Kirkali - 14 - Last part in Marathi Crime Stories by Abhay Bapat books and stories PDF | किंकाळी प्रकरण 14 - (शेवटचे प्रकरण)

Featured Books
  • फिर से रिस्टार्ट - 1

    फिर से रिस्टार्ट (भाग 1: टूटा हुआ घर)रात का सन्नाटा था।आसमान...

  • Maharaksak Arjun

    चमकदार रोशनी से भरा राजमहल बेहद शानदार और प्रभावशाली दिख रहा...

  • मेरे शब्द ( संग्रह )

    1- ££ काश काश मैं तेरे शहर का होता, इक चाय के सहारे ही सही प...

  • एक समझौता

    कभी-कभी एक नजारा बीती हुई जिंदगी को ऐसे सामने लाकर खड़ा कर द...

  • Mafiya ki Secret Love - 1

    कॉलेज के एक कोने में एक लड़का खड़ा था…हुडी पहने, लंबाई 6’2”,...

Categories
Share

किंकाळी प्रकरण 14 - (शेवटचे प्रकरण)



प्रकरण १४
विश्रांती नंतर कोर्ट सुरु झालं. टेप रेकॉर्डर टेप लावून सज्ज करण्यात आला. कोर्टातल्या  भिंती वरच्या इलेक्ट्रिक पॉइंटला एक्स्टेन्शन  लावून त्याचे सॉकेट जोडण्यात आले.सर्वाना नीट ऐकू यावे म्हणून स्पीकर जोडण्यात आला.
“ टेप चालू करा. आणि मला कोर्टात शंभर टक्के शांतता हव्ये.नाहीतर मी त्याला बाहेर काढेन.” न्यायाधीशांनी आदेश दिला.
टेप चालू झाला. उन्मन आणि बंब यांच्यातील  संवाद ऐकू यायला लागले.
“ डॉ.बंब.... ऐकू येतंय तुम्हाला?.... डॉक्टर, ... ऐकू येतंय?  असेल तर हो म्हणा....”
मधे थोडा वेळ कसलाच आवाज आला नाही नंतर अगदी दमून बोलल्या सारखा आवाज आला,
“ हो.”
“ तुम्हाला कोणी फटका मारला माहित्ये?” उन्मन चा आवाज आला.
पुन्हा शांतता. पुन्हा तोच प्रश्न.
“ ज्याने तुम्हाला मारलं, त्याचं नाव सांगू शकता का?”
पुन्हा शांतता. नंतर उन्मन च्या आवाजात त्याच प्रश्नाची पुनरावृत्ती. दोन-तीन वेळा.शेवटी डॉक्टरांचा आवाज,
“ हो.”
“ छान डॉक्टर. नाव सांगा त्याचं.” उन्मन चा आवाज.
शांतता.
“ डॉ.बंब प्लीज नाव सांगा त्याचं किंवा तिचं.”
पुन्हा वाक्य रचना बदलून तोच प्रश्न अनेकदा विचारला गेला.
शेवटी अगदी अस्फुट अशा दबलेल्या, दमलेल्या आवाजात डॉ.बंब यांचे तोंडून ‘ते’ नाव बाहेर पडले.
“ दॅटस् ऑल.” खांडेकर आनंदाने म्हणाले.  “ टेप बंद करा.”
मशीन बंद करण्यात आलं. खांडेकर कोर्टाकडे वळले आणि विजयी मुद्रेने म्हणाले,
“आता हे स्पष्ट झालंय की आपण सगळ्यांनी जे नाव ऐकलंय ते  लीना धुरी चं .निनाद धुरी नाही.”
“ पुन्हा एकदा टेप लावा.” न्या.कोलवणकर म्हणाले.
पुन्हा मशीन चालू करण्यात आलं.न्यायाधीश आणि पाणिनी पटवर्धन लक्षपूर्वक ऐकत होते.
