Reunion - Part 14 in Marathi Short Stories by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | पुनर्मिलन - भाग 14

Featured Books
Categories
Share

पुनर्मिलन - भाग 14

स्वतःला दोष देताना.... काकांना  ह्या स्थळाची नीट चौकशी न केल्याबद्दल अतिशय वाईट वाटत होते  .ऊमाच्या आईवडीलांच्या माघारी तिचे कल्याण करण्याऐवजी त्यांच्या हातुन तिच्या आयुष्याचे नुकसान घडले होते.काय उत्तर देणार होते ते तिच्या स्वर्गीय मातापित्यांना ..?असे ते सारखे सारखे बोलू लागले .आता तर काकुंसोबत काकांच्या पण डोळ्यातून अश्रू वाहायला लागले . ऊमाने कसेतरी दोघांना शांत केले .ती म्हणाली , “काका यात तुमची काहीच चुक नाही.. दोष असेल तर हा माझ्या नशिबाचा आहे .तुम्ही तर नेहेमी माझ्या भल्याचाच विचार केला आहे .मला आपल्या मुलीसारखे वाढवले आहे .. असो... आता जे झाले ते झाले ...आता आपल्याला पुढला विचार करायला हवा.मग तिने काकांना मोहनने सुचवलेला पर्याय सांगितला .त्या पर्यायानुसार ती ऑफिसमधून कर्ज घेऊन पैशाची व्यवस्था  करू शकेल असेही सांगितले .आता काकु चटकन उठून आत गेल्या..आणि आतल्या खोलीतुन एक पितळी डबा घेऊन बाहेर आल्या .ऊमाच्या हातात तो डबा देऊन त्या म्हणाल्या ,“हे बघ पोरी यात तुझ्या काकांची एक पूर्वीची जुनी अंगठी आणि माझ्या चार बांगड्या आहेत .आमच्याकडे शिल्लक असलेली अशी ही आता शेवटची पुंजी आहे . हे मोडून तुझ्या लग्नाचा खर्च करणार होतो .पण तेव्हा सारा खर्च जावईबापूंनीच केला होता त्यामुळे हे तसेच राहिले .हे खूप जुने दागिने आहेत अगदी माझ्या सासूने मला लग्नात दिलेले ..त्यामुळे चोख सोन्याचे आहेत .याची किंमत किती असेल हे मला माहित नाही ,पण तुझ्या गरजेला मात्र हे नक्कीच पुरे पडतील “यानंतर परत काकू म्हणाली ,मला म्हातारीला तरी हे दागिने घालून आता कुठे जायचे आहे ?याचा उपयोग तुझ्या अडचणीच्या वेळेस होतो आहे यात मला समाधान आहे ग  .हे घे बरे तुझ्या ताब्यात आणि बघ हे विकून किती पैसे उभे करता येतात ते  ..”ते दागिने पाहून आणि काकूचे असे बोलणे ऐकुन ऊमाच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले .“काकु ,अग एवढेच तर शिल्लक आहे तुमच्याकडे .ठेव ना तुमच्या अडचणीला कधी भविष्यात लागले तर मला नको ग हे दागीने नको करू असला आग्रह मला  “आपल्या वृद्ध काका काकुंच्याकडून ज्यांनी आपल्या आईवडीलांच्या माघारी आपल्याला निगुतीने सांभाळले ..आपल्याला सख्ख्या मुलीप्रमाणे प्रेम दिले .त्यांच्याकडून आता अशी आर्थिक मदत घ्यायची ..?उमाच्या मनाला ही कल्पनाच सहन होत नव्हती ती फक्त खाली मान घालून अश्रू ढाळत बसून राहिली .काकू हलके हलके तिच्या पाठीवरून हात फिरवत राहिली  .काकूंनी बरेच समजावून सांगूनसुद्धा ऊमा मात्र हे अजिबात ऐकेना हे पाहून आता मात्र काकांनी या संभाषणात भाग घेतला .“ऊमा पोरी बरोबर बोलतेय तुझी काकु ..आणि माझे ऐकशील तर तु तुझ्या पगारात अशा कर्जाचा हप्ता नको लावुन घेऊस  ..आता तुझ्या पदरात ही तुझी लहान लेक आहे ..तुझा नवरा परत कधी येईल हे तुला काय कोणालाच ठाऊक नाही अशा परिस्थितीत उगाच तुझ्या नियमित पगाराच्या कमाईत खंड पाडून घेऊ नकोस .. परवा डायरिया झाला म्हणून नयना आजारी होती तेव्हा किती गोंधळ झाला होता आठवते न ?तुझी नोकरी असल्याने तु दवाखान्याचे एवढे बिल भागवू शकलीस नाहीतर आमची काहीच ऐपत नव्हती ग तुला मदत करायची .