Kirkali - 3 in Marathi Crime Stories by Abhay Bapat books and stories PDF | किंकाळी प्रकरण 3

Featured Books
  • అంతం కాదు - 25

    వెంటనే సరే దీన్ని ఇప్పుడు ఎలా యూస్ చేయాలి అని అంటాడు ధర్నా వ...

  • అధూరి కథ - 6

    రాధిక తో పాటు Luggage తీసుకుని బయటకు వెళ్తున్న సమయంలో tv లో...

  • థ జాంబి ఎంపరర్ - 17

    జాంబీ జనరల్స్ యుద్ధం - ఆదిత్య పునరాగమనంసుమంత్ కింద పడే పెట్ట...

  • అంతం కాదు - 24

     ఇక సముద్రం పైన చూస్తే చనిపోయిన శవాన్ని అంటే సామ్రాట్ శవాన్న...

  • మౌనం మట్లాడేనే - 8

    ఎపిసోడ్ - 8 విక్రం యొక్క అంగీకారంప్రియా, ఆదిత్య దగ్గరకు పరుగ...

Categories
Share

किंकाळी प्रकरण 3



प्रकरण ३
पाणिनी आणि सौम्या सूर्यदत्त मार्गावरील डॉक्टर बंब यांच्या पत्त्यावर पोहोचले डॉक्टरांचा बंगला टेकडीच्या उतारावर होता दोन कार साठी पार्किंग व्यवस्था होती आणि त्यावर एक टुमदार बंगला होता. 
"डॉक्टरांना भेटायच्या आधी आपण त्यांचे शेजारी डहाणूकर यांना आधी भेटू त्याच्यानंतर डॉक्टरांचा गडी जो टॉवेल गुंडाळून बाहेर बघायला आला होता त्याचीही मुलाखत घेऊ"  पाणिनी म्हणाला.
त्याने डहाणूकरच्या दारावरील बेल वाजवली दारात एक माणूस येऊन उभा राहिला 
"मी मिस्टर पटवर्धन आहे आणि ही माझ्या बरोबरची सौम्या सोहोनी." आपली ओळख करून देत  पाणिनी म्हणाला.
"ठीक आहे. मी अनुमान डहाणूकर." दारात उभा असलेला माणूस म्हणाला. पण त्याच्या चेहऱ्यावर ना शत्रुत्वाचे भाव होते ना मित्रत्वाचे. आपल्याकडे आलेला पाहुणा पुढे काय बोलतोय याची तो वाट बघत होता साधारण पन्नाशीचा तो माणूस होता करडे डोळे आणि जाडजूड भुवया आणि भादरलेल्या मिशा. 
"मला वाटतं तुमच्या बायकोने पोलिसांना फोन केला होता "  पाणिनी म्हणाला.
“ हो बरोबर ” 
“ ती आत आहे का?” 
“आहे.” 
“ तिच्याशी बोलायचं आहे आम्हाला .” पाणिनी म्हणाला.
“कशाबद्दल?” 
“तिने काय पाहिलं आणि काय ऐकलं याबद्दल” 
“तिने पोलिसांना सांगितलंय ते.”
“समजलं मला ते”   पाणिनी म्हणाला.
दारातल्या माणसाने आपले संवाद तिथेच थांबवले. ना त्याने त्या दोघांना आत यायला सांगितलं ना जायला सांगितलं. पाणिनी मात्र मुद्दामच तिथे रेंगाळत उभा राहिला.
आत मधून हार्मोनियम वाजवण्याचा आवाज येत होता. अगदी हळूहळू मंद स्वरातील सुरावट. तो आवाज अचानक थांबला आणि कुणीतरी आतून विचारलं ,
“ पटवर्धन म्हणजे पाणिनी पटवर्धन अॅडव्होकेट तर नाही? ” 
“ हो. तोच आहे मी.”  पाणिनी म्हणाला. 
“ अरे बाप रे ! वाव ! मी अपेक्षा केली नव्हती की कधीकाळी तुम्ही माझ्या घरी याल. कोर्टात मी तुम्हाला बरेच वेळा पाहिलंय. तुमचे फोटो पाहिलेत. या,या आत या मिस्टर पटवर्धन.” 
मिसेस डहाणूकर तिच्या नवऱ्या पेक्षा गब्दुल होती पण त्याच्यापेक्षा दहा वर्षांनी तरुण वाटत होती. खोली बाहेर येतात तिने सर्व परिस्थितीचा ताबा घेतला. 
