Teen Jhunzaar Suna - 28 in Marathi Fiction Stories by Dilip Bhide books and stories PDF | तीन झुंजार सुना. - भाग 28

Featured Books
Categories
Share

तीन झुंजार सुना. - भाग 28

              तीन झुंजार सुना

श्रेय  

मुखपृष्ठ चित्र               सौ. शिल्पा पाचपोर

लेखनास सहाय्य               डॉ. अनंत बिजवे

                           Adv. आनंद मुजुमदार.           

पात्र  रचना

 

श्रीपति पाटील                     कुटुंब प्रमुख, प्रगतिशील शेतकरी

यमुनाबाई.                        श्रीपतरावांची बायको

प्रताप                            श्रीपतरावांचा मोठा मुलगा

निशांत                           श्रीपतरावांचा मधला मुलगा

विशाल                           श्रीपतरावांचा धाकटा मुलगा

मेघना                           श्रीपतरावांची मुलगी

सरिता                           प्रतापची बायको.

वर्षा                             निशांतची बायको

विदिशा                           विशालची बायको.

वासुदेवराव सुळे                    वर्षाचे वडील

विजयाबाई                        वर्षांची आई.

शिवाजीराव                        विदिशाचे  वडील

वसुंधराबाई                        विदिशाची आई  

आश्विन                          प्रताप आणि सरिताचा मुलगा

बालाजी आणि सदा                 शेत मजूर  

बारीकराव                         शेत मजूर

कृष्णा आणि राघू                  शेत मजूर

दाजी, रखमा आणि सुरेश            गोठ्यांची व्यवस्था पहाणारे मजूर.

रावबाजी                          ठेकेदार. बटाईदार.

रघुवीर आणि त्यांची गॅंग            परदेशी मजूर.

 

 

 

भाग २८         

भाग २७ वरून पुढे वाचा .................

अर्ध्या तासाने विदिशा आली, दिवस भराचा आढावा घेतल्यावर, सरिता म्हणाली की –

“बोल वर्षा, तुला काही महत्वाच्या विषयांवर चर्चा करायची होती ना ?”

“वहिनी, बाबांना बोलावू का ? ते असले तर बरं होईल असं मला वाटतं.” – वर्षा.

विदीशाने जावून बाबांना बोलावून आणलं. ते आले. म्हणाले “काय खास आहे, असा कोणता जटिल प्रश्न आहे की ज्यावर तुम्ही तिघी एका ठिकाणी बसून निर्णय घेऊ शकत नाही ?”

“हो बाबा, एक वेगळाच प्रश्न निर्माण झाला आहे.” वर्षा म्हणाली “ आता आपण पूर्ण तीस एकर शेती कसणार आहोत, त्या अनुषंगाने बरेच प्रश्न उपस्थित झाले आहेत आणि त्यावर उत्तरं शोधायची आहेत. आणि त्याच बाबींमधे आम्हाला तुमचा सल्ला हवा आहे.”

“काय ग सरिता, तुला पण अडचण आली आहे ? आश्चर्य आहे. सांगून टाक, मी आलो आहे.

“बाबा,” सरिता बोलली “मी पण तुमच्या इतकीच अनभिज्ञ आहे. मलाही काही माहीत नाहीये. वर्षांच सांगेल आता, काय प्रॉब्लेम आहे ते.

वर्षांनी बोलायला सुरवात केली. “मागच्या वर्षी आपण फक्त ५ एकर शेती सांभाळली. त्याचा सुरवातीचा सर्व खर्च बाबा, तुम्ही उचलला. आपण त्यात यशस्वी झालो, उत्पन्न पण मिळालं. पहिल्या वर्षी सगळ्यात जास्त खर्च होतो तो land preparation वर. आता त्या ५ एकरांवर हा  खर्च नाहीये, पण २० एकरांवर तर तो करावाच लागेल. दुसरं म्हणजे, बी, बियाणे, खतं, फवारणी वगैरे, यावरचा  खर्च मागच्या वर्षी तर आपण झेलला. पण या वर्षी तो आता चौपट – पांचपट होणार आहे. हा खर्च भागवण्यासाठी  पैशांची तजवीज करावी लागणार आहे. ती कशी करायची, यासाठी ही बैठक बोलावली आहे.”

“जिल्हा बँके कडे अर्ज करा लोन साठी,” – बाबा.

