पण हे माझ्यासोबत का ?
आई ... तु म्हणाली होतीस कुठे न सांगता जाऊ नकोस...
मी तर तुला सांगून खेळायला गेले होते ना ....
तरी पण हे माझ्यासोबत का ?
आई तु म्हणाली होतीस कुठे लांब जाऊ नकोस एकटी...
पण मी तर मैत्रिणीसोबत आपल्याच अंगणामध्ये होते ना..
तरी पण हे माझ्यासोबत का ?
आई .. तु म्हणाली होती अनोळखी व्यक्ती पासून दूर रहा ...
पण हा दादा तर ओळखीचा होता ना...
तरी पण हे माझ्यासोबत का ?
आई ... तू म्हणाली ना कोणी दिलेल चॉकलेट खाऊ नकोस ...
मी तर खूपदा त्याला नको म्हणाले होते ...
तरी पण हे माझ्यासोबत का ?
आई... तु म्हणाली होती ना ,
कोणी त्रास दिला तर जोरजोरात आरडा ओरडा करायचा ...
मी तर खूप ओरडत होते गं !
तरी पण हे माझ्या सोबत का ?
आई... तू म्हणाली होती ना ..
अभ्यास कर नाहीतर राक्षस घेऊन जाईल...
मी तर अभ्यास करायचे ना ...
तरी पण हे माझ्यासोबत का. ....
आई ... शेवटी ही मला तुझाच चेहरा समोर येत होता ..
तुझेच शब्द आठवत होते ...
मी तर काहीच विसरले नव्हते ...
तरी पण हे माझ्या सोबत का ?
आई ... त्या दादाला तर फाशी देऊन मारणार ना...
मला तर ओरडून ओरडून रडून रडून मारलं गं....
मी तर छोटी बाहुली होते ना तुझी ..
तरी पण हे माझ्यासोबत का ?
- सुचित्रा गायकवाड/ सदावर्ते