“ तुमच्या बरोबरच्या या तरुणीचे नाव काय म्हणालात तुम्ही ? ”
“ सौंम्या सोहोनी, माझी सेक्रेटरी.” 
“ हॅलो. कशा आहात तुम्ही सोहोनी मॅडम? खरंच खूप आनंद झाला तुम्हा दोघांना भेटून. या आत या बसा.” ती एकदम उत्तेजित आणि उत्साहित होत म्हणाली. 
“ मला वाटतं, काल रात्री काय झालं हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे.” मिसेस डहाणूकर म्हणाली.
“ हो बरोबर आहे.”  पाणिनी म्हणाला. 
“ तुमचा काय संबंध आहे याच्याशी मिस्टर पटवर्धन ? ”
“ माझा एक क्लायंट आहे त्याचा आणि डॉक्टर बंब यांचा संबंध आला आहे. म्हणजे डॉक्टरांचा मित्र आहे तो आणि ते डॉक्टर आता आजारी आहेत.”  पाणिनी म्हणाला. 
“ओह, अच्छा असं आहे तर! खरं म्हणजे तुम्हाला फार काही सांगण्यासारखं नाहीये. मी सुचवते की तुम्ही इथे खिडकीजवळच बसा कारण मी काल रात्री इथेच बसले होते हे सगळं घडलं तेव्हा. म्हणजे तुम्हालाही नीट बघता येईल.” 
पाणिनी पटवर्धन आणि सौम्या ते तिने सांगितलेल्या ठिकाणी खिडकी जवळ बसले .
“ छान दृश्य दिसतंय या खिडकीतून ”  पाणिनी म्हणाला.
“ अहो माझा नवरा तर या खिडकीत जवळजवळ पूर्ण दिवस बसून असतो. त्याच्याकडे दुर्बीण आहे चांगली. त्यातून पक्षी निरीक्षण, निसर्ग बघणं, सगळं काही तो आवडीने करतो. त्याला घरात बसूनच असं बघायला आवडतं बाहेर फारसा फिरायला जात नाही तो.” मिसेस डहाणूकर म्हणाली. 
“बाहेर फिरायला, पर्यटनाला जाणं म्हणजे पैसा खर्च करणं आलं ”  डहाणूकर म्हणाला 
“ बरं मिस्टर पटवर्धन मी तुम्हाला थोडक्यात सांगते काय घडलं ते, तर काल रात्री मी आणि माझा नवरा दोघेही या खिडकी जवळच बसलो होतो आता तुम्ही बसलाय तिथे, माझ्या नवऱ्याने काही फोटो काढले आणि आणि नंतर तो आमच्या घरच्या तळघरात असलेल्या डार्क रूम मध्ये गेला म्हणजे ते फोटो डेव्हलप करायला. मी तिथेच बसून होते.हां, मध्येच तुम्हाला सांगायचं म्हणजे आम्ही इथे राहायला येण्याच्या आधीपासून डॉक्टर बंब हे आमचे म्हणजे माझ्या नवऱ्याचे ओळखीचे होते. त्यांच्यामुळेच आम्हाला इथे त्यांच्या शेजारी जागा मिळाली.” मिसेस डहाणूकर म्हणाली.
“ डॉक्टर बंब आणि माझी ओळख आठ वर्षांपूर्वी एक रुग्ण आणि डॉक्टर या नात्यातून झाली आणि पुढे मैत्री झाली.”- अनुमान डहाणूकर म्हणाला.
बोलता बोलता पाणिनीने जवळची दुर्भिण घेऊन आपल्या डोळ्याला लावली आणि एकदम कौतुकाने उद्गारला, “अरे! फारच अप्रतिम दुर्भिण आहे ही.”
“ दुर्भिण या विषयातला मी बऱ्यापैकी तज्ज्ञ आहे. तुम्हाला सांगतो पटवर्धन माझ्या पाहण्यात आलेली ही एक सर्वोत्कृष्ट दुर्भिण आहे. या दुर्भिणीतनं डॉक्टर बंब यांच्या अंगणातलं ते मांजर बघा, ते कशाशी खेळतंय तेही तुम्हाला बघायला मिळेल.” 
“डॉक्टर बंब यांचे मांजर !” पाणिनी उद्गारला. 
