Teen Jhunzaar Suna - 24 in Marathi Fiction Stories by Dilip Bhide books and stories PDF | तीन झुंजार सुना. - भाग 24

Featured Books
  • અસવાર - ભાગ 3

    ભાગ ૩: પીંજરામાં પૂરો સિંહસમય: મે, ૨૦૦૦ (અકસ્માતના એક વર્ષ પ...

  • NICE TO MEET YOU - 6

    NICE TO MEET YOU                                 પ્રકરણ - 6 ...

  • ગદરો

    અંતરની ઓથથી...​ગામડું એટલે માત્ર ધૂળિયા રસ્તા, લીલાં ખેતર કે...

  • અલખની ડાયરીનું રહસ્ય - ભાગ 16

    અલખની ડાયરીનું રહસ્ય-રાકેશ ઠક્કરપ્રકરણ ૧૬          માયાવતીના...

  • લાગણીનો સેતુ - 5

    રાત્રે ઘરે આવીને, તે ફરી તેના મૌન ફ્લેટમાં એકલો હતો. જૂની યા...

Categories
Share

तीन झुंजार सुना. - भाग 24

              तीन झुंजार सुना

श्रेय  

मुखपृष्ठ चित्र               सौ. शिल्पा पाचपोर

लेखनास सहाय्य               डॉ. अनंत बिजवे

                           Adv. आनंद मुजुमदार.           

पात्र  रचना

 

श्रीपति पाटील                     कुटुंब प्रमुख, प्रगतिशील शेतकरी

कमला बाई                       श्रीपतरावांची बायको

प्रताप                            श्रीपतरावांचा मोठा मुलगा

निशांत                           श्रीपतरावांचा मधला मुलगा

विशाल                           श्रीपतरावांचा धाकटा मुलगा

मेघना                           श्रीपतरावांची मुलगी

सरिता                           प्रतापची बायको.

वर्षा                             निशांतची बायको

विदिशा                           विशालची बायको.

वासुदेवराव सुळे                    वर्षाचे वडील

विजयाबाई                        वर्षांची आई.

शिवाजीराव                        विदिशाचे  वडील

वसुंधराबाई                        विदिशाची आई  

आश्विन                          प्रताप आणि सरिताचा मुलगा

बालाजी आणि सदा                 शेत मजूर  

बारीकराव                         शेत मजूर

कृष्णा आणि राघू                  शेत मजूर

दाजी, रखमा आणि सुरेश            गोठ्यांची व्यवस्था पहाणारे मजूर.

रावबाजी                          ठेकेदार. बटाईदार.

रघुवीर आणि त्यांची गॅंग            परदेशी मजूर.

 

 

 

भाग २४         

भाग २३   वरून पुढे वाचा .................

“बरोबर आहे तुझं म्हणण” निशांत म्हणाला. आणि मग ते दोघ परत येऊन बसले. विशाल म्हणाला “वहिनी, सांगा तुमचा प्लॅन, आमची आता पूर्ण खात्री पटली आहे. आणि आता आम्ही पण तुमच्या बरोबर आहोत.”

सरिता समाधानाने हसली. म्हणाली “मला हे ऐकून खूप बरं वाटलं. आता मी माझा प्लॅन सांगते. पूर्ण ३० एकराला उभे पत्रे लावून कुंपण घालायचं. म्हणजे कोणालाही सहजा सहजी आत घुसता येणार नाही. आणि गस्त घालायची जरूर पडणार नाही.”

“किती खर्च येणार आहे अंदाजे ?”- निशांत

“कल्पना नाही, आता ही बाहेरची कामं करायचा जिम्मा तुमचा. तयारी आहे न ? येणार ना आमच्या बरोबर. ? ” सरितानी विचारलं.

“हो वहिनी, म्हणजे काय ? येणारच. आणखी, मला असं वाटतं की आता बसून सगळ्यांची कार्य क्षेत्र वाटूनच घेऊ. म्हणजे कामात जरा सुसूत्रता येईल.” विशाल बोलला.

“वा विशाल, एकदम बरोबर बोललास. आत्ता अनायासे बैठक भरलीच आहे तर आत्ताच ठरवून टाकू. प्रथम तूच सांग कशी विभागणी असावी, असं तुला वाटतं ?. – सरिता.

आता  विशाल गडबडला, सरिता त्यांच्याच पारड्यात चेंडू टाकेल असं त्याला वाटलंच नव्हतं. त्यानी निशांत कडे पाहीलं, निशांतनी खांदे उडवले. मग थोडा विचार करून म्हणाला “माझी आता खात्री झाली आहे की शेतीतलं तुम्हालाच आमच्यापेक्षा जास्त कळतं, तेंव्हा तुम्हीच ठरवा. आम्हाला मान्य असेल.”

“ओके” सरिता म्हणाली “आता शेताच्या कामाची व्याप्ती वाढली आहे तेंव्हा वर्षा पूर्ण वेळ हिशोबाचे काम पाहील. त्यामधून तिला डोकं वर काढायला वेळ मिळेल असं वाटत नाही.”

