🧡अनारसे
अनारसे घरी सर्वांच्या आवडीचा प्रकार
हा पदार्थ थोडा वेळखाऊ आणि नाजुक असला तरी
चवदार असतोच
🧡दिवाळीत आणि अधिक महिन्यात अनारशाचा मान असतो
अनारसे आवडणाऱ्या प्रत्येकीला वाटते की आपल्याला अनारसा जमायला हवा
तेलात टाकल्यावर तो हसायला नको...
आणि सरावाने हळूहळू अनारसा जमतोच
🧡लहानपणापासून आधी आजी मग आई आणि मग सासूबाई यांना अनारसे करताना बघितले होते
त्या वेळेस मदतीच्या निमित्ताने लुडबुड पण केली होती
हळुहळु स्वतः करण्याइतपत प्रगती होत गेली
अगदी आई आजी किंवा सासूबाई सारखे अलवार नसले
तरी अनारसे बरे जमू लागले
🧡साहित्य
एक वाटी बासमती तांदूळ
पाऊण वाटी किसलेला गूळ
एक मोठा चमचा तूप
आवश्यकतेनुसार दूध
खसखस
तळणीसाठी तेल किंवा तूप
🧡कृती
तांदूळ स्वच्छ धुवून
तीन दिवस भिजत ठेवला
प्रत्येक दिवशी तांदुळातले पाणी बदलले
यामुळे तांदुळाला कुबट वास येत नाहीं
🧡तीन दिवसानंतर तांदूळातून पाणी काढून टाकले
तांदुळ परत एकदा धुवून घेतले
आणि सुती कपड्यावर सुकवून घेतले
तीन चार तासानंतर
थोडेसे ओलसर असतानाच
ते मिक्सरमध्ये वाटून घेतले
हे ओलसर असल्याने वाटायला थोडा वेळ लागतो
हे पीठ चाळणीतून दोन तीन वेळा चाळायला लागते
रवा बाजुला काढून ठेवला
आणि फक्त बारीक पीठ घेतले
🧡या तयार कोरड्या पीठात गुळ घातला
गूळ मिसळण्या साठी लागेल तसा थोडा दुधाचा वापर केला
पीठ मऊसूत गोळा होईपर्यंत मळून घेतले
त्यासाठी थोडे साजूक तूप वापरले
🧡पीठ मळून झाल्यानंतर त्याचे दोन गोळे तयार केले हे गोळे आंबण्यासाठी तीन दिवस घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवले
हे तीन दिवस या पिठाला हवा लागण्यासाठी थोडा वेळासाठी रोज डबा उघडून ठेवला
चौथ्या दिवशी पीठ छान आंबले
🧡पीठ बाहेर काढून थोडा दुधाचा वापर करून त्याचे लहान लहान गोळे करुन घेतले
पोळपाटावर खसखस पसरुन त्यावर या गोळ्याचे मध्यम जाडीचे अनारसे थापले
मंद आचेवर तेलात सोनेरी रंगावर तळले
तळताना त्यावर हलके हलके तेल उडवले
यामुळे अनारसे खुसखुशीत होतात
🧡तळलेले अनारसे थोडा वेळ टिशू पेपर वर काढले
यामुळे अतिरिक्त तेल निघून जाते
नंतर गार झाल्यावर डब्यात भरले