किंकाळी.......
प्रकरण १
पाणिनी पटवर्धनच्या ऑफिसात,चाळीशीच्या घरातला, एक हसऱ्या, आनंदी चेहेऱ्याचा जाडगेला माणूस पाणिनीला भेटायला आला.
सौंम्याने त्याची पाणिनीशी ओळख करून दिली.
“ हे मिस्टर धुरी म्हणून आहेत.”
पाणिनीने त्याला नमस्कार केला आणि बसायला सांगितलं.
“ तुमच्या बद्दल मी बरंच ऐकलंय, वाचलंय. पण तुमची भेट घ्यायला लागेल असं वाटलं नव्हतं.” तो म्हणाला.
“ म्हणजे मना विरुद्ध किंवा नाईलाजाने भेटावं लागतंय ?” पाणिनीने विचारलं
“ तसंच नाही अगदी पण माझ्या बायकोचा आग्रह आहे की मी तुम्हाला भेटावं आणि तुम्ही माझी उलट तपासणी घ्यावी. ” धुरी म्हणाला.
“ कोर्टात प्रकरण आहे? घटस्फोटाचं वगैरे?”
“ छे: हो ! बायको आणि मी एकत्रच राहतोय प्रेमाने संसार चाललाय.”
“ मग उलट तपासणीचा विषय कुठे येतो?” पाणिनीने विचारलं
“ कोर्टात तुम्ही घेता तशी नाही हो. तिचं म्हणणं आहे की मी तिला नीट सांगू शकलो नाही कालच्या घटने बद्दल तर तुम्ही मला प्रश्न विचारून बोलतं करावं. आणि योग्य सल्ला द्यावा.”
“ पण मी जे प्रश्न विचारणार तेच प्रश्न तुमची बायको नाही का विचारू शकणार?” पाणिनीने विचारलं
“ तिचं म्हणणं आहे की मी तिला सांगतलेली हकीगत हास्यास्पद आहे.मी काहीतरी जुळवून सांगतोय. मी एक जातिवंत विक्रेता आहे आणि काळ्याला पांढरं कसं म्हणायला लावायचं हे मी उत्तम प्रकारे करू शकतो त्यामुळे मी तिला जी घटना सांगितली त्यावर तिचा विश्वासच बसत नाहीये.तिचं म्हणणं आहे की तुम्ही मला प्रश्न विचारून अगदी बारकाव्यानिशी माझ्याकडून तपशील माहित करून घेऊ शकाल.आणि मी कुठे अडचणीत आलो नाहीयेना किंवा येणार नाहीना याची अटकळ बंधू शकाल.” धुरी म्हणाला.
“ विचित्रच आहे हे सगळ.” पाणिनी म्हणाला. “ माझं अशील कोण असणार आहे? तुम्ही की बायको?” पाणिनीने विचारलं
“ काही फरक पडेल त्याने?”
“ तुम्ही तुमची खरी हकीगत सांगितल्यावरच मी याचं उत्तर देऊ शकेन.” पाणिनी म्हणाला.
“ सध्यातरी बायको अशील आहे असे समजा. ”
“ ती का नाही आली भेटायला?” पाणिनीने विचारलं
यावर धुरी काही बोलण्याधुरीच सौंम्या म्हणाली, “ तिचा फोन आला होता सर, मिस्टर धुरी भेटायला येणार आहेत आणि तुम्ही त्यांच्याकडून माहिती घेऊन योग्यतो सल्ला आणि संरक्षण द्या असं ती म्हणाली. मी तुम्हाला हे सर्व सांगे पर्यन्त मिस्टर धुरी इथे येऊन पोचले होते.”
“ ठीक आहे मिस्टर धुरी, तुमचं नाव काय ?”
“ निनाद”
“ तर मग निनाद धुरी तुमची हकीगत सांगा , अगदी सविस्तर.” पाणिनी म्हणाला.
“ माझी स्वत:ची औषध कंपनी आहे. धुरी रुग्णाधार कंपनी नावाची.आमची काल रात्री विक्रेत्यांची एक मिटिंग ठेवली होती.आढावा बैठक. आम्ही अशा मिटिंग घेतो.अधून मधून.कंपनीच्या विक्रीत घट झाली किंवा नफा अपेक्षे नुसार होतं नसेल तर अशा गोष्टींवर चर्चा करण्यासाठी.” –धुरी ने सांगायला सुरुवात केली.
