कथा क्र. १: "भुतांच्या reels आणि नंदूच्या deals"
भाग २ : नथुचा भूतमय फॅन मिट
पुण्यात परत आल्यावर सकाळची माझी दिनचर्या अगदी बदलून गेली होती. आधी मी डोळे उघडताच चहा किंवा कॉफीचा विचार करायचो, पण आता पहिलं काम म्हणजे फोन हाती घेऊन @Konkan_ghosts_with_jokes ची नोटिफिकेशन्स तपासणं. मोबाईल हातात घेताच टिंग-टिंग-टिंग! असा आवाज यायचा, आणि स्क्रीनवर एकाहून एक भन्नाट कमेंट्स चमकायला लागायच्या. कुणी लिहिलंय – “भाई, तुमच्या डोळ्यांचा स्पार्क इतका भयानक आहे की लाइट बिल वाचेल!”, तर दुसरा म्हणायचा – “भूत असूनही तुमचा sense of humour भन्नाट आहे! Alive असताना इतका कधी हसलो नव्हतो!” काही तर अगदी वेगळेच प्रश्न विचारायचे – “भाई, तुम्ही फिल्टर Snapchat वरून वापरता की ‘आत्मा-शॉप’ मधून?” आणि एकाने तर भन्नाट लिहिलं – “माझ्या ऑफिसच्या डेडलाईनपेक्षा तुमचं हसणं जास्त घाबरवतं!”
मी प्रत्येक कमेंट वाचून हसत-हसत पडायचो, काहींचे स्क्रीनशॉट घेऊन मित्रांना पाठवायचो, तर काहींवर लगेच रिप्लाय द्यायचो. फॉलोअर्स दिवसेंदिवस वाढत होते; कालपर्यंत फक्त गावातल्या आंब्याच्या झाडाखाली दिसणारा नथू आता इंटरनेटवरचा Afterlife Influencer झाला होता. लोक त्याचं कॉन्टेंट बघून चर्चा करत – “हा खरंच भूत आहे की फक्त भारी मार्केटिंग?” आणि नथू मात्र प्रत्येक कमेंट वाचून हसत हसत म्हणायचा – “भाई, जरा रहस्य ठेवलं तरच लोक फॉलो करतात!” एक दिवस अचानक माझ्या फोनवर नथूचा DM आला – "भाई, ताबडतोब निंबुटवाडीत ये. मी एक भुतांचा फॅन मीट ठेवतोय!"मी हसून विचारलं, "अरे भुतांचा फॅन मीट म्हणजे काय? भुतांना पण फॅन असतात का?"तो अगदी उत्साहात – "अरे, जगातल्या वेगवेगळ्या भागातली भुते आलीयेत मला भेटायला – काही कोकणातली, काही थेट UK मधली. एकाने तर ई-व्हिसा काढलाय, immigration वर फक्त धुक्याच्या रूपात गेला!"हे ऐकून मी सरळ गाडी काढली. गावात पोचलो तेव्हा दृश्य भन्नाट होतं. आंब्याच्या झाडाखाली पांढरे-पांढरे, पारदर्शक कपडे घातलेली इंटरनॅशनल भुते उभी होती. कुणाच्या गळ्यात Bluetooth हेडसेट लटकत होता, कुणी DSLR घेऊन फोटो काढत होतं, आणि एक भूत तर Selfie Stick घेऊन फिरत होतं – तो सगळ्यांना पकडून म्हणत होता, “चल भाई, एक afterlife groupfie काढूया!” बाजूला एक चायनीज भूत live translation करत होतं – मराठीतलं भुतांचं बोलणं इंग्रजीत, आणि इंग्रजीचं परत मराठीत. म्हणजे भूत-मीट पण एकदम इंटरनॅशनल लेव्हलचं.
मंचावर नथूने मोठा बॅनर लावला होता – "Konkan Ghosts With Jokes – Meet & Greet (Only Dead Allowed… Humans By Special Invite)".मी "Special Invite" वर आलो होतो, त्यामुळे भुतांनी मला एकदम VIP माणूस समजून वागवलं. एकाने तर माझ्यासाठी खास धुक्याचा थंडावा लावला होता, “मानूस आहे ना… गरम होईल” म्हणून.पहिल्यांदा मंचावर नथू आला, आणि माईक हातात घेऊन म्हणाला –"मित्रांनो, आपण भुतं फक्त घाबरवायलाच नाही, तर हसवायलाही जन्मलोय!"सगळीकडून टाळ्यांचा आवाज झाला.आणि खरं सांगायचं तर, टाळ्यांसारखा ढणढण आवाज, कारण भुते टाळ्या वाजवली की प्रतिध्वनी तीन मिनिटं चालतो. एक तर एवढा हसला की धूर होऊन हवेत उडून गेला. त्याला परत यायला पाच मिनिटं लागली.नंतर Q&A सेशन सुरू झालं. एका पाण्यात राहणाऱ्या जलपरी-भुताने विचारलं, "नथू भाई, तुमचे मेमस एवढे रिलेटेबल कसे असतात?"नथू मिश्कील हसत म्हणाला – "कारण मी डेडलाईन चा प्रॉब्लेम समजतो… तुम्ही लोकांना फक्त वाटतो, आम्ही तर खरोखर डेड आहोत!"हे ऐकून सगळ्या भुतांनी एकत्र “वाऽऽह!” केलं, आणि तो आवाज गावाच्या मंदिरापर्यंत गेला.
