Quotes by Vivek Vishwanath Shinde in Bitesapp read free

Vivek Vishwanath Shinde

Vivek Vishwanath Shinde

@chefvivekshinde


ही काळी आई…
धन-धान्य देई…
जोडते मनांची नाती…

आमची माती
आमची माणसं

ही कविता जेव्हा कानावर पडते, तेव्हा नजरेसमोर येतो तो आपल्या मातीतला खरा नायक — शेतकरी.
मातीशी नातं जपणारा, कर्जाच्या फासात अडकलेला, जगाच्या पोटासाठी स्वतः उपाशी राहणारा… पण सन्मानासाठी लढणारा भूमिपुत्र.

आज या भूमिपुत्राच्या जीवनात असह्य अंधार दाटलेला आहे.
फक्त ३ महिन्यांत – ७६७ शेतकरी आत्महत्या.
या आकड्यांमागे आहेत अनेक विधवा, पोरकी झालेली लेकरं, आणि उद्ध्वस्त झालेलं आयुष्य.

विदर्भ, मराठवाडा भागांतील परिस्थिती अजून भयावह आहे.
पाणी नाही, बाजारभाव नाही, विमा दावे अडकलेत, योजनांच्या नावाखाली केवळ कागदोपत्री मदतीचं खेळ आहे.

आणि या सगळ्यात आजची सर्वात वेदनादायक बातमी — कृषीमंत्री विधिमंडळात बसून ‘Junglee Rummy’ खेळताना दिसतात.

हा खेळ ज्या कुटुंबांचं घर उद्ध्वस्त करतो, तो मंत्री सभागृहात खेळतो?
आणि दुसरीकडे, त्या सभागृहाच्या बाहेर शेतकरी शेवटचा निर्णय घेतो — आत्महत्येचा.

हे वागणं केवळ दायित्वहिनता नाही, तर शेतकऱ्याच्या जीवनाशी केलेली क्रूर थट्टा आहे.

शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबाला १ लाखांची मदत – तीही अटींमध्ये अडकलेली.
९६,८११ शेतकरी ‘नमो शेतकरी महासन्मान’ योजनेपासून वंचित – फक्त बँक-आधार लिंकिंगच्या कारणामुळे.

मग प्रश्न उरतो – या पदांवर बसलेली माणसं नेमकी कोणासाठी काम करतायत?

मी स्वतः एक कॅटरर, एक व्यवसायिक, पण सर्वात आधी – या मातीत वाढलेला भूमिपुत्र.
ज्या मातीतली भाकर खाऊन मोठा झालो, त्या मातीच्या माणसाच्या अश्रूंवर मी मौन बाळगू शकत नाही.

शेतकरी ही केवळ वर्ग नाही – तो आपल्या संस्कृतीचा प्राण आहे.
त्याच्या व्यथा, त्याचं दुःख समजून घेणं, हे केवळ सरकारचं नव्हे, तर आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे.

शेवटी एवढंच म्हणावसं वाटतं –

“मातीवर उगमलेलं पाणी रोखता येतं, पण मातीवर सांडलेलं रक्त… त्याचा हिसाब मात्र काळ स्वतः घेतो.”

विवेक शिंदे (शेफ व केटरर व्यवसायिक)
भूमिपुत्र, कोल्हापूर

Read More

गुरुपौर्णिमा आणि माणुसकीचा पाया — एक वैयक्तिक चिंतन

विवेक शिंदे, कोल्हापूर



“गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः॥”

आज गुरुपौर्णिमा…
या दिवशी केवळ आध्यात्मिक गुरूंनाच नव्हे, तर आयुष्याला दिशा देणाऱ्या प्रत्येक क्षणाला, प्रत्येक व्यक्तीला नम्र प्रणाम करण्याची आपली परंपरा आहे. आई-वडील, शिक्षक, शेतकरी, कारागीर, कामगार — हे सगळेच आपल्या आयुष्यातले “जीवनगुरू” असतात.

