Kirkali - 7 in Marathi Thriller by Abhay Bapat books and stories PDF | किंकाळी प्रकरण 7

Featured Books
Categories
Share

किंकाळी प्रकरण 7



प्रकरण ७
साडेनऊ वाजता पाणिनी पटवर्धन सरकारी वकील खांडेकरांच्या ऑफिसमध्ये पोहोचला खांडेकर आत आहेत का याची त्यांने त्यांच्या सहाय्यकाकडे चौकशी केली. ते बाहेर असल्याचं त्याला सांगण्यात आलं. 
“माझा एक क्लायंट इथे आलाय.” 
“कोण?” 
“निनाद धुरी. त्याला भेटायचय मला इथे.” 
“त्यासाठी खांडेकर यांची परवानगी घ्यायला लागेल घ्यायला, मला.”  सहाय्यक म्हणाला.
“त्यांना सांगा. मी इथे आलोय म्हणून.”  पाणिनी म्हणाला. 
“मला अधिकार नाहीये तसं कळवण्याचा.”
“तुम्ही प्रमुख आहात ना इथे ?”
“मी इथे नोकरीला आहे. प्रमुख वगैरे नाही.” 
“तुम्हाला इथे काहीच अधिकार नसेल तर मला माझे अधिकार वापरावे लागतील.” पाणिनी म्हणाला आणि त्या अधिकाऱ्याचा विरोध धुडकावून लावत खांडेकरांच्या केबिनच्या दारात जाऊन उभा राहिला आणि दार खडखड वाजवलं. 
खांडेकर बंद खोलीमध्ये कुणाशी तरी बोलत होते आणि पाणिनीने दारावर केलेली टकटक त्यांना सहन झाली नाही त्यामुळे त्यांनी चिडून एकदम दार उघडलं समोर पाणिनी आल्याचं बघून ते गुरगुरत म्हणाले, “ निघून जा इथून! माझ्या कामात अडथळा आणू नको.” 
“मी माझ्या क्लायंट्च हित आणि हक्क याचा रक्षण करायला आलोय.”  पाणिनी म्हणाला. 
“कोण आहे तुझा क्लायंट?” 
“निनाद धुरी.” 
“त्याच्यावर कुठल्या गुन्ह्याचा आरोप वगैरे झालेला आहे?” -खांडेकर 
“मला माहित नाही पण तो माझा क्लायंट आहे आणि त्याच्या हित संबंधाचे रक्षण करणं माझं कर्तव्य आहे. त्याच्याशी जर तुम्ही बोलत असाल तर मी इथे हजर असणे आवश्यक आहे.” 
“नाही मला पटत नाही.” -खांडेकर
“का नाही?” 
“कारण आम्ही एका खुनाची चौकशी करतोय.” 
“धुरीला त्यासाठी पकडलय?” 
“आत्ता सांगणं अवघड आहे.” खांडेकर म्हणाले. 
“तसं असेल तर मी उपस्थित असणं अत्यावश्यक आहे.”   पाणिनी म्हणाला.
खांडेकर काही बोलले नाहीत पाणिनीने आपल्या अशीलाकडे बघून आवाज चढवून म्हंटलं,
“अधिकृत रित्या मी माझी मागणी तुमच्यासमोर मांडली आहे तुम्ही जर...”
“एक मिनिट थांब.” खांडेकर ओरडले. 
“कुठल्याही तांत्रिक मुद्द्यावर तू मला अडकवायला बघू नको. माझ्या दृष्टीने निनाद धुरी हा एक महत्त्वाचा साक्षीदार आहे. आत्ता तरी. पण ज्या अर्थी त्याने तुझ्यासारखा महागडा वकील नेमला आहे त्याअर्थी तो अशा काही गोष्टीत गुंतलेला असावा की मला अजून त्याची माहिती झालेली नाही.” - खांडेकर
“ माझी फी परवडणारा कोणीही मला वकील म्हणून ठेवू शकतो पण त्यामुळे ही वस्तुस्थिती बदलत नाही की माझ्या क्लायंटशी बोलण्याचा मला अधिकार आहे.”  पाणिनी म्हणाला.