“ ते मांजर डॉक्टर बंब यांचे नाहीये. पश्चिमेच्या बाजूला त्यांचे आणखीन एक शेजारी आहेत अधर आगवेकर नावाचे. त्यांचं मांजर आहे ते. अर्थात हे आगवेकर कुटुंबीय कुणात फारसे मिसळत नाहीत. तसे ते आहेत चांगले पण ते एकलकोंडे आहेत.”
“त्या मांजरांने कुठून तरी सोनेरी मासा मिळवलेला दिसतोय खेळायला.”   पाणिनी म्हणाला.
“ हो. त्या स्विमिंग पुलाजवळ ते मांजर कायम पडलेलं असतं. त्याची नजर त्यातल्या पाण्यातल्या माशांच्या वर असते. बराच वेळ ते मांजर तिथे घालवतं. अत्ता पर्यंत ते त्या माशाला कधीही पकडू शकल नव्हतं, अरेच्च्या! अत्ता मात्र त्या मांजराने तळ्याजवळ सोनेरी माशाला मारलेलं दिसतय..त्या पाण्याजवळची जी हिरवळ आणि बाग केल्ये, ती डॉक्टर बंब यांचा गडी दीनानाथ पुरी याने तयार केल्ये. खूप कष्टाळू आहे तो. आम्ही त्याला दीना म्हणतो.” मिसेस डहाणूकर म्हणाली”.
“ बरं मला आता डिस्टर्ब करू नका. पाणिनी पटवर्धन ना मला पूर्ण हकीगत सांगू दे.विषयांतर फार झालं. आपल्या खिडकीतून दिसणाऱ्या दृश्याबद्दल.” मिसेस डहाणूकर म्हणाली. सौंम्या सोहोनी आपली पेन्सिल आणि डायरी काढून ती टिपणं घ्यायच्या तयारीला लागली.
“ तर पोलिसांनी मला कालावधी बद्दल जास्त करून विचारलं. मी त्यांना सांगितलं की साधारण रात्री साडेअकरा वाजता हे घडलं असावं.”
आतल्या बाजूने हार्मोनियम वर एक शास्त्रीय धून वाजलेली पाणिनीला ऐकू आली. 
“ माझी पुतणी, सहेली. ती वाजवते हे. काही दिवस इकडे रहायला आल्ये.”
“केवढी आहे वयाने?”  पाणिनीने विचारलं.
“एकोणीस.”
“ काल रात्री तिने पाहिलं का काही?” पाणिनीने विचारलं.
“ अजिबात नाही. ती हार्मोनियम वाजवत होती.”
“  एवढ्या रात्री?”
“ हो तिला खूप आवड आहे आणि शास्त्रीय शिकत्ये.त्याचा सराव करावा लागतो.”
“ आम्ही बोलू का तिच्याशी?”  पाणिनीने विचारलं.
पाणिनीने हा प्रश्न विचारताच दोघेही डहाणूकर हादरले.अनुमान डहाणूकर एकदम गडबडीत म्हणाला, “ नको नको.मला नाही वाटत तुम्ही बोलावं. तिने काहीच पाहिलं नाहीये.”
“ तर मी पुढचं सांगते,” मिसेस डहाणूकर म्हणाली,  “ हां, तर काय सांगत होते, तर या स्त्रीला मी रस्त्यावरुन चालत येताना बघितलं.मला आश्चर्यच वाटलं कारण या भागात तिला कधीच पाहिलं नव्हतं. मी माझी दुर्बिण डोळ्याला लावली आणि पाहिलं तर ती डॉक्टर बंब यांच्या घरात जात होती.करड्या रंगाचा ड्रेस अंगात होता आणि पायात ब्राऊन रंगाचे बूट.”
“ तिच्या हातात हँडबॅग किंवा पर्स होती?”  पाणिनीने विचारलं.