“ अशा प्रकारात कल्पना शक्तीला खूप वाव असतो. डॉक्टर बंब यांचा आवाज इतका अस्पष्ट आहे की आपण स्वत:च्या मनात लीना धरून चाललो तर लीना ऐकल्याचा भास होईल.निनाद धरून चाललो तर निनाद ऐकू आल्यासारखं वाटतं.मी मनात काहीच न आणता स्वच्छ मानाने ऐकलं. धुरी हे नाव तर नक्कीच  उच्चारलं गेलंय.प्रश्न निनाद की लीना एवढाच आहे. माझं मत आहे की लीना नाही. निनाद हेच नाव बंब यांनी घेतलं आहे.” न्यायाधीश म्हणाले.
“ मला हा टेपरेकॉर्डर पुराव्यात घ्यायचाय.” खांडेकर म्हणाले.
“ मला माहित्ये ते.” न्यायाधीश म्हणाले. “ तुम्ही अत्ता जो खटला चालवताय तो सरकार वि. निनाद धुरी असा आहे.आणि जो पुरावा तुम्हाला रेकॉर्डवर हवाय, तो तुमच्या म्हणण्याप्रमाणे  दर्शवतोय की  लीना म्हणजे मिसेस धुरी हल्लेखोर आहे. मग तुमच्या म्हणण्या प्रमाणे निनादला सोडून द्यावे लागेल. ”
“ त्या दोघांनी संगनमत केल्याची शक्यता मी अजून सोडून दिलेली नाही.” --खांडेकर.
“ पण त्यांनी एकत्रित सहभाग घेऊन हत्या केल्याचा पुरावा ही सादर केलेला नाही. तुम्हाला अजून काही प्रश्न  विचारायचे आहेत? ” न्या.कोलवणकर म्हणाले.
“ नाही.” –खांडेकर.
“ क्रॉस घ्यायच्ये?”
“ नाही युअर ऑनर.”  पाणिनी म्हणाला.  “ मला वाटतं सरकार पक्षाला टेपरेकॉर्डर पुरावा म्हणून दाखल करायचा आहे.”
“ हो... पण एक मिनिट...” खांडेकर जरा गोंधळून म्हणाले,  “ खर तर आम्ही कोर्टाला रेकोर्डिंग ऐकवलंय.कोर्टाने ते दोन वेळा ऐकलंय.आता पुरावा म्हणून सादर करायची गरजच नाही.”
“ तो एकच मार्ग आहे रेकॉर्ड वर घेण्याचा.कारण कोर्टाचा क्लार्क, जो इथे झालेल्या सर्व साक्षी आणि उलट तपासण्या टिपून घेतो, तो त्या मशीन मधून आलेला आवाज कोणत्या भाषेत लिहिणार?”  पाणिनीनं विचारलं.
“ आवाजाची नोंद कशाला करायला पाहिजे? क्लार्क एवढचं टिपून घेऊ शकतो ना, की टेप वर डॉ.बंब यांनी हल्लेखोर म्हणून लीना धुरी असं नाव उच्चारलं. ” खांडेकर म्हणाले.
“ न्यायाधीशांना निनाद वाटतंय, सुरुवातीला तुम्हालाही निनाद धुरी वाटत होतं.”  पाणिनी म्हणाला.
“ आपण पुरावा म्हणून हा टेपरेकॉर्डर दाखल करून घेऊ.निदान अत्ता तरी .वाटलं तर नंतर काढून टाकता येईल.” न्यायाधीश म्हणाले.
“ ठीक.”  पाणिनी म्हणाला.
“ ठीक.” खांडेकर म्हणाले.
“ तुम्हाला क्रॉस घ्यायची आहे?”
“ नाही.”  पाणिनी म्हणाला.
“ तुमचा पुढचा साक्षीदार बोलवा.”-न्यायाधीश
“ आरोपी विरुद्धची ही केस रद्द करावी का याचा आमचा विचार अजून नक्की होत नाहीये.आम्हाला दुपारी दोन वाजे पर्यंत मुदत हवी आहे, विचार करून आम्ही निर्णय घेतो.तोवर कोर्टाने सुट्टी जाहीर करावी.” खांडेकर म्हणाले.
“ बचाव पक्षाची काही हरकत?” पाणिनीकडे बघून न्यायाधीशांनी विचारलं.
“ कोर्ट जर सुट्टी घेणार असेल तर त्यापूर्वी  मला एकाला साक्षीसाठी पुन्हा बोलवायचं आहे.”  पाणिनी म्हणाला.
