प्रकरण ४
“या दुसऱ्या मुलीची काय भानगड आहे? ” बाहेर आल्यावर सौम्याने पाणिनीला विचारलं.
“ डहाणूकर नवरा बायको सोडून तिच्याबद्दल कुणालाच माहीत नाही. आणि आता आपल्या दोघांना माहिती आहे. तू जी टिप्पणी घेतलीस आमच्या संवादाची त्याच्यातून हे सिद्ध होईलच की ही दुसऱ्या बाईची भानगड त्यांनी पोलिसांना सांगायला पाहिजे असं मी त्याला सांगितलं आहे म्हणून.” पाणिनी म्हणाला.
“ प्रत्येक गोष्ट आम्ही सविस्तर लिहून घेतल्ये मी. आणि त्याच्यात तुम्ही दिलेला सल्ला तर अधिकच व्यवस्थित लिहून घेतला आहे.” सौम्या म्हणाली. पाणिनी समाधानाने हसला.
“ चल आता आपण त्या घरघड्याला भेटू.” थोड्याच वेळात पुरीच्या दारावरची बेल सौम्याने वाजवली काही क्षणात दार उघडलं गेलं. एक माणूस दारात उभा होता.
पाणिनी काही बोलायच्या आधीच त्यानेच पाणिनीला विचारलं,
“नमस्कार कसे आहेत डॉक्टर बंब ?”
“मला माहित नाही.” पाणिनी म्हणाला.
त्या माणसाच्या चेहऱ्यावर एकदम निराशा पसरली.
“हां ! काल काय घडलं त्याची चौकशी तुम्ही करताय का?” तो उद्गारला. “डहाणूकर यांच्या घरी तुम्हाला जाताना मी पाहिलं मगाशी.”
“बरोबर आहे तुझं, पण डॉक्टर बंब आणि माझी भेट झालेली नाही. आणि त्यांच्या सध्याच्या स्थितीविषयी पण मला माहित नाही. आम्हाला कळलेल्या बातमीनुसार ते अजूनही बेशुद्धच आहेत.” पाणिनी म्हणाला.
“या आत.काय हवंय तुम्हाला? ”
“जरा चौकशी करायची होती.”
त्याला आत येण्यासाठी जागा करून द्यायला पुरी बाजूला सरकला. ते आत आल्यावर दार आपोआपच बंद झालं.
“ माफ करा तुम्हाला स्वयंपाक घरातूनच प्रवेश करायला लागणार आहे. म्हणजे आमच्या घराची रचनाच तशी आहे. म्हणजे डॉक्टरांनी हे बांधलं तेच मुळे अशा पद्धतीने.”
“माझं आडनाव पटवर्धन आहे ” पाणिनी म्हणाला. बोलता बोलता ते स्वयंपाक घरातून हॉलमध्ये आले. हॉल आणि बेडरूम अशी एकत्रच खोली होती.
पटवर्धन असे आडनाव सांगितल्यावर त्या घरगड्याच्या मनावर कुठलाच परिणाम झाला नाही. “मला तुम्ही दीनानाथ किंवा दीना म्हणाला तरी चालेल.. बरेच जण दीना म्हणतात. बसा मिसेस पटवर्धन दोघेही बसा.”
पाणिनीने आपली मान हलवली. “ही माझी सेक्रेटरी आहे.”
“ ओ! माफ करा. माझा गैरसमज झाला. बोला ना काय हवंय तुम्हाला?”
“काय घडलं नेमकं ” पाणिनीने विचारलं.
दीना पुरीने थकल्या सारखा उसासा टाकला.
“ खूप जणांना आणि खूप वेळा सांगून झालंय पण ठीक आहे तुम्ही पहिल्यांदाच आलाय तुम्हाला सांगतो.”
“मी बाथरूम मध्ये आंघोळ करत होतो आणि.....”
“संध्याकाळ पासून तुम्ही इथेच होतात का?” त्याला मध्येच तोडत पाणिनीने प्रश्न केला.
“संध्याकाळ पासून? नाही. मी डॉक्टरांच्या बरोबरच होतो. ते खूप उशिरापर्यंत काम करतात बरेच वेळा .”
“तुला कामाचे असे ठराविक तास नसतात का ” पाणिनीने विचारलं.
