गोड्या पाण्याचीटंचाई असली तरी गाव सधन होता. मळ्याच्या कडेने आंग ओलीवर बिनशिपण्याचे माड नारळानी ओथंबलेले असायचे.एकेका माडापर दीड दोनशे नारळ लागलेले दिसायचे . खाऱ्या पाण्याचा उग्रम असल्यामुळे कोंड सखलातल्या नारळाचं खोबरं गोडूस लागायचं. मंगळवारी दांड्यातला बाजार नी शुक्रवारी पठारातल्या बाजाराला कोंड सखलातले लोक नारळ विकायला जात. त्यांच्या नारळावर गिऱहाईकं नुसती तुटून पडायची. नारळाचं बेफाट उत्पना असल्यामुळे कोंड खोलात प्रत्येक वाडीत तीन चार तरी तेलाचे घाणे असायचे. खाडीच्या कडेला उंडिली नी करंजाची झाडं माजलेली होती.मळ्यात उन्हाळी भुईमूग व्हायचा. ढोरं कायम मोकाट सोडलेलीअसल्यामुळे पिकदाऊ मळ्यात जायला एक वाट ठेवून भोवती वावभर रुंद चर खणलेले असत. माऱ्याच्या जागी पुरुषभर उंचीची काटेरी तटकी लावून बंदस्ती केलेली असायची. सराईपासून ते अगदी वैशाख्या अमावास्येपर्यंत कायम तेल घाणे सुरू असत. त्यावर खोबरेल, गोडंतेल, करंजाचं तेल नीउंडीच कडू तेल काढलं जायचं. फोंडा , विजयदुर्ग, देवगड कडचे व्यापारी कोंड सखलात येवून तेलाची पिपंच्या पिपं भरून खाडीमार्गाने होड्यांमधून नेत असत. खाडी किनारी होड्यांमधून मच्छिमारीकरणारे लोक होड्याना सुरली (कीड ) लागू नये म्हणून करंजेलाचं चोपडाण काढीत. ते मुलबक प्रमाणात कोंड सखलातच मिळत असे. तसेच तेलाचे दरही बाजारापेक्षा कमी असत.
आजूबाजुच्या गावातली माणसं घरातल्या पोरी बाळीनी काम चुकारपणाकेला तर त्याना दटावणी करीत म्हणायची,“आताबगीन बगीन नायतर कोंड सखलातल्या पोऱ्या वांगडा तुजा लगीन लावून देन. सुपभर दागिने मिळती पण डोयवर हांडो घेवन् गिमाडी सदीचा पानी हानूक लागला की म्हायारचा सुख काय हुता ता समजात तुका. ....” चेष्टेचा भाग सोडला तरी गोष्ट खरी होती.कोंडसखलातलं मागणं आलं तर घरातली बायका माणसं नाक मुरडून, “आजून दोन वर्सां तरी आमच्या सकूचा लगीन करूचा नायहा..... आनि दुसरां म्हणशा तर माजो चुलतभाव हुंबैत नोकरी करता, तेनाव आपल्या झिलासाटना माका हटकलान हा….” अशी हुलबाजी करून आलेल्याना वाटेला लावीत. अगदी अडला नडलेला बाप , काळी मेळी पोर पैशाच्या आशेने कोंड सखलात द्यायला राजी व्हायचा. पण कोंड सखलातले पोर वस्ताद..... खिशात कायम चार पैसे बाळग़णारे, बाजारात नाही तर जत्रा, उत्सवांमध्ये चांगले चुंगलेकपडे घालून हातच्या बोटात दोन दोन आंग़ठ्या नी गळ्यात सोन्याची चेन घालून जात. गर्दीत फिरताना काहीतरी निमित्त काढून खिशातून नोटांची चळत काढून झळकावीत नी गोर गरीब घरातून आलेल्या पोरींपुढे श्रीमंतीचं प्रदर्शन करून त्यांच्याशी संधान जुळवीत.
रावाच्या वाडीतले मर्गज,धुरी आणि राणे स्वत:ला शहाण्णव कुळी मराठा. त्याना राव ही उपाधि मिळालेली होती. त्यातही राणे समाजआपले आडनाव राव राणे असे लावीत. काही घराणी मौंजी बंधनाचा संस्कारही करून घेत आणि दोन जानवी घालीत. त्याना जानवीवाले मराठे असंही म्हटलं जायच. तालुक्याच्या राजकारणात रावाच्या वाडीतली मातब्बर मंडळी आब राखून होती. पंचायत समिती आणि जिल्हापरिषदेत एक दोन मेंबर रावाच्या वाडीतले, धुरी,मर्गज,रावराणे यांच्यापैकी कुणीतरी हमखास असत. ६० साली धुऱ्यांच्या घरवडीपैकी बाबाजीरावयाना मंत्रालयात वित्त अधिक्षक म्हणून बढती मिळाली.त्यावेळचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्याशी त्यांचे घनिष्ट संबंध जुळले . परिणाम स्वरूप त्यांचे चुलतबंधू अनंतराव धुरी पंचायत समितीचे सभापती झाले. गावाने त्यांचा भव्य सत्कार केला. “तालुक्याचीसत्ता हाती आली आहे तर तरवड ते कोंडसखलपर्यंत पक्का रस्ता बांबून गावात गाडी आणा” अशी राणे गुरुजीनी आपल्या भाषणात विनंती केली. लोकानी टाळ्यांचा नुसता कडकडाट केला.
तरवडातून कोंड सखलापर्यंत रस्ता आणायचा हे मोठं जिकीरीचं आणि प्रचंड खर्चाचं काम होतं. पणआता तालुक्याची सत्ता हातात होती आणि मंत्रालय पातळीवरही घरचाच मनुष्य होता. बाबाजी रावानी मुखंमंत्री निधीतून मोठी रक्कममंजूर करायचं आश्वासन दिलं. भराभर चक्र फिरली आणि पंधरा दिवसात सर्व्हे करणारी टीमकोंड सखलात आली. सात लोकांच्या टीमने कोंड सखलात तंबू ठोकला. लोकाना मोठं कुतूहल होतं. रिकामटेकडे लोक दिवसभर तंबू जवळ ठिय्या देवून असत. टीम मधल्या लोकाना हौशीने मदत करीत. सभापतीनी त्या लोकांची बडदास्त ठेवणाच्या सक्त सुचनावाडीतल्या लोकाना आणि सरपंचानाही दिलेल्या होत्या. सर्वेचं काम सुरू असताना टीम मधली लोकं मांडावर मोज मापं घेतअसताना गर्तेच्या दिशेने मोठमोठ्याने कुकारे मारलेले ऐकू आले. टीममधली माणसं चितागती होवून बघायला लागली. लोक काठ्या, कोयते घेवून गर्तेच्या दिशेने धावत सुटले.
जोरगतीची सुकती लागलेली होती. गर्तेच्या बाजूला दहा बारा वाव अंतरात कायम रबरबीत चिखल होवून कमरभर खोलरुपणी झालेल्या असायच्या. किनाऱ्याच्या बाजूला कायम लवा , नागरमोथ्याची चाबंच्या चाबं माजलेली असायची . रान डुकरं नागरमोथ्याला भलतीच लंपट. रात्री काळवंपडल्यावर डुकरांचे कळप नागरमोथा खायला चिखलटीत घुसली. (क्रमश: )