प्रायः गरीबच राहिला आहे. उघड्यावर राहत असल्याने संपत्तीसंचय करुनही त्यांना उपयोग नव्हताच. तसे पाहिले तर ज्या गावांचे रक्षण ते प्राण धोक्यात घालून करीत असत, त्याच गावांना ते प्रसंगी लुटूही शकत होते. तरीपण त्यांनी तसं केलं नाही. उलट गावाचं रक्षणच केलं. तसं पाहिल्यास तसा एकही अध्याय महार समाजाच्या बाबतीत इतिहासातही दिसत नाही. शिवाय शेत जमिनींचे, हद्दींचे तंटे महाराच्याच साक्षीने निकाली निघत. एवढे त्यांच्या साक्षीचे महत्व होते. ते त्यांच्या इमानदारीपणामुळेच. तसेच अगदी पेशवेकालीन न्याय निवाड्यातही महारांनी खोटी साक्ष दिल्याचे एकही उदाहरण अस्तित्वात नाही.
महारांवर गावातील जमा झालेला सारा मुख्य ठाण्यांवर जमा करण्याची जबाबदारी असे. त्यात त्यांनी कधीही तो सारा मध्येच गायब केल्याचेही एकही उदाहरण नाही. कदाचीत त्यांच्या या इमानदारीपणामुळेच त्यांच्या समाजावर पुढे अस्पृश्यता लादली गेली, अन्याय बंधने लादली गेली असावीत. परंतु हा समाज पुर्वीपासून लढवय्या असूनही आपल्या गावाविरुद्ध, व्यवस्थेविरुद्ध त्यांनी कधीही शस्त्र उचलले नाही.
महार समाजाला नेमके कधी अस्पृश्य ठरवले गेले याबाबत इतिहास मूक आहे. या समाजाची आर्थिक आणि सामाजिक अवनती कशी आणि नेमकी कधी झाली, हे पुराव्यांअभावी ठरवता येणे अवघड आहे. गावाचे रक्षण करणाऱ्यांना आणि जे आधी सर्वच समाजघटकांतून आले होते त्यांना आरंभापासून अस्पृश्य मानले गेले असण्याची शक्यता नाही. ज्या काळात भारतांतर्गत आणि विदेशी व्यापारही भरात होता तेव्हा त्या व्यापारी तांड्यांचे रक्षण करणार्या महाराष्ट्रातील महारांना अस्पृश्य मानले जाण्याची शक्यता नाही. किंबहुना आठव्या शतकापर्यंतच्या स्मृतीही महारांचा अस्पृश्य म्हणून निर्देश करत नाहीत. असे असले तरी महार समाजाची हळूहळू सामाजिक पातळीवर अवनती होत गेली. त्यांच्या सर्व जबाबदाऱ्या पूर्ववत तर ठेवल्याच. पण त्यात अमानुषपणे वाढ केली गेली. पुर्वी जातीप्रथा नसून वर्णव्यवस्था अस्तित्वात होती. वर्णसंकरातून अस्पृश्य वा अन्य कोणत्याही धर्मशास्त्रात महार, मातंग, धेड, परिया, चिरुमा, नामशुद्र, मेघवाल इत्यादी भारतात अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातींचा साधा उल्लेखही नाही. याचा अर्थ दहाव्या शतकानंतर कधीतरी या जातींना अस्पृश्य बनवले गेले. मात्र महार समाज परंपरागतच मुख्यतः संरक्षणाचेच कार्य करीत असल्याने लढवय्येपणा, चिकाटी हे मुलभूत गुण त्यांच्यात होते. वेळोवेळी ज्ञात इतिहासातही त्यांनी त्या गुणांचे प्रदर्शन केले आहे. मात्र ग्रामव्यवस्थेचे रक्षण करुनही त्यांना ग्रामव्यवस्थेनं काहीही दिलेलं नाही. आजही हा समाज उपेक्षिततेचंच जीणं जगत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान बनवलं व ते सन २६ जानेवारी १९५० ला लागू केलं. त्यानुसार संपुर्णच महारच नव्हे तर तमाम अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातींना संरक्षण मिळालं. परंतु खऱ्या अर्थानं हा अस्पृश्य समाज स्वतंत्र्य झाला नाही. आजही बाह्यतेनं पाहिला वा अवलोकन केलं तर भेदभाव मिटलेला दिसतो. परंतु अंतर्मनात आजही भेदभाव कुटकूट भरलेला आपणाला दिसून येत आहे. याचाच अर्थ असा की आजही भेदभाव गेलेला नाही. आज एक महार समाज सोडला तर बाकी समाज आजच्या भेदभावाला विरोध तरी करतो काय की बाकी समाज मात्र इतर समाजाच्या हो ला हो मिळवतो. ही शोकांतिकाच आहे.
रामदास जेव्हा लहान होता, तेव्हा त्याला भेदभाव वैगेरे काही समजत नव्हता. ना त्याच्या गावात भेदभाव होता. तो महार जातीचा असूनही गावातील मंदिरात त्याला प्रवेश मिळत मिळत होता आणि इतर बाकीच्या जातीची मुलंही त्याच्यासोबत खेळत होती. इंग्रज भारतात आले होते. त्यातच स्वातंत्र्याचं लोण गावातही येवून ठेपलं होतं. परंतु ते लोण गावात जरी आलं असलं तरी अजुनही गावकरी स्वातंत्र्याच्या लढाईत भाग घेत नव्हते. गाव तसं पाहिल्यास स्वयंभू होतं व अशा स्वयंभू गावात स्वातंत्र्याचा काही एक उपयोग नव्हता.
इंग्रजांनी देशात अधिराज्य स्थापन करण्यापुर्वी भारतात पेशवाई होती. पेशव्यांनी येथील आपल्याच बांधवांची जात कनिष्ठ समजून त्या जातीवर अत्याचार करणं सुरु केलं होतं. ज्या जातीत रामदासचीही जात होती. परंतु ते सर्व शहरात होतं. गावात भाईचारा होता व गाव गुण्यागोविंदानं राहात होते. ना गावात कोणी पेशवे येत ना गावात पेशव्याची माणसं येत. पेशव्याची माणसं गावातून जेव्हा शेतसारा वसूल करायची वेळ यायची, तेव्हा वर्षातून एकदा येत असत.
ते गाव व त्या गावात असलेली ती दरी. इंग्रज जेव्हा भारतात आले. ते त्या गावात येत नसत. कारण गावात येणं म्हणजे साधी सोपी गोष्ट नव्हती. कधीकाळी ते गावात येत त्या दरीत माणसांना लोटविण्यासाठी. ती एक दरी की ज्या दरीत माणसांना लोटवलं की त्या दरीतून तो माणूस कधीच बाहेर पडणार नाही. इंग्रज गावात आलेच वा दुरुन दिसले की अशावेळेस संपुर्ण गावातील लोकं घरात लपत असत व घराचे दरवाजे बंद करुन दरवाज्याच्या आतूनच बाहेरचं दृश्य पाहात असत. ते माणसांचे हात बांधलेले. त्यांची ओळख पटू नये म्हणून त्यांचा चेहरा झाकलेला. असा त्यांचा अवतार असायचा. शिवाय इंग्रज गेल्यावर त्या दरीत लोटविलेल्या माणसांना दरीतून काढतो जरी म्हटलं तरी काढता येत नसे. त्याचं कारण होतं आपलाच जीव जाणं. कारण दरीतील अंत दिसत नव्हता. तो अदृश्य स्वरुपाचा होता.