सात मैल चार फर्लांग रस्ता - भाग १
नावळे दस्तुरी नाका ते चिवारी चवाठा सात मैल चार फर्लांग रस्त्या बांधायचं कंत्राट चिवारीतल्या भाऊघाट्याने घेतलं ही वार्ता पसरल्यावर जानशी, कुवेशी, नावळे, चिवेली आणि हरचली यापाच गावातल्या पैसेवाल्या असामीना अगदीपोटशूळ उठला. हरचलीचा बळी भंडारी, कुवेशीतला बाबुराव देसाई आणि नावळे मुसलमान वाडीतला इद्रूसकोळशेकर हे सिलीपाट आणि खुटवळाचा धंदा करीत. देसायाचा पावसाळी काठ्या- बांबूचा मोठा धंदा होता. तो खाडी काठच्या सहा सात गावानी फिरून आगाऊ बयाणा देवून गावागावानी मुख्य रस्त्याच्या कडेला आवती, मलकी काठ्यांचे थप मारून ठेवीत असे. पाऊस सुरू झाल्यावर साधारण महिनाभरात बेटांची तोड होत असे. काठीची लांबी किती भरते त्या प्रमाणात नऊहाती तीन तोडे आणि चवथा तोडा सात किंवा सहा हाती भरेल तसा मारून वीस वीस तोड्यांची बंडलं काठीच्या बेळाने बांधून वाडी वाडीवार रस्त्याच्या कडेला एकत्र करून थप मारलेले असत. गावातले मोठे ठिकाण वतनवालेलोक देसायांकडे थेट व्यवहार करीत. किरकोळ गिऱ्हाईकं त्यांचा माल आपल्याच ठिकाणात ठेवीत आणि माल न्यायला ट्रक आला की , देसायांचा कोण कारभारी ट्रकासोबत असेल त्याला भेटून मालदेत. गावा गावानी काही मध्यस्त अडलेनडलेल्या किरकोळ गिऱ्हाईकांकडून कमी दराने माल खरेदी करून देसायांना घालीत.
नावळ्यातला इद्रूस मोमीन खुटवळाचे कोळसे पाडून ते मुंबई, कोल्हापूर, सांगली कडच्या ठोक व्यापाऱ्याना घालीत असे. दसरा झाल्यापासून ते शिमग्यापर्यंत गावोगाव सडा माळावर कलम लागवडीसाठी प्लॉट मधल्याआंजणी, करवंदी, उक्षी, पंचकोळीच्या झाळी, चारणी , कुंबये, गोडे कांदळ आणि इतर बारबंडी झाडांची मुळकंडं (त्याना मुळवा किंवा खुटवा म्हटलं जातअसे) खणून काढून त्याच्या ढिगोळ्या करून त्या कवळाने (जंगली झाळी बेटातील ओल्या डहाळ्या) झाकून त्यावर मातीचं लिंपण करून मग आग घालण्यात येई. त्यामुळे ढिगोळ्यांमधली लाकडं अर्धवट जळून त्यांचा कोळसा पडत असे. कलम लागवडीसाठी ठिकाणांमधला मुळवा- खुटवळ काढायचं काम सुरू झालं कीइद्रूस आणि त्याच्याकडे कोळसा पाडायचं काम करणाऱ्या फैलातले कामदार टेळ थेवून फिरत असत आणि खुटवळाची खरेदी करीत असत. मग तो खुटवळ जाळून त्याचा कोळसा पाडून झाला की तो वाहतूकी योग्य जागी एकत्र केला जात असे. नावळ्यासह आजूबाजूच्या गावानी सडा माळावर इद्रूसचे कोळशाचे डेपो मारलेले असत. ट्रकाचं भरवण होईल इतपत माल साठल्यावर ट्रक भरून शहरात ठोक व्यापाऱ्यांना घातला जात असे.
