कथा क्र.०५: बायकोचा मेकअप
माझं नाव गोट्या सावळे. गावात मला कुणी नावानं नाही हाक मारत, सगळे “गोट्या फजित्या” म्हणूनच ओरडतात. कारण माझं आयुष्य म्हणजे रोजचा नवा तमाशा, आणि त्यातली मुख्य नायिका म्हणजे माझी बायको. माझ्या घरातली कायमची नाटक कंपनी.
आता ही बाई नेहमी एकच गप्पा मारते —“मी अजूनही कॉलेज मुलगी दिसते हो!”मी लगेच उडवतो —“अगं, कॉलेजचं नाही, तू आता गावच्या शाळेचं playground दिसतेस."
ते ऐकताच ती डोळे वटारते, कमरेवर हात ठेवते आणि full heroइन मोडमध्ये म्हणते —“तुला काय कळतं? शिल्पा शेट्टी बघ, दोन मुलं असूनही धडधाकट झकास दिसते!”
मी हळू आवाजात पुटपुटलो —
“हो गं, पण तिचा नवरा राज कुंद्रा आहे…आणि माझा प्रकार राज कुंडकर आहे!”
गावात नवरात्राची जत्रा होती. सकाळपासून बायकोचा एकच गजर चालू होता,"आज मी भारी heavy मेकअप करून येणार. गावातल्या बायका थक्क व्हायला हव्यात!"
मी मनाशी पुटपुटलो ,"थक्क? अरे, गावकरी तर दचकतील. तुझा मेकअप म्हणजे थेट नागीण सिरियलचा repeat telecast. लोक भजनी मंडळात झांजा सोडून पळतील!"
ती पार्लरला गेली. माझ्या छातीत शंभर वाट्या चहा उकळला तरी इतकी काळजी झाली नसती. दोन तासांनी परत आली…
देवा देवा! दार उघडलं आणि माझ्या घरात नवं प्रेतच उभं राहिलंय की काय असं वाटलं.
गाल एवढे गुलाबी की, गावच्या काकाच्या शेतातले ताजे भोपळे पण लाजून मागे सरकले असते.
ओठ एवढे लाल की, गाईनं दुध देणं थांबवायचं बाकी ठेवलं. म्हशीच्या डोळ्यातही प्रश्न,“आपण दूध देतोय की लिपस्टिकच्या कारखान्यात काम करतोय?”
डोळ्याभोवती काजळ एवढं घट्ट की, गावातल्या गव्हाच्या पोत्यात काळा कावळा हरवून गेला तरी शोधून काढता येईल.
केसांची स्टाईल बघून वाटलं, “गावातली वीज गेली तर हिच्या डोक्यावर टॉर्च लावून गाव उजळेल.”
मी दारात थबकलो. तोंडाला काहीच आवाज फुटेना. शेवटी थोडं धैर्य गोळा करून विचारलं —"बाई, कोण आहेस तू? माझ्या घरात कसली heroine शिरली? बायको कुठं गेली? तिला पार्लरवालीनं कुठे लपवून ठेवलंय का?"
ती full attitude मध्ये कमरेवर हात ठेवून म्हणाली,"गोट्या, मीच आहे तुझी बायको!"
मी डोकं खाजवत अडखळलो —"अगं, तू माझी बायको आहेस की लोकल नाट्य मंडळाची नायिका आहेस? सरळ सांग, आज कोणत्या नाटकात नाचायचंय? 'नागीण', 'भूताचा बदला' की 'रंगपंचमी एक्सप्रेस'?"
बाहेर गडबड ऐकून मी दार उघडलं तर अंगणात अर्धा गाव जमला होता. लोकांना वाटलं सावळे काकू पार्लर करून नाही, थेट “भूतांच्या स्पर्धेत” भाग घ्यायला आली आहे.
पहिलाच शेजारी, भिंगाऱ्याचा पाटील, मोठ्याने हसून म्हणाला –"अरे गोट्या, बायकोनं रंगपंचमी लवकरच केली दिसते! एवढ्या लाल रंगात गावातली झेंडे फिके पडले."
मग दुसरा, हरबा पवार, मोबाईल काढून फोटो काढायला लागला. म्हणाला –"अरे, ही सावळे काकू नाही रे, ही तर INSTAGRAM वरची ‘लाल परी’ आहे! आता हिला फॉलो करायला अर्धं गाव account उघडेल."
तिसरा, बंड्या, खुसखुसत म्हणाला –"गोट्या, आता तुला धोका आहे. रात्री झोपताना चुकून बायकोला भूत समजून उडी मारशील, आणि गावातले लोक म्हणतील, ‘सावळे घरात भूताची शिकार झाली.’"
