भाग ४
योगायोग अचानक भेटींचा.
“तुमच्या बरोबर बाइक वरुन? पाऊस किती पडतो आहे बघितलं का? बाइक वर मी भिजणार नाही का?” – क्षिप्रा.
शरद हिरमुसला झाला. एक चान्स वाया गेला. पावसाला सुद्धा आत्ताच पडायचं होतं.
“हां हे माझ्या लक्षातच आलं नाही. ओके तुम्ही बसने जाणंच बरोबर आहे. ओके देन बाय.” आणि त्याने बाइक चालू केली. – शरद.
“एक मिनिट, तुम्ही रेन कोट वापरत नाही का? पार भिजून गेला आहात. बायको चीड चीड करणार घरी गेल्यावर.” – क्षिप्रा.
“ती असती तर नक्कीच चिडली असती. पण आता ती या जगात नाहीये. त्यामुळे त्या आघाडीवर शांतता आहे.” – शरद.
क्षिप्राचा चेहरा ते ऐकून पडला. यावर काय बोलावं तेच तिला सुचेना.
“सॉरी, मला माहीत नव्हतं.” - क्षिप्रा.
“नेवर माइंड. इट इज ओके. तो आता भूतकाळ आहे. पण आता वर्तमानात पावसाचा जोर वाढतो आहे, तुम्ही लवकर बसस्टॉप वर जा, नाहीतर भिजाल. बाय.” – शरद.
“तुम्हाला भिजायला आवडतं?” – क्षिप्रा.
“हो आवडतं मला, पण त्याचं काय? तुम्ही का भिजत उभ्या राहिल्या आहात?” – शरद
“मी जर म्हंटलं की तुमची ऑफर मी स्वीकारली आहे तर?” – क्षिप्रा.
शरदची विकेटच पडली. तरी तो म्हणाला,
“अहो पण पाऊस वाढतो आहे. तुम्ही भिजाल. घरी ओरडा खावा लागेल.” – शरद.
“आईची माया असते ती. ती बोलणारच. तुम्ही नका टेंशन घेऊ.” – क्षिप्रा.
“ठीक आहे बसा.” – शरद.
“मी छत्री घेऊनच बाइक वर बसते, मग तुम्ही पण भिजणार नाही.” – क्षिप्रा.
शरदच्या मनात चांदणे. हुरळूनच गेला तो. क्षिप्रा गाडीच्या मागच्या सीट वर बसली. छत्री होतीच. तिने दोघांच्याही डोक्यावर येईल अशी धरली. त्यामुळे तिला शरदला चिकटून बसावं लागलं. शरद खुश.
“गाडी हळू चालवा. छत्री उडून जाईल, आणि छत्री बरोबर वाऱ्याने मी पण पडेन” – क्षिप्रा.
थोडं दूर गेल्यावर वाऱ्याचा आणि पावसाचा जोर खूपच वाढला. क्षिप्राला छत्री सांभाळणं कठीण झालं होतं.
“अहो छत्री उडते आहे. कुठे थांबता येईल का?” – क्षिप्रा.
शरदला क्षिप्रा काय बोलते आहे ते नीट ऐकू गेलं नाही तो थांबला. क्षिप्रा पुन्हा तेच म्हणाली. “थोडं समोर गेल्यावर एक हॉटेल आहे तिथे थांबू शकतो.” शरद म्हणाला. क्षिप्राने मान डोलावली.
हॉटेल मधे गेल्यावर,
“काय घेणार, चहा की कॉफी? की सॉफ्ट ड्रिंक?” – शरद.
“या पावसात सॉफ्ट ड्रिंक? नको कॉफीच बरी.” – क्षिप्रा.
“मस्त पाऊस पडतो आहे. काही खायला पण मागवायचं का?” – शरद.
“माझी आई जाम वैतागते बाबांवर.” – क्षिप्रा.
“का बुवा?” – शरद.
“सतत फोकस आपला खाण्यावरच.” – क्षिप्रा.
शरदला प्रकर्षाने जाणवलं की संभाषणाची गाडी भलत्याच ट्रॅक वर चालली आहे, ती बदलण्याची आवश्यकता होती. पण बाबांचा विषय निघाल्याने एक गोष्ट पक्की झाली होती, ती म्हणजे लग्न झालेलं नाहीये. तो म्हणाला,
“ते सोडा, आपण इतका वेळ नुसतंच बोलतो आहोत. माझं नाव शरद गुप्ते.” – शरद.
“मी क्षिप्रा देशपांडे.” – क्षिप्रा
कॉफी आली. कॉफी पिता पिता बरंच अवांतर गप्पा गोष्टी झाल्या. पाऊस पण थांबला होता. शहरात शिरल्यावर एका ठिकाणी क्षिप्रा म्हणाली की,
“मी इथे उतरते. इथून मी जाईन.” – क्षिप्रा.
“ओके.” शरदने बाइक थांबवली. बाय करून शरद निघाला. तरंगतच घरी आला. पण हळू हळू त्यांचे विचार बदलत गेले. त्याचं मन म्हणालं की त्याचं एक लग्न झालेलं आहे. ती मुलगी मोकळेपणी बोलली यांचा अर्थ तिला सामाजिक जाणिवेचं भान आहे. तू उगाच भलते विचार मनात आणू नकोस. एक साधी ओळख हीच वस्तुस्थिती आहे. ती तशीच ठेव. मग शरदने तिचा विचार मनातून झटकून टाकला. असेच चार दिवस गेले, कितीही म्हंटलं तरी ऑफिस मधून घरी येतांना बसस्टॉप वर त्याचं लक्ष जायचंच. पण ती दिसली नाही.