“ जोपर्यंत डॉक्टर काम करतात तोपर्यंत मलाही काम करावे लागत. त्यांचं काम झालं की तेच मला सांगतात की घरी जा. कधी गरज लागली तर ते मागच्या दारातून पुन्हा मला बोलावून घेतात .”
“रात्री उशिरा डॉक्टरांनी दोन जणांना अपॉइंटमेंट दिल्या होत्या?”
“मला माहित नव्हतं पण त्यांनी तसं मला सांगितलं होतं. पोलिसांनी त्यांचं अपॉइंटमेंट लिहिलेलं रजिस्टर घेतलय ताब्यात. त्यांचं म्हणणं आहे दोन जणांची नावे त्यात होती .धुरी आणि पांडव. या दोघांच्याही नावावरून मला काही अर्थबोध झाला नाही म्हणजे कधी ऐकली नव्हती नाव. त्यातल्या त्यात पांडव हे नाव आधी कधीतरी ऐकल्यासारखं वाटत होतं पण धुरी हे पहिल्यांदाच ऐकलं. काल रात्रीपासून त्यांना जी काळजी सतावत होती ती दूर झाली असं मला वाटलं. आणि त्यांनी मला घरी जायला सांगितलं.”
“किती वाजले होते तेव्हा?”
“मला वाटतं रात्री अकरा वाजले असावेत.”
“आणि तू तेव्हा आंघोळ करत होतास?”
“ हो मी रज रात्री झोपताना अंघोळ करतो. पण अगदी लगेच केली नाही. घरी आल्यावर मी जरा थोडीफार आवरावरी केली, झोपायची तयारी करण्याच्या दृष्टीने अंथरूण तयार केलं. कारण सकाळी घाईत जाताना अंथरूण तसंच अर्धवट राहिलं होतं.” पुरी म्हणाला.
“सकाळी का घाई झाली होती ?”
“डॉक्टरांना काहीतरी हवं होतं म्हणून त्यांनी मला बोलावलं. म्हणजे ते त्यांच्या मागच्या दाराने बाहेर आले. आणि मला ओरडून हाक मारली यांचा असा स्वभाव होता की काही लागलं की ते मला जोरदार हाका मारायचे. म्हणजे मी उठलो होतो तेव्हा, नाष्टा पण झाला होता पण काही आवरून झालं नव्हतं. ते मी रात्री घरी आल्यावर आधी आवरलं आणि मग आंघोळीला गेलो.”
“ठीक आहे पुढे काय झालं?”
“ मला कसला तरी एक वेगळाच आवाज आला. मला आधी कसला आहे ते कळलं नाही नंतर मला जाणवलं तो बाईच्या किंचाळण्याचा आवाज होता. मी नळ बंद केला आणि खिडकीपाशी गेलो तसाच ओलेत्याने. मागचा दरवाजा जोरात बंद केलेला दृष्टीस पडला. मला बोलवण्यासाठी डॉक्टरांनी तो उघडला होता. कुणीतरी त्यांना धक्का देऊन आत ढकललं होतं. कदाचित त्याना बंदुकीचा धाक दाखवला असावा. मला तो दरवाजा बंद होताना फक्त दिसला. तो ऑटोमॅटिक बंद होणारा दरवाजा आहे. माझ्याही घराचा दरवाजा तसाच आपोआप बंद होतो.मी अंगावर पटकन टॉवेल गुंडाळला आणि तसाच बाहेर पडलो.”
“कोणी बाहेर येताना तुला दिसलं?” पाणिनीने विचारलं.
“.नाही मला नाही वाटत कोणी माणूस बाहेर आला असेल. मला वाटतं डॉक्टरांनी मागचा दरवाजा उघडला मला बोलावण्यासाठी. कोणीतरी बंदुकीचा धाक दाखवून त्यांना ढकलला असेल आत मध्ये. म्हणजे हा माझा अंदाज आहे.”
“ डॉक्टरांनी तुला हाक मारली पण पाण्याच्या आवाजामुळे तुला ती ऐकू आली नाही असं असू शकतं?” पाणिनीने विचारलं.
“शक्यच नाही. मला नाही वाटत तसं. कारण जेव्हा डॉक्टर बोलवतात तेव्हा ते खूप जोरात हाक मारतात. मला ते ऐकू आलीच असती. मी जो आवाज ऐकला तो आवाज बाईच्या किंचाळण्याचाच होता आणि नक्की ती डॉक्टरांच्या घरातच होती.”