“ आणि मिटिंग मधे काहीतरी घडलं?” पाणिनीने विचारलं
“ नाही. मिटिंग चालू असतांना नाही. नंतर.”
“ बरं. पुढे?”
“ या मिटिंग साठी आम्ही शहराच्या बाहेर, रस्त्यालगत एक मोठी जागा घेऊन तिथे अद्ययावत व्यवस्था केली होती. राजहंस एकर्स नावाची प्रॉपर्टी आहे.काल सोमवार होता आणि त्यामुळे रस्त्यावरही फार वर्दळ नव्हती.तर मिटिंग संपवून माझ्या कार ने घरी जात असतांना मला एक तरुणी रस्त्यात दिसली. ”
“ गाडी चालवत होती ती?” पाणिनीने विचारलं
“ नाही.चालत होती. हातात पेट्रोल चा कॅन होता तिच्या.आता याचा अर्थ काय होतो,तुम्हाला सांगायला नकोच, बिचारीच्या गाडीतलं पेट्रोल संपलं म्हणून ती जवळच्या पंपावरून हातातल्या कॅन मधे पेट्रोल भरून आपल्या गाडीकडे परत जात असावी.माझी द्विधा मनस्थिती झाली. हल्ली तरुणीला पुढे करून म्हणजे आमिष म्हणून तिचा वापर करून कार वर दरोडा घालणाऱ्या दरोडेखोरांबद्दल मी ऐकलं होतं. म्हणूनच मी गोंधळलो पण ही मुलगी मला चांगल्या घरातली वाटली आणि नियमित कार चालवणारी असावी अशी वाटली म्हणून मी लगेच माझी गाडी थांबवली.” धुरी म्हणाला.
“ वय काय होतं मुलीचं, अंदाजे?” पाणिनीने विचारलं
“ २३-२४ असावं.मी तिला काय झालं ते विचारलं माझ्या अंदाजा प्रमाणेच तिच्या गाडीतलं पेट्रोल संपलं म्हणून ती पंपावर जाऊन कॅन मधे पेट्रोल घेऊन आपल्या गाडीकडे निघाली होती. मी तिला गाडीत घेतलं.तुझ्या गाडी पर्यंत सोडतो असं सांगितलं. तुझी गाडी कुठे आहे विचारलं तेव्हा ती म्हणाली की अर्धा किलोमीटर असेल इथून.”
“ पुढे?”
“ आम्ही तसेच हळूहळू तिच्या गाडीकडे निघालो, पण एक किमी अंतर जाऊनही तिची गाडी जिथे असायला हवी तिथे नव्हती!”
“ नव्हती?” पाणिनी ओरडला.
“ तेच सांगतोय. नव्हती.” धुरी म्हणाला. “ मग मी आणखी जरा पुढे गेलो आणि उलट फिरून पेट्रोल पंपापर्यंत आलो, कुठेही कारचा मागमूस नव्हता.मी तिला या बाबत विचारलं.तिलाही धक्काच होता.ती म्हणाली की कारच्या किल्ल्या बाहेर काढून तिने खालच्या रबर मॅट खाली ठेवल्या होत्या. तरीही एकही थेंब पेट्रोल नसलेली गाडी चोरली कशी जाऊ शकते याचं तिला आश्चर्यच वाटत होतं.एक फुट सुद्धा गाडी पुढे जाऊ शकली नसती.”
“ कोणीतरी त्या गाडीत पेट्रोल टाकून गाडी घेऊन गेलं असाव किंवा दुसऱ्या गाडीला बांधून म्हणजे टोव् करून ही गाडी नेली असावी.” पाणिनी म्हणाला. “ पोलिसांना कळवलं असालचना तुम्ही?”
“ आता हाच तो क्षण आहे की ज्या बद्दल मी तुमच्याशी बोलावं असं माझ्या बायकोला वाटतय मिस्टर पटवर्धन.” धुरी म्हणाला.पाणिनी ने फक्त भुवया उंचावल्या.
“ नाही कळवलं.” धुरी म्हणाला.
“ का?” पाणिनीने विचारलं
“ तिला कळवायचं नव्हत.” –धुरी.
