Bolka Vruddhashram - 5 in Marathi Women Focused by Ankush Shingade books and stories PDF | बोलका वृद्धाश्रम - 5

Featured Books
Categories
Share

बोलका वृद्धाश्रम - 5

        

             स्नेहलचं घर जवळ आलं होतं. तसे रात्रीचे साडेनऊ वाजले होते. स्नेहलनं घराच्या अगदी जवळच गाडी थांबवायला लावली होती. त्यानंतर ती उतरली. तिनं त्याला बाय केलं. वाटत होतं की आज त्याच्यापासून विलगच होवू नये. परंतु विचार होता. विचार होता की आपल्या मायबापाला न विचारता कसं विलग व्हावं. म्हणूनच ती आपल्या घरी गेली होती.
         स्नेहल घरी गेली. तशी वेळ झालेली पाहात बऱ्याच वेळेपासून चिंतीत असलेली आई तिला विचारायला लागली. 
         "बाळ, वेळ कसा झालाय एवढा?"
         "आई, मैत्रीणीच्या घरी कार्यक्रम होता. त्यात वेळ लागलाय. तसं मी सांगीतलंही होतं की वेळ लागेलच. परंतु आता आले ना घरी."
         स्नेहल आईशी खोटं बोलली होती. तिनं आपल्या आईलाच फसवलं होतं. ते तिलाही माहित होतं. आता ती दर सुट्टीच्या दिवशी कोणतं ना कोणतं कारण सांगून घरुन निघून जात असे व ती स्वानंदसोबत बागबगीचे हिंडत फिरत असे. कारण होतं, तिला स्वानंदमध्ये निर्माण झालेलं प्रेम. आज तिला राहावलं जात नव्हतं. त्यातच तिला त्याचेशी केव्हा केव्हा आपला विवाह होतो, असंही वाटत होतं. अशातच तिनं एक दिवस तीच गोष्ट आपल्या आईला सांगितली व शपथ दिली की तिनं तिच्या वडिलाला ती गोष्ट सांगू नये. नाहीतर ती तिचं मेलंलं शरीर पाहणार. कारण तिचे वडील हे हार्टच्या आजारानं ग्रस्त होते. वाटत होतं की कदाचित तिचं प्रेमप्रकरण व तेही आंतरजातीय प्रेमप्रकरण माहित होताच वडील एका झटक्यानं मरतील. 
          ती स्नेहलची आई. ती भावूक होती. शिवाय तिला स्नेहलनं शपथ दिली होती की तिनं तिच्या वडिलांना त्याबद्दल सांगू नये. जे बोलणं तिच्या आईनं लपवलं होतं. परंतु ते बोल तिच्या मनात काट्यासारखं चुभत होतं. वाटत होतं की तिही आपल्या पतीला फसवतेय. परंतु उपाय नव्हता. कारण तिलाही स्नेहलसारखी भीती होती की तिचे पती हा धसका सहन करणार नाहीत व ते देवाघरी निघून जातील.
           स्नेहल आईवडीलांची एकुलती एक मुलगी. तिचं आईवडीलांवर निरतिशय प्रेम होतं. ती त्यांना धोका देवू पाहात नव्हती. ना ही तिला आईवडिलांचा विश्वासघात करायचा होता. म्हणूनच ती पळूनही जात नव्हती. कधी वाटायचं की स्वानंदसोबत पळून जावं आईवडिलांना न सांगता. परंतु जर ती पळून गेली तर आईवडील दोघांनाही आपण मुकू. असंही तिला वाटत होतं.
          स्नेहलचं ते स्वानंदसोबत असलेलं प्रेम. ते प्रेम फक्त तिच्या आईला माहित झालं होतं. त्या प्रेमाचा आता वडिलांपेक्षा आईनंच जास्त धसका घेतला होता. ज्यात तिच्यासमोर दोन प्रश्न होते. पहिला प्रश्न म्हणजे तिचं जात सोडून दुसऱ्याच जातीच्या पुरुषावर असलेलं प्रेम व दुसरा प्रश्न होता पतीच्या हार्ट फेलचा. तिला चिंता वाटत होती. शेवटी त्या चिंता तशाच ठेवून ती मनातल्या मनात झुरत होती. ज्यातून तिला अन्न गोड लागेनासं झालं होतं व ती दिवसेंदिवस सूकत चालली होती. आज ती अंथरुणालाही खिळली होती व डॉक्टरांनी घोषीत केलं होतं की ती लवकरच जग सोडेल.