“ कोण आहे?”
“ बंब यांचा घर गडी.”  पाणिनी म्हणाला.
साक्षीदार कोर्टातच होता.तो येऊन पिंजऱ्यात उभा राहिला.
“इथे अत्ता प्रज्ञा पांडव ने सांगितलं की एक स्त्री मागच्या दाराने बाहेर पळाली.तर मला एक विचारायचं होतं की  बंब यांच्या घराच्या त्या मागच्या दाराला माझ्या माहिती नुसार  ऑटोमॅटिक डोअर क्लोजर आहे. बरोबर ना? ”  पाणिनीनं विचारलं.
“ हो.”
“ आणि अगदी तशाच प्रकारचा ऑटोमॅटिक डोअर क्लोजर तुझ्या घराच्या पुढच्या दाराला आहे ना?”
“ हो.”
“ तुझ्या आणि बंब दोघांचेही ऑटोमॅटिक डोअर क्लोजर व्यवस्थित चालू आहेत, अजून?”  पाणिनीनं विचारलं.
“ आहेत सर.”
“  बंब यांचे घराचे मागचे दार आणि तुझ्या घराचे पुढचे दार  समोरा समोर आहेत? ”
“ बऱ्यापैकी सामोरा समोर. ”
“  जेव्हा तू तुझ्या घरातून अंगावर फक्त टॉवेल गुंडाळून बाहेर आलास, काय झालं ते बघायला, तेव्हा तुझ्या हातात काहीही नव्हतं? कसाबसा टॉवेल गुंडाळून तू आलास?”
“ हो. काय घेणार होतो मी बरोबर? तेवढा वेळच नव्हता.” नोकर म्हणाला.
 तेव्हा तुला डॉ.बंब यांच्या घराचं मागचं दार बंद असलेलं दिसलं?”  पाणिनीनं विचारलं.
“ हो सर.”
“ आणि तू फक्त टॉवेल गुंडाळून बाहेर आला होतास? ”
“ हो साहेब.”
“ आधी साक्ष देताना तू म्हणाला आहेस की पोलिसांनी तुझी चौकशी केल्यावर तुला घरी जा  आणि कपडे करून  तिथेच थांब म्हणून सांगितलं .”
“ हो.”
“ आणि तू त्या प्रमाणे केलंस?”  पाणिनीनं विचारलं.
“ हो साहेब.” नोकर म्हणाला.आणि पाणिनी हसला.
“ या कोर्टाला तू सांगशील का, की तू फक्त टॉवेल गुंडाळून बाहेर आला होतास आणि पोलिसांनी घरी जा म्हणून सांगितल्यावर तू घरी गेलास असं म्हणतो आहेस तर ऑटोमॅटिक डोअर क्लोजरमुळे बंद झालेलं  तुझ्या घराचं दार तुझ्या साठी  कोणी उघडलं?  कारण तुझ्याकडे किल्ली नव्हती.”  पाणिनी म्हणाला.
न्यायाधीश आपल्या खुर्चीतून पुढे सरकले आणि खूप लक्षपूर्वक ऐकू लागले.
“ अजून तुला पुढे विचारतो मिस्टर पुरी, की जेव्हा तू कोर्टात टेप रेकोर्डिंग ऐकत होतास, तेव्हा मी तुझ्याकडे पहात होतो, तेव्हा तू खूप तणावा खाली होतास.  खुर्चीतून कुठल्याही क्षणी उठून कोर्टाच्या बाहेर पळायच्या तयारीत होतास! कारण डॉक्टर बंब यांचा आवाज इथे जमलेल्या सर्वांपेक्षा तू जास्त चांगला ओळखतोस. जेव्हा डॉक्टर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचं नाव उच्चारणार होते,तेव्हा तुला खात्री होती की हे नाव  निनाद धुरी किंवा लीना धुरी नव्हतं तर दीना पुरी असणार होतं. फक्त ते खूप दमले असल्यामुळे त्यांच्या कडून स्पष्ट उच्चार झाला नाही त्यामुळे त्यांनी तुझं नाव घेऊनही ते नाव निनाद धुरी किंवा लीना धुरी आहे असा भास सगळ्यांना झाला. प्रत्यक्षात इथे जमलेल्या कोणीही हा प्रयोग करून पाहावा, खूप दमलेल्या आवाजात, आपला उच्छ्वास टाकत केलेला  दीना चा उच्चार ‘निनाद’ वाटू शकतो, कारण निनाद उच्चारताना दमलेल्या माणसाचा शेवटचा ‘द’ नीट ऐकू येणार नाही.  