नंतरच्या एका रविवारी, नेहमीच्या शिरस्त्या प्रमाणे चांगला दोन तीन कप भरून चहाची किटली आणि ब्रेड बटर घेऊन आलेली तीन चार पेपर घेऊन गॅलरी मधे बसला. जेमतेम दहाच मिनिटं झाली असतील, अजून पहिलाच चहाचा कप संपायचा होता, तो बेल वाजली. शरदची अजून कोणाशी इतकी घसट झाली नव्हती, त्यामुळे त्याला जरा आश्चर्यच वाटलं. कोण असेल असा विचार करताच त्याने दार उघडलं. समोर क्षिप्रा उभी होती. एकदम फ्रेश. फुला सारखी टवटवीत. हसऱ्या मुद्रेने ती शरद कडे पहात होती.
“तूम्ही?” शरद जवळ जवळ ओरडलाच. “तूम्ही इथे? माझ्या घरी? कसं काय?”
“आत येऊ द्याल की बाहेरच बोलायचं आहे?” – क्षिप्रा.
“ओह सॉरी सॉरी. या आत या.” – शरद.
क्षिप्रा आत आली चहूकडे नजर फिरवून निरीक्षण करत होती. भिंतीवर चित्राचा म्हणजे शरदच्या बायकोचा हार घातलेला फोटो होता.
“हा फोटो तुमच्या बायकोचा का?” – क्षिप्रा. शरदने मान डोलावली.
“किती सुंदर होत्या, त्यांच्यावर ही वेळ यावी याचं वाईट वाटतं. काय झालं होतं?” – क्षिप्रा.
“मी ऑफिस मधे होतो, ती मैत्रिणी बरोबर शॉपिंगला जाणार होती. एका भरधाव जाणाऱ्या कारने तिला सिग्नलवर रस्ता क्रॉस करतांना उडवलं. तातडीने हॉस्पिटल मधे पोचवलं, पण काही तासात संपल सगळं.” शरद आता भाऊक झाला होता.
“मग त्या कार वाल्याला पकडलं का? त्याला शिक्षा झाली का?” – क्षिप्रा.
“त्यांची चूक नव्हती. दुसऱ्या बाजूने रहदारी चालू होती त्याच बाजूने तो जात होता, पण कारचं स्टीयरिंग व्हीलच तुटलं आणि तो काहीच करू शकला नाही. आणि त्याचा दोष नव्हता म्हणून मी पण काही केलं नाही.” – शरद.
वातावरण कारण नसतांनाच गंभीर झालं होतं. दोघांनाही समजत नव्हतं की काय बोलावं ते.
“बरं ते जाऊ द्या, तुम्ही इथे कश्या काय? माझा पत्ता कोणी दिला?” - शरद
“तुम्ही गॅलरीत बसला होता न? चला तिकडे मग सांगते.” – क्षिप्रा.
गॅलरीत आल्यावर,
“ती समोरची बिल्डिंग दिसते न त्यांच्या पाचव्या मजल्यावर मी राहते. ती समोर पाचव्या मजल्याची गॅलरी दिसते आहे ती आमचीच. तुम्ही नेहमीच रविवारी इथे बसून चहा पित पित पेपर वाचता, आम्हाला दिसायचं. आपली ओळख नव्हती म्हणून फार लक्ष नव्हतं. पण आज बघितलं तर तुम्हीच दिसला.” – क्षिप्रा.
“असं झालं तर. म्हणून तुम्ही आलात. ओके. चहा घेणार? मी छान चहा करतो.” – शरद.
शरदने किचन मधे जाऊन चहाचा मग आणला, आणि तिला चहा दिला.
“हे ब्रेडबटर चे स्लाइस आहेत हे पण घ्या.” शरद आपुलकीने म्हणाला.
थोडावेळ अवांतर गप्पा चालू असतांनाच तिच्या आईचा फोन आला.
“आईचा फोन आहे जेवणाची वेळ झाली आहे. मी निघते. बाय सी यू.” – असं म्हणून क्षिप्रा निघाली.
शरदने क्षिप्राला विसरण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्या डोळ्यांसमोरून तिची मूर्ती काही हलत नव्हती. ती आल्यानंतर काय काय बोलणं झालं ते आठवत होतं. रात्री बऱ्याच उशिरा त्याला झोप लागली. चार पांच दिवस तसेच गेले. रोज संध्याकाळी त्याने बसस्टॉप च्या जवळ उभा राहून तिची थोडा वेळ वाट पाहीली. काही उपयोग झाला नाही. ती रविवारी येईल असं त्याला उगीचच वाटलं. पण ती नाही आली.त्याने गॅलरीतुन मान उंच करून बघितलं, पण काही हालचाल दिसली नाही. शेवटी त्याने तिचा विचार डोक्यातून काढून टाकला.
पण नंतर एक दिवस संध्याकाळी बसस्टॉप जवळ ती अचानक दिसली. तिला पाहून त्याने ब्रेक दाबला, पण तिथे रस्ता थोडा उखडला होता आणि पालिकेने त्यावर बारीक खडी टाकली होती, त्यावरून शरदची गाडी घसरली आणि त्याचा बॅलन्स सुटला. तो पडला आणि बाइक बरोबर खेचल्या जाऊन थोडं दूर पर्यन्त रस्त्याला घासत गेला. हे सगळं क्षिप्राच्या समोरच घडलं. ती धावली. लोकं पण धावली. त्यांनी शरदला उठवलं.पॅन्ट एका पायावर फाटली होती, आणि शर्ट बाही वर फाटला होता. पायाला आणि हाताला चांगलंच खरचटलं होतं आणि थोडं थोडं रक्त वाहत होतं. लोकांनी त्याला चालवत बसस्टॉप वर नेऊन बसवलं. एकाने त्यांची बाइक रस्त्याच्या कडेला लावली.
क्रमश:---
दिलीप भिडे