          असाच तो एक काळा दिवस उजळला. तो तिच्या आईच्या जीवनातील शेवटचा दिवस होता. त्या दिवशी स्नेहलच्या आईची प्रकृती थोडी जास्तच होती. ज्यामुळं तिचे बाबा कामावर जायचे घरीच थांबले होते. तसा काळ आला.
           स्नेहलच्या आईचा काळ आला होता. तसं तिच्या आईनं तिला व आपल्या पतीला जवळ बोलावलं. तिनं स्नेहलचा हात आपल्या पतीच्या हातात दिला व ती बोलू लागली.
          "स्नेहलचे बाबा, मी काय म्हणतो ते जरा नीट ऐका. मी काही जगू शकणार नाही. तेव्हा माझ्यानंतर एक गोष्ट कराल. या स्नेहलचा हात पिवळा कराल अन् तसं करतांना जात पात पाहू नये. तसं मला आश्वासन द्या. मगच मी सुखानं मरु शकेल."
          स्नेहलचा हात तिच्या वडिलांच्या हातात होता. अगदी काकूळतीनं ती बोलत होती. तसं तिनं म्हटलेले शब्द त्यांच्या कानातून चिरुन गेले व त्यांनी तसं आश्वासन आपल्या प्रिय पत्नीला दिलं. त्यानंतर त्यांनी स्नेहलचा हात आपल्या हातातून मोकळा केला. 
           आज तीन दिवस झाले होते. वाटत होतं की तिची आई आज बरी झालेली आहे. ती चांगली बोलायला लागली होती. तशी ती अंथरुणावरच होती. तसा तिच्या पतीला विचार आलाच होता. आपल्या पत्नीला असं अचानक झालं तरी काय असावं. ज्याच्यामुळं तिची अचानक तब्येत बिघडली. ते विचारच करीत होते. तोच स्नेहल धावत आली. म्हणाली, 
          "आईला श्वास भरुन आलाय. आता तिला ताबडतोब डॉक्टरकडे न्यावं लागतेय."
          ते स्नेहलचे शब्द. त्यावर विश्वास करीत तिचे वडील धावतच आपल्या पत्नीजवळ गेले. त्यांनी पाहिलं की आपल्या पत्नीची प्रकृती जास्तच खराब झालेली आहे. त्यांनी त्यावर उपाय म्हणून तिला रुग्णालयात भरती करायचं ठरवलं. त्यांनी ताबडतोब रुग्नवाहिका बोलावली व त्या रुग्णवाहिकेत तिला टाकून रुग्णालयात नेलं. परंतु घात झाला. रुग्णालयात डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केलं होतं.
          न बिघडणारी आईची प्रकृती. ती अचानक बिघडली व लवकरच आई या जगतातून निघून गेली. त्याचं दुःख झालं होतं स्नेहलला. ती का मरण पावली असेल. हेही तिला कळेनासं होतं. मात्र आज तिच्यावर एक प्रकारची जबाबदारी आली होती. 
        आई मरणाची दुःखद बातमी. ती बातमी रुग्णालयातील डॉक्टरांनी तिच्या वडिलांना सांगताच तिच्या वडिलांनी आपल्या प्रिय पत्नीला घरी आणलं. तिचा अंत्यविधी उरकवला. मात्र त्यांना सदमा जरी पोहोचला असेल तरी ते दुःख चेहर्‍यावर त्यांनी दिसू दिलं नाही. त्याचं कारण होतं स्नेहल. त्यांना वाटत होतं की आपण जर असे दुःखी राहिलो तर स्नेहलचं कसं होणार. तिची हिंमत खचेल. त्यामुळंच ते स्वतःच्या मनात दुःख न दाखविण्याचा प्रयत्न करीत असत.