“हे तू कशावरून म्हणतोस? म्हणजे दारातच उभे राहून ती बाई किंचाळली नसेल कशावरून ” पाणिनीने विचारलं. “ म्हणजे ती मागच्या दाराने आत गेली असेल तू खिडकीपर्यंत पोहोचेपर्यंत ”
“दीना ने जरा विचार केला तुम्ही म्हणता तसं झालं असू शकतं. मला त्या दाराचंच थोडं आश्चर्य वाटतं होत. जर ते डॉक्टरानी उघडलं असत ते जोरात ओरडले असते आणि मला ऐकू आलं असतं.”
“ठीक आहे टॉवेल गुंडाळून तू बाहेर आलास. पुढे काय झालं ?”
“मागचा दरवाजा उघडा होता. अजून कुठलाच आवाज येत नव्हता. मला हे जरा विचित्र वाटलं. मी जरा इकडचा तिकडचा कानोसा घेत होतो तेवढ्यात पुढच्या बाजूने फिरत फिरत आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी मला पाहिलं आणि हटकलं की मी तिथे काय करत होतो. आणि मी कोण होतो ”
“नंतर पुढे?” पाणिनीने विचारलं.
“एक पोलीस पुढच्या दाराने आत आला. ते दार उघडच होतं. म्हणजे अर्धवट उघड होतं. म्हणजे तसं पोलीस ऑफिसर म्हणाला.”
“डॉक्टर बंब त्यांच्या तपासण्याच्या खोलीत नार्कोटिक्स चा स्टॉक ठेवायचे?” पाणिनीने विचारलं.
“मला वाटतं ठेवत असावेत.”
“तुझ्याकडे घराच्या किल्ल्या आहेत त्यांच्या?”
“.नाही त्याबंबतीत डॉक्टर परखड होते ते म्हणायचे ते त्यांचं घर आहे जेव्हा मला गरज लागेल तेव्हा ते बोलून घ्यायचे त्यांनी बोलावलं नाही तर मी जायचं नाही तसेच त्यांचं वागणं असायचं पण मी त्याच्याशी जुळून घेतलं होतं त्यांचा व्यवसाय त्यांनी करावा माझं काम मी करावं .शेवटी मी त्यांचा नोकर होतो. त्यांच्या कुठल्याही व्यवसायात किंवा इतर गोष्टीत नाक खुपसत नसे. मी.”
“बरं मला वाटतं डहाणूकर नवरा बायकोशी तुझं बोलणं झालंय.”
“नाही झालय त्यांच्याशी बोलणं.”
“ घरातून पळत बाहेर जाणाऱ्या स्त्रीचं, तिनं जे वर्णन केलंय आहे ते तू ऐकलं आहेस का?” पाणिनीने विचारलं.
“ नाही ”
“ही स्त्री इतर कुठल्या प्रसंगी डॉक्टरांना याआधी भेटली असावी का याची उत्सुकता आहे मला.” पाणिनी म्हणाला.
“असेल कदाचित मला नाही सांगता येणार. त्यांच्याकडे फार पेशंट येत नसत. तसे ते निवृत्त झाल्यातच जमा होते. तिथे पेशंट असत तेव्हा मी जरा लांबच राहत असे म्हणजे डॉक्टरांना काही हवं असेल तरच त्यांच्याजवळ जात असे.” पुरी म्हणाला.
पाणिनी काहीतरी बोलणार होता तेवढ्यात पुरी एकदम म्हणाला,
“ मला वाटतं त्या मुलीचं आडनाव पांडव होतं. खात्री नाही देता येणार पण बहुतेक तेच होतं. मी डॉक्टरांच्या बंगल्याबाहेरच्या म्हणजे मागच्या बाजूच्या बागेत काम करत होतो तेव्हा ही आपल्या कार ने तिथे आली आणि मला विचारलं की डॉक्टर बंब घरी आहेत का. मी तिला सांगितलं की पुढच्या दाराने ये आणि बघ आहेत किंवा नाही ते. त्यावर ती माझ्याकडे बघून फक्त हसली आणि आपल्या कारचा हॉर्न दोनदा वाजवला आश्चर्य म्हणजे हॉर्न वाजल्यावर लगेचच बंगल्याच मागचं दार उघडलं गेलं आणि डॉक्टर बंब बाहेर आले तिला बघून त्यांना एकदम आनंद झालेला दिसत होता. तिला घेऊन ते घरात गेले.”
