त्यातल्या त्यात एक गोष्ट ऊमाला बरी वाटायची ती म्हणजे त्यांच्या घराच्या आजूबाजूला कोणीच राहणारे नसल्याने घरातला नेहेमी होणारा सतीशचा आरडाओरडा आणि दंगा कुणाला कळायचा प्रश्न नव्हता .आता ऊमाने ठरवले ऑफिसला जायला सुरवात करायची काकूने पण तिच्या ऑफिसच्या वेळात नयनाला संभाळायची जबाबदारी घेतली आणि ऊमाचे ऑफिस रुटीन सुरु झाले अजुन तरी ऊमाने काका काकुना याची काहीच कल्पना दिली नव्हती सतीश कधी घरी यायचा कधी नाही हे घडणारे सगळे कमी पडले म्हणून की काय... एक दिवस एक वृध्द गृहस्थ संध्याकाळी दारात उभे राहिलेले दिसले .ऊमा नुकतीच ऑफिसमधून आली होती . येताना काकूकडून नयनाला घेऊन आल्यामुळे कडेवर नयना आणि हातात पिशवी आणि पर्स होती .नयनाला आधी खाली उतरवून तिने पर्समधून किल्ली काढून घराचे कुलूप उघडले .ते गृहस्थ बाहेर उभे असलेले तिच्यासोबतच आत आले .आत आल्यावर नयनाला बेडवर बसवून उमाने त्यांना काही विचारायच्या आतच त्यांनीच ऊमाला विचारले ,कोण आहात तुम्ही ?अचानक एक अनोळखी गृहस्थ तिच्याच घरात येऊन तिलाच कोण आहात असे विचारतो आहे हे पाहून ऊमाला थोडे नवल वाटले आणि किंचित रागही आला या अगांतुक प्रश्नाचा .पण ते मोठे असल्याने त्यांच्या वयाचा आदर करून ती म्हणाली ,मी उमा ..सतीश समर्थ यांची पत्नी ..ऊमाने असे म्हणल्यावर ते म्हणाले “अरेच्या असे आहे काय...... लग्न ठरले होते म्हणूनच सतीशने घर माझ्याकडून भाड्याने घेतले वाटते ?हे ऐकताच ऊमा म्हणाली ,“काय बोलताय काका मला त्याचा अर्थ नाही समजला .”“ सांगतो ..हा सतीश असाच ओळखीचा आहे माझ्या .गेल्या वर्षभरापासून हे घर मी त्याला भाड्याने दिले आहे .आधी त्याने आगावू एक महिन्याचे भाडे दिले होते .नंतर पुढच्या महिन्यात भेटला तेव्हा सहा महिन्याचे एकदम भाडे देतो म्हणाला होता .नंतर परत भेटला तेव्हा पैसे द्यायची टाळाटाळ केली होती ..त्यानंतर माझ्या काही वैयक्तिक कामासाठी मी चार पाच महिने बाहेरगावी होतो .आता आलो ते आधी इकडे आलो बघा ..पैशाची गरज आहे मला .आणि एवढे दिवस भाडेकरूने भाडे तटवले तर मला कसे परवडेल ..?”हे सर्व एकून ऊमा म्हणाली ,“काका तुमचा काही गैरसमज तर होत नाही ना ,..?हे घर तर आमचे स्वतःचे आहे ..”ऊमाने असे सांगितले तेव्हा ते हसु लागले आणि म्हणाले ,“पोरी तु माझ्या मुलीसारखी आहेस ..मी कशाला तुझ्याशी खोटे बोलेन ?आणि गैरसमज व्हायचे काय कारण? ..खरोखर हे घर माझेच आहे .तु त्याची बायको असुन सुद्धा सतीशने तुला पण थापा मारल्या वाटते .असे म्हणून ते घरीच बसून राहिले .“सतीश कुठे आहे आणि कधी येईल ?असे त्यांनी विचारले “ तो ऑफिसमधून अजून यायचा आहे.तो आला की मी सांगेन त्याला तुमचा निरोप “त्या गृहस्थाना अशा रीतीने जायला सांगायचा प्रयत्न ऊमाने केला .