पापक्षालन भाग 5
स्वतः तेजदत्त निवडक स्वारांसह राजप्रासादावर चाल करुन गेले. दत्तांनी राजप्रासादाला वेढा घातला. आदल्या रात्रीच्या नशेत गुंग झालेले रक्षक समशेरी परजीत प्रासादाबाहेर धावले. प्रासादातील रक्षकांची संख्या विपुल होती. परंतु बेसावध असताना झालेल्या हल्ल्यामुळे त्यांचे मनोधैर्य खचले होते. लोहपट्टीकेच्या अद्भुत शस्त्राची चांगली किमया झाली अन् रक्षकांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली. राजरक्षकांचा प्रतिकार क्षीण झालेला दिसताच तो मोका साधून तेजदत्तानी राजप्रासादात प्रवेश केला.
यवन सरदारासह प्रासादातील सर्व रक्षक जेरबंद झाले. सरदाराचे दोन्ही हात छाटून त्याला एका अश्वावर बसवून संपूर्ण राजधानीत फिरवून विभवेवर पूर्व सत्ताधिश मेघवत्सांचे पुत्र तेजदत्त यांचे साम्राज्य प्रस्थापित झाल्याची दवंडी पिटण्यात आली. राजधानीत सहस्रोंच्या संख्येने सापडलेल्या यवनांची नृशंस हत्या करून शत्रू संपविण्यात आले. राजप्रासादावर मध्यान्ह समयाला चंद्र घराण्याची राजचिन्हांकित ध्वजा दिमाखाने फडकू लागली. नगरातील राजसेवेमधील अधिकार वर्गाकडूनकिरकोळ हल्ले होतच होते. थोड्या अवधीतच एक एक व्यापार पेठ कब्जात घेतल्याची सुवार्ता घेऊन दत्तांच्या सेवेतील दूत राजप्रासादाकडे येऊ लागले. त्याचवेळी सर्वसामान्य जनही जल्लोष करीत तेजादत्तांच्या सहाय्यार्थ सरसावले. जनसामान्यानी लपून राहिलेल्या यवनांचा शोध घेवून गतकालात त्यानी केलेल्या अत्याचाराचा बदलाघेतला. दुष्ट यवन सरदाराची हात छाटलेल्याअवस्थेत नगरातून धिंड काढीत असता संतप्त जनसमुहाने त्याच्यावर दगड-धोंड्यांचा मारा केला. जनता एवढी प्रक्षुब्ध झाली होती की, यवन सरदाराची धिंड काढून त्याला प्रसादासमोर परत आणल्यावरबेभान झालेल्या जामावाने त्याला अश्वावरुन खाली खेचले. त्याला पायदळी तुडवून छिन्नविछिन्न केल्यावर त्याच्या कारकिर्दीतील मदांध उच्चाधिका सहस्रोंच्या ना शोधूनशासन करण्याचे सत्र प्रजाजनानी स्वेच्छेने सुरु केले. आता मात्र उच्चपदस्थांचे रक्षकही जनसामान्यांमध्ये मिसळले. सूर्यास्तापर्यंत अनाचारी सत्ताधारी पूर्णपणे नामशेष झाल्यावर संध्यासमय असतानाही नगर जनांनी घराघरांसमोर गुढ्या तोरणे उभारुन आनंदोत्सव साजरा केला.
दुसर्या दिवशी सूर्योदयाच्या वेळेला संपूर्ण साम्राज्यामध्ये पूर्व सत्ताधिश मेघवत्सांचे पुत्र तेजदत्त यांनी विभवेवर साम्राज्य प्रस्थापित केल्याचे वृत्त दशदिशाना प्रसृत झाले. विभवेच्यासीमेलगतच्या मांडलिक राज्यांना यवन सत्तेच्या कब्जातून सोडवून सार्वभौमत्व बहाल केल्याच्या मंगलपत्रिका चंद्र घराण्याच्या राजमुद्रेसह रवाना करण्यात आल्या. प्रातःकाली स्नानादिकार्ये करुन सुचिर्भूत झालेले तेजदत्त रक्षकांच्या ताफ्यासह महादुर्गा मंदिराच्या परिसरात पोहोचले. मंदिराच्या प्रवेश मार्गात पडलेला पर्वतप्राय पत्थरांचा ढिगबाजूला करीत असताना प्रवेशद्वारातील कमानीच्या मध्यभागी दगडात खोदून बसविलेली गणेशमूर्तीनिर्भंग अवस्थेत सापडली. पुनरुत्थान कार्यारंभीचा हा शुभ शकून पाहून तेजदत्तांचे हृदय हर्षोत्फुल झाले. त्यांच्या देखरेखीखाली मंदिराच्या आवाराची स्वच्छता सुरुझाली. मंदिरातील महादुर्गेची मूर्ती जालाशयात विसर्जित केली होती त्या जागेचा निर्देश करताच साहसी तरुणांनी जलाशयात उड्या मारल्या.