“तुझ्या क्लायंटला आम्ही इथे पकडून आणलेले नाही तो इथे स्वतः हून आला आहे.” खांडेकर म्हणाले. 
“स्वतःहून आला असेल तर तो स्वतःहून निघूनही जाईल. चल धुरी बाहेर हो.”  पाणिनी म्हणाला. 
“त्याला प्रश्न विचारण्याचं काम अजून चालू आहे.” खांडेकर म्हणाले 
त्या दोघांचं बोलणं ऐकून धुरी दारात आला. खांडेकर त्याला म्हणाले,
“ मिस्टर पटवर्धन एकंदरीत तू ज्या पद्धतीने बोलतो आहेस माझ्याशी, त्यावरून माझ्या दृष्टीने धुरी हा साक्षीदाराच्या ऐवजी एक संशयित म्हणून माझ्या नजरेसमोर आहे.” 
धुरी कडे वळून खांडेकर पुढे म्हणाले, “ परिस्थिती काय आहे तू समजून घेशील मिस्टर धुरी, एका तरुण स्त्री बरोबर तू हॉटेलात गेलास, आणि नवरा बायको म्हणून तुम्ही तिथे रजिस्ट्रेशन केलं हे आम्हाला समाजापुढे आणायचं नाहीये, जोपर्यंत तू सहकार्य करतोयस  तोपर्यंत.. हे आणलं तर तुझी काय इज्जत राहील याचा विचार कर.” 
“धुरी, चल लगेच निघू इथून आपण.”  पाणिनी म्हणाला.
“ हे सर्व जरा शांतपणे नाही का घेता येणार? खांडेकर खूप सहकार्य करताहेत मला.” धुरी म्हणाला .
“मला थांबता येणार नाही मी तुझं वकील पत्र घेतलंय.”  पाणिनी म्हणाला. 
धुरीची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली 
“ हे बघ पटवर्धन, नीट बघून घे, तुझ्या अशीलाकडे. त्याच्या शरीरावर जखमा नाहीयेत. पाईप ने मारल्याचे वळ नाहीयेत. कुठलाही तणाव त्याला दिलेला नाही. तूच सांग धुरी,कसे वागलो आहे आम्ही?” खांडेकर म्हणाले. 
“अतिशय व्यवस्थित वागलाय तुम्ही.” धुरी म्हणाला. 
“ दुर्दैव आहे, तुला जशी अपेक्षा होती त्याप्रमाणे तुझ्या या वकिलांनी तुझ्या कहाणीवर विश्वास ठेवलेला नाही. त्याला असं वाटतंय की आपण आपल्या अशिलाला संरक्षण दिले पाहिजे काही सल्ला दिला पाहिजे, तो तुझा हक्क आहे. असं तुझा वकील भासवतोय.” खांडेकर म्हणाले. 
“मी पटवर्धनना इथे बोलवलेलं नाहीये.” धुरी म्हणाला. 
“धुरी आता जास्त बोलू नकोस आणि इथे थांबू नकोस मी तुला गाडीत सर्व काही सांगतो चल माझ्याबरोबर ”  पाणिनी म्हणाला.
“तुम्ही त्याला काही समजून सांगण्यापेक्षा धुरीच तुम्हाला व्यवस्थित समजून सांगू शकेल आणि तेही इथेच.” खांडेकर पाणिनीला म्हणाले. “ तिघांनी आपण एकत्र बसून बोलू आणि सगळा विषय संपवून टाकू ” 
“ मला माझ्या क्लायंटशी खाजगी बोलायचं आहे. धुरी चल माझ्याबरोबर.” 
असं म्हणून पाणिनीने धुरीचा दंड पकडून त्याला आपल्याकडे ओढलं त्यांच्याकडे बघून हसत खांडेकर दारात उभे होते. 
“ काय चावटपणा चाललाय हा पटवर्धन? मला तुम्ही इथे कुठल्या परिस्थितीत ढकललय लक्षात येतय का तुमच्या? मी काय लहान मुलगा नाहीये पक्का व्यावसायिक आहे मी याच्यापेक्षा मोठाली आव्हान मी पेलल्येत अशा स्थितीत काय करायचे ते माझं मला माहिती आहे.” 
