सुख एक मृगजळ
आनंद चव्हाण रेल्वेच्या बोगीत बसून हातातल्या भोवऱ्याकडे पहात होता. त्याच्या पाच वर्षाच्या मुलाने कामावरून परतताना भोवरा आणा म्हणून हट्ट केला होता. भोवरा तर त्याने मिळवला होता. आपल्या मुलाला तो भोवरा देणार याचे समाधान त्याला वाटत होते कि नव्हते याचा निवाडा मात्र त्याचे मन करू शकत नव्हते.
भयानक युद्धामध्ये दुष्मन देशाच्या सैनिकांधले दोन सैनिक एका दरीत समोरासमोर आले. दुष्मन एक काय किंवा अनेक काय.. तो दुष्मनच.. चालून गेले एकमेकांवर.. हातातली शस्त्रे काडतूसे संपून निष्प्राण झाली होती. उरल्या संगिनींनी आणि सरावात मिळवलेल्या कौशल्याने दोघे एकमेकांशी भांडू लागले. सरतेशेवटी एक वरचढ ठरला. त्याने समोरच्या सैनिकांच्या छातीत सांगिनीचा भाला खुपसला. तो कोसळला. ज्याने त्याला भाला भोसकला तोही दमून पडला. काही वेळ श्वास गोळा करत त्याने शत्रूकडे पाहिले. त्याची छाती हलत होती. प्राण पूर्ण गेला नव्हता.
ह्याने उठत त्याला निष्प्राण करण्यासाठी परत संगीण उचलली. त्याच्यावर उगरलीच होती तेवढ्यात तो अस्फुटसा काही बोलला.
"साब.. साब.. रुको साब."
तो थांबला.
" खूब लढे साब... ल.. लेकिन अब मै नही बचता.. कुछ बोलना है साब.. सून लो.. " तो अर्जव करत होता.
त्याने पडल्या सैनिकासमोर गुढगे टेकवले.
" साब.. बच्चे है आपको?.. बच्चे? कितने है साब.? " त्याने युद्धभूमीवर अजब प्रश्न विचारला होता.
" लडका है एक... " त्याने उत्तर दिले.
" वाह.. उमर लंबी हो आपके बेटे कि साब.. मुझे भी एक बेटा है साब.. जन्ग के बाद उसको मिलके ये देना चाहता था.. " असे म्हणत त्याने वर्दीच्या पाउच मधून एक भोवरा काढला.
तसे जिंकल्या सैनिकाच्या डोळ्यातून अश्रूची धार लागली.
"आपके बेटे को मेरी तरफ से देना.." असे म्हणत त्याने प्राण सोडला.
आनंदच्या डोळ्यात परत अश्रू जमा झाले होते. कर्तव्याच्या घाईत मुलासाठी घ्यायचा भोवरा त्याला दुसऱ्या एका कर्तव्यक्षम बापाकडून मिळाला होता. मुलाने मागितलेलं खेळण देण्याचं सुख आनंदला डोळ्यातल्या अश्रूमुळे मृगजळासारखं भासत होतं.. सुख खरतर मृगजळच.. भोगण्याचा क्षण खूप छोटा.. पण त्याला मिळवतानाची दुःखे अतिशय दीर्घ.
- शब्दभ्रमर