पण नथूच्या फॅन मीटमध्ये एक स्पेशल भूत होतं. फुगे पिशाच्च.हे असं भूत की कुणी जरा जास्त हसला, की त्याला फुगा बांधल्यासारखं हवेत उचलून नेतं. तेवढ्यात गावातील पांडू पाटील तिथून जात होता. त्याला इतक्या भुतांचा मेळा पाहूनच धडकी भरली. डोळे मोठ्ठे करून तो किंचाळला –"भूतं आली! पळा रे पळा!"त्याच्या आवाजाने भुतं तर हसली, पण फुगे पिशाच्चाने ‘हास्य सेंसर’ ओळखून थेट पांडूला पकडलं आणि १५ फूट उंच झाडाच्या फांदीवर बसवलं. पांडू तिथे लटकून ओरडत होता."कोणी तरी मला खाली उतरवा, नाहीतर मी वरून म्युनिसिपालिटीवर केस टाकीन!"
गावकरी मात्र त्याला वाचवण्याऐवजी तिकडे लाईव्ह व्हिडिओ करत होते. बाकीची इंटरनॅशनल भुते DSLR घेऊन अँगल बदलून फोटो काढत होती, तर एक UKचं भूत #HauntedFanMeet हा हॅशटॅग लावून Reels बनवत होतं. पांडूला हवेत लटकवलेलं पाहून एक भूत तर म्हणालंच – "हा पांडू तर Premium Content आहे!"
गोंधळ वाढू नये म्हणून नथू लगेच माईक हातात घेऊन आला –"अहो, शांत व्हा! हा पांडू माझा लहानपणीचा मित्र आहे. त्याला घाबरवण्याऐवजी आपण Positive PR करूया!"त्या वेळी कुणीतरी भुतांसाठी ‘स्पेशल चहा’ घेऊन आला – म्हणजे कपात फक्त धूर होता. भुते चहा पीत नसली तरी कप हातात धरून ती भन्नाट फोटो काढत होती. एक कोकणातलं भूत तर Boiling Hot, Just Like My Afterlife! असा Insta कॅप्शन टाकलं. दुसरं एक ब्रिटिश भूत म्हणालं – "ओह डार्लिंग, हा चहा नाही, हा तर Selfie Smoke Filter आहे!"थोड्याच वेळात #चहा_भूत_मीट ट्रेंड व्हायला लागलं. कुणीतरी पांडूचं झाडावरून लटकलेलं आणि भुते ‘पीस’ साइन करत असलेलं ग्रुप फोटो काढलं, आणि तो फोटो पाहून संपूर्ण निंबुटवाडीमध्ये हसण्याचा स्फोट झाला.
फॅन मीट संपायला लागलं, सगळी भुते त्यांच्या-त्यांच्या “मृत्यूच्या” टायमटेबलबरोबर निघायला लागली. कुणी हॉटेलच्या छतावरून उडून गेलं, कुणी जुन्या विहिरीत डाईव्ह मारला, तर एक UK मधलं भूत तर Heathrow च्या दिशेने धुरासारखं निघालं. नथूने माझ्याकडे पाहत मिश्कील हसून म्हटलं,"भाई, पुढच्या महिन्यात ‘आत्म्यांच्या गप्पा’ नावाचा पॉडकास्ट सुरू करतोय. भुतांचं, भुतांसाठी, आणि… अधूनमधून जिवंत लोकांसाठी! पहिल्या एपिसोडला तूच गेस्ट."
मी हसत म्हणालो, "ठीक आहे, पण रेकॉर्डिंग दिवसा कर बरं का… रात्री माझं नेटवर्क भुतांसारखंच दिसतं, पण चालत नाही!"नथूने लगेच नोट्स घेतल्या, “ठीक आहे, दिवसा… आणि स्नॅक्स ठेवू का?”मी: “हो, पण तुमच्यासाठी धूर फ्लेवर्ड, आणि माझ्यासाठी गरम भजी!”
गावात परत एकदम शांतता आली होती, पण Instagram अजूनही #HauntedFanMeet ने गजबजलेलं होतं. एक व्हिडिओ तर जबरदस्त व्हायरल झाला होता. फुगे पिशाच्च पांडू पाटलाला झाडावरून खाली सोडत होता, आणि पार्श्वसंगीतात कोणी तरी “ये दोस्ती हम नहीं तोडेंगे” वाजवलं होतं.
आता नथू फक्त गावातलं भूत नव्हतं – तो Afterlife Celebrity झाला होता. म्हणे लवकरच त्याला “भूतांचे ऑस्कर” मध्ये Best Friendly Spirit चा अवॉर्ड मिळणार आहे. आणि मी? मी विचार करत होतो, “च्याआयला, पुढच्या वेळी जर मी त्याच्या शोला गेलो, तर मोबाइल चार्जर तरी घेऊन जाईन!” 😄
समाप्त
-अक्षय वरक