पाऊस
मृग नक्षत्र येताच तूं किती लगबगीनं अवनीच्या भेटीला यायचास. सगळीकडे हिरवगार करायचास. तुझ्या चाहुलीनं अवनी तर वेडीपिसी व्हायची.मस्त मृदगंध दरवळायचा. माणुस काय सगळेच जीव मनसोक्त दिलखुलास हुंदडायचे.का तर तु आलास म्हणून पण आता तस होत नाही तुझी वाट बघता बघता मृग नक्षत्र काय सगळा ऋतुच कोरडा जातो. अवनी हवालदील होते. शेतकरी अवनीला हताश बघुन गलितगात्र होतो. पाऊसच नाही तर अवनीला गोंजारणार तरी कस?,तिच्यात रुजवणार तरी काय आणि कस?प्रश्न.....प्रश्न आणि प्रश्नसर्पाचेच वेटोळे सोडवताना कठीण होऊ लागतं.
यात माणसाची चुक आहे पण तिची एवढी मोठी शिक्षा द्यायची का? नकोरे असा कठोर होऊस. बरस जरा हलके बरस,जरा कधी मुक्तपणे कोसळ,जरा कधी अवनीला गोंजारत तिच्यात रुजत, तिला फुलवत थोडा रेंगाळ.असा लोभसपणे येरे.असा कठोर नको होऊस. आणखी किती तुझी आळवणी करायची .दुसरीकडे जगणं मुष्कील होईल असा कोसळतोस. त्यांना पाण्यानी झोडपुन मारतोस इकडे पाण्याविना तडफडवुन मारतेस.कसा रे तु? बदल बाबा स्वतःला.माणुस कसला बदलतोय.
तो झाडं तोडणारच,प्रदुषण करणारच,मनासारखा वागणारच आणि तू आला नाहीस की तुझ्या नावानं ओरडणारच.असं वागण,असं ओरडण हा त्याचा जन्मसिद्ध हक्क आहे. हे कसं तू विसरतो. म्हणुन म्हणते ये बाबा ....सगळ हिरवगार कर,शेतक-याच्या डोळ्यातलं पाणी थांबव,त्यांच्या आत्महत्या थांबव यातच तुझही भल आहे.थोड पुण्य तुझ्या गाठीलाही जमेल. येतोस न मग.........!
पावसा तुझं येणं सगळ्यांना हवं आहे.तुझा शिडकावा अंगावर गोड शिरशिरी ऊमटवतो. मनाच्या तारा मस्त झंकारु लागतात.आनंदाचा ऊत्सवच सुरु होतो.अवनी तर बेभान होतेच पण माणूसही आनंदाचे डोही आनंद तरंग असा होतो.त्याची ब्रह्मांनंदी टाळी लागते.
बळीराजाचं काही वेगळं नाही.तोतर आनंदानी वाहणा-या डोळ्यांनी शेतात धावतो.आजवर तुझी वाट बघता बघता त्याचे डोळे अश्रू गाळत होते.तू येताच त्याच्या आयुष्यात सगळंचं बदलतं.त्याचे हिरवेकंच हात शेतात राबायला लगबग करू लागतात.बळीराजा इतका आनंदीत होतो की त्याला त्याच्या डोक्यावर असलेल्या कर्जाचं जराही ओझं होतं नाही.आजपर्यंत कर्जामुळे चालतांना अडखळणारा बळीराजा तू येताच अडखळणं विसरून सुसाट पळतो.काय किमया घडते रे तुझ्या येण्यानी!
तू आलास की लहान मुलांचा पाण्यात खेळण्याचा आनंद दुप्पट वाढतो.कागदाची नाव करून ती पाण्यात सोडण्यात बच्चेकंपनी एकदम खूष असते.अंगावरच्या कपड्यांवर चिखलाचा पेंटींग ही मजेत करवून घेतात ही मुलं. मनसोक्त भीजून शरीराच्या कणाकणावर पावसाच्या थेंबांची स्वाक्षरी घेण्यात किती मजा येते हे ही बाळ गोपालच जाणतात.
अभीसारिकाही अशीच चिंब भीजते पावसात आणि प्रियकराच्या प्रेमात. धुंदफुंद होऊन दोघंही आनंद संगीत गात एकमेकांत मिसळून जातात.
'रिमझीम रिमझीम पाऊस पडे.
तळहातांवर थेंबांनी ग रांगोळी सजे..रांगोळी सजे.'
अशी पावसाची रांगोळी मनावर किती खुलून दिसते. शरीरावर किती छान रंगते की त्याकडे नुसतं बघत रहावंस वाटतं.
वाटेल तसा झोडपणारा पाऊस वैरी वाटतो.आणि एकही थेंब जेव्हा तो देत नाही तेव्हा कृर वाटतो. पण पाऊस म्हणतो
"मला दरवर्षी आनंदानी यायला आवडेल. अवनीला गर्भरेशमी साडी नेसवायला आवडेल. पण तुम्हीच मी येण्यात अडथळा आणता.का तोडता वृक्ष? का कुठेही माती राहू देत नाही? सगळीकडे का सिमेंटचे जंगल करता? नका असं करू...मला येत नाही म्हणून मी कासावीस होतो. मला भेटता येत नाही म्हणून अवनी, पशूपक्षी सगळे हवालदील होतात.माणसा तू सुद्धा दु: खी होतोस नं! मग कशाला हा जीवघेणा खेळ खेळतो थांबव सगळं. मुक्तपणे बहरू द्या वृक्षवेलींना. मातीचा छप्पर असू दे ते खूप तापतं. मगच येतों मी. मला वाचवणं तुमच्याच हातात आहे. जर मी रागावलो तर असाच वेड्यासारखं वागीन.आलो तर झोडपीन नाहीतर येणारच नाही'
पाऊस खरच बोलतोय.आपण माणसानी कसं वागायचं ठरवलं पाहिजे.पावसाचं ऐकलं नाहीतर गहजब होईल या पृथ्वीवर.
______________________________
समाप्त
लेखिका…. मीनाक्षी वैद्य.