चौथा, म्हसोबा चौगले, डोळे मिचकावून म्हणाला –"अरे गोट्या, एवढं लालपान पाहिलं की मला वाटलं ग्रामपंचायतीच्या भिंतीवर पेंट मारलंय. एवढ्या रंगात बायको आहे की बॅनर, ओळखूच येईना."
पाचवा, वामन शिंदे, पोट धरून हसत म्हणाला –"गोट्या, बायकोनं इतका मेकअप केलाय की गावातल्या बैलालाही शंका येईल, ही माणूस आहे की आमच्या जोताचा नवा जोडीदार?"
लोक हसत हसत लोळले. कुणी गुडघे आपटतंय, कुणी डोळ्यातून पाणी पुसतोय.
मी बिचारा मध्येच उभा. शेवटी हात जोडून म्हटलं –"मित्रांनो, ही माझीच बायको आहे. पण आजच्या मेकअपने ती ‘बायको’ नाही, थेट ‘बायकॉम्बो’ झालीये – horror plus comedy एकदम मिळून!"
गावातल्या मंडळींनी एवढा दणका मारून हसला की शेजारच्या विहिरीतलं पाणी पण हादरलं.बायको मात्र तिथेच उभी, डोळे लाल करून जळत होती. दिसायला ती आधीच ‘लाल परी’, त्यात रागाने आणखी पेटली – थेट ‘लाल राक्षसी’ झाली.
आम्ही नवरात्राच्या जत्रेला गेलो. बायको full confidence मध्ये होती. चेहऱ्यावरचा मेकअप आणि चालण्यात तो “catwalk” असं काही करत होती की, मला वाटलं “गावातल्या गाई-बैलांचं प्रदर्शन सुरू झालंय का?”
तिला वाटलं, लोक तिच्याकडे कौतुकाने पाहतायत.पण खरं काय? लोकांची पोटं धरून हसून अवस्था झाली होती.
कुणी म्हणालं – “ही बाई आहे की दिवाळीचा फटाका? फोडल्यावर रंग उडणार का काय?”
दुसरा हसत म्हणाला – “गोट्या, तुला एवढं धाडस कुठून आलं? अशी रंगवलेली बाई हाताशी ठेवलीस! मी असतो तर शेजारी बसायलाही घाबरलो असतो.”
तिसरा तर थेट चौकात ओरडला – “गोट्याची बायको आलीये की mobile वरचा new filter चालू करून आलिये?”
एक लहान पोरगं आईला विचारत होतं – “आई, ही मावशी आहे का circus मधली जादुगार बाई?”
मी एवढा हतबल झालो की, मला वाटलं जमिन फाटून आत जावं. पण जमिनीनेही म्हटलं असावं – “गोट्या, आज तुझं वजन मी उचलणार नाही, तू वरच उभा राहा.”
मी थरथरत्या आवाजात बायकोला म्हटलं –"बाई, हे मेकअप-शेकअप सोड. तू जशी आहेस तशीच छान आहेस. नाहीतर गावात माझीच फजिती होते, लोक मला ‘गोट्या नव्हे, बायकोचा बळीचा बकरा’ म्हणतील.”
बायकोने लगेच डोळे वटारून, हात कमरेवर ठेवून विचारले–"गोट्या, खरं सांग, मी heroine दिसतेय की नाही?"
मी डोकं खाजवत, पोट धरून हसणाऱ्या लोकांकडे पाहिलं आणि सावकाश उत्तर दिलं –"हो गं, heroineच दिसतेस… पण कोणत्या सिनेमातली ते सांगता येत नाही. बहुतेक horror-comedyच!"
लोकांनी असा गडगडाटी हशा केला की जत्रेतल्या ढोल-ताशांचा आवाजही त्यात हरवून गेला.
त्या दिवशी गावभर माझी फजिती झाली खरी. कोण भेटलं की विचारत होतं ,“गोट्या, बायकोला कुठल्या चित्रपटाच्या ऑडिशनला पाठवलंस का?”
मी चेहरा लपवून इकडे-तिकडे पळत होतो.
पण एक गोष्ट मात्र मनाशी ठरवली –बायकोवर प्रेम केलं की ती आपोआप सुंदर दिसते.जास्त मेकअप केला की सौंदर्याचं काही खरं राहत नाही, फक्त नवऱ्याची फजिती एक्सप्रेस गावभर धावत सुटते.
आणि म्हणून मी आजवर जेवढे शहाणपणाचे धडे घेतलेत, त्यातला मोठा धडा हा –"बायकोला कधीच जास्त मेकअप करायला प्रोत्साहन द्यायचं नाही… नाहीतर गावात गोट्याच्या ‘कॉमेडी सर्कशीत’ नायक मी आणि विदूषकही मीच ठरतो!"
समाप्त
-अक्षय वरक