ही काळी आई…
धन-धान्य देई…
जोडते मनांची नाती…
आमची माती
आमची माणसं
ही कविता जेव्हा कानावर पडते, तेव्हा नजरेसमोर येतो तो आपल्या मातीतला खरा नायक — शेतकरी.
मातीशी नातं जपणारा, कर्जाच्या फासात अडकलेला, जगाच्या पोटासाठी स्वतः उपाशी राहणारा… पण सन्मानासाठी लढणारा भूमिपुत्र.
आज या भूमिपुत्राच्या जीवनात असह्य अंधार दाटलेला आहे.
फक्त ३ महिन्यांत – ७६७ शेतकरी आत्महत्या.
या आकड्यांमागे आहेत अनेक विधवा, पोरकी झालेली लेकरं, आणि उद्ध्वस्त झालेलं आयुष्य.
विदर्भ, मराठवाडा भागांतील परिस्थिती अजून भयावह आहे.
पाणी नाही, बाजारभाव नाही, विमा दावे अडकलेत, योजनांच्या नावाखाली केवळ कागदोपत्री मदतीचं खेळ आहे.
आणि या सगळ्यात आजची सर्वात वेदनादायक बातमी — कृषीमंत्री विधिमंडळात बसून ‘Junglee Rummy’ खेळताना दिसतात.
हा खेळ ज्या कुटुंबांचं घर उद्ध्वस्त करतो, तो मंत्री सभागृहात खेळतो?
आणि दुसरीकडे, त्या सभागृहाच्या बाहेर शेतकरी शेवटचा निर्णय घेतो — आत्महत्येचा.
हे वागणं केवळ दायित्वहिनता नाही, तर शेतकऱ्याच्या जीवनाशी केलेली क्रूर थट्टा आहे.
शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबाला १ लाखांची मदत – तीही अटींमध्ये अडकलेली.
९६,८११ शेतकरी ‘नमो शेतकरी महासन्मान’ योजनेपासून वंचित – फक्त बँक-आधार लिंकिंगच्या कारणामुळे.
मग प्रश्न उरतो – या पदांवर बसलेली माणसं नेमकी कोणासाठी काम करतायत?
मी स्वतः एक कॅटरर, एक व्यवसायिक, पण सर्वात आधी – या मातीत वाढलेला भूमिपुत्र.
ज्या मातीतली भाकर खाऊन मोठा झालो, त्या मातीच्या माणसाच्या अश्रूंवर मी मौन बाळगू शकत नाही.
शेतकरी ही केवळ वर्ग नाही – तो आपल्या संस्कृतीचा प्राण आहे.
त्याच्या व्यथा, त्याचं दुःख समजून घेणं, हे केवळ सरकारचं नव्हे, तर आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे.
शेवटी एवढंच म्हणावसं वाटतं –
“मातीवर उगमलेलं पाणी रोखता येतं, पण मातीवर सांडलेलं रक्त… त्याचा हिसाब मात्र काळ स्वतः घेतो.”
विवेक शिंदे (शेफ व केटरर व्यवसायिक)
भूमिपुत्र, कोल्हापूर