“ही स्त्री दिसायला एकदम खानदानी वाटत होती. पण मला ती प्रथमदर्शनी आवडली नाही. ज्या पद्धतीने तिने मला डॉक्टर बंब आहेत का हे विचारलं आणि मी तिला पुढल्या दाराने जा असं सांगितल्यानंतर ज्या पद्धतीने तिने दोनदा हॉर्न वाजवून डॉक्टरला बाहेर बोलावून घेतलं तेव्हाच ती माझ्या मनातून उतरली होती. तिलाही बहुतेक जाणवलं होतं की आमच्या दोघात काहीतरी गैरसमज झाला आहे. म्हणून ती जेव्हा बाहेर आली तेव्हा तिने माझ्याकडे मी करत असलेल्या बाग कामाविषयी ,त्या तळ्यातल्या माशांविषयी काहीतरी चौकशी करून मला मस्का लावायचा प्रयत्न केला. ती घेऊन आलेली कार नवीनच वाटत होती म्हणजे त्याच्यावर गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर सुद्धा नव्हता. टेम्पररी रजिस्ट्रेशन चा स्टिकर होता. तिच्या बोलण्यात आलं की तिला परमनंट नंबर मिळाला होता आणि जुना स्टिकर काढून त्या जागी नव्याने मिळालेली नंबर प्लेट लावण्यासाठी तिला माझी मदत हवी होती माझ्यासाठी ते पाच मिनिटातच काम होतं आणि मी ते केलं” पुरी म्हणाला..
“तुझ्या लक्षात आहे काय नंबर होता गाडीचा?” पाणिनीने विचारलं.
“एन.एल. २६ डब्ल्यू.के. ८५३२”
“पांडव बद्दल तुला काही माहिती आहे का याची पोलिसांनी चौकशी केली तुझ्याकडे?” पाणिनीने विचारलं.
“हो केली ना पण मी त्यांना हे काही सांगितलं नाही. याचं कारण त्या वळेला माझ्या मनात हे सगळं आलं नाही. आत्ता तुमच्याशी बोलताना मला हे सगळं आठवलं म्हणून सांगितलं आणि याचा तुम्हाला उपयोग होईल की नाही हे ही मला माहित नाही आणि तिचं आडनाव पांडव आहे किंवा नाही हे ही मला माहित नाही.” पुरी म्हणाला
“तीच मुलगी असणार ती.” पाणिनी म्हणाला. “ती याआधी इथे आली होती?” पाणिनीने विचारलं.
“मला तरी वाटत नाही ती आधी आली असावी. पण तिची आणि डॉक्टर बंब यांची चांगलीच ओळख असावी. मागच्या आठवड्यात चार दिवस मी रजेवर होतो त्या वेळेला ती इथे आली असावी.”—पुरी.
“त्या पलीकडच्या घरात एक मुलगी राहते डहाणूकर ची पुतणी. तू ओळखतोस तिला?”
“सहेली?”
“हो तीच”
पुरी जोरात हसला.
“अगदी चांगली ओळखतो मी तिला. ती कायम इकडे डॉक्टरांच्या बंगल्याच्या आसपासच वावरत असते. मांजराबरोबर खेळते, मासे बघत बसते .कधी तंद्रीत माशांकडे किंवा मांजराकडे बघत रडत असते.मागच्या दाराने डॉक्टरांच्या घरातही जाते. तिला डॉक्टर खूप आवडतात. तिला खूप चांगले समजून घेतात असं तिचं म्हणणं आहे.”
“किती वर्षाची आहे ती?” पाणिनीने विचारलं.
“एकोणीस वय असेल तिचं. दिसते थोडी मोठी.”
“ठीक आहे.” पाणिनी उठून उभा राहत म्हणाला, “तुला मनापासून धन्यवाद. मला हवी होती ती माहिती मिळाली.”
दीनाने पाणिनीच्या हातात हात मिळवले. “डॉक्टरांची तब्येत कशी आहे नाही कळलं का तुम्हाला?” त्यानं विचारलं .