“ या बाबतीत मला नक्की नाही सांगता येणार,पण काही हातात होतं असं वाटत नाही.हं, पण एक नक्की की ती बाहेर आली तेव्हा हातात काहीही नव्हतं.हे मी खात्री पूर्वक सांगू शकते.ती आत गेल्यावर थोड्या वेळातच आतून जोरजोरात आवाज यायला लागले. मारामारीचे.मला आधी काय चाललंय ते कळलंच नाही.मी अनुमानला हाक मारली पण तो जवळपास नव्हता.काय ते पाहायला मी पुढच्या दाराकडे घावले, त्याच वेळी तिने किंकाळी फोडली. दोनवेळा.मी क्षणभर थांबले आणि पोलिसांना फोन लावला.किंचाळण्याचा आवाज डॉक्टरांच्या घरातूनच येत होता.पोलिसांना मी सांगितलं की मला बाईच्या किंचाळण्याचा आवाज ऐकला आणि काचेची वस्तू फुटल्याचा आवाज ऐकला. एवढ सांगून मी फोन बंद केला आणि पुन्हा दाराकडे धावले.”
“ खिडकीत नाही?”  पाणिनीने विचारलं.
“ नाही.कारण मला हार्मोनियम च्या आवाजापासून दूर जाऊन तिकडे काय झालाय ते पाहायचं होतं.खिडकीत गेले असते तर हार्मोनियम च्या आवाजात ते कळलं नसतं.”
“ पुढे?”
“ ती मुलगी लगेचच झपझप चालत, म्हणजे पळतच बाहेर आली.”
“ आत गेलेली मुलगीच होती की वेगळी?”  पाणिनीने विचारलं.
“ अहो जी आत गेली तीच !”
“ बरं, पुढे काय झालं?”
“ ती पळत गेली रस्तावर आणि मला डॉक्टरांच्या घराकडे जायचं होतं,पोलीस येणार होते त्यांना सर्व प्रथम माहिती द्यायला पाहिजे ना! तेवढ्यात माझा नवरा अनुमान, मला तिकडेच निघालेला दिसला. पण डॉक्टरांचा घरगडी, दीना पुरी किंकाळी ऐकल्यावर टॉवेल गुंडाळलेल्या अवस्थेतच मागच्या दाराजवळ आलेला दिसला. मग अनुमान परत फिरला आणि घरी आला. ”
“ पोलीस आल्यावर काय झालं?”  पाणिनीने विचारलं.
“ मी त्यांना काय काय घडलं ते सर्व सांगितलं. पोलिसांनी त्यांची काही माणसं तिला शोधायला बाहेर पाठवली, काही डॉक्टरांच्या घराजवळ ठेवली.” मिसेस डहाणूकर म्हणाली.
“ घरगडी पुरी?”  पाणिनीने विचारलं.
“ त्याला पोलिसांनी त्याच्या घरी पाठवलं.”
“ बरेच दिवसापासून आहे तो डॉक्टर बंब यांच्या बरोबर?”
“ माझी आणि डॉक्टरांची ओळख झाल्यापासून तो आहेच त्यांच्याकडे.” अनुमान डहाणूकर म्हणाला.
“ तुम्ही पोलिसांशी बोललात?” पाणिनीने त्याला विचारलं.
“ अजिबात नाही.मला अशा कुठल्याच लफड्यात साक्षीदार म्हणून अडकायचं नसतं. फालतू वेळ जातो कोर्टात.तारखा पडतात, वकील आरोपी सोडून साक्षिदारालाच कोंडीत पकडणारे प्रश्न विचारतात. अनुभव घेतलाय मी.त्यापेक्षा मी माझ्या फोटो डेव्हलपिंगच्या छंदात स्वत:ला गुंतवतो. ” अनुमान म्हणाला.
“ कुठल्या केस मधे हा अनुभव आलाय? खुनाच्या?”  पाणिनीने विचारलं.
“ नाही. स्कूटरच्या अपघाताच्या.”
 मिसेस डहाणूकर म्हणाली, “ मी सांगू का, मी पोलिसांना एवढी सविस्तर माहिती दिली की माझ्या नवऱ्याला काही प्रश्न विचारायचं त्यांच्या डोक्यातच नाही आलं.”
“ घराबाहेर जी मुलगी पळत आली तिचा आत घडलेल्या घटनेशी काही संबंध नव्हता.ती वेगळीच मुलगी होती.” अनुमान म्हणाला.
“ वेगळी मुलगी?” पाणिनी आश्चर्याने म्हणाला.
“ हो.माझा अंदाज आहे की माझी बायको रविना जेव्हा पोलिसांना फोन करत होती तेव्हा ही मुलगी मागील दाराने बाहेर पडली.” अनुमान म्हणाला.