“बाबा मी त्याचा विचार केला, पण त्याला वेळ लागतो आणि आपल्याजवळ तेवढा वेळ नाहीये. परत तिथे बऱ्याच जणांचे हात ओले करावे लागतात, असंही ऐकलं आहे. ते काही आपल्याला जमायचं नाही. दूसरा एखादा उपाय सुचवा ना.” वर्षा म्हणाली.

“माझी तर सगळी गंगाजळी तुमचीच आहे, पण ती पुरेशी पडणार नाही. बँके कडे तर जायचं नाही, मग एकच मार्ग उरतो. तो म्हणजे बाहेरून कर्ज घ्यायचं. पण त्यात एक धोका आहे. त्यांचा व्याज दर अचाट असतो. कमावलेला सर्व पैसा तेच  खाऊन जातील, मग एवढा प्रपंच करायचा कशाला ? साधी शेती काय वाईट आहे ?” – बाबा.

तिघी जणी जागच्या जागी थिजल्या. बाबा असं काही बोलतील याची कोणीच कल्पना केली नव्हती. साधी शेती करायची ? म्हणजे सपशेल माघार घ्यायची ? सर्वांच्याच मनात हे प्रश्न आले. तिघी जणी आ वासून बाबांकडे पहातच राहिल्या.

“अरे, असं भूत बघितल्या सारखं, काय बघताय माझ्या कडे ?” – बाबा.

“बाबा, तुम्हीच आम्हाला हिम्मत दिलीत ना, तुम्हीच आम्हाला लढायला शिकवलं ना, तुम्हीच म्हणता ना की या माझ्या तीन झुंजार सुना आहेत, वाघिणी आहेत, म्हणून. मग आजच  आमच्यावर असलेला तुमचा विश्वास ढासळला का ? एकदम साधी शेती करा म्हणालात, ते का ? एकदम अशी सपशेल माघार का ?” सरिता कळवळून म्हणाली. तिचे डोळे ओले झाले होते आणि स्वर जड झाला होता.

“तुझे आहे तुज पाशी, परी तू जागा चुकलासी.” – बाबा.

सरिता आणि वर्षा काहीच न कळल्यामुळे बाबांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत राहिल्या. पण काही क्षणानंतर विदिशा मोठ्याने म्हणाली  “युरेका युरेका”

वर्षांनी विचारलं “युरेका काय ? काय कळलं आहे तुला ?”

“निशांत आणि विशाल. त्यांच्या कडे भरपूर साठवलेला पैसा आहे. तो घ्यायचा. प्रॉब्लेम मिटला.” – विदिशा म्हणाली. ती आता हसत होती.

“ए, आरशात तोंड बघ, ही चिकट माणसं मुळात कबूलच करणार नाहीत की त्याच्या जवळ पैसे आहेत, आणि ते ही लाखों रुपये, आहेत म्हणून. आणि केलं कबूल, तरी ते आपल्याला देणार नाहीत बघ.” वर्षा म्हणाली.

“हे बघ” विदिशा म्हणाली “ शस्त्र सामग्री कुठे ठेवली आहे हे आता आपल्याला कळलं आहे. ती आता फक्त हस्तगत करायची आहे. ती करू.” – विदिशा उत्साहाने म्हणाली.

“हूं, तुझ्या बोलण्यात दम आहे पण काम खूप अवघड आहे, एक वेळ विशाल तयार होईल पण निशांत! No way. पैशांसाठी काहीही करेल तो.” वर्षा बोलली.

“अग, तेच तर करायचं आहे आपल्याला.” विदिशा म्हणाली.

“विदिशा, कधी कधी तू न, फारच गूढ  बोलतेस, काही प्रकाश पडत नाहीये बघ डोक्यात. Please elaborate.” सरिता म्हणाली.

“निशांतला बॅलन्सशीट वाचता येते का ?” विदिशा.

“माहीत नाही.” – वर्षा.

“मग तर आपलं काम अजूनच सोपं झालं आहे. तू असं कर. मागच्या वर्षीची बॅलन्सशीट तू तयार केलीच आहेस ना, मग त्याच आधारावर येत्या वर्षांची अनुमानित बॅलन्सशीट तयार कर. आणि त्यात भरपूर प्रॉफिट दाखव. आणि हे दोन्ही रिपोर्ट त्याला अश्या रीतीने नीट समजावून सांग की त्याला पैसे गुंतवण्याचा मोह पडलाच पाहिजे. त्यानी निर्णय घेतला की विशाल डोळे झाकून मागे मागे येईल. सिम्पल.” विदिशांनी तिची कल्पना सविस्तर सांगितली.

