प्रिय... यापुढं नात्याचं नाव लगेच लिहायची तयारी नाहीये अजून माझी.
मी माझ्या निवडल्या जोडीदारासोबत संसारी पोहोचलेली असेल आणि तू हे पत्र वाचत असशील. जाताना "येते" एवढंच म्हणाले. तुला मी नेहमी सारखीच तुसडी वाटली असेल नं? पण माझ्या तुसडेपणाकडे तुझं लक्ष जातंच कुठं. तुझं आपलं सतत मनू गेली कुठे? मनू जेवली का? मनू बरिये ना? मनुला काही लागत तर नाहीये ना? ह्याच प्रश्नांची उत्तरे शोधण्यात लक्ष असतं.
मला अजून पण आठवतं. मी पहिल्यांदा तुला पाहिलं आणि एक नकारात्मक रेषा मनात उमटली. मला तू जवळ आसपास नकोसा वाटलास. पण तू मात्र उलटाच वागत होतास. मी झिडकारत होते तू स्वीकारत होतास. मी दूर जाऊ पाहत होते तू जवळ येण्यासाठी प्रयत्नशील होतास. सगळ्यांनी समजावले पण माझ्या मनात आधीच्या नात्याबद्दल असलेली अढी आणि नव्या नात्याबद्दल असलेली नकारात्मकता तशीच होती.
माझं तुझ्याकडून काहीच होऊ नये म्हणून मी सतत स्वतःला सांभाळून होते. माझी आजारपणं, माझे शिक्षण, माझा कल. माझ्या आयुष्याचे सर्व निर्णय. यात तुझा काहीही सहभाग नसावा असेच मला सदैव वाटायचे. हा..आता एकत्र राहत होतो म्हणून मी थोडं स्वतःला सैल सोडलं होतं. पण तरीही हातचं राखूनच. तू मात्र कक्षा ओलांडत माझ्या आईच्या अडून माझी काळजी वाहू पाहत होतास. कधी कधी वाटायचं कि तू फार सपोर्टिव्ह आहेस. पण विश्वास टाकावा वाटत नव्हता.
माझं वयं वाढत होतं तसं आपल्यातलं अंतर सुद्धा मी जाणून बुजून वाढवलं. बाहेर शिक्षण घ्यायचा निर्णय घेऊन मी स्वतःला तुझ्यापासून लांब केलं. मनाप्रमाणे गोष्टी घडवून आणत मी माझ्यामते आपल्या काहींशा मला लाजिरवाण्या वाटणाऱ्या नात्याला आयुष्यापासून लांब ठेवण्याचा यत्न सुरूच ठेवला.
माझा होणारा लाईफ पार्टनर निवडल्यावर मी आईला सांगितले पण तिला ते पटले नाही. तिने नकार दिला. त्या रात्री मी तुमचं बोलणं ऐकलं. मला तुझा राग आलेला. कारण डोक्यात होतं कि तिला तू भरवलं आहेस. पण...
तू तिची समजूत काढत होतास. माझी बाजू घेऊन? मी चुकले आणि काही नुकसान झालंच तर तू माझ्या मागे उभा राहशील याचं आश्वासन तू तिला देत होतास? माझ्या जोडीदाराच्या बिजिनेस आयडियाला सपोर्ट करण्यासाठी तू स्वतःची जमीन विकून पैसे देऊ करत होतास? तू आमच्या दोघींच्या मध्ये यायचं नाही. इतकं तिने सुनावलं पण तू मागे हटला नाहीस. का? तुला काय पडलं होतं इतकं? मी तर तुला कोणीही मानत नव्हते ना? मग?
माझ्या आईशी भांडून तिला मारझोड करुन तिचा पगार दारू जुगारासाठी ओढणारा बाप मी पाहिला होता.
माझ्या भवितव्याचीच काय पण जगण्याचीही पर्वा नसणारा बाप मी पाहिला होता.
बाप असून पण नसल्यासारखा आयुष्याचा एकेक दिवस मी पाहिला होता.
तो मेल्यावर त्या नात्याबद्दल माझी संवेदना ही मेली.
पण..पण तू आलास.
मला आणि आईला घरी आणलंस. परत तोच दुवा साधण्याचा प्रयत्न केलास. पण ह्यावेळी मी कमी पडले. तरीही तू माझ्यासाठी भांडलास. परक्याच्या मुलीला आपलं मानून रक्ताच्याही नात्याच्या वर जाणारं नातं तू माझ्याशी जोडलयस. माझ्यासाठी सदैव असणारा माझा बाप माझा जन्मदाता नसला तरी तो आहे म्हणून मी अनाथ नाही हे मला आता कळलंय.
बाबा मला माफ कर. परत येईन तेव्हा तुझ्या हक्काची मुलगी तुझी मनू तुझ्या समोर असेल. तुझ्याशी नजर मिळवण्याचीही हिम्मत होतं नव्हती माझी म्हणून येते एवढंच बोलून सटकले. खरंतर कडकडून मिठी मारून तुझी क्षमा मागायची होती. परत येईन त्यावेळी नक्की.
तुझी
मनू.
- शब्दभ्रमर 🍁🍁