आणि हे बघ लग्नाआधी तूच तर हे घर चालवत होतीस ना .आता सुद्धा सारखी बारीक सारीक मदत करीत असतेसच की ग तु ..तुझी काकू म्हणते ते अगदी योग्यच आहे .या तुझ्या अडचणीला आम्हाला आता तरी उपयोगी पडू देत ग  “काकांचे हे बोलणे ऐकुन ऊमा खरोखरच भानावर आली .काका बोलत होते ते बरोबरच होते .दोन लाखाच्या कर्जाचे हप्ते पण मोठे असणार होते .अशी मोठी रक्कम जर तिच्या पगारातून कापली गेली असती तर तीची खरोखरच फारच अडचण झाली असती .एकतर सतीश गायब त्याच्या पगाराचा पत्ता नाही  अशात पगार जर कमी हातात आला तर संसाराचा सगळा खर्च ती कशी पेलणार होती ?आणि खरेच जर एखादी अनपेक्षित अडचण आली तर कोणाच्या तोंडाकडे बघणार होती ती .?तशात छोट्या नयनाची जबाबदारी पण होतीच की .. नयनाला ती कशी मोठी करणार होती ?सतीशने तर सगळाच  खोटा डोलारा उभा केला होता .भाड्याचे घर ,खोटे दागिने, ..भविष्यासाठी तिच्याकडे तिची नोकरी आणि नियमित येणारा पगार इतकेच तर होते .तशात सतीशचे चमत्कारिक वागणे ,त्याची व्यसने ..त्याच्याकडून कसल्याही आर्थिक मदतीची अपेक्षा करणेच चुकीचे होते ..उलट भविष्यात आणखीन काय काय अडचणी तो निर्माण करेल हे सांगता येत नव्हते .तरी तिने अद्याप काकांना सतीशचे भाड्याचे घर ,त्याने केलेले खोटे दागिने,त्याची व्यसने  याविषयी काहीच सांगितले नव्हते .इतकेच नाही तर मोहनने सांगितलेली त्याच्या मानसिक आजाराची गोष्ट पण लपवली होती  .सध्या तरी काकांची टेन्शन्स वाढवण्यात काहीच अर्थ नव्हता .अखेर ऊमाने काकुच्या म्हणण्याला होकार दिला .काका काकू दोघांनाही बरे वाटले .ऊमावर आलेले मोठे संकट तात्पुरते तरी दूर होणार होते .डबा परत काकुकडे देऊन नयना म्हणाली,काकू सध्या तुझ्याकडेच ठेव हे ,”माझ्या घरी आता मी नेत नाही .एकतर घर माझे गावाबाहेर आहे त्यात सध्या मी तिथे नयनासोबत एकटीच आहे .  उगाच जोखीम नको.उद्या येईन तेव्हा बघेन याचे कसे कसे करायचे ते  “आणि ती नयनाला घेऊन आपल्या घरी गेली.दुसऱ्याच दिवशी नेहेमीप्रमाणे नयनाला सकाळी काकुच्या घरी सोडुन तिने स्वतःच्या ऑफिसमध्ये रजा कळवली .आणि ती मोहनकडे त्याच्या ऑफिसमध्ये गेली .मोहनला भेटून तिने घडले ते सर्व सांगितले आणि हे दागिने विकण्याच्या कामासाठी त्याला तिच्या सोबत सोनाराकडे येण्याचा आग्रह केला . हा असा व्यवहार करताना सोबत कोणी पुरुष माणूस असेल तर बरे .ऊमाच्या या विनंतीला मोहन तयार झाला आणि साहेबांना सांगुन तो तिच्यासोबत ऑफिसमधून बाहेर पडला .त्या छोट्या गावात सोनाराची दोन तीन दुकाने होती .त्यातल्या एक त्याच्या ओळखीच्या दुकानदाराकडे मोहन तिला घेऊन गेला .मागच्या वेळेस ऊमा याच सोनाराकडे गेली असताना तिचे दागिनेच खोटे निघाले होते .त्यामुळे तिच्या मनात टेन्शन होते .पण आज असे काही घडले नाही काकूचे दागिने जुने असल्याने सोने चोख होते आणि दागिने वजनदार होते .बांगड्या आणि अंगठी मिळुन दोन लाखाच्या वर रक्कम ऊमाला मिळाली .सगळा व्यवहार पुरा झाल्यावर दोन लाख पाच हजार रक्कम ताब्यात आल्यावर दोघे बाहेर पडले .ऊमा मोहनला म्हणाली ,“मोहन आज माझ्यासोबत येऊन हा व्यवहार नीट पार पाडलात खरेंच कसे आभार मानायचे तुमचे तेच मला समजत नाही ““ वहिनी असे बोलून मला परके नका करू ..मी सतीशचा मित्र आहे पण आता मला तुमचा भाऊ समजा ..अडचणीत मी असेन तुमच्या पाठीशी .तुमच्या भावाने जे जे तुमच्यासाठी केले असते ते सगळे मी करेन तुमच्यासाठी .”ऊमाच्या डोळ्यात टचकन पाणी आले . क्रमशः