माझ्यासाठी गुरुपौर्णिमा ही स्वतःच्या विचारांचा आरसा पाहण्याची संधी असते.
आपल्यामुळे कुणाला आधार मिळतोय का?
आपलं वागणं कुणाला उभं करतंय की खाली बसवतंय?



मित्रांनो,
आजच वर्तमानपत्रातून एक मनाला अस्वस्थ करणारी बातमी वाचनात आली.
मुंबईतील आमदार निवासात, एका कॅंटीनमधील कर्मचाऱ्याला अन्न निकृष्ट मिळालं म्हणून झालेल्या वादातून त्याच्यावर मारहाण झाल्याचा प्रकार घडला.

निकृष्ट अन्नावर आक्षेप घेणं पूर्णपणे योग्य आहे, कारण “अन्न हे पूर्णब्रह्म आहे”, आणि अन्न शुद्ध असणं ही प्रत्येकाची मूलभूत अपेक्षा आहे.
पण त्यावर प्रतिक्रिया देताना जर कष्ट करणाऱ्या व्यक्तीवर हात उचलला जात असेल, तर ती कृती कोणत्याही निकषांवर योग्य ठरत नाही.



मी स्वतः एक अन्नसेवक आहे.
माझ्या व्यवसायात दररोज मला कामगार, स्वयंपाकी, वाहतूक कर्मचारी आणि कार्यालयीन सहकाऱ्यांच्या रूपात असंख्य “गुरू” भेटतात —
ते मला संयम, संघटन आणि सेवा शिकवतात.
कधी त्यांच्या कडून चूक होतेही, पण त्यांच्याशी सन्मानाने संवाद साधणं, हीच माझी त्यांच्यावरील गुरुदक्षिणा असते.



तुकाराम महाराज म्हणतात:
“आपुल्या मना जे जे भावे, ते ते दुसऱ्याच्या मना ज्ञावे।”
आपल्याला जे सन्मानाने वागणं हवं असतं, तेच इतरांनाही द्यावं — हीच खरी माणुसकीची शिकवण.



गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आज मी सर्व भूमिपुत्र बंधूंना आणि स्वतःलाही एक विनंती करतो —
शब्दांइतकी कृतीत गुरुपरंपरा जपूया.
अहंकार नको, नम्रता हवी. राग नको, संवाद हवा. कडकपणा नको, कर्माचा आदर हवा.

कारण शेवटी, आपण सर्वजण एकमेकांचे गुरू आहोतच.
कधी शब्दांनी शिकवतो, कधी वागणुकीने…
कधी चुकतो, पण सावरतोही.



🙏 गुरुपौर्णिमेच्या या शुभदिनी, मी वाकून नमन करतो त्या प्रत्येक कष्टकरी सहकाऱ्याला,
जो गॅसजवळ उभा राहून दुसऱ्याच्या थाळीत प्रेम शिजवतो…

नमन त्या भूमिपुत्राला,
जो चुकल्यानंतरही शांतपणे गालावरचा घाम पुसतो,
पण हक्काचा आवाज उठवत नाही…

आणि प्रार्थना एवढीच — या गुरुपौर्णिमेचा प्रकाश आपल्या वर्तनात उतरू दे!

शुभं भवतु।

आपलाच,
विवेक शिंदे, कोल्हापूर

Read More

नमस्कार प्रिय भूमिपुत्र बंधू-भगिनींनो,

आपल्या भूमीच्या मातीचा सुगंध, श्रमाचा सन्मान, आणि संतांची शिकवण हे आपल्याला वेळोवेळी जागं करतं — आपल्या ओळखीच्या पलीकडे जाऊन आपल्याला एका मोठ्या विचारविश्वाशी जोडतं.

कालच महाराष्ट्राच्या संत परंपरेवर, आपल्या राज्याच्या ज्ञानवंत वारशावर एक महत्त्वाचा संदेश समाजमनात उमटला. त्या निमित्तानं मन नकळत विचार करतं — आपण खरोखर आपल्या संतांची, आपल्या थोर पुरुषांची शिकवण जपतो का? की ती फक्त ऐकण्यात आणि बोलण्यातच राहते?