मंदिराच्या आवारातील भग्न दीपमाळा, विजय स्तंभ, कोसळलेले तट यांची डागडुजी सुरु झाली. मंदिराची तीन गोपुरे उभारण्यास दीर्घकाल लागला असता म्हणून मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यापुरती गाभाऱ्याची दुरुस्ती करण्याचे काम वेगाने सुरु झाले. विभवेच्या सिंहासनावरील यवनसरदाराचा वध करुन चंद्र घराण्याचे साम्राज्य विभवेत प्रस्थापित झाल्याची मंगलवार्ता पोहोचविण्यासाठी थिरुकोट्टाला दूत रवाना झाले. जालाशयाबाहेर काढलेल्या महादुर्गेच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी प्रजाजनांची मंदिराच्या प्रांगणात रिघ लागली. सप्ताहभर लोटल्यावर मेघवत्सांनी भूमीगत होण्यापूर्वी वनप्रांती भूमित पुरुन ठेवलेला खजिना घेऊन अकरा गजराजांचे पथकवाजत गाजत राजाधानीकडे येऊ लागले. त्या पथकाच्या अग्रभागी मेघवत्सांचे स्वामीनिष्ठ सेवक वृद्ध डेंगा भिल्ल, कटू भिल्ल अश्वारुढ होऊन आनंदाच्या आरोळ्या मारीत होते.सम्राटांचा खजिना राजधानीच्या वेशीपर्यंत येईतो मुख्य पथकाच्या दुतर्फा प्रजाजनांची दाटी झाली होती. त्यांनी तेजदत्तांचा जयजयकार केला.
महाराज मेघवत्सांसह आचार्य विभवेला येण्यासाठी रवाना झाल्याचे वृत्त आले. त्यांच्या स्वागतार्थ राजमार्गावर ठिकठिकाणी कमानी उभारुन संपूर्ण मार्गाचे सुशोभन करण्यात आले. महाराज मेघवत्स आणिआचार्यांच्या दर्शनासाठी आतुर प्रजाजन त्यांच्या आगमनाच्या आदल्या दिवसापासूनच राजपथाच्या दुतर्फा ताटकळत थांबले होते. दीर्घ प्रतिक्षेनंतर महाराज आणिआचार्यांना घेऊन राज रथाने नगराची वेस ओलांडिली. प्रजाजनांच्या जयजयकाराच्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला. राजरथ राजप्रासादा समोर उभा राहताच मंगलवाद्ये वाजूलागली. आचार्यांना पालखीत बसवून राजप्रासादात नेले जात असता स्वतः तेजदत्तांनी त्यांच्या पालखीला खांदा दिला. राजप्रासादावर दिमाखाने फडकणारी चंद्र घराण्याची भगवी राजचिन्हांकित ध्वजा पाहिल्यावर मेघवत्सांना आपल्या जीवनाचे सार्थक झाल्याची भावना सुखवू लागली.
संकल्पपूर्तीसाठी आचार्यांनी दिलेले आशीर्वाद सत्कारणी लागले होते. नामशेष झालेल्या चंद्र घराण्याने पुनश्च विभवेच्या सिंहासनाचाताबा घेतला होता. राज्याभिषेकापूर्वी जगन्माता महादुर्गेची प्रतिष्ठापना करण्याचा मनोदय तेजदत्तांनी व्यक्त केला. आचार्यांनी त्याला अनुमोदन दिले. मूर्तीचीप्रतिष्ठापना करण्याचा दिन आचार्यांनी मुक्रर केला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी तेजदत्तांना राज्याभिषेक होईल असे आचार्यांनी जाहिर केले. दुर्गा प्रतिष्ठापना आणि राज्याभिषेक विधीची पूर्व तयारी सुरु झाली. यवनांनी विभवेची सत्ता काबिज केलीत्यावेळी झालेल्या हल्ल्यात प्रमुख राजपुरोहितांचा शिरच्छेद झाला होता. मात्रत्यांचे दोन पुत्र परागंदा झाले असून ते विभवेपासून दूर स्थायिक झाले असल्याची वार्ता कळली. त्यांचा शोध घेऊन त्यांना समारंभपूर्वक राजधानीत आणण्यात आले.दोन्ही धर्मकृत्यांचे पौरोहित्य करावयाची जाबाबदारी त्यांचेवर सोपविण्यात आली.
महादुर्गेच्या प्रतिष्ठापनेचा दिवस उजाडला. संपूर्ण नगरीमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. लाखो प्रजाजनांची मंदिराच्या प्रांगणात दाटी झाली. सूर्योदयाबरोबर धार्मिक विधींचा आरंभ झाला. गणेश पूजन, पुण्याहवाचनादि प्रारंभिक विधी पूर्ण झाले. महादुर्गेच्या मूर्तीला सप्त नद्यांच्या पवित्र जलानेस्नान घालण्यात आले. मूर्ती उचलून गाभाऱ्यात नेण्यापूर्वी महाराज मेघवत्स पुढेआले. त्यांनी देवीसमोर लोटांगण घातले. साश्रू नयनांनी गद्गद् स्वरात महाराज बोलू लागले, “दुर्गामाते! माझ्या पराक्रम शून्यतेमुळे,माझ्या गाफिलीमुळे तुला दीर्घकाळ जल समाधीचे कष्ट घ्यावे लागले. तुझ्या कृपेमुळेच हा मंगल दिन पाहण्याचे भाग्य मला लाभले आहे. माते,माझ्या पापांचे क्षालन करुन तुला संतुष्ट करण्यासाठी मी आत्माहुती देणार आहे. माते, आशीर्वाद दे की, या पुढे कल्पांतापर्यंत तुझ्या परम भक्तांचेच साम्राज्य या विभवानगरीत नांदेल!” काय घडत आहे याची कल्पना येण्यापूर्वीच मेघवत्सांनी कमरेचे खड्ग उपसले अन् त्वेषाने कंठस्थानी वार करताच त्यांचे शीर तुटून त्यांचे कलेवर महादुर्गेच्या चरणावर कोसळले. (समाप्त )
◎ ◎ ◎ ◎ ◎ ◎