माजी तक्रात म्हनशा तर माज्ये सात भांगे जातत रस्त्यात..... म्हंज्ये ऱ्हवले फकस्त चार....तेतू पिकनार काय नी आमी खाणार काय? ह्या जमनीर आमच्या कुटंबाचा प्वॉट अवलंबून हा. ए्येक दोन भांगे आसते तर जावने मराने म्हटला आसता. सरकारसगळाच बळकाऊक बगता हा तसा़ कसां जमात? म्हनू माका रस्त्यासाटना जमीन द्येवची नाय........
वकिलानी हरीची बाजू मांडताना आपला अशिल अत्यंत गरीब व अल्प भू धारक आहे, रस्त्यासाठी थोडी झीज सोसायला तयार आहे. पण निम्मेपेक्षा जास्त क्षेत्र ऍक्विझिशन खाली यत आहे. ही जमीन रस्त्याखाली गेली तर त्याच्यासह कुटूंबीयांवर उपासमारीची वेळ येणारआहे. तेव्हा एकतर ऍक्विझिशन एवढी पर्यायी शेतजमीन सरकारने द्यावी कि़वा फेर सर्व्हे करून माझ्या अशिलाचे क्षेत्रवगळून लगतच्या अन्य क्षेत्रातून रस्ता न्यावा. मी आणखीही एक बाब न्यायालयाच्या निदर्शनाला आणू ईच्छितो की सदरील रस्त्याच्यामूळ प्रस्तावात सरकारने अलिकडेच फेरबदल दुरूस्ती करून रस्त्याची लांबी वाढवून फेरबदल केलेला आहे. त्यामूळे माझ्या अशिलाची कैफियत न्यायसंगत आहे. हरीची चर्या बघून आधीच जज्ज साहेबाना त्याचा कळवळा आलेला होता. वकिलानी केलेलं ऑर्ग्यमेंटऐकल्यावर साहेबानी सरकारचे ऍक्विझिशन बेकायदा ठरविले. निकाल झिलूच्या बाजूने लागला. आता तरवरस्त्याचा प्रस्ताव पुरताच कचराकुंडीत गेला.
त्या दरम्यानेच कुंभवडे फाट्यावरून हरचलीत मांडापर्यंतरस्ता होवून वसतीची राजापूर हरचली गाडी सुरू झालेले होती. दोन वर्षानी दादा खोतांचा मुलगा प्रभाकर राजापूर पंचायत समितीचा अध्यक्ष झाला. त्याने सूत्र हाती घेतल्या घेतल्या हरचली मांडापासून बाणेवाडी मार्गे चिवारी चवाठा असा दोन गावांसाठी मिळून जोड रस्ता मंजूर करून घेतला . आता बऱ्याच सुधारणा झालेल्या होत्या. कामाचा मक्ता आतून प्रभाकर देसायानीच घेतलेलाहोता, मंजूर झालेल्या भागात फार मोठे चढ उतार नव्हते.त्यामुळे दीड महिन्यात रस्त्याचे काम पुरे झाले आणि राजापूर हून हरचलीला येणारी गाडी चिवारी मांडापर्यंत यायला लागली. मे अखेरीला राजापूरहून दुपारची चिवारी गाडीही सुरू झाली. गुरव वाडी, मुळमवाडी हा भाग चिवारीतला भाग मात्र दुर्लक्षितच राहिलेला होता. सिली पाट आणि खुटवळाच्या धंद्याला उतरती कळा लागली होती, कोळशाचा धंदा तरबंदच पडलेला होता. पावसाळी चिव्याच्या काठ्या भरायचा धंदा अजूनहीसुरू होता. तसेच सार्वत्रिक जोरदार कलम लागवड झाल्यामुळे आंबा व्यापार तेजीत आलेला होता.
गुरवांच्या काट्यात कलम लावण्यासाठी त्यांच्या भावकीन सोळा एकर प्लॉट मधला खुटवळ काढला. ईद्रूस रडी करून पाडून मागायला लागला म्हणून गुरव बळीकडे गेले. भरवण गुरवानी करून द्यायचं या अटीवर सौदा ठरला. पंधरा दिवसानी वर्दी आली. बळी स्वत: ट्रकासोबत आलेला होता. निम्मे भरताड झाल्यावर ड्रायव्हर नी बळी भाकरी खायला बसले. बळीने इंग्लिश दारवेची बाटली खोलली. पाव बाटलली ड्रायव्हराला देऊन उरलेली स्वत:प्याली. आता बऴी तालात आलेला होता. जेवताना आपल्या मोठेपणाची त्याने भाकडं सुरू केलिन. आपली मळ्यातली जमीन वाचवण्यासाठी मंत्रालयातून हुकूम कसा काढला? भाऊला डबऱ्यात बसवण्यासाठी हरीला पुढे करून कोर्टाचा हुकूम घेऊन काम बंद कसं पाडलं हे रंगवून सांगितलं. “तेका धडो शिकवसाटना आजपावत दोन हज्जार रुपाये खरचले”.”ड्रायव्हर नवीन होता. बळीच्या बाता ऐकून तो अजाब करीत म्हणाला,” बळी शेट तुमचं म्हंजे लय भारी काम हाय की राव….” बऴीने पिशवीतून हातभर लांब सुरा काढला. “ ही वस्तू कायम आपल्या जवळ आस्ता. दुनयाभर माज्ये वादी दुस्मन हत. कोन कदी सामनी येत तां कळनार नाय.”