मित्रांनो, महाराष्ट्राची खरी ओळख ही केवळ गड-किल्ले, तलवारी, आणि ऐतिहासिक जय-पराजयात नाही — ती आहे संतांच्या विचारात, वारकऱ्यांच्या अखंड पायी चालणाऱ्या वारीत, विठ्ठल नामाच्या जयघोषात, आणि आपल्या जीवनातील कृतीतून व्यक्त होणाऱ्या मूल्यांमध्ये.

आजच नंदवाळ सारख्या आपल्या कोल्हापूरच्या मातीवर लाखो वारकरी विठ्ठल-नामात रंगून गेले. संत तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे —
“जना सांगे धर्म, विज्ञान सांगे परोपकार।
तुका म्हणे त्या सद्गुरूसी, वंदन करूनी सेवा कर।”

याचा अर्थ केवळ मंदिराच्या उंबरठ्यापर्यंत श्रद्धा मर्यादित न ठेवता, आपल्या कर्तृत्वात, परोपकारात, आणि समाजहिताच्या कार्यात श्रद्धेचं रूपांतर करावं — हाच खरा धर्म.

म्हणूनच ‘भूमिपुत्र’ या संकल्पनेचा अर्थ फक्त जन्माने नव्हे, तर कर्माने ठरतो. आपल्या भूमीवर प्रेम करणं, तिच्या संस्कृतीचं रक्षण करणं, आपल्या व्यवसायातून, सेवेतील प्रामाणिकपणातून, आणि एकमेकांच्या उत्थानातून भूमिपुत्रत्व सिद्ध होतं.

महाराष्ट्र धर्म म्हणजे कोणत्याही एका संकुचित चौकटीत न अडकणारा, सर्वांचा सन्मान करणारा, विचार, कर्तृत्व आणि परोपकाराचं मूल्य जपणारा जीवनमार्ग आहे. तो कोणत्याही राजकीय चौकटीत अडकवणं हे त्या संकल्पनेचं खच्चीकरण ठरेल.

चला तर, या संतांच्या आणि थोर पुरुषांच्या शिकवणुकीला केवळ आठवणीत न ठेवता, ती आपल्या कृतीत उतरवूया — आपली व्यावसायिक प्रगती, सामाजिक बांधिलकी, आणि वैयक्तिक जीवनात ती जपूया.

वारी एक दिवसाची नसेल, तर ती आयुष्यभराची वारी आहे — न थांबणारी, न थकणारी, आणि सतत चांगुलपणाच्या दिशेने वाटचाल करणारी!

जसा विठ्ठल प्रत्येक वारकऱ्याच्या मनात असतो, तशीच आपली भूमी, आपली माणसं, आणि आपली कर्तव्यनिष्ठा ह्या प्रत्येक भूमिपुत्राच्या मनात जागृत असायला हवी.

तुझ्या दर्शनाची आस कधी थांबायची नाही,
उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुकायची नाही —
अर्थातच, ही वारी फक्त मंदिराची नाही,
तर ती आहे आपल्या विचारांची, कृतीची, आणि समाजसेवेची…

आपण सर्वजण मिळून या भूमिपुत्राच्या वारीत सहभागी होऊ, एकमेकांना आधार देऊ, आणि आपल्या महाराष्ट्राच्या, आपल्या कोल्हापूरच्या मातीत कर्तृत्वाचं बीज रुजवू.

अन्नदाता सुखी भव।
सर्व भूमिपुत्रांना सलाम।
शुभं भवतु।

आपलाच,
विवेक शिंदे, कोल्हापूर

Read More

प्रिय भूमिपुत्र बंधू-भगिनी हो,

आपण सारेच ज्या मातीच्या कणाकणात, शब्दाशब्दात आणि श्रमाच्या थेंबांमध्ये वाढलो, ती माती म्हणजे केवळ भौगोलिक सीमा नव्हे, ती आपल्या संस्कृतीची, परिश्रमाची आणि आत्मीयतेची उर्जा आहे.