        स्नेहलचे वडील नित्यनेमानं कामावर जात होते. तिही त्यांचा आणि आपला स्वयंपाकपाणी करुन आपल्या नोकरीवर जात असे. तिचे वडील कामावरुन सांजच्याला सात आठ वाजता घरी येत असत. तिही सांजच्याला पाच सहा वाजता घरी येत असे. तसं पाहिल्यास वडील रविवार असो की तिच्या सुट्टीचा दिवस. ते कामाला जात असत. अन् तिला मात्र सुट्टी मिळत असे. त्यामुळंच तिला आता स्वानंदला भेटण्यासाठी रान मोकळं झालं होतं. आता ती रविवार व सुट्टीच्या दिवशी स्वानंदसोबत बागेत फिरायला जात असे. कारण आता तिला टोकणारं कोणीच नव्हतं.
          स्वानंद व स्नेहलचं प्रेमप्रकरण जोरात सुरु होतं. तसं पाहिल्यास तिला पाहायलाही कोणी येत नव्हतं. कारण बऱ्याचशा तिच्या वयातील मुलींचे विवाह होवून गेले होते. शिवाय हुंडापद्धती व थाटामाटात लग्न करण्याच्या प्रक्रियेनं कोणीही राजबिंडा तिला गवसत नव्हता. 
        स्नेहलच्या वडिलांनाही आपल्या मुलीच्या विवाहाबद्दल काळजी वाटत होती. त्यांनाही वाटत होतं की तिचा विवाह व्हावा. तिचेही दोनाचे चार हात व्हावे. परंतु असे कोणी तिला मागणी घालणारे त्यांना गवसत नव्हते. अशातच एक दिवस स्नेहलला तिच्या वडिलांनी विवाहाबद्दल विचारलं,
         "बेटा, आज तुझी आई जीवंत असती तर किती बरं झालं असतं."
          "असे काय बोलता बाबा? आई काय माझ्या जन्माला पुरली असती."
         "तसं नाही बेटा, मला वाटते, तुझ्या विवाहाचा प्रश्न मिटला असता."
          "मग आता काय झालं? माझा विवाह नाही झाला तर काय होणार? मी राहिल अशीच एकटीच."
           "असं नको बोलूस. अगं एकट्यानं जीवन कापणं लय कठीण गोष्ट आहे. तुला आता कळत नाही. तू अजून लहान आहेस."
         "मग समाजातील मुलगा नाही गवसला तर मी आंतरजातीय विवाह करेल. मग तर झालं."
         "नाही बेटा. असं नको बोलूस."
          "मग काय बोलू बाबा? तसा एखादा मुलगाही मला गवसायला हवा ना. आपण पाहतोच ना की माझ्याशी विवाह करायला कोणीच येत नाही आहेत. कारण आपली परिस्थिती. आपल्याजवळ पैसे नाहीत ना. आपण गरीब आहोत ना. म्हणूनच कोणी फिरकत नाहीत आपल्याकडे. अन् आपल्या समाजात हुंडा आहे ना लय मोठा. अन् त्यांना थाटामाटात लग्नही हवं. काय ही हुंडा पद्धती अन् काय हे लग्न? ही हुंडा पद्धती बंदच व्हायला हवी. अन् थाटामाटात लग्नही. आता ज्यांच्याजवळ पैसे नाहीत, त्यांच्या मुलीनं कसं लग्न करावं? तिनं का कुवारंच राहावं की काय?"
          "ती आपली प्रथा आहे बेटा. प्रथेनुसार लग्न केलं तर समाजात आपली इज्जत बनून राहाते."
         "कशाची इज्जत बाबा. अहो, समाजातील ही विवाहाची बंधनं. या जाचक अटी. शिवाय जावयाला वरवर करणारी ही परंपरा. वधुपित्याची नेहमीच खाली राहणारी मान. मुलीच्या शिकण्याला व आई वडिलांच्या शिकविण्याला काहीच किंमत नाही. बिचारे राब राब राबतात. आपल्या मुलींना लहानाचं मोठं करतात. शिकविण्यालाही पुष्कळ पैसा लावतात. अन् तरीही नशिब उजळत नाही मुलींचं. विवाह करतांना हुंडा लागतो अन् थाटामाटात लग्न करावं लागतं. बाबा, समानतेच्या गोष्टी करणारा आपला समाज. म्हणतो की स्री समान आहे. मग स्रियांनीच का द्यावा हुंडा. एखादी मुलगी गरीब असल्यास तिला हुंडा म्हणून पुरुषांनी मदत करु नये काय?"
         "बेटा, तुझं बरोबर आहे. परंतु......"