ट ट्रक लोड करून झाला नी गडी वाटेला लागले. ट्रक मुळमवाडीत चिंचेकडे नेऊन वऴवून आणायचा होता. बऴी अजून सुरा हातात वागवीत बसला होता. इंग्लिश दारू ड्रायव्हरच्या अंगावर आलेली होती. ट्रक भाऊंच्या आगराजवळून पुढे गेला. मुऴमवाडीच्या अलिकडे मोठं वळण घेऊन एकदम घसारी सुरू व्हायची. ड्रायव्हरला काय सुधरलं नाही. वळणात मोडणावर ट्रक सरळ पुढेच गेला . तिथे रस्याच्या कडेबाहेर जात ट्रक उलटला. ट्रक कडेला गेल्यावर खाली कोसळणार हे लक्षात येवून क्लीनरने बाहेर उडी मरलीन. ट्क दोन घोलांट्या मारून पंधरा फूट खोल जाऊन मोठ्या आंब्याच्या झाडावर धडकला . झाड जुनाट नी खूप मोठं होतं म्हणून ट्रक तिथेच थोपला. छातीवर स्टेअरिंग आदळून ड्रायव्हर बेशुध्द पडला. टक्लीनरने कि़चाळी मारीत ट्रक बाहेर उडी मारल्यावर बऴी दाराकडे झेपावला. ट्रक पलटीझाल्यावर तो बाहेर फेकला गेला नी त्याच्या हातातला सुरा खच्चकन् मांडीत घुसून खोल रुतून बसला.
बळी आणि क्लीनर यांच्या किंकाऴ्या ऐकल्यावर मुळमवाडीतले झिलगे धावले. ट्रक आगराजवऴून पुढे गेला तेंव्हा भाऊ झोपाळ्यावर बसलेले होते काही वेळातच कि़काळ्या ऐकल्यावर काहीतरी गडबड आहे हे ओळखून भाऊ बॅटरी घेऊनबाहेर पडले. मुऴम वाडकरा़चा गलका नी कुकारे ऐकून त्या रोखने पुढे गेल्यावर बळीच्या किंकाळ्या ऐकू आल्या. बॅटरीच्या झोतात आडवा पडलेला बऴी दिसला. डाव्यामांडीत सुरा घुसल्यामुळे धोतर रक्ताने भरलेले होते. यशाचस्थितीत त्याला उचलून भाऊंच्या घरी ओसरीवर ठेवले. त्यानी बायकोला हाक मारून पाणी आणायला सा़ंगितले. दोघेजण भाऊंजवळ थांबले नी बाकीचे बत्ती पेटवून घेवून ट्रक उलटला होता तिकडे गेले. दोघानी बळीचे हातपाय धरल्यावर भाऊनी त्याच्या मांडी घुसलेला सुरा उपसून काढला. ओल्या फडक्याच्या पिळ्याने रकत पुसून जुने गाईचे तूप जखमेवरओतून त्यावर कपसाचा बोळा दाबीत तूप ओतूनबोटाने जखमेत भरला . कोणीतरी गुरव वाडीतल्या वैद्याला घेऊन आला. बळीचेधोतर सोडून त्याला धुवून पुसून भाऊंकडचा पंचा गुठाळून घोंगडी अंथरून त्यावर ठेवले. दारवेचाअंमल असल्यामूळे बऴीला झोपेची झापड आली नी त्याची कण्ह कुथ बंद झाली.
क्लीनरला फारसं लागलेलं नव्हतं. ड्रायव्हरमात्र स्टेअरींग वर पालथा पडून थ़ंड झाला होता. त्याचप्रेत मोकळ्या जागेवर आणून ठेऊन लैक रात्रभर तिथे राखण करीत बसले. सकाळी पोलिसपाटिल राजापूर पोलिसाना वर्दी द्यायला रवाना झाला. बळीलाडोळीत घालून घरी नेलेनी. मध्यान उलटल्यावर पोलिस आले. अपघात कसाझाला याची माहिती क्लिनर आणि बळी हे दोघेच सांगू शकत होते. अपघात झालेलं ठिकाण बघितल्यावर सगळेच आश्चर्य करीत होते. (क्रमश:)