उत्सव आठवड्यावर आला. सालाबाद प्रमाणे महानैवेद्य करणे भागच होते. थोडीतरी मोठी भांडी खरेदी करणे भाग होते. घर्डा कंपनीने भांडी खरेदीसाठी पंचवीस हजाराचा चेक दिला. देवस्थानचे दोन ट्रस्टी  मुंबईला रवाना झाले. मुख्य ट्रस्टी भाऊ दात्ये यांचा मुलगा  मोहन  हायकोर्टात वकिली करायचा. रहायचा. तो गिरगावला सेंट्रल सिनेमा जवळ मंडळी मुक्कामाला तिथे गेली. त्यांच्या आंघोळी -पांघोळी  भाऊनी येण्याचे प्रयोजन सांगितले. मोहन त्याना म्हणाला, “ग्रॅण्ट रोडला खोज्यांची जुनी दुकाने आहेत. त्यांच्याकडे जुन्यातली मोठी पातेली मोडीच्या दराने मिळतात. देवस्थानसाठी  अॅल्युमिनीयमच्या भांड्यांपेक्षा  जुन्यातली  तांब्या पितळेची पातेली, तपेली मिळतात का बघुया. ” 
       नाष्टा पाणी उरकून साडेदहाच्या सुमाराला मंडळी ग्रॅण्ट रोडला खोज्याच्या दुकानात गेली. तिथे गेल्यावर मालकाशी बोलणं झाल्यावर त्याने नोकराना सोबत घेवून  स्टॉक रूम मधून मोठी तपेली, कडीवाली पातेली  असे सहासात नग बाहेर आणले. पहिले  तांब्याचे  तपेले   भार्गवरामाचे आहे  हे  भाऊनी ओळखले. शहानिशा करण्यासाठी  ते फिरवून बघताना श्री  देव भार्गवराम  हे  छिन्नीने ठोकून घातलेले नाव ग्रॅण्डरने  घासूनघालवायचा प्रयत्न केलेला होता तरी भाऊनी अचूक ओळखले. पान खायच्या निमित्ताने त्यानी मोहनला दुकानाबाहेर नेले. आपला संशय त्यानी बोलून दाखवला.  मोहनचा मित्र खेडचा अनिल दरेकर, त्याला दोन महिन्यापूर्वी पोलिस उपनिरिक्षक म्हणून बढती मिळालेली होती. मोहनने त्याला  फोन केला. तासाभरात  फौज फाटा घेवून  हजर झाला.  दरम्याने खोज्याने  दाखवलेली सगळी  मोठी आयदणं  देवस्थानचीच होती हे ट्र्स्टीनी ओळखलेलं होतं . भाऊ  मोहनला घेवून बाहेर गेले  हा संकेत  ओळखून बाकीचे ट्रस्टी गप्प राहिले. 
         भाऊंच्या डायरीत देवस्थानच्या चोरीला गेलेल्या सगळ्या ऐवजांचा तपशील होता. आश्चर्य म्हणजे  चांदीच्या घंगाळ- ताटांसह सगळा ऐवज त्या खोज्याने आपल्याकडे असल्याचे कबूलही केले. फक्त ताटे त्याने घरी नेलेली होती. खोज्याने  सांगितले ते ऐकून मंडळी पुरती चक्रावून गेली. चोरी झाली त्याच्या दुसऱ्याच दिवशी यच्चयावत्  सगळ्या  वस्तू  त्याने पाच लाखाला खरेदी केल्या होत्या तशी त्याच्या डायरीतली नोंदही त्याने दाखवली. “चालिस सालसे ये धंधा कर रहा हूं , कभी इतना बूरा वखत नहीं  आया. जबसे ये सामान  खरिदा उस दिनसे मेरा धंदा चौपट होगया है. पंद्रह दिन पहले दो नौकरोंको निकाल दिया..... बडी आमदनी है  मगर बिना कमाई  कितने दिन टिक सकूंगा? ये सामान  उठाकर फेंक भी नहीं   सकता, ना कोई  खरिददार मिलने की उम्मीद  रही....... ढाई लाखमें  तुम्हारा माल उठाकर ले चलो ....... तुम्हारा जो कोई  देव है  उससे  मेरेलिये मन्नत मांगो....... मेरा धंदा  शुरू हो जाय..... ” दरेकर, मोहन यानी  अडीज लाख रुपये  रक्कम देवस्थानला बिना पावती  देणगी म्हणून भरली नी सगळा ऐवज ताब्यात घेवून विषय मिटवला. 