         "परंतु काय बाबा? हे समाजानं नियम बदलायला हवेत. नाहीतर आंतरजातीय विवाहाला तरी मान्यता द्यायला हवी समाजानं."
          "तसं नाही बेटा. आंतरजातीय विवाह करणे बरोबर नाही. त्यानं संस्कार तुटतो. समाजातील विवाहाचे नियम तुटतात. सर्वचजण असेच बोलत गेले तर जात हा विकल्प राहणार नाही. जात नष्ट होईल. ती टिकणार नाही. अन् जात आहे, म्हणून आपण सुरक्षीत आहोत. नाहीतर कोणीही येवून आपल्यावर अत्याचार केला असता. माहित आहे बेटा, जात जेव्हा बनवली गेली. तेव्हा कामंच पाहिल्या गेली होती. कामालाच प्राधान्य दिलं गेलं होतं. अन् कोणीही कोणतीही जात धारण करु शकत होता. परंतु संरक्षण नव्हतं. कोणत्याही जातीतील पुरुष कोणत्याही जातीतील महिलांवर अत्याचार करीत होता. परंतु जेव्हा एका जातीतून दुसऱ्या जातीत पलायन करणं बंद झालं. तेव्हा खऱ्या स्वरुपाचं जातीतील आयाबहिणींना संरक्षण मिळालं. आता कोणीच कोणावर अत्याचार करीत नाहीत. जातीवर तर नाहीच नाही. म्हणूनच जात महत्वाची आहे व जात टिकविण्यासाठी जर जातीतील माणसांना हुंडा द्यावा लागला व थाटामाटात विवाह करावा लागला तरी लोकं ती प्रक्रिया करतातच. परंतु तुमच्या पिढीला काय कळणार ते बेटा. तुम्ही अजून लहानच आहात. जेव्हा तुम्ही माझ्याएवढे व्हाल. तेव्हा तुम्हाला कळेल की जात किती महत्वपुर्ण आहे. अगं जात आहे म्हणूनच आपण आहोत. विना जातीनं माणूस स्वैरभैर झाला असता. अन् तू म्हणतेस की आंतरजातीय विवाह व्हावेत. परंतु तू मागील काही आंतरजातीय विवाह करणाऱ्यांची उदाहरणं बघ. बरेचसे आंतरजातीय विवाह टिकत नाहीत. आंतरजातीय विवाहात कधी एखादी मुलगी वात्रट निघते तर कधी एखादा मुलगा. शिवाय असा विवाह एखाद्या मुलीनं केलाच तर तिला आयुष्यभर वाळीत टाकतो समाज आणि तिच्या परिवारालाही. हेच नाहीतर तर समाजात एखाद्याची मुलगी अशी आंतरजातीय विवाह करुन पळून गेलीच तर समाजाचा दबाव त्या कुटूंबावर एवढा येतोय की समाजाचा असा दबाव वधुपित्याला सहन होत नाही व आत्महत्या घडते वडिलांनी. हे शंभर प्रतिशत खरं आहे बेटा. शिवाय अशी मुलंही चांगली निघत नाहीत. ती विवाह करण्यासाठी मुलींना भाळवतात. परंतु विवाह झाल्यानंतर काही दिवसानंतर मुलींना सोडून देतात. मग ना मुलींना मायबाप स्विकारतात. ना समाज. अशा मुलींच्या आत्महत्या घडतात समाजात. म्हणूनच जातीचेच विवाह करतो समाज. त्यालाच मान्यता आहे. हुंडा पद्धती असली तरी. अन् थाटामाटात लग्न करतांना खर्च लागत असला तरी. लोकं त्यासाठी कर्ज देखील घेतात. परंतु जातीचेच विवाह करतात."
         "बाबा, म्हणजे तुमचं म्हणणं आहे की मी माझा विवाह जातीअंतर्गतच करावा."
         "होय. जातीचाच पाहू एखादा मुलगा तुझ्यासाठी."
         "अन् बाबा, मला आंतरजातीय विवाह करायचा असेल तर?"
          "नाही बेटा. समाज काय म्हणेल."