निशांत मध्येच म्हणाला “ वहिनी, त्या साठी पूर्ण वेळ कशाला ? हे काम तर मी सुद्धा केलं आहे आणि मला माहीत आहे की या गोष्टीला फारसा वेळ द्यावा लागत नाही ते.”

“नाही, निशांत” सरितानी उत्तर दिलं. “ आता सर्व गोष्टी कॉर्पोरेट पद्धतीनेच होतील असा आम्ही निर्णय घेतला आहे. आता फक्त शेतीच नव्हे तर आणखीही बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत. त्याला अजून वेळ आहे, पण पाया म्हणजे फाऊंडेशन आत्ता पासूनच पक्क करायला हवं. सर्व गोष्टी रीतसरच करायच्या आहेत आम्हाला. त्या साठी आम्ही वर्षाला अमरावतीच्या एका चार्टर्ड अकाऊंटंट कडे काही दिवस ट्रेनिंग ला पाठवणार आहोत. एक दोन दिवसांत ती जायला सुरवात करेल. एक नवीन कम्प्युटर पण त्याच साठी घ्यायचं ठरवलं आहे.”

“बापरे, बराच मोठा कार्यक्रम दिसतो आहे. काय काय करणार आहात, आम्हाला पण कळू द्या की.” निशांत म्हणाला.

“आजचा तुमचा पहिलाच दिवस आहे, आता आपण रोजच सकाळी आणि संध्याकाळी बैठक घेणार आहोत. तेंव्हा तुम्हाला सर्व कळून येईलच.” सरिता म्हणाली. “आणि आपण जे काही करू, ते बैठकीत पास झाल्यावरच करू. काळजी करू नका.” थोडं थांबली प्रतिक्रिया पाहाण्यासाठी, मग म्हणाली “बरं आता पुढे जाऊया ?”

“वहिनी,” निशांत म्हणाला “चुकलंच आमचं, आम्हाला तुझी कुवत ओळखताच आली

नाही. एक वर्ष फुकटच वाया गेलं. सॉरी.”

“अरे, ठीक आहे, एकच वर्ष गेलं. उर्वरित आयुष्य तर आपल्या जवळ आहे. काम करायला! सगळी कसर भरून काढू. तुम्ही सुद्धा आता, हातचं काही न राखता आमच्या बरोबरीने आता काम करणार आहात, आमचं बळ आता दसपट वाढलं आहे. हा हा म्हणता सगळं मार्गी लागेल. तेंव्हा नको एवढं वाईट वाटून घेऊ. झालं, गेलं, विसरून जा.” सरितानी समजावलं. मग म्हणाली “बरं आता पुढचं प्लॅनिंग सांगू ?”

“हो सांग” विशाल म्हणाला. “निशांत आता तू मधे मधे बोलू नकोस., वहिनींना नीट सगळं सांगू दे, काय प्लॅनिंग आहे ते.”

“आता २०  एकरात मुसळी लावायची आहे आणि पुढच्या सीजन मधे अश्वगंधा लावायची आहे.” सरिता बोलत होती. “याची संपूर्ण जबाबदारी विदिशा उचलेल. काय कमी आहे, काय मागवायचं आहे, किती मजूर लावायचे आणि कामाचं  प्लॅनिंग, सगळं सगळं विदिशा बघेल. जे काही बाहेरून लागणार आहे, त्यांची एक यादी करून ती निशांत आणि विशाल यांना द्यायची. काय ग विदिशा, जमेल ना हे ?”

“हो वहिनी, तुम्ही काळजीच करू नका. मी सगळं व्यवस्थित सांभाळेन.” विदिशाने ताबडतोब होकार भरला.

“वहिनी, मी काय म्हणतो,” विशाल मध्येच म्हणाला. “मी आणि विदिशा मिळून, एक टीम बनवतो, म्हणजे तिला सुद्धा बळ मिळेल आणि काही अडचण आलीच तर तिला गाइड पण मी करू शकेन. म्हणजे किती झालं तरी मला शेतीमधली  तिच्यापेक्षा जास्तच माहिती आहे, म्हणून म्हंटलं.”

“नको, कारण असं की, तुमचं सगळं ज्ञान हे पारंपरिक शेतीतलं आहे. आपण आता जे करतो आहोत, ते सर्वतोपरी वेगळंच आहे. तुम्ही दोघं एकत्र आले तर, वादावादी वाढेल आणि कामात खीळ बसेल. इथे सर्व कामं वेळच्या वेळी आणि अतिशय शिस्तबद्ध रीतीने व्हावी  लागतात, आणि माझी खात्री आहे की विदिशा आणि तिची टीम या सर्व कामात वाकबगार झाली आहे. आणि त्यातूनही काही अडचण निर्माण झालीच, तर आपण रोज सकाळ, संध्याकाळ मीटिंग करणारच आहोत, त्यात जो काही मुद्दा असेल, त्यावर विचार विनिमय करून निर्णय घेतल्या जाईलच. तेंव्हा तू निश्चिंत रहा.”

