Patrakaar Ghondira Ghotre - 4 in Marathi Comedy stories by Akshu books and stories PDF | पत्रकार धोंडीराम धोत्रे - 4

The Author
Featured Books
Categories
Share

पत्रकार धोंडीराम धोत्रे - 4

                 भाग ३ : रात्रीची मोहीम

गावातलं सायंकाळचं शांत वातावरण काहीतरी कुजबुजतं होतं. पक्ष्यांनी झाडांवर बसून गोंधळ घालणं थांबवलं होतं, आणि आता फक्त झाडांच्या फांद्यांमधून वारा ‘हश्श… हश्श…’ करत वाजवत होता. भिकू काकांनी सांगितलेल्या गोष्टी पुन्हा एकदा मनात पुटपुटल्या . रमाबाईचं ओलं भूत, पायांशिवाय साडीतील बाई, आणि टपटप टपकणारं कुंकू!

माझ्या पोटातली बातमीभूक जोरात चिवचिवायला लागली. एका बाजूला मन म्हणत होतं, “धोंडीराम, इतकं काय विचार करतोयस? एक चहाचा कप घे आणि घरी झोपी जा.”पण दुसऱ्या बाजूने पत्रकार म्हणून जो आत्मा माझ्यात अडकून बसलाय, तो ओरडत होता. “चहा राहू दे! तुझं नाव ‘धोंडीराम भिताडे’ आहे की ‘धोंडीराम भिताडतो’?”

शेवटी मी कमर कसली, आणि एकच विचार केला.“धोंडीराम, तू विहिरीकडे पुन्हा जायलाच हवं… पण यावेळी कसलंही विचलन नको!”

फक्त मध्येच एकच अडचण होती. मला टॉर्च सापडत नव्हती. मागच्या वेळी वापरलेली टॉर्च भिंतीवर टांगलेली होती, पण तिच्यात बॅटरी होती का नाही हे एक कोडंच होतं. मी तिला हलवलं, पण ती ‘विहिरीप्रमाणे’ शांत राहिली. शेवटी एका मोबाईलच्या फ्लॅशवर विश्वास ठेवून, मी बाहेर पडलो. आणि मनात म्हटलं,“भूत भेटलं तर विचारेन. ‘इंटरव्ह्यू द्याल का, की थेट फीचर स्टोरी होणार?’”

मी ठरवलं. यावेळी कसलीही घाई नाही, थरथर नाही, चहा-वडापाव नाही, आणि सर्वात महत्त्वाचं – गण्या नाही!पण तयारी मात्र फिल्मी पातळीवर करायची होती.माझं रिपोर्टर किट पुन्हा एकदा अत्यंत गंभीरपणे तपासलं:

📸 कॅमेरा – ऑन केला... पण फ्लॅश चालू झाला आणि समोरच्या मांजरानं मला शिव्याच दिल्या.🔦 चष्म्यात लावलेली टॉर्च. चार्ज होती, पण तिचा उजेड इतका कमी की वाटलं माझ्या डोळ्यांतून उजेड जास्त येईल.🎤 'डबल-घनदाट डर' फिल्टरवाला मायक्रोफोन. तयार ठेवला होता, पण टेस्ट करताना माझाच घामाचा आवाज रेकॉर्ड झाला!🍔 पोट – अजूनही सटकलेलं, आणि तोच एक ‘लाईव्ह’ साऊंड इफेक्ट रात्रीसाठी कामी येणार होता.

मी स्वतःला समजावलं. “धोंडीराम, आज तू कधी नव्हे इतका शहाणा दिसतोय... पण फक्त तूच पाहतोयस!”

तेवढ्यात गण्या मागून हळूच उगम पावला. त्याच्या चेहऱ्यावर एवढं गूढ भाव होतं की वाटलं हा भूताचं प्रतिनिधित्व करत आलाय.

गण्या म्हणाला, “भाऊ, मी पण येऊ का सोबत? विहिरीपाशी भूत आलं, तर दोन डोळ्यांनी एकट्यानं पाहणं योग्य नाही.”

मी त्याच्याकडे पाहून गंभीरपणे म्हणालो, “गण्या, तू आलास की आवाजच घाबरून निघून जाईल!”

गण्या काही न बोलता गप्प झाला. पण त्याचा चेहरा सांगत होता –"भूत जर आलंच, तर मीच त्याला घाबरवणार!"

आता फक्त मी, माझं रिपोर्टर किट, आणि त्या अंधाऱ्या विहिरीच्या गूढ पायऱ्या. सगळं एका ब्लॅकमेल झालेल्या भुतासाठी सज्ज होतं...