          "समाज काय म्हणणार आहे? मला सांगा, आता आपली परिस्थिती नाजूक आहे, हे समाजाला दिसत नाही काय? समाज आपल्या या परिस्थितीत आपल्यासाठी धावून येतो काय? आला काय? नाही ना. अन् आतापर्यंत माझ्या या ढळत असलेल्या विवाहाच्या काळात कोणता समाजाचा मुलगा धावून आलाय माझ्याशी विवाह करायला. प्रत्येक मला पाहायला येणारा मुलगा हा हुंडा मागतो. त्यातल्यात्यात थाटामाटात विवाह करण्याचाही सल्ला देतो. हे आपल्या जातीतील जातवंतांना दिसत नाही काय? त्यापेक्षा आंतरजातीय विवाह केलेला बरा. मी करेलच असा आंतरजातीय विवाह. ज्यात हुंडाही लागत नाही. थाटामाटात विवाहही करावा लागत नाही. अन् आपल्याला कर्जही काढावं लागत नाही. ज्यातून कर्जबाजारी झाल्यानं माझ्याच वडिलाची आत्महत्या होईल."
          "बेटा, तुझं म्हणणं ठीक आहे. परंतु?"
          "परंतु काय बाबा? मी तर ठरवलंच आता की मी आंतरजातीय विवाह करणार म्हणजे करणारच. आपण त्याला संमती द्यायला हवी. अन् का देवू नये आपण तशी परवानगी? बाबा, थाटामाटात विवाह करुनही व हुंडा दिल्यानंतरही लोकं घटस्फोट देतात. घटस्फोटाला जास्त प्राधान्य देतात. त्यापेक्षा आंतरजातीय विवाह बरा की नाही. हं, आपण म्हणताय की आंतरजातीय विवाह झाल्यानंतर ज्या मुलाशी आंतरजातीय विवाह केला. तो त्यागून देतो मुलीला. मग मुलीला कुठं जावं, हा पर्याय नसल्यानं ती आत्महत्या करते. ते सगळं बरोबर आहे आपलं. परंतु तो एक नशिबाचाच भाग आहे. माझ्या नशिबात जे घडायचं असेल, ते घडणारच. त्याला कोणीही रोखू शकत नाही, असं समजा. अन् तसं घडलंच तर मी आपल्याला वचन देतेय की मी आत्महत्या करणार नाही. मला आपण माझ्या पायावर उभं केलं ना. मग मी नोकरी करील. नाही नोकरी असली तर एखादा कामधंदा करील. परंतु मरण्यासारखं पाऊल उचलणार नाही. आता तर पटली ना माझी व माझ्या जीवाची खात्री."
           "पण बेटा." 
           "बाबा, आता पण वण काही नको. माझा बेत ठरला म्हणजे ठरला. हं, एक मागणं मागते की माझा विवाह झाल्यानंतर आपण माझ्याच जवळ राहावं. राहाल की नाही?"
           "बेटा, मुलगी ही पराया घरची सुन असते. तिला पतीच्याच मतानं चालावं लागतं. तिथं आपलं चालत नाही. अन् चालविण्याचा प्रयत्न जर केला तर नाते तुटतात. तुला वाटतंय का की तुझं असंच माझ्यामुळं नातं तुटावं?"
          "बाबा, असे कित्येक नाते मी तुमच्यासाठी ओवाळून फेकणार. जो व्यक्ती माझ्या वडिलांची सेवा करु शकत नसेल, तो माझा पती कसला? तो माझा पती व्हायच्याच लायकीचा नाही."
          "बेटा, तसं नसतंच. कधीकधी जिद्द सोडायची असते."
           "बाबा, त्याची चिंता आपण आतापासून करु नका. वेळच सांगेल ते. वेळेनुसार वागू आपण. ठीक आहे. जर मला आंतरजातीय विवाह करणारा मिळाला तर आपण जुळवून घ्यायचं आणि जर तुम्हाला जातीचा व्यक्ती विवाह करणारा मिळाला तर मी जुळवून घेईल."
            "ठीक आहे तर."
            "ठीक आहे."
            वडील व बाळाचं ते संभाषण. ते संभाषण रास्त गोष्टीवर सुरु होतं. स्नेहल आंतरजातीय विवाहाची भाषा करीत होती, तर वडील आंतरजातीय विवाह न करण्याला प्राधान्य देत होते. अशातच दोघांनीही एकमेकांना समजून घेवून एकमेकांचे विचार जुळवून घेण्याचं ठरवलं होतं.