“ कारण काय?” पाणिनीने विचारलं
“याबंबतीत ती मला काहीच सांगायला तयार झाली नाही. पण मिस्टर पटवर्धन मला त्या मुलीची इतकी दया आली होती काय परिस्थितीत ती सापडली होती !तिच्याकडे काही पैसेच नव्हते.”
“पर्सही नव्हती तिच्याकडे ?” पाणिनीने विचारलं
“पर्स होती पण त्यात फार पैसे नव्हते. तिने तिची पर्स कार मध्येच ठेवली होती पेट्रोल आणण्यापूर्ती एक नोट तिने आपल्या बरोबर घेतली होती तिचं म्हणणं होतं एका हातात गॅस चा कॅन एका हातात पर्स घेऊन रात्रीच्या अशा वेळेला पेट्रोल पंपापर्यंत जाणं धोकादायक होतं.”-धुरी
“कार लावून ती नक्की मागेच चालत गेली ना? पुढे नाही ना?” पाणिनीने विचारलं
“नाही पटवर्धन. मागेच चालत गेली. कारण ती म्हणाली पेट्रोल पंपाच्या पुढे साधारण अर्धा पाऊण किलोमीटर आल्यानंतर कार मधलं पेट्रोल संपल्याचं तिच्या लक्षात आलं. आणि वाटेत तिने पेट्रोल पंप बघितला होता. ती म्हणाली की गाडीत पेट्रोल कमी आहे हे तिला माहिती होतं परंतु अजून आठ-दहा किलो मीटर ते पुरेल आणि पुढे गावात गेल्यावर आपण पेट्रोल भरू असाच तिचा विचार होता. पण तिच्या अंदाजाच्या आधीच पेट्रोल संपल्यामुळे कार गचके देऊन थांबली. कशीबशी तिने आपली कार रस्त्याच्या कडेला तरी लावली.” धुरी ने उत्तर दिलं
“रस्त्याच्या अगदी कडेला लावता आली?” पाणिनीने विचारलं
“हो तसंच म्हणाली ती.”
“आणि मग ती हातात कॅन घेऊन पुन्हा पेट्रोल पंपाकडे मागे जायला निघाली?” पाणिनीने विचारलं
“होय सर”
“मग तिने एखादी लिफ्ट नाही का मिळवली? स्कूटर, बाईक, किंवा कार?” पाणिनीने विचारलं
“मी तिला ते विचारलं पण ती म्हणली, जेमतेम अर्धा किलोमीटर वरच पेट्रोल पंप होता आणि एकदम अनोळखी माणसाबरोबर जाणं रात्रीच्या वेळेला तिला बरोबर वाटलं नाही.”
“पण मग तू सुद्धा तिच्या दृष्टीने अनोळखी होतास, तरी ती तुझ्या गाडीत कशी बसली?” पाणिनीने विचारलं
“त्याचा खुलासा तिने केला, मी तिला विचारलं तेव्हा. ती म्हणाली की पेट्रोलचा कॅन जवळ जवळ पाच लिटरचा होता गाडीतून पंपाकडे जाताना तो रिकामाच होता त्यामुळे तिला फारसे जणवलं नाही पण येताना पेट्रोल भरल्यामुळे तो कॅन जड झाला. त्यातून मला कारमध्ये पाहिल्यावर आणि मी तिची चौकशी ज्या पद्धतीने केली त्यावरून तिला माझ्यावर विश्वास वाटला आणि ती माझ्या कार मध्ये बसली.” धुरीने खुलासा केला
“त्यानंतर काय झालं नेमकं तिथे?” पाणिनीने विचारलं
“मला एक क्षणभर काय करायचं ते कळलं नाही. एक पूर्ण अनोळखी मुलगी माझ्याबरोबर होती. तिची गाडी चोरली गेली होती त्यात असलेल्या पर्स सहित. पर्समध्ये ड्रायव्हिंग लायसन्स आणि इतरही बरंच काही होतं.”
“या मुलीचं नाव तरी तुला समजलं का?” पाणिनीने विचारलं
“हो मी विचारलं ना तिला. आणि तिनेही ते सांगितलं. आमची चांगलीच मैत्री झाली होती या सगळ्या प्रसंगात
“काय नाव होतं तिचं?” पाणिनीने विचारलं
“ओवी वागळे” धुरी म्हणाला.