“इथे बोलण्यापेक्षा आपण माझ्या कार मध्ये बसून बोललेलं जास्त बर होईल.” 
धुरीनं पाणीनीचा हात झटकला आणि म्हणाला “मला जिथे बोलायचे आहे तिथेच मी बोलेन तुम्ही कार मध्ये बसून बोलू म्हणालात म्हणून मी तसं करेन असं नाही. मी तुम्हाला एखादा सल्ला घेण्यासाठी फोन केला.  माझ्या वतीने विचार करण्यासाठी नाही.” असे वाद घालता घालता ते लिफ्टने खाली उतरले.
“धुरी, पुढे बस मी तुला घरी सोडतो.”  पाणिनी म्हणाला. 
“काही गरज नाही मी टॅक्सी करून जाईन. प्रत्येक वेळेला, प्रत्येक गोष्टीत तुम्ही आधार द्यायची गरज नाही मला. मी सक्षम आहे त्यासाठी.” धुरी म्हणाला. 
“त्या रात्री काय घडलं हे तू सगळं खांडेकर यांना सांगितलंस?”  पाणिनीने विचारलं.
“ न सांगण्याचं काही कारण होतं?” धुरीने उत्तर द्यायच्या ऐवजी प्रति प्रश्न केला. 
“अत्यंत घाणेरडी आणि अविश्वासार्ह कथा आहे ती ”  पाणिनी म्हणाला.
“ माझ्या शब्दावर संशय घेतला जाणे या गोष्टीची मला सवय नाही ”  धुरी म्हणाला.
पाणिनी पटवर्धनने त्याला बळजबरीने आपल्या गाडीत शेजारी बसवलं. आणि गाडी चालू केली. 
“डॉक्टर बंब मेल्याचं तुला कसं कळलं?”  पाणिनीने विचारलं.
“कोण डॉक्टर बंब?” धुरीनं विचारलं 
“ज्या डॉक्टराला तू कियानला दत्तक घेण्यासाठी पैसे मोजलेस तो.”  पाणिनी म्हणाला. 
“तुम्ही काय बोलताय माझ्या लक्षात येत नाही.”
“ मी काय बोलतोय तुला लक्षात येत नसेल अत्ता, पण काल तू प्रज्ञा पांडवला फोन करून डॉ.बंब मेल्याच सांगितलंस आणि तिला सूचना सुद्धा दिलीस की तू सांगितलेल्या तथाकथित गोष्टीला, म्हणजे तुला रस्तावरून पेट्रोल कॅन घेऊन जाणारी बाई दिसणं,तू तिला लिफ्ट देणं वगैरे थापांना तिने पाठींबा द्यावा म्हणून.”
“ तुम्ही हे सुद्धा काय बोलताय मला समजत नाहीये.पांडव हे नाव मी कधीच ऐकलेलं नाहीये.आणि कुणालाच मी असं सांगितलेलं नाही की मी तुम्हाला जी हकीगत सांगितली त्याला पूरक असं काहीतरी बोल किंवा वाग. कदाचित असं झालं असेल की मी तुम्हाला लिफ्ट दिलेल्या बाईची जी हकीगत सांगितली त्या बाईच नाव पांडव असावं.”
“ तू अत्ता जे बोललास माझ्याशी तेच तू खांडेकरांना सांगितलंस?”  पाणिनीने विचारलं.
“ अर्थात.तेच खर आहे आणि तेच मी सांगितलं त्यांना.” धुरी म्हणाला.
“ आता विस्तव चांगलाच पेटलाय.”
“ म्हणजे? अहो ते एवढे सज्जन पणे वागले माझ्याशी ! फारच सहकार्य केलं त्यांनी. ते म्हणाले की तू सहकार्य कर सर्व काही सांग.आमच्या कडून पत्रकारांना काहीही बातमी बाहेर दिली जाणार नाही जेणे करून तुझी इज्जत जाईल.”
“ काय घडलंय आणि काय घडणार आहे याची कल्पना आली मला आता.”  पाणिनी म्हणाला.