“तुमच्या या विधानामधून आपल्याला नेमका कालावधी निश्चित करता येत नाहीये.”  पाणिनी म्हणाला.
“बरोबर आहे तुम्ही म्हणता ते. मी माझ्या बायकोबरोबर बसून घडलेल्या घटनांचा आढावा घेत होतो. मी ज्या वेळेला डॉक्टरांच्या घराकडे जाण्यासाठी पायऱ्या उतरत होतो, त्या दरम्यान मला त्यांच्या घराची पुढची बाजू दिसत नव्हती. माझी बायको जी आधी खिडकीत उभी होती, तिला पुढची आणि मागची दोन्ही बाजू दिसत होती. पण ती फोन करायला गेली आणि त्यानंतर लगेचच ती डॉक्टरांच्या घराकडे म्हणजे पुढच्या दाराकडे जाण्यासाठी रस्त्यावर आली पण त्यावेळी तिला घराची मागची बाजू दिसत नव्हती. पटवर्धन, मी बायफोकल चष्मा लावतो. त्यामुळे पायऱ्या उतरताना मला खाली वाकून पायऱ्या बघत बघत उतरावं लागतं. मी तसंच करत होतो पण मध्येच मान वर करूनही पाहत होतो आणि त्याच वेळेला मला ही मुलगी दिसली.” अनुमान डहाणूकर म्हणाला. 
“ ही मुलगी दिसली म्हणजे नेमकी कुठली? पुढच्या दारातून जी बाहेर पडली ती? ”  पाणिनीने विचारलं.
“ नाही-नाही. मागच्या दारातून जी बाहेर पडली ती. आणि माझा जो अंदाज आहे त्यानुसार हीच ती मुलगी होती, जिने डॉक्टरांना खाली पाडून बेशुद्ध केलं.” 
“तिचं वर्णन करता येईल तुम्हाला?”  पाणिनीने विचारलं.
“नाही ती स्त्री होती एवढेच मी सांगू शकतो. याहून अधिक काही नाही. तिनं एक लांब कुडता घातला होता तिच्या गुडघ्यापर्यंत येईल तेवढ्या लांबीचा कारण मला तिची फक्त एक झलकच दिसली, म्हणजे मागचा दरवाजा एकदम उघडला गेला. आणि ती पळत बाहेर आली. मी तिला फक्त एखाद दोन सेकंद बघितल असेल.”
“माझ्या नवऱ्यानं त्यांने पाहिलेली ही गोष्ट पोलिसांना सांगितली नाही याची मला आता काळजी वाटते आहे. तुम्हाला काय वाटतं पटवर्धन हे त्याने सांगायला पाहिजे?” 
पाणिनी ने तिरक्या नजरेने सौम्याकडे पाहिलं आणि ती प्रत्येक संवाद लिहून घेत होती याची खात्री झाल्यावर मिसेस डहाणूकर च्या प्रश्नाला त्यांने उत्तर दिलं,
“नक्कीच मला वाटतं की त्याने पोलिसांना हे सांगायला हवं. ही त्याचं कर्तव्य आहे.” 
अनुमान जोरात हसला आणि म्हणाला, “ पोलिसांना कधीही वाटलं तर ते मला केव्हाही इथे येऊन प्रश्न विचारू शकतात पण मी इथून त्यांना सांगायला काही जाणार नाही. माझ्या बायकोने त्यांना आधीच खूप माहिती देऊन ठेवली आहे.”
“मला आता डॉक्टरांचा घरगडी दीनापुरी ला भेटायचंय. कुठे असेल तो आत्ता?”  पाणिनीने विचारलं.
“ त्याला त्याच्या घरी राहायला परवानगी दिली आहे पोलिसांनी. त्यांनी फक्त डॉक्टरांचं घर सील करून ठेवलय.” 
“डॉक्टरांच्या जीवाला धोका आहे असं पोलिसांना वाटतंय ? ”
“ माहित नाही आम्हाला. ते याबद्दल कुणालाच काही सांगत नाहीयेत.”
“ठीक आहे. आम्ही निघतो.” पाणिनी पटवर्धन म्हणाला. दोघांनी डहाणूकर नवरा बायको शी हस्तांदोलन करून निरोप घेतला.
(प्रकरण ३ समाप्त.)