“अग पण तो माझ्या शब्दावर विश्वास ठेवेल का ? तो म्हणेल की तुम्ही सगळे सामील आहात आणि त्याच्या पैश्यांवर आपला डोळा आहे म्हणून.” वर्षानी शंका काढली.

“अरे, don’t worry वर्षा मॅडम, मी सांगेन घरी गेल्यावर, तशी आयडिया कर. आणि बघ गंमत, सगळं आपल्या मनाप्रमाणे होईल.” विदिशा आता खूपच कॉन्फिडन्ट होती.

“ठीक आहे, मग आता तुम्ही बाहेर जा. मला आकडेमोड करू द्या. अनुमानित बॅलन्सशीट बनवण्यासाठी. ती घेऊनच घरी जाऊ आज.”  वर्षा पण आता उत्साहाने म्हणाली.

विदिशा, सरिता आणि बाबा बाहेर अंगणात आले.

“मी जरा जाऊन येते, बघते रामशरण किती शिकला ते. नांगरणी करण्याइतपत तयार झाला आहे का ते बघायला हवं. आजचा दिवस तर वाया गेला.” विदिशा म्हणाली आणि शेता कडे गेली.

“सरिता” बाबा म्हणाले “तुझ्या या दोन्ही जावा रत्न आहेत रत्न. छान जोडीदार मिळाल्यात तुला. दोघींच्याही कष्टाला सीमा नाही. तुमची टीम आश्चर्यकारक रिजल्ट्स मिळवून दाखवतील याबद्दल खात्री आहे मला. खूप प्रगती करा. आमचा आशीर्वाद आहे तुमच्या पाठी.” बाबा जरा भावनाविवंश झाले. संध्याकाळ होत आली होती आणि मजूर आता परतत होते. विदिशा पण आली.

“काय ग, काय प्रगती आहे ?” सरितानी विचारलं.

“उत्तम, मला वाटलं नव्हतं, पण आजच अर्ध अधिक शेत नांगरून झालं आहे. रामशरण छान आणि व्यवस्थित चालवतो आहे. लवकर आत्मसात केलं त्यांनी.” विदिशा म्हणाली.

वर्षा अजूनही आत काम करत होती. सदाच्या बायकोनी मग सगळ्यांच्या साठी चहा आणि पोहे आणले. थोड्या वेळाने वर्षा पण बाहेर आली.

“चला. झाली सर्व तयारी. आता कोंडाणा जिंकायचा आहे. हर हर महादेव.” – वर्षा

“छान, आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं.” – बाबा म्हणाले.

निशांत चा फोन आला. “काय ग झालं की नाही काम ? घरी केंव्हा येणार ?”

आम्ही कसं येणार ? आमच्या जवळ वाहन नाहीये. तुमचीच वाट बघतो आहे.” वर्षा म्हणाली.

“का ? स्कूटी असेल ना तिथे ?” – निशांत.

“हो हो, विसरलेच की मी. ओके. निघतोच आम्ही. कामं झाली आहेत चहाच पितो आहे. झाल्यावर लगेच निघतो.” – वर्षा.

“बरं तुमची तयारी पूर्ण झाली आहे ना, का नुसताच हर हर महादेव चा नारा.” – बाबा.

“मला माहीत नाही, विदिशा टयूशन घेणार आहे माझी. आणि तिला पूर्ण कॉन्फिडंस आहे आता रिजल्ट आल्यावरच कळेल, टयूशनचा  काय परिणाम झाला आहे ते.” – वर्षा.

“काय ग विदिशा, काय म्हणतेय वर्षा, मग सर्व प्लॅनिंग तयार आहे ना तुझं ? नाही तर ऐन वेळी घोटाळे करशील.” – बाबा

“बाबा, तांत्रिक बाजू वर्षांनीच सांभाळायची आहे. त्यातलं मला काही कळत नाही. मी फक्त emotional blackmail कसं करायचं ते सांगणार आहे.” विदिशा म्हणाली.

सरिता हसली. म्हणाली “ चालू द्या, चालू द्या यश घेऊन या म्हणजे झालं.”

 

क्रमश:..

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

धन्यवाद.