“ काय... म्हणजे...” धुरी काहीतरी चिडून बोलणार होता पण थांबला आणि काहीतरी आठवून म्हणाला, “ तो पेट्रोल चा कॅन माझ्या गाडीतच सापडला बरं का ! तुमचा अंदाज खरा ठरला.म्हणजे तुम्ही म्हणालात ना की ती मुलगी जर गाडीतून उतरताना कॅन घेऊन उतरली नाही तर कॅन गाडीतच असायला हवा होता,पण मी म्हणालो होतो की मला दिसला नाही तो. पण तो गाडीतच सापडला मला. म्हणजे मी तुम्हाला सांगणारच होतो पण तेवढ्यात पोलिसांनी मला चौकीत बोलावलं आणि सांगायचं राहीलं.” धुरी म्हणाला.
“ पोलिसांना तू तुझ्या गाडीत कॅन असल्याचं सांगितलंस?”
“ अर्थात.”
“ त्यांनी तुला तो द्यायला सांगितला?”
“ त्यापेक्षा वेगळीच गोष्ट केली त्यांनी, माझी गाडीच पोलीस स्टेशन ला घेऊन आले ते.”
“ मला भीती वाटत होती की तू तुझ्या कर आणि गॅरेजची झडती घ्यायला परवानगी देशील की काय.”  पाणिनी म्हणाला.
“ त्यात काय अडचण आहे? त्या मुलीचे ठसे त्यांना हवे होते. हॉटेलातल्या तिच्या ठशांशी ते जुळवून बघायचे होते.त्यांना.त्यांना तिच्यात एवढा का रस होता मला कळलंच नाही.त्यांनी मला विचारलं की डॉ.बंब मला माहिती आहेत का म्हणून. ”
“ तू काय सांगितलस त्यांना?”  पाणिनीने विचारलं.
“ वस्तुस्थितीच सांगितली, की माझ्या आयुष्यात मी त्याचं नाव कधी ऐकलं नाही म्हणून.”
“ हे तू खांडेकरांना सांगितलस?”  पाणिनीने विचारलं.   
“ अर्थात.”
“आणि हे तू असच्या असं सांगितलंस खांडेकरांना? जसं आत्ता तू मला सांगतो आहेस तसं?”  पाणिनीने विचारलं.
“हो जसेच्या तसे सांगितलं. त्यात बदल करण्यासार”खं काय आहे?” धुरी म्हणाला. 
“तुला तसं वाटत असेल तर ठीक आहे. अर्थात पोलीस जेव्हा तुझ्या कारची झडती घेतील तेव्हा क्लीनर साईड समोरचा कप्पा ते उघडतीलच. त्याना कोणती कागदपत्रे हवी आहेत ते तिथे बघतीलच. ठीक आहे तर.. तू खांडेकरांच्या ऑफिस मध्ये असल्याचा मला कळलं म्हणून तुला तिथे भेटायला आलो.”  पाणिनी म्हणाला.
 हे वाक्य ऐकल्यावर मात्र धुरीचा चेहरा एकदम बदलला आपल्या सीटवर एकदम ताठ होऊन बसला. 
“काय रे काय झालं एकदम?”  पाणिनीने विचारलं.
“नाही काय नाही. मी फक्त विचार करत होतो, कार मधले ठसे घेतल्यानंतर ते काय करतील? गॅरेजमध्ये सुद्धा ठसे बघतील का?” 
“ते बहुतेक तुझी कार पोलिसांच्या लॅबोरेटरीत घेऊन जातील. ते तुला विचारतील की असं केलं तर तुझी काय हरकत आहे का? कदाचित त्यांनी तुला आधीच विचारल असेल.” 
“हो. बरोबर आहे.” धुरी म्हणाला. 
“मग तू म्हणाला असशील ना, की माझी काही हरकत नाही म्हणून?” 
“हो म्हणालो. म्हणजे तसं म्हणणं भागच पडलं मला. किती वेळ लागेल त्यांना इथे येऊन माझी कार न्यायला?” 
“फार नाही लागणार वेळ ”  पाणिनी म्हणाला.
“ते जाऊदे पटवर्धन, तुम्ही किती  हळू चालवताय कार!  एखाद्या गोगलगायी .सारखी मला पटकन घरी पोहोचायचय.”
“का? एवढी काय घाई आहे?” 