“ती कोण होती? म्हणजे लग्न झालेलं होतं का एकटीच होती? आणि कुठे नोकरी वगैरे करणारी होती? की काय?” पाणिनीने विचारलं
“मला समजलय त्यानुसार लग्न होऊन तिचा घटस्फोट झाला होता. तिची वैयक्तिक माहिती तिने मला फारशी दिली नाही. आणि तिच्यावरचा प्रसंग बघितला तर मीही त्याबद्दल फारसा आग्रह धरला नाही. तुमच्याही लक्षात येईल पटवर्धन मी फक्त दहा ते पंधरा मिनिटं तिच्याबरोबर होतो. मी तिला हे नक्कीच सांगितलं की तिने ते पोलीसांना कळवलं पाहिजे. गाडीचं वर्णन, गाडीची पूर्ण माहिती तिने पोलिसांना दिली पाहिजे. ती एवढंच म्हणली की नाही तिला तसं काही करायचं नाहीये. मग मी तिला विचारलं की ती काय करणारे नेमकं पुढे? त्यावर ती म्हणाली की आत्ता तरी तिला काही त्याबद्दल सुचत नाहीये. मी तिला विचारलं तिचं कोणी मित्र मैत्रिणी आहेत का या शहरात?तर ती म्हणली नाही, कोणीही नाही. यावर मी तिला म्हणालो की अशा या रात्री तिने शहरात एकटं भटकणं बरोबर नाही. पण ती म्हणली की माझ्याकडे काहीच पैसे नाहीयेत. यावर मी तिला म्हणालो की मी तिला असं एकटं वाऱ्यावर सोडू शकत नाही.” धुरी म्हणाला.
पाणिनी तुटकपणे फक्त ‘हूं’ एवढंच म्हणाला.
“पटवर्धन तुमच्या या हुंकारात माझ्याबद्दलचा संशय दिसतो आहे , आणि मी मान्य करतो की तो योग्यही आहे. मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे मला हा संशय प्रथम आला की या तरुणीला पुढे करून म्हणजे अमिष म्हणून दाखवून एखादं कपट खेळलं जात आहे की काय आणि मला अडकवलं जात आहे की काय.! माझी ही स्वतःची कंपनी असल्यामुळे आणि त्या निमित्ताने मी खूप फिरत असल्यामुळे मला माझ्या गाडीत नेहमी मोठी रक्कम ठेवायची सवय आहे .””
“मोठी रक्कम म्हणजे काय?” पाणिनीने विचारलं
“साधारण लाखभर रुपये तरी मी माझ्याजवळ बाळगतो. माझ्या पाकिटात १५-२० हजार रुपये आणि बाकी गाडीत दडवून ठेवलेले असतात.”
“हायवे वरच्या एका हॉटेलमध्ये मी तिची राहायची सोय करण्यासाठी तिला घेऊन गेलो. हॉटेलच्या बाहेरच त्यांनी पार्टी लावली होती की जागा उपलब्ध आहे. पण प्रत्यक्षात त्यांनी मला जागा दिली नाही.”
“कारण काय?” पाणिनीने विचारलं
“संशय. रात्रीच्या अशा वेळेला एका मुलीला घेऊन तिच्या पेक्षा वयस्कर माणूस येतो आणि तिच्या राहण्याची व्यवस्था करायला सांगतो हे हॉटेलच्या दृष्टीने नक्कीच संशयास्पद होतं. आणि त्यात त्यांची काही चूक नव्हती.”
“बर मग काय केलंस तू?”
“माझी अडचण तिने ओळखली होती; म्हणून तिने सुचवलं की आपण दोघांनी नवरा-बायको आहेत असं भासवून हॉटेलमध्ये बुकिंग करू. त्या बबतीत ती एकदम प्रॅक्टिकल वाटली मला. म्हणजे तिच्या दृष्टीने विचार केला तर तसा विचार करण्यात तिची चूक नव्हती. तिला याची खूप जाणीव होत होती की तिच्यामुळे मला खूप उशीर होत आहे आणि त्रास सहन करावा लागत आहे.”
