गुरुपौर्णिमा आणि माणुसकीचा पाया — एक वैयक्तिक चिंतन
विवेक शिंदे, कोल्हापूर
⸻
“गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः॥”
आज गुरुपौर्णिमा…
या दिवशी केवळ आध्यात्मिक गुरूंनाच नव्हे, तर आयुष्याला दिशा देणाऱ्या प्रत्येक क्षणाला, प्रत्येक व्यक्तीला नम्र प्रणाम करण्याची आपली परंपरा आहे. आई-वडील, शिक्षक, शेतकरी, कारागीर, कामगार — हे सगळेच आपल्या आयुष्यातले “जीवनगुरू” असतात.
माझ्यासाठी गुरुपौर्णिमा ही स्वतःच्या विचारांचा आरसा पाहण्याची संधी असते.
आपल्यामुळे कुणाला आधार मिळतोय का?
आपलं वागणं कुणाला उभं करतंय की खाली बसवतंय?
⸻
मित्रांनो,
आजच वर्तमानपत्रातून एक मनाला अस्वस्थ करणारी बातमी वाचनात आली.
मुंबईतील आमदार निवासात, एका कॅंटीनमधील कर्मचाऱ्याला अन्न निकृष्ट मिळालं म्हणून झालेल्या वादातून त्याच्यावर मारहाण झाल्याचा प्रकार घडला.
निकृष्ट अन्नावर आक्षेप घेणं पूर्णपणे योग्य आहे, कारण “अन्न हे पूर्णब्रह्म आहे”, आणि अन्न शुद्ध असणं ही प्रत्येकाची मूलभूत अपेक्षा आहे.
पण त्यावर प्रतिक्रिया देताना जर कष्ट करणाऱ्या व्यक्तीवर हात उचलला जात असेल, तर ती कृती कोणत्याही निकषांवर योग्य ठरत नाही.
⸻
मी स्वतः एक अन्नसेवक आहे.
माझ्या व्यवसायात दररोज मला कामगार, स्वयंपाकी, वाहतूक कर्मचारी आणि कार्यालयीन सहकाऱ्यांच्या रूपात असंख्य “गुरू” भेटतात —
ते मला संयम, संघटन आणि सेवा शिकवतात.
कधी त्यांच्या कडून चूक होतेही, पण त्यांच्याशी सन्मानाने संवाद साधणं, हीच माझी त्यांच्यावरील गुरुदक्षिणा असते.
⸻
तुकाराम महाराज म्हणतात:
“आपुल्या मना जे जे भावे, ते ते दुसऱ्याच्या मना ज्ञावे।”
आपल्याला जे सन्मानाने वागणं हवं असतं, तेच इतरांनाही द्यावं — हीच खरी माणुसकीची शिकवण.
⸻
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आज मी सर्व भूमिपुत्र बंधूंना आणि स्वतःलाही एक विनंती करतो —
शब्दांइतकी कृतीत गुरुपरंपरा जपूया.
अहंकार नको, नम्रता हवी. राग नको, संवाद हवा. कडकपणा नको, कर्माचा आदर हवा.
कारण शेवटी, आपण सर्वजण एकमेकांचे गुरू आहोतच.
कधी शब्दांनी शिकवतो, कधी वागणुकीने…
कधी चुकतो, पण सावरतोही.
⸻
🙏 गुरुपौर्णिमेच्या या शुभदिनी, मी वाकून नमन करतो त्या प्रत्येक कष्टकरी सहकाऱ्याला,
जो गॅसजवळ उभा राहून दुसऱ्याच्या थाळीत प्रेम शिजवतो…
नमन त्या भूमिपुत्राला,
जो चुकल्यानंतरही शांतपणे गालावरचा घाम पुसतो,
पण हक्काचा आवाज उठवत नाही…
आणि प्रार्थना एवढीच — या गुरुपौर्णिमेचा प्रकाश आपल्या वर्तनात उतरू दे!
शुभं भवतु।
आपलाच,
विवेक शिंदे, कोल्हापूर