भूमिपुत्र म्हणजे कोण? जात, धर्म, भाषा किंवा गावाने ठरवलेली ओळख नव्हे — तर ज्या भूमीवर आपण कष्ट करतो, जिच्या कणाकणात आपल्या घामाचा सुगंध मिसळतो, त्या भूमीशी असलेली नाळ — हाच खरा भूमिपुत्रत्वाचा अर्थ आहे.

आज आपण व्यवसाय, शेती, सेवा, शिक्षण किंवा कोणत्याही क्षेत्रात असलो, तरी आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी — आपले यश हे केवळ वैयक्तिक न राहता ते समाजाच्या, गावाच्या, राज्याच्या, राष्ट्राच्या उन्नतीशी जोडलेलं असावं.

चांगल्या विचारांची देवाण-घेवाण, प्रामाणिक कष्टांची जाण, आणि एकमेकांना आधार देण्याची तयारी — याचं बळ वाढलं, तर कुठलाही भूमिपुत्र मागे राहणार नाही.

या व्यासपीठावर, कोणीही कुठल्या जातीचा, धर्माचा, किंवा पार्श्वभूमीचा असो — प्रत्येकाला आपलं म्हणता यावं, व्यक्त होता यावं, आणि दुसऱ्याच्या यशात आपलं यश पाहता यावं — हाच आमचा हेतू आहे.

मनात कटुता न ठेवता, मतभेदांना बाजूला ठेवून, आपण एकमेकांसाठी उभं राहिलो तर आपल्या मातीतूनच नवी स्वप्नं उभी राहतील, नवे नेतृत्व तयार होईल, आणि आपल्या भूमिपुत्रांची ओळख ही केवळ नावापुरती न राहता कर्तृत्वाने उजळेल.

चला तर मग, संवाद सुरू ठेवूया…
मृग नक्षत्राची सुरुवात आपल्या विचारांच्या आणि कृतीच्या नवा पेरणीची असो…
आपल्या भूमिपुत्रत्वाचा खरा अर्थ जगाला दाखवूया…!

आपलाच,
विवेक शिंदे, कोल्हापूर

Read More

प्रिय भूमिपुत्र बंधू-भगिनी हो,
सस्नेह नमस्कार

मराठी मातीच्या काळजा मधून अंकुरलेले आपण सर्व सखे-सोबती आहोत ... या अर्थाने आपण भूमीपुत्र आहोत याचा आपणांस सार्थ अभिमान आहे ...!

भूमिपुत्रांनो,
काल 6 जून रोजी रायगडाच्या अंतःकरणांमध्ये युगकर्ते शिवछत्रपतींचा राज्याभिषेक व्हावा... आणि आज 7 जून रोजी मृग नक्षत्राचा शुभारंभ व्हावा हे नियतीने घडवून आणलेले सुयोग असावेत… म्हणूनच मृग नक्षत्राच्या शुभारंभी आपण एकमेकांच्या काळजाच्या मातीत ऋणानुबंधाची पेरणी करूया आणि एकतेची मोट बांधून कर्तृत्वाचे बीज अंकुरावे या साठी सुसज्ज होऊया.

आज पासून वेळोवेळी आपण एकमेकांशी संवाद साधूया ...!
एकमेकांची सुख-दुःखे ... व्यवसायातील बलस्थाने आणि अडी-अडचणीना व्यक्त करूयात आणि आपण सर्वजण मिळून हातामध्ये हात गुंफून एकमेकांच्या पाठीशी उभे राहू ...!

भूमिपुत्र हो,
माता अन्नपूर्णेची अखंड सेवा ...
हाच आपला जीवन ठेवा ...!!!

ही सेवा एक दिलाने करूया ...!
सर्वांची प्रगती ... हाच उत्कर्ष ...
हे मानवतेचे स्वप्न साकार करूयात ...!

आज तारीख आहे सात ...
देऊया एकमेकांना साथ ...

अखंड तेवत राहो ...
एकतेच्या दिव्याची वात ...
होऊ दे कर्तृत्वाच्या मृग नक्षत्राची बरसात ...!!!

अन्नदाता सुखी भव ...!!!
अन्नखाता सुखी भव ...!!!
शुभं भवतु ...!

आपला,
श्री. विवेक शिंदे, कोल्हापूर

Read More