हरचलीतल्या बळी भंडाऱ्याचा सिलीपाटाचा धंदाहोता. तो गावोगावी इमारती लाकूड खरेदी करून ते मुंबई. कोल्हापूर, पुणे अशा शहरानी लाकूड व्यापाऱ्याना घालीत असे. १९२५ ते १९८०या साठ वर्षाच्या काळात कोकण किनारपट्टीवर खाडी काठच्या गावानी कलम लागवडीसाठी प्रचंड प्रमाणात झाडांची तोडझाली. त्याकाळात सिलीपाट आणि कोळसा व्यापाऱ्यानी गबरगंड कमाई केली, बळी भंडारीसिलीपाटाच्या जोडीला हापूस आंबा व्यापार आणि सावकारीही करायचा. भाऊ घाटे हा चिवारीतला मोठा जमिनदार. तो दरवर्षी स्वत:ची दोन तीनशे काठी घालायचा. गेली चार पाच वर्षं तो कलम लागवड करणाराना मुळवा- खुटवळ काढून देण्याची कंत्राटं घेई. नावळे ते चिवारी रस्त्याच्या कामाचा मक्ता तोभाग आडवळणी दुर्गम असल्यामुळे कोणी घ्यायला तयार होईना. दोन तीन वर्षं ते कामरेंगाळलेलं होतं. चिवारीतले दादा खोतांचे लहान भाऊ सचिवालयात मोठ्या पदावर होते.त्यानी या रस्त्याच्या कामाचा पाठपुरावा चालवलेला होता. रस्त्याचा सर्वे करून प्रारंभिक सोपस्कार चुटकीसरशी पुरे झाले पण काम करायला कोणी कंत्राटदार पुढे येईना. वरून नेट लागला की जिल्हाज्बो र्डातलेअधिकारी राजापूर भागात सरकारी कंत्राटं घेणारानाहे रस्त्याच्या कामाची गळ घालीत. असाच एक कंत्राटदार- बापू पवार, याला अगदी अकल्पित भाऊ घाट्याचं नाव सुचलं. हा माणूस खटपट्या आहे. तो हे काम करू शकेल. असा विचार करून त्याने भाऊची भेट घेतली. काम मोठ्या खर्चाचं, भाऊंच्या आवाक्याबाहेरचं होतं. पण काहीतरी उलाढाली करून थोडीशी जम करून कामाला सुरुवात केली असतीतर पहिला टप्पा पार केल्यावर पहिला हप्ता मिळाला असता आणि मग पुढची जुळणी करणंफारसं अवघड गेलं नसतं.
गावात दगडी बंधाऱ्याचं बांधकाम करणारी चार पाच मोठी फैलं होती. त्याना हाताशी धरून सीझन झाल्यावर हिशोब देण्याच्या बोलीवर काम करूनघेता येणारं होतं. बापू पवाराचं सांगणं भाऊ घाट्याने मनावर घेतलं. त्याच्या सोबत रत्नागिरीला जावून सायबाला भेटून भाऊने कामाची पूर्ण माहिती घेतली. परत आल्यावर राजापुर मामलेदार ऑफिसमधले अव्वल कारकूननाना जठार आणि बापू पवार यांच्या सोबत आपल्या फैलातले जाणकार गडी घेवून त्यानेनिर्धारीत रस्त्याच्या भागाची पहाणी केली. पूर्ण रस्त्याचा भाग़ खुणेचे दगड पुरून आखलेला होता. दुसरे दिवशी आपल्या फैलातले गडी घेवून त्याने कामाचे बजेट ठरवण्याच्या दृष्टीने कामाचा तपशीलवार आडाखा घेतला. नावळे दस्तुरी नाका ते बानखिंडी पर्यंत साधारण एकतृतियांशअंतरापर्यंत सपाटीचा भाग होता. तिथलं काम फार अवघड नव्हतं. त्या भागात कातळीभाग फार कमी पण प्रचंड मुळवा होता.चालचलावू अंदाजाने साठ सत्तर लोड खुटवळ मिळणारा होता. त्यातून गडी मजूरी भागून थोडी रक्कम शिलकी पडली असती. त्या नंतरचा बानखिंडीचा साधारण दीडशे वाव लांबीचा भाग सडावळी कडून गावदरीकडे गेलेला उतरणीचा भागहोता. त्या भागात आरंभी छातीभर उंच भरावटाकून उठवावा लागला असता. आणि त्यापुढे क्रमा क्रमाने उंची कमी होत गेलेली होती.
बानखिंडीचा दुसरा टप्पा संपून गावदर सुरू झाल्यावर बाणेवाडी जवळचा बेताचा चढ आणि कुंभारवाडच्या घाटीचा मोठा टोणा चढल्यावर चवाठ्यापर्यंत दोन बेताचे चढ नी बाकी सगळी सपाटी होती. कामातला भारी नी खर्चिक टप्पा बानखिंडीतला भरावघालून करायचा भाग हाच होता. भाऊंचे गडी कामात मुरलेले आणि कसबी होते. त्यानी आजूबाजूला फिरून भराव घालण्यासाठी पुरेसा घडघड्या अनगळ धोंड्याचा (बोल्डर) मालमिळेल की नाही याचा पक्का अंदाज घेतला. आपापसात चर्चा केल्यावर बाबल्या येरमम्हणाला, “भाऊनु, शे दीडशा सुरुंग घालुचे पडती. पण भरावाचा काम हयच्या हय भागात. आमच्या वांगडा बानेवाडकरांचा फैल आसला तर दोन म्हयन्यात उतारा पावतचा मकण पुरा व्हयत. (क्रमश:)