रात्री अकरा वाजता, मी खरंतर खूप शहाणपणानं वाड्याकडे पोचलो... पण तेवढ्यात लक्षात आलं. मी शहाणपणानं आलो, पण सोबत भजी घ्यायचं विसरलो!खांद्यावर फडकं टाकून, झाडाच्या सावलीत सावकाश बसलो. म्हणजे मी झाडाखाली होतो, पण झाड माझ्यावर जरा जास्तच झुकलेलं होतं. एकदा वाटलं त्याच्या फांद्या हातात येऊन विचारतील, "का रे बाबा, काय शोधतोय तू?"

सगळं अगदी चित्रपटात शोभेल असं भयंकर वातावरण. रात्रीचं भयाण शांत वातावरण... की जे कधी कधी इतकं शांत असतं की माणूस आपलीच सुस्कारा ऐकून दचकतो.

तेवढ्यात... “गुळ…गुळ…गुळ… टप्प… टप्प…”

हा आवाज म्हणजे पाणी पडतंय की मिक्सरमध्ये पिठलं फिरतंय, कळेचना.पण यावेळी त्यात काहीतरी वेगळं होतं.जणू त्या गुळगुळाटात कुणी फुसफुसतंय, "हेल्लो, धोंडीराम... थोडं पुढे ये ना!"

एक क्षण वाटलं भूतचंही नेटवर्क बिघडलंय. आवाज पडलाय, आणि ती सवयीप्रमाणे "रीकनेक्टिंग..." करत असावी.पण नाही, त्यात रडण्याचा... की श्वास गुदमरण्याचा एक धूसर सुर मिसळला होता. जणू कुणी भूत एअरटेल कस्टमर केअरवर फोन लावून 'live chat' करतंय.

मी सावकाश उभा राहिलो. टॉर्च चालू न करता विहिरीच्या दिशेने पावलं टाकली.एकेक पाऊल म्हणजे हातात धरलेलं लाडू फुटू नये इतकं सावध!

कॅमेरा चालू होता... पण त्यात आवाजाचं काहीच नव्हतं, कारण मी स्वतः 'mute' मोडवर गेलो होतो.  दचकून दात एकमेकांवर इतके घट्ट बसले होते की वाटलं आता दात डॉक्टरकडेच उघडावे लागतील.

पण आतून, म्हणजे अगदी पोटाच्या पार्श्वसंगीतातून, एक जबरदस्त घोषणा ऐकू आली –"धोंडीराम, ही बातमी भारी आहे!"

आता ते भूत दिसो वा न दिसो, बातमी हवी होती. कारण गावात भिकू काका पेक्षा मी व्हायरल व्हायला हवा होतो....आणि म्हणूनच मी त्या अंधाऱ्या विहिरीकडे चाललो होतो.एकेक पावलासोबत आतून फक्त पोटातला गडगडाट, आणि बाहेर निव्वळ सस्पेन्स!

विहिरीच्या दुसऱ्या बाजूला काहीतरी हललं...पावसाच्या पानगळीसारखी मूक, पण लक्ष वेधणारी हालचाल.थोडंसं झाडीतून डोकावून पाहिलं तर... साडी! ओलसर केस! खाली झुकलेली मान!

माझ्या डोक्यात थेट ‘श्रीदेवीच्या भूताचा रिटर्न्स’ सुरू झाला.

माझं हृदय एकदम झोकून दिल्यागत वाजायला लागलं. ढम ढम ढम........... धम धम धम!त्या टेंपोमध्ये माझ्या हाताचा अंगठा टॉर्चच्या बटणावर नाचायला लागला.पण मी विचारात होतो.“हे टॉर्च लावायचं का? की आधी ‘जय हनुमान’ म्हणायचं?”टॉर्च लावला तर ती दिसेल… पण तिची ती नजर मी पचवू शकेन का?

तेवढ्यात मी हळूच कुजबुजलो –“काय… तुम्ही… रमाबाई आहात का?”

...सगळीकडे पिन ड्रॉप सायलेन्स.म्हणजे एवढं शांत की डासानं छातीवर टाळी दिली असती, तरी आवाज झाला नसता.

पण ती सावली... हळूहळू विहिरीकडे वळली.अगदी तसंच... जसं दार उघडल्यावर सासू सासरच्या अंगणात वळते... पण न बोलता वळते!

आणि काय सांगू?

ती सावली... वाऱ्याच्या झोतासारखी एकदम विहिरीत झेपावली!

माझ्या डोळ्यांनी ‘झेपावली’ पकडलं, पण मेंदू अजून Loading… Please wait म्हणत होता.

मी एकदम धावपळीतल्या हिरोप्रमाणे विहिरीकडे धावत गेलो.एका बाजूला मनात भीती, दुसऱ्या बाजूला पायातलं लूज धोतर खाली येतोय का याची काळजी.

विहिरीच्या काठावर पोचलो... आणि काय?

तिथे काहीच नव्हतं.