विशाल मागे हटायला तयार नव्हता, तो विचार करत होता की, सगळीच  मुख्य कामं जर बायकांनी केली तर आपल्याला कोण विचारणार ? ही भीती त्याला भेडसावत होती. आपला सहभाग नसेल तर, एक दिवस आपण बाहेर फेकल्या जाऊ आणि फक्त यांची गुलामी करावी लागेल असं त्याला वाटत होतं. झालेला सगळा संवाद निशांत पण ऐकत होता आणि त्याच्या चेहऱ्यावर जवळ जवळ हेच भाव होते. तो म्हणाला –

“पण वहिनी, मी वर्षाबरोबर, आणि विशाल विदिशा, बरोबर काम करणार असेल तर फायदाच होईल ना, सर्व कामं वेळच्यावेळी आणि व्यवस्थित होतील, असं मला वाटतं. आणि, तुम्ही म्हणाल्या, त्या प्रमाणे आमचं ज्ञान अगदीच टाकाऊ आहे, आणि त्यामुळे कामात अडथळा येईल असं मला तरी वाटत नाहीये” निशांतनी आपली बाजू मांडली.

“बरोबर आहे तुझं म्हणण. तुमचं ज्ञान टाकावू आहे असं मी म्हणतच नाहीये. तुमचा  अनुभव आहेच. पण या हर्बल शेती करता तो irrelevant आहे.” सरिता थोडं प्रतिक्रिया पाहण्यासाठी थांबली. तिच्या अपेक्षेप्रमाणेच निशांत उसळून म्हणाला –

“काय वहिनी, काय बोलते आहेस ? आम्ही इतकी वर्षं शेतात राबलो ते काय वाया गेलं का  ? आम्हाला त्या कामाचा कंटाळा आला आहे, हे आम्ही मान्य करतो, पण  म्हणून आम्हाला काही कळतच नाही असं कसं म्हणू शकतेस तू ? काय वाटेल ते बोलू नकोस.”

आता वातावरण गरम होतांना बघून, बाबांनी हस्तक्षेप केला. म्हणाले “ निशांत, जरा दमानं घे. आपण इथे चर्चा करायला बसलो आहोत, भांडायला नाही. सरिताचं म्हणण नेमकं काय आहे ते तरी ऐकून घे. तुम्हाला काही कळत नाही असं ती कुठे म्हणाली ? तिचं एवढंच म्हणण आहे की दोन्ही गोष्टी अगदी एकदम वेगळ्या आहेत, बस. शेवटी सर्व निर्णय सर्वानुमते होतील असंच ठरलं आहे ना ? मग ऐकून घे आणि मग तुझं मत सांग. चर्चा करा, म्हणजे आपापली मतं  मांडा आणि पटवून द्या. वाद विवाद नकोत. त्यानी काहीही साध्य होणार नाही.”

बाबांच मधे बोलल्यामुळे, निशांतचा नाईलाज झाला. म्हणाला “ ठीक आहे वहिनी, सांग तू,” पण अजून तो धुमसतच होता. आणि त्याच्या चेहऱ्यावर ते स्पष्ट दिसत होतं की तो दुखावल्या गेला आहे.

“निशांत, शांत हो.” वर्षा बोलली. “वहिनींच्या बोलण्याचा तू भलताच अर्थ काढला. त्यांना हे अभिप्रेत नव्हतं. त्यांना एवढंच म्हणायचं होतं की पारंपारिक शेती आणि हर्बल शेती यात जमीन अस्मान चा फरक आहे आणि म्हणूनच पारंपारिक शेतीचा अनुभव इथे फारसा उपयोगी पडत नाही.”

“असं कसं ?” निशांत अजूनही जरा चिडलेलाच होता. ”शेती ही शेतीच  आहे, थोडा फार फरक असू शकतो पण जमीन अस्मान चा फरक आहे असं म्हणण म्हणजे फारच झालं. असं काही नसतं.”

“आता कसं पटवून द्यायचं तुम्हाला,” वर्षाच म्हणाली “गेले वर्षभर आम्हाला माहीत आहे की किती कष्टाचं काम आहे हे, किती उस्तवारी करावी लागते, केवढी काळजी घ्यावी लागते ते. अफाट कष्ट उपसल्या शिवाय, मालाला इतकी किंमत मिळत नाही.” वर्षा पोट तिडिकेने बोलत होती. तिचा स्वर पाहून निशांत थोडा नरमला. विशालला आता थोडी थोडी समज यायला लागली होती. त्याला पटायला लागलं होतं की या बायकांच्या बोलण्यात तथ्य असतं. तो म्हणाला “निशांत, अरे जरा नीट पूर्णपणे ऐकून तरी घे वहिनींना काय म्हणायचं आहे ते. त्यांचं झाल्यावर आपण साधक बाधक चर्चा करू आणि मगच फायनल करू. नाही तरी बाबा आत्ता असंच म्हणाले ना. मग काय हरकत आहे ?”

“ ठीक आहे, सांगा वहिनी.” निशांत म्हणाला.

 

क्रमश:..

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

धन्यवाद.