“कारण मी सतत कामात गुंतलेला असतो. तुम्ही आत्ताच उल्लेख केलात की  पोलीस कार मधला क्लीनर समोरचा कप्पा तपासतील, आता मी त्याचा विचार केला तर मला असं आठवतंय की काही महत्त्वाचे पेपर म्हणजे माझ्या व्यवसायासंबंधी तिथे मी ठेवलेले आहेत. पोलिसांना त्याची काही गरजही नाही. आणि त्यांनी ते बघू नयेत असं मला वाटतं. पण पोलिसांनी बघितले की सर्वसाधारण जनतेला ही ती कळतील.”-धुरी 
“तुला मी भेटायच्या अनेक कारणांपैकी हे एक कारण होतच. तुझी कार तपासायची परवानगी तू पोलिसांना द्यायच्या आत मला तुला भेटायचं होतं.”  पाणिनी म्हणाला. 
“तुम्हाला उशीरच झाला मला भेटायला.” चिडून धुरी म्हणाला. 
“बरोबर आहे तू म्हणतोस ते. माझा काही दोष नसताना सुद्धा पोलीस तुला घरी न्यायला आले होते तेव्हा जर तू आग्रह धरला असतास की माझ्या वकीलाच्या उपस्थितीशिवाय मी येणार नाही किंवा कुठल्याही प्रश्नाचे उत्तर देणार नाही तर अधिक बरं झालं असतं आणि तुला माहिती होतं की मी तुझ्या घरी यायला निघालो होतो म्हणून.”  पाणिनी म्हणाला.
“पुढे नीट बघा, एकदम मध्ये गाडी येते आहे आपल्या!” धुरी ओरडला 
“तुला ज्या गोष्टीची काळजी वाटते आहे,   ती गोष्ट तुझ्या गाडीच्या कप्प्यातून आधीच काढून मी माझ्या खिशात ठेवली आहे.”  पाणिनी म्हणाला.
धुरीने चमकून पाणिनीकडे बघितलं. 
“पाच लिटरचा पेट्रोलचा कॅन खरेदी केल्याची पावती.”  पाणिनी म्हणाला.
धुरीचे डोळे एकदम विस्फारले गेले. त्याचे चेहऱ्यावर संशय आणि भीती अशा संमिश्र भावना होत्या. 
“काय उपयोग करणार आहात तुम्ही या माहितीचा?” 
“काही नाही माझ्या काही क्लायंटना मला कधी कधी काही काही शिकवावं लागतं पण तू तर म्हणतोयस की तू एकदम तयारीचा व्यवसायिक आहेस पटापट विचार करू शकतोस. महत्त्वाचे निर्णय तातडीने घेऊ शकतोस. त्यामुळे मला काहीच म्हणायचं नाहीये”
“खरं सांगायचं तर तुम्हाला जे वाटतं तसा त्या त्यांच्या खरेदीच्या रिसीटला काही अर्थ नाहीये."-धुरी 
“अच्छा.” तुटक पणे पाणिनी म्हणाला. 
“एकदा आणि एकदाच बदल म्हणून मला खरं काय ते सांग. तू डॉक्टर बंब यांची सोमवारी रात्री साठी अपॉइंटमेंट घेतली होतीस? तुझी एकट्याची किंवा त्या पांडव आडनावाच्या मुली “बरोबर?”  पाणिनीने विचारलं.
“नाही.” 
“खरंच बोलतोयस तू?” 
“हो” 
“माझा प्रश्न फार महत्त्वाचा आहे लक्षात ठेव.”  पाणिनी म्हणाला.
“ठीक आहे समजा घेतले मी, तुम्हाला वस्तुस्थिती काय ते सांगितलंय आणि आता जरा गप्प बसा मला विचार करू दे. अनेक प्रसंग माझ्या डोळ्यासमोर येतात त्याची मला जरा सांगड घालू दे.” धुरी म्हणाला. 
प्रकरण सात समाप्त 

वाचक हो आपणास माझी कथा आवडत असेल तर आपल्या मित्र नातेवाईक यांनाही कथा वाचायला सांगा. तुम्ही स्वतःही या कथेला फक्त लाईक करू नका  तर कॉमेंट ही करा