फक्त...एकेक थेंब विहिरीत पडताना “टप्प... टप्प...” करत होता,आणि पाण्याच्या कडेला, एक कुंकवाचा हलकासा, लालसर छटा.

माझा कॅमेरा मात्र अजूनही चालू होता.पण त्यात रेकॉर्ड झालं फक्त माझं दमलेलं श्वास, घाबरलेला चेहरा… आणि शेवटी मी म्हटलं,“भिकू काका, तुमचं भूत भलतंच स्पॉटीफायवर ऐकवतंय!”

मी एकदम हेरांप्रमाणं "Action!" म्हणावं तसा कॅमेरा वर केला.लेन्स थेट विहिरीकडे! Zoom इन करणारच होतो...तेवढ्यात... भर्रकन!

माझ्या मागून काहीतरी झाडावरून "धप्प!" करत हातावर येऊन आदळलं!ऐकायला झाडाचं पान वाटावं, पण वजन मात्र भरदार पापडाएवढं!माझा कॅमेरा घसरून थेट –

चटाक!धप्प!!स्प्लॅश!!!

थेट विहिरीत गेला!!

मी अक्षरशः "अरे देवा! माझा कॅनन!" म्हणत गडबडलो आणि मागे वळलो.

पण मागे?कुणीच नव्हतं.ना साडीवालं भूत, ना गण्या, ना भिकू काका…फक्त एक पोपट झाडावरनं बघत होता, असा चेहरा करून की जणू त्यानंच WhatsApp वर विडिओ पाठवून टाकला!

माझ्या अंगावर एकच काय, दोन दोन काटे आले – एक अंगावर, एक मनावर.म्हणलं, “धोंडीराम, तुझा कॅमेरा गेला, पण आताचं भयानक सत्य शूट न करता गेलं!”

आता माझ्या मनात नवीनच स्क्रिप्ट सुरू झाली.

“कोणीतरी इथे आहे… पण कोण? आणि का?”“कॅमेरा विहिरीत का फेकला?”“का तो पानासारखा खून झाला?”“आणि… माझं SD कार्ड वाचणार का?”

मी विचार करत होतो, पण पोपट मात्र शेंडी हलवत म्हणत होता.“हे तर फक्त ट्रेलर होता रे, धोंड्या भाऊ…”

विहिरीच्या कडेला एक कोपरा असा काही ढासळलेला होता, की जणू तिथे भूतांनी MSEBचं काम सुरू केलंय. लाईन फाटलेली, पण काम बाकीचं!

तिथेच मला एकदम धूप-लवेंडर-सिंदूर-पापड मिक्स असाच काहीसा वास आला.मी उगाचच दोनशे वेळा नाक फुरफुरून खात्री केली.हा वास ‘भिकू काकांच्या बाथरूम फिनाईल’चा नाही!

मी काठी वापरून हात घालून खणलं.थोडं माती, थोडे किडे, आणि शेवटी...

"टण टण!"

एक जुनं सांदीपातलं तांबं बाहेर आलं, जसं कुणी ‘हॉटेल मधून parcel मागवलं’ आणि ते आर्टिफॅक्टमध्ये मिळालंय!

त्यावर लिहिलं होतं:

“रमा – १८२२, श्रावण पौर्णिमा”

मी डोळे मोठ्ठे केले – म्हणजे हि गोष्ट काहीतरी खऱ्याजवळची आहे! पण मग प्रश्न –"विहिरीत दररोज तोच आवाज का?"भूत पेंड ड्राईव्ह लावून रिंगटोन ऐकतंय का?

मी ते तांबं हातात धरून अगदी CID स्टाईलने बाहेर पडलो.घरात आलो. कुणालाच काही सांगितलं नाही.रिपोर्टर मोड ऑफ.

पण…

झोप मात्र काही केल्या आली नाही.

डोळे मिटायचा प्रयत्न केला, की समोर तीच सावली, तीच साडी, आणि तोच ‘गुळ गुळ टप्प टप्प’ साऊंड ट्रॅक.

माझं मन गोंधळून गेलं –हे खरंच भूत आहे का?की एखादा रात्रीचा RJ विहिरीतून लाईव्ह प्रोग्राम करतोय?

एक प्रश्न सारखा सतावत होता.

“कोणी आहे का, जे आजही या कहाणीला जिवंत ठेवतंय?”…की फक्त मीच, अति कल्पनाशक्तीमुळे ‘झोपेच्या जागी थरार’ घेतोय?

👉 पुढच्या भागात:भाग 4 – सत्याचा उलगडा:धोंडीराम एका तांत्रिक पद्धतीने शोध घेतो आणि एका मोटारीच्या पाईपचा रहस्यभंग करतो – पण... तेवढंच उत्तर पुरेसं आहे का?