“नाही ना. तू हॉस्पिटलमध्ये फोन करून का चौकशी करत नाहीस?” पाणिनीने विचारलं.
“माझ्याकडे इथे फोन नाहीये आणि डॉक्टरांचं घर तर पोलिसांनी सील बंद केलंय आणि फोन करायला मी बाहेर जावं अशी परिस्थिती नाहीये कारण इथल्या सगळ्या परिस्थितीत मी या परिसराकडे लक्ष द्यावं अशीच डॉक्टरांची इच्छा असणार त्यामुळे मला सोडूनही बाहेर जाता येत नाही.”-पुरी
“ठीक आहे. मला जर डॉक्टरांनी बद्दल काही कळलं आणि माझं पुन्हा इकडे येणं झालं तर तुला मी कळवीन.” पाणिनी म्हणाला. आणि सौम्याला घेऊन बाहेर पडला.
“आता काय करायचं पुढे?” सौम्याने विचारलं
“आपण कनक ला फोन लाऊ.”
फोन लागल्यावर पाणिनीने कनकला पांडवच्या गाडीचा नंबर सांगितला आणि या नंबरच्या गाडीची माहिती, त्याचा मालक कोण आहे याचा तपशील काढायला सांगितला.
“तुझं काम करतो पण तुला देण्यासाठी माझ्याकडे आणखीन एक बातमी आहे, दोन मिनिट थांब.”
पाणिनी ने थोडावेळ हातात फोन धरून ठेवला.
“तू मला एक काम सांगितलं होतंस, डॉक्टर बंब यांच्याकडे झालेल्या घटनेबद्दल आठवतं?”-कनक.
“मी तुला सांगितलेली काम विसरत नसतो.” पाणिनी म्हणाला.
“तर ऐक, डॉक्टर बंब अर्ध्या तासा पूर्वीच गेले. म्हणजे वारले. मला समजलेल्या माहितीनुसार जाण्यापूर्वी त्यांना शुद्ध आली होती आणि तेवढ्या अवधीत त्यांनी पोलिसांना काहीतरी माहिती दिली आहे. पण काय माहिती दिली आहे हे अजून माझ्या माणसाना समजलेलं नाही. आणखी एक, पण ते महत्वाचं आहे की नाही मला माहित नाही पण सांगतो, डॉ.बंब यांना कोणीही नातलग नाही.त्यामुळे त्यांनी त्यांच्या सर्व संपत्तीचा कारभार आणि व्यवस्थापन कोर्टाच्या प्रशासकाकडे सुपूर्त झालंय. ”--कनक
“ओके. थँक्स कनक. मी दहा मिनिटांनी पुन्हा फोन करतो तुला,दरम्यान हा प्रशासक कोण आहे त्याची माहिती काढ. ”. पाणिनी म्हणाला आणि आपल्या कार मध्ये बसून सौम्याला घेऊन निघाला.
“ आता ही खुनाची केस झाली आहे.” पाणिनी सौंम्याला म्हणाला. “ डॉक्टर बंब गेले. कनकने मला पुन्हा दहा मिनिटाने फोन करायला सांगितलाय.गाडीच्या नंबर वरून कुणाची गाडी आहे हे त्याला कळेल.”
“ आपण कुठे चाललोय अत्ता?” –सौंम्या.
“ धुरीच्या घराकडे. समजा तो पर्यंत गाडी कुणाची आहे ते कनक कडून समजलं तर आपण त्या मालकाकडे जाऊ नाहीतर धुरीकडे.”- पाणिनी म्हणाला.
वाटेत पंधरा मिनिटांनी त्याने कनकला फोन लावला.कनकने पाणिनीला नाव आणि पत्ता सांगितला. नाव प्रज्ञा पांडव, राहणार मानस अपार्टमेंट असं होतं.,
“ आता आधी प्रज्ञा पांडव ! ” आपली गाडी वळवत पाणिनी म्हणाला. “ धुरी नंतर . ”
प्रकरण 4 समाप्त
वाचकहो आपल्याला माझी कथा आवडत असल्यास आपल्या मित्र-मैत्रिणींना माझ्या कथा वाचायला सुचवा आणि या कथेला आपली समीक्षा ही करा