“हे सर्व किती वाजता घडलं होतं?” पाणिनीने विचारलं
“आमची मीटिंग रात्री अकरा नंतर संपली, आणि हा सगळा प्रकार घडला तेव्हा मध्यरात्री झाली असावी.”
ठीक तर मग नवरा बायको म्हणून हॉटेलमध्ये बुकिंग करावं असं तिने सुचवलं. तू काय केलंस? पाणिनीने विचारलं
“आम्ही त्या हॉटेलच्या पुढे असलेल्या एका हॉटेलमध्ये गेलो. ब्युटी रेस्ट असं त्याचं नाव होतं. आणि मी तिथे जाऊन रिसेप्शनला सांगितलं की आम्हाला राहण्यासाठी जागा हवी आहे. त्या मॅनेजरने आमच्या दोघांकडे नीट निरखून पाहिलं. आणि रक्कम सांगितली. मग आम्ही आमचं रजिस्ट्रेशन केलं.”
“कशा पद्धतीने रजिस्टर केलं तुम्ही? तुमच्या स्वतःच्या नावाने?” पाणिनीने विचारलं
“नाही, नाही पटवर्धन ! तिचं आडनाव वागळे होतं त्यामुळे आम्ही दोघांनी मिस्टर आणि मिसेस निनाद वागळे असं बुकिंग केलं ती कुठल्या शहरातून आली होती मला माहित नव्हतं. त्यामुळे मी त्या वेळेला माझ्या मनात पटकन ज्या शहराचं नाव आलं ते नाव लिहून टाकलं. त्या रजिस्टर मध्ये पुढचा कॉलम म्हणजे माझ्या गाडीचा नंबर, गाडी कुठल्या प्रकारची आहे, आमचे फोन नंबर, असे होते.ते लिहिताना मी गाडीच्या नंबरातले पहिले तीन आकडे लिहून टाकले आणि दोन खोटे फोन नंबर लिहून टाकले. हे सगळं चालू असताना माझ्या डोक्यात सतत एक विचार चालू होता तो म्हणजे मी हे जे काही करतोय त्या मुलीला मदत करण्यासाठी हे बरोबर आहे ना.” धुरी म्हणाला.
“मी समजू शकतो तुमची त्या वेळची मनस्थिती.” पाणिनी म्हणाला.
“ मी पैसे भरले.त्या माणसाने मला आमची रूम दाखवली.मी माझी गाडी पार्क करून आलो.तिला गुड नाईट केलं.तिला पुन्हा विचारलं की पोलिसांना कळवायचं का तर ती म्हणाली नको.मी तिला खर्चाला काही रक्कम दिली आणि तिचा निरोप घेऊन घरी गेलो.”
“ कधी पोचलास घरी?” पाणिनीने विचारलं
“ साधारण रात्रीचा १ वाजला असेल.मी घड्याळ बघितलं नाही तेव्हा.”
“ तुझी बायको?”
“ ती झोपली होती.”
“ तू आल्यावर उठली नाही ती?”
“ उठली ना! मिटिंग कशी झाली वगैरे प्रश्नही विचारले.”
“ वागळे बद्दल बोललास तिला?”
“ रात्री नाही बोललो.दुसऱ्यादिवशी सकाळी सांगितलं.”
“ त्यावर काय म्हणाली ती?”
“ ती म्हणाली की हॉटेलात ठेवण्याऐवजी मी तिला घरीच घेऊन यायला हवं होतं.तिने आग्रह धरला की मी त्या हॉटेलमध्ये जाऊन पुन्हा त्या मुलीला भेटावं आणि तिला काय हवं नको ते विचारावं.”
“मग तू गेलास पुन्हा त्या हॉटेलला?” पाणिनीने विचारलं
“हो मिस्टर पटवर्धन. मी आणि माझी बायको दोघेही गेलो. पाच नंबरची खोली आम्हाला दिली होती मॅनेजरने. आम्ही त्या खोलीत गेलो. दाराला किल्ली लावलेली होती. आम्ही आत गेलो. आत कुणाचीही चाहूल नव्हती. अंथरुणावर कोणीतरी झोपल्याच दिसत होतं. म्हणजे बिछाना वापरल्याचं दिसत होतं पण कोणीही नव्हतं.”
( प्रकरण १ समाप्त.)