पत्र सुमने 3
प्रिय सोना
आज पाणीपुरी खायला गेले आपल्या नेहेमीच्या माणसा कडे
पूर्वी आपण दर पंधरा दिवसाला जाऊन पाणीपुरी खात असू
आधी रगडा पॅटीस मागवायचे हा माझा शिरस्ता
तू मात्र दही शेव पुरीला पसंती द्यायचा
ते एक प्लेट खाऊन झाले की
आपल्या हातात पाणी पुरी साठी बशी दिली जात असे
तुला पाणीपुरी मध्ये कांदा हवा असे
हे नेहेमीचे असल्याने त्या माणसाला सांगायला लागत नसे
त्याचे पाण्याचे कॉम्बिनेशन इतके परफेक्ट असे की वेगळे काही सांगावे लागत नसे
एवढ्या दोन प्लेट झाल्या की आपले मन
तृप्त होत असे
खरेतर काही दिवसापूर्वी जायचे चालले होते आपले पाणीपुरी खायला ..
पण या ना त्या कारणाने राहून गेले
आणि मग तुझे आजारपण सुरू झाले
आणि मग कुठली पाणी पुरी..
त्या आठवणीत काल गेले होते तिकडे
खुप गर्दी होती लोकांची त्यामुळे
गाडीवाला जाम बिझी होता
लवकर द्या की आम्हाला असे म्हणल्या वर म्हणाला
सहा सहा महिने येत नाही आणि आला की गडबड करता होय
त्याला काय माहित या मागील सहा महिन्यात काय काय रामायण घडले आहे
पाणी पुरी तशी बरी होती
पण आपली पूर्वीची मजा मात्र नाही आली
ती सगळी मजा तुझ्या बरोबर निघून गेली रे...