        प्रिंदावणचा  ब्रह्मदेव म्हणजे  चार हात औरस चौरस दीर्घ वर्तुळाकार रुजीव, स्वयंभू  शीळा आहे.  गावापासून लांब एकवशी निर्जन स्थानी  देवस्थान  आहे. सगळी चढणीची वाट. ताकदवान  नी चालसूर माणसालाही  तिथे पोचायला पाऊण तास लागतो . काही ठिकाणी उभ्या कड्याच्या धारेने जेमतेम हातभर रुंद  पायवाट आहे. चुकून माकून पाय घसरला तर दोन माडांएवढ्या खोल दरीत कोसळून थेट स्वर्गात रवानगी होईल इतकी बेलाग पायवाट.  मंदीर हाकेच्या अंतरावर आल्यावर मात्र  सगळा परिसर सवथळ आहे. मंदिराच्या डाव्या अंगाला मोठ्या जांभ्या धोंडीच्या  सांदरीतून कमरभर उंचीवरून आंगठ्या एवढी स्फटिक भुभ्र पाण्याची संतत धार बारमाही पडत असते . धारेखाली  कातळवटीत  हातभर  लांब रुंद नी वीतभर खोल  डबरा मारलेला आहे . तिथून खालच्या अंगाला  कमरभर सखलवट  भागापर्यंत पाटातून वहात आलेले पाणी वळणा वळणाने दरडीच्या  पायथ्याशी व्हाळाच्या उगमात जावून मिसळते. मंदिराला दोन गोपुरे आहेत. सभागृहाच्या गोपुरापेक्षा  देवाच्या गाभा ऱ्या वरचे गोपूर  दुप्पट उंच आहे. आजूबाजुच्या दोन तीन गावांमध्ये विशिष्ट ठिकाणांहून गाभाऱ्या वरचे गोपूर  स्पष्ट दिसते. 
        ब्रह्मदेवाचे थळ कौल प्रसादासाठी आसमंतात प्रसिद्ध आहे. ब्रह्मदेवाच्या थळावर दिलेला कौल म्हणजे ब्रह्म वाक्य अशी आसमंतातल्या जनलोकांची श्रद्धा आहे.  तसेच  या देवस्थानात येवून बोललेला नवस हमखास पुरा होतो अशी या देवस्थानाची ख्याती आहे. देवस्थान ऐन  जंगल भागात असल्यामुळे  दर्शनाला येणाऱ्या माणसाना  दिवसा ढवळ्या भेकर,  डुक्कर,  साळिंदर  दिसतात. पण या भागात पारध करायला बंदी आहे. मंदिराच्या आसपास असंख्य लाल तोंडाची  केलडी वावरताना दिसतात . पण चुकून सुद्धा मंदिराच्या  अंतर्भागात एकही केलडं प्रवेश करीत नाही. हे सुद्धा एक अजब पण सत्य आहे.  दर्शनाला येणारे लोक देवाला मानवलेल्या केळी, पेढे व अन्य वस्तू बाहेर जावून  केलड्यांसाठी  प्रांग़णात टाकतात. देवस्थानचे पुजारी भिकूभाऊ  रानडे देवाला मानवलेला नारळ वाढवून एक भकल भक्ताला परत देतात नी दुसऱ्या  भकलातले सगळे खोबरे काढून बारीक फोडी करून गाभाऱ्या समोर प्रसादाच्या ताटात टाकतात. बऱ्याच  फोडी साठल्या  की ओंजळभर  बाहेर नेवून ओवरीत केलड्याना  घालतात. ठोम पावसाचे दिवस सोडले तर वर्षभर  दिवसाडी गेला बाजार पन्नासेक नारळ तरी फुटतो नी केलड्यांच्या उदरनिर्वाहाची सोय होते.  
        प्रिंदावणच्या बाजुला कोळीसरे हा बाजार वस्तीचा गाव. अलिकडेच तिथे केरळकडचे काही लोक आले. त्यानी बेकरी, ज्यूस सेंटर,असे व्यवसाय सूरू केले. त्यांचा नोकरवर्ग सगळा तिकडचाच असे . ते आसपासच्या गावानी फिरून रिक्शाच्या केबलच्या फासक्या लावून भेकरी, डुकर, साळिंदर पकडून त्यांचे मटण विकीत. ब्रह्मदेवाच्या मंदिराकडे भरपूर शिकार असल्याची माहिती त्याना कळल्यावर त्यानी मंदिराच्या जवळ केबलच्या फासक्या लावल्या. दुसऱ्या दिवशी  सकाळी  शिकारी आले. त्यावेळी  ब्रह्मदेवाची पुजा करून भिकुभाऊनी  रुद्राची आवर्तनं सुरू केली. केबलच्या  फासात पुढचा पाय अडकलेला  डुक्कर  प्राणभयाने  ओरडत होता.  जनावर चार ओझ्याच होतं. शिकाऱ्यानी दांडे कोयत्यांनी  घाव घालून डुकर मारला. फासकी सोडवून डुकराचे पाय बांधून त्यात वासा घालून जनावर उचललं  नी एकाएकी  जोरदार वाऱ्याच्या  कावट्या सुटल्या. मंदिरा जवळ कळंबाच्या झाडांवर आग्यामाशांची मोहळं होती.  वाऱ्याच्या  कावट्या नी  मोहोळाना जोरदार हेलकावे बसायला लागल्यावर आग्यामाशा पिसाळल्या. हजारोंच्या संखेने त्यांची  भिरी च्या भिरी  जमिनीवर उतरली नी गूंऽऽगूं  असा भीषण आवाज करीत  दिसेल त्याच्यावर हल्ला करीत  डसायला  येवू लागली . (क्रमश:)