ऊमाचे बोलणे ऐकून ते तेथून गेले तर नाहीच उलट ..खोलीतल्या एका खुर्चीवर बसले आणि म्हणाले , “मी आता पैसे घेतल्याशिवाय इथून अजिबात जाणार नाही .येउदे त्याला कधी यायचे आहे ते “एक वर्षाचे भाडे सहा हजार रुपये होते आणि त्याने मला आत्तापर्यंत फक्त हजार रुपये दिलेत .आता पाच हजार रुपये बाकी आहेत .ते एकरकमी घेऊन मगच जाईन मी ..ओळखीचा होता आणि गरजू वाटला म्हणून कमी भाड्यात घर दिले तर हा माझे भाडे पण देईना झालाय “ ..असेही ते रागारागाने बोलु लागले ऊमाचे तर आता डोकेच गरगरू लागले .डोके धरूनच ती बसून राहिली .काही वेळ ती अशीच बसून राहिली,नयना पण थोडी बिचकली होती .ती पण तिला चिकटून राहिली .मग तिने त्या गृहस्थांना चहा विचारला पण त्यांनी नकार दिला आणि थोड्याच वेळात सतीश घरी आला ,नशीब आज तो पिऊन नव्हता आला .आत येताच त्या गृहस्थांना पाहिल्यावर तो दचकला त्यांनी काही बोलायच्या आतच तो त्यांच्यापुढे गयावया करू लागला .मी तुमचे पैसे बुडवणार नाही मी ते देईन असे बोलू लागला .पण त्या गृहस्थांचे पैसे घेतल्याशिवाय परत जायचे लक्षण दिसेना शेवटी सतीशने खिशातून त्याच्या जवळचे दोन हजार काढले आणि ऊमाकडे दोन हजार रुपये मागितले.तिथे आता तर काहीच बोलता येत नव्हते .मग ऊमाने तिची पर्स काढून सतीशला पैसे दिले . त्याने त्या गृहस्थांना ते पैसे दिले, सध्या इतके घ्या आणि उरलेले हजार उद्या तुमच्या घरी आणुन देतो असे म्हणत कशीबशी त्यांची समजूत काढली .अखेर पैसे घेऊन ते निघून गेले .ते गेल्यावर ऊमाने विचारले , “अरे सतीश हे कोण ?आणि हे जे सांगत होते ते खरे आहे का ?यावर सतीश अगदी चुपच ..!!परत ऊमा म्हणाली ,“अरे आपले लग्न ठरताना तु तर म्हणला होतास हे तुझे स्वतःचे घर आहे असे .का असे खोटे बोललास ..?आणि आम्हाला फसवलेस ?तिचे त्राग्याचे बोलणे ऐकून सतीश नेहेमीप्रमाणेच वैतागला ..आणि म्हणाला,काय करणार होतो मी त्या वेळेस ? “स्वतःचे घर कुठून आणणार होतो मी ?मला ना आई न बाप एक अनाथ मुलगा मी कसे घर घेणार होतो ?माझे घरदार काहीच नाही म्हणल्यावर तुझ्या काकांना चालले असते का ?तुझ्याशी लग्न करण्यासाठी मी ही थाप मारली होती तुझ्या काकांना नाहीतर त्यांनी कशी दिली असती आपली पुतणी माझ्यासारख्या अनाथाला ?आणि कसे झाले असते माझे लग्न ?म्हणून मला असे करायला लागले समजले ना ?सतीशचा हा असा कांगावा ऐकून ऊमा हतबुद्ध झाली .यावर काय बोलावे ऊमाला सुचेना, पण मनातून मात्र ती चांगलीच हबकली ..एक तर सतीशला दारूचे, जुगाराचे व्यसन होतेच ,त्यात आता हे घरही त्याचे स्वतःचे नाही हे तिला समजले .आता काय करावे हे तिच्या आकलनापलीकडे गेले होते दोन दिवस असेच गेले ..आणि एक दिवस सतीश रात्री दहा वाजले तरी ऑफिसमधून आलाच नाही .क्रमशः