खाजगी डॉक्टर गाठला तर तो गपाचुपीत गर्भपात करून ईमलीला मोकळी करील आणि सुऱ्या ईमलीचा बेत धुळीला मिळेल, त्यापेक्षा सिव्हील हॉस्पीटलला अॅडमिट व्हायचं... आपल्याला सुऱ्यापासुन दिवस गेलेयत्, तो आपल्याशी लग्न करायला तयार आहे, मात्र आईबाबाचा याला विरोध आहे. ते जातपंचायतीला घाबरून आपल्याला जीवे मारतील. तेव्हा सरळ पोलिस केस करा नी सुऱ्याशी माझे लग्न लावून द्यायला आईबापाला भाग पाडा... असे सिव्हील हॉस्पीटल मधल्या डॉक्टरांना सांगायचे पण या प्रकाराची मिटवा मिटवी करू द्यायची नाही असे त्याने ईमलीला बजावले.
कल्लाप्पा नाना भाव्यांची टॅक्सी घेऊनच बिऱ्हाडी आला. ईमली, तिची आई टॅक्सीत बसल्या. “आपून सिविल हॉस्पिटलमदी जाऊया” असं ईमलीने आईला अगोदरच पटवून सांगितलेलं. कल्लाप्पाच्या मनाने चव्हाण किंवा औरंगाबादकर डॉक्टरांकडे जायचं होत पण सिव्हिलमध्ये कमी पैशात सोय असताना “उग आनी मोटा डागतर गाटून हज्जार रूप्पय कस्याला वाया घालवायचं?" हे सुंद्रिच म्हणणं त्यालाही पटलं. टॅक्सी सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात शिरली, माणसं खाली उतरत असताना मटांगे कॉन्ट्रक्टर समोर दिसले. कल्लाप्पा हात जोडीत “राम राम सायब म्हणत त्यांच्या समोर गेला. सगळे सोपस्कार केस पेपर वगैरे झटपट उरकले आणि ईमली तपासणीसाठी आर. एम. ओ. च्या केबिन बाहेर रांगेत बसली. आर. एम. ओ. नी ईमलीला तपासलं. ईमलीने खरा प्रकार त्यांच्या कानी घालून सुऱ्याने सांगितल्याप्रमाणे डॉक्टरांना विनंती केली. ही केस मटांगे कॉन्ट्रॅक्टर मॉर्फत आलेली या केसमधील गांभीर्य लक्षात घेता ईमलीला बाहेर बसायला सांगून आर. एम. ओ. नी मटांग्याना फोन लावला.
मटांग्यानी कल्लाप्पाला बाजुला घेऊन ईमली गरोदर असल्याचे सांगितले. कलाप्पा त्यांच्या खास ठेवणीतला माणुस, १०/१५ वर्षे त्यांची घसट. सुऱ्या ईमलीच्या प्रेमाची गोष्ट त्यांच्या कानी गेलेली. त्यांनी कलाप्पाला सल्ला दिला. पोरगा भंडारी समाजाचा आहे. तुझ्या पेक्षा उच्च जातीतला... रायकरशेठच्या खास मर्जीतला... तुझी पोरगी नवरा मेलेली---- तुझ्या जातीतला कोण उमेदवार पोरगा ईमलीला पत्करणार नाही मिळालाच तर अर्ध्या वयाचा एखादा बिजवर... तीन चार पोरांचं लेंढार असलेला एखादा दारूडा... तोच तुझ्या पैशावर डोळा ठेवून ईमलीशी म्होतूर लावील आणि सोन्याची कोंबडी देणारी म्हणुन ईमलीला हाताशी धरून तुला धुवील. त्यापेक्षा सरळ तिचे सुऱ्याशी लग्न लावुन दे...
कल्लाप्पा अजिजीच्या सुरात म्हणाला, “मटांगेशेट, तुम्ही म्हंतासा त्ये पटतय गा मला बी सुऱ्या वडराचं पोरगं आस्त तर ईमलीला देवून आनी दोन डंपर बी दिलं आस्तं की जावायाला. माज्या धंधात बी भागीनं घेतलं आस्तं. पर आमची वडराची जात पंचायत अक्षी बेकार बगा.” त्यावर मटांगे म्हणाले, “त्याचीबी धास्ती सोड रे. मल्लूला व्हिस्कीचा खम्बा देऊन पटवतोकी त्यालाबी. तू कायतरी खूळ डोक्यात घेऊन आडवं लावाय बघतोएस ईमलीला अन सुऱ्याला ! पण प्रकरण जड जाईल कलाप्पा गाठ भंडाऱ्याशी आहे !” मग कल्लाप्पा बोलला, “मटांगे शेट, पोरगी जाती भाईर ग्येली म्हंजे नाकच कापलं म्हंतील गा समदं... माझं हागणं मुतणं बंद झालं म्हंतील गा त्ये.... शेट तुमच्या पाया पडतो पर ह्या भानगडीत तुम्ही पडू नगासा... माजं म्या निस्तारतो कसतरी" ईमली आणि बायको दोघींना घेऊन कल्लाप्पा बाहेर पडला.
आपल्या बेताचा ईमलीलाच नव्हे आपल्या बायकोला सुंद्रीला सुध्दा पत्ता लागू नये अशा खबरदारीने कल्लाप्पाने पुढच्या हालचाली केल्या. ईमलीला टॅक्सीत घालून कलाप्पाने तिला कोतवड्यात नेली. तिला नामुच्या हवाली करून झाली गोष्ट त्याने कानावर घातली. चार दिवसांनी ईमलीला सांगली – कोल्हापूरकडे नेऊन मोकळी करायची तोवर तिला पालाबाहेर पडु दयायचे नाही असा बेत ठरला.
सुऱ्या संध्याकाळपर्यंत ईमलीची वाट बघीत राहील. ती भेटल्यावर पुढे कसे काय करायचे हा बेत ठरवायचा होता. प्रेस बंद करून सुऱ्या बाहेर पडला. नाक्यावरच्या पानपट्टी समोर ईमलीचा भाऊ ईराप्पा दिसला. सुऱ्याने काही विचारण्या पूर्वीच ईराप्पा म्हणाला, “सुऱ्यादा आज सकाळच्याला ईमली आलती मंग आय नी बाबा ट्याकशीतून डागदरकडे गेलती ईमलीला कायतर झालंया. दुप्पारी भाकरी खावुन बा ईमलीला कोतवड्यात घालवाय ग्येला. त्यो आजून आल्याला न्हाय घरला..." एवढी बातमी पुरेशी होती. दुसऱ्या दिवशी सकाळीच सुऱ्याने कोतवडे गाठले.
मंगेशाच्या बागेत संकेत स्थळी जाऊन सुऱ्या वाट बघीत थांबला. अर्धा तास गेला आणि सुऱ्याच्या पायाशी बसलेला बादशा कान ताठ करीत भुंकायला लागला. गडग्या बाहेरून दोन वडारांचे पोरगे सुऱ्याला खुणावीत होते. सुऱ्या गडग्यापर्यंत गेला. 'तुमी सुऱ्यादा न्हवं?' सुऱ्या मानेनेच हो म्हणाला. आमाला नामुदानं धाडलया. ईमली त्येच्या पालवर हाई. तुमाला संगट घ्येऊन यायला सांगितलया... मनोमन हरखलेल्या सुऱ्याने छलांग मारून गडग्यापलिकडे उडी ठोकली. वडारांच्या पोरांसोबत तो नामुच्या पालाकडे जाऊ लागला.
नामु पालाबाहेर वाट बघीत उभा राहीलेला. सुऱ्या समोर येताच हात जोडीत, यावा सुऱ्यादा . असं म्हणून त्याने सुऱ्याला पालात नेलं. सुऱ्याने पालात प्रवेश केला मात्र काय होतेय हे समजण्यापूर्वीच तीन दांडगे वडार त्याच्यावर तुटून पडले. दोन कापडाच्या पटकुराने त्याचे तोंड. करकचुन बांधल्यामुळे सुऱ्याला ‘ऊं’ करायचीही सवड मिळाली नाही. लाथा बुक्क्यानी यथेच्छ तुडवून काढल्यावर हात पाय दोरीने करचुन बांधून त्यानी सुऱ्याला पालातच खांबाला डांबून टाकले त्याला... सुऱ्याच्या मागोमाग आलेला बादशा सुऱ्याला आत मारहाण सुरू झाली हे ओळखुन तो दात विचकुन गुरगुरत पालाच्या कवाडीकडे सरकु लागला. बाहेर आडोसा धरून राहिलेल्या वडारानी दगडधोंडयाचा असा मारा केला की घाबरलेल्या बादशा माघारी वळला. एक दोन धोंडे अगदी वर्मी लागल्यामुळे धुम पळत माऱ्या बाहेर सावध अंतरावर जाऊन पालाकडे तोंड करीत तो भुंकत राहील. दोन चार गडी पुन्हा दगड घेऊन त्याच्या दिशेने आलेले दिसताच बादशहाने पळ काढीत तडक घर गाठले. अंगणाच्या पेळेवर बसून आकाशाकडे तोंड करून तो अवलक्षणी ओरडु लागला.
बादशाचे भेसूर रडणे ऐकुन मंगेशची आई-बहिण दोघी बाहेर आल्या. मंगेशच्या बहिणीने आजुबाजुला नजर टाकली. तिला काहीच अर्थबोध होईना. मग तिने बादशहाला साखळीने बांधले अन् ती पुन्हा कामाला घरात गेली. दहा पंधरा मिनिटे बादशा भीषण रडत राहीला तेव्हा मात्र काहीतरी अघटीत घडल्याची चाहुल मंगेशच्या बहिणीला लागली. घरात पुरूष मनुष्य कोणीच नव्हते. तिने मागीलदारी जाऊन शेजारच्या भाईला हाक मारली. भाई आला. भाई समोर दिसताच बादशा दोन पायांवर उभा रहात भुंकायला लागला. भाईने बादशाची साखळी हातात पकडून त्याला मोकळं केल मात्र... साखळीला ओढ देत बादशा बागेकडे निघाला. (क्रमश:)