तसाच  दीना उच्चारल्यावर ‘लीना’ असा  उच्चार वाटू शकतो.कारण दोन्ही नावात शेवटी ‘ना’  आहे तसाच पुरी चा उच्चार  धुरी वाटू शकतो.  तुझ्या सुदैवाने सरकार पक्षाला तो लीना वाटला, न्यायाधीशांना निनाद वाटला आणि म्हणून तुझं फावलं आणि  तू पळाला नाहीस.  ” पाणिनीने बॉम्ब फोडला.
दीना पुरीने काहीतरी बोलायचा प्रयत्न केला पण बोलू शकला नाही.अचानक त्याने खुर्चीतून उसळी मारली आणि दाराच्या दिशेने पळायचा प्रयत्न केला. पण तिथपर्यंत तो पोचू शकला नाही. तुडुंब भरलेल्या कोर्टातल्या लोकांनी त्याला दहा पावलं सुद्धा पुढे जाऊ दिल नाही.न्यायाधीशांनी पोलिसांना त्याला पकडण्याचे आदेश दिले.
पाणिनी नाटकीपणे न्यायाधीशांकडे वळून म्हणाला,
“ आता आपण  खांडेकरांच्या विनंती नुसार आपण कोर्टाचं कामकाज दुपारी २ पर्यंत तहकूब केलंत तरी माझी हरकत नाही.”
न्यायाधीश हसले.
“ दरम्यान मी सुचवू इच्छितो की, डॉक्टर बंब यांच्या कपड्यांच्या कपाटाची तुम्ही पोलिसांकडून  झडती घेतली तर तिथे एक शर्ट-पँट मिळेल की जी या साक्षीदाराच्या मापाची असेल.अगदी तंतोतंत,पण ते कपडे डॉ.बंब यांना होणार नाहीत.या खेरीज तुम्हाला दीना पुरीच्या मापाचे बूट, जे बंब यांना होणार नाहीत, तुम्हाला सापडतील. एवढंच काय तर बंब यांच्या त्याच कपाटातल्या एका छोट्या ड्रॉवर मधे पुरीचा बनियन आणि अंडरवेअर सापडेल. अर्थात ही दोन्ही अंतरवस्त्रं सुद्धा डॉ.बंब यांची नाहीत. ”
खांडेकर काही बोलायचं सोडून ऐकतच राहिले. पाणिनी पुढे म्हणाला,
“ एवढं सगळं झडतीत सापडल्यावर निनाद ऐवजी  ऐवजी लीना धुरीवर सुद्धा  खुनाचा आरोप ठेवायची गरज भासणार नाही. राहता राहिला माझ्या वरील चोरीची डायरी ठेऊन घेतल्याचा आरोप.  जर सरकारी वकील खांडेकरांनी  कोर्टाच्या प्रशासकाकडे चौकशी केली तर  तो सांगेल की  पुढील आदेश  प्रशासकाकडून मिळेपर्यंत डॉ.बंब यांची ती डायरी  अॅडव्होकेट पटवर्धन  हे बंब यांचा प्रतिनिधी या नात्याने सांभाळत आहेत  असे  आधीच पटवर्धन यांनी प्रशासकाला कळवलं होतं.”
“ काय ? ” खांडेकर ओरडले. “ ती डायरी तुम्ही कोर्टाच्या प्रशासकाकडे दिली?” खांडेकरांना  हा मोठा धक्का होता.
“ प्रशासक पुढील आदेश देई पर्यंत बंब यांच्या वतीने त्यांची  डायरी मी सांभाळून ठेवतो आहे असं मी प्रशासकाला कळवलं आहे लेखी. आणि अद्याप मला प्रशासकाने त्या संदर्भात  पुढील आदेश दिलेले नाहीत त्यामुळे ती डायरी अद्याप माझ्याकडे आहे.पण ती चोरीची वस्तू म्हणून नाही तर डॉ.बंब यांची मालमत्ता म्हणून मी सांभाळतो आहे.” मिस्कील पणे  पाणिनी म्हणाला.
न्यायाधिशांच्या चेहेऱ्यावर मिस्कील हास्य पसरलं. खांडेकर खाऊ की गिळू या नजरेने पाणिनीकडे बघत होते.पाणिनीची नजर अॅडव्होकेट  कर्णिक कडे वळली आणि तो पुढे म्हणाला,
“ बार कौन्सिल मधील विद्वान वकील कर्णिक यांच्या मदतीने सरकारी वकिलांनी मला डायरी प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला पण प्रशासकाने मला सहकार्य केलं.”
  “  डायरीचा विषय माझ्या दृष्टीने संपलाय” न्यायाधीश म्हणाले. “ मिस्टर पुरी, पटवर्धन यांनी तुमच्या वागणुकीबंबत नोंदवलेल्या निरीक्षणाबद्दल तुम्हाला काही म्हणायचंय?”
“ मला काही बोलायचं नाही.” पुरी उत्तरला.
“ मी पोलिसांना आदेश देतो आहे की त्यांनी बंब यांच्या घराची झडती घ्यावी आणि पटवर्धन यांनी अंदाज केल्या प्रमाणे बंब यांच्या कपाटात खरंच पुरीचे कपडे आणि बूट सापडतात का ते शोधावं. मिस्टर खांडेकर मी दोन तासांसाठी कोर्टाच काम तहकूब करतो आहे.” न्यायाधीश म्हणाले. आणि उठून आपल्या चेंबर मधे गेले. निनाद धुरी ने  संधी साधून पाणिनीला  जवळ बोलावलं..
“डायरीच्या चोरीतून तुम्ही सुटलात पटवर्धन, पण ती डायरी जेव्हा प्रशासकाकडे पुन्हा जाईल तेव्हा काय? त्यात आमचे नाव आहे, म्हणजेच पर्यायाने कियानच्या अवैध दत्तक विधानाचा विषय समाजापुढे येणार. तो आमचा पुत्र नाही हे कियानला कळणार.त्याचं आयुष्य बरबाद होणार.”  घाबरून निनाद म्हणाला.
“ शांत हो.मी तसं काहीही होऊ देणार नाही.” पाणिनी म्हणाला.
“ पण...” निनाद काहीतरी बोलणार तेवढ्यात पाणिनीने त्याला क्लू दिला,
“ कॉम्ब बाईंडिंग ची डायरी आहे ती. त्यातल्या पानावर पान नंबर छापलेले नाहीयेत. त्यात पानं वाढवता येतात तशीच काढता ही येतात, न फाडता.”  पाणिनी म्हणाला.
न्यायाधीशांनी  दोन तासांनी पुन्हा  कोर्टात प्रवेश केला.
“ तुम्हाला पुरावे मिळालेत?” न्यायाधीश म्हणाले.
“ थोड्याच वेळात पोलीस ते आणतील.” खांडेकर म्हणाले.
न्यायाधीश म्हणाले, “ निनाद  धुरी वरचे आरोप तुम्हाला सिद्ध करताच आलेले नाहीत खांडेकर, प्रश्न राहतो लीना धुरी खुनी आहे का हे तपासणं. सकृत दर्शनी, पटवर्धन यांच्या निवेदना नंतर  पुरी ने ज्या पद्धतीने  पळून जायचा प्रयत्न केला आणि नंतर काही बोलण्यास नकार दिला त्यावरून लीना  धुरी पेक्षा पुरी हाच संशयास पात्र ठरतो. पोलीस पुरावे आणे पर्यंत मला सांगा, मिस्टर पटवर्धन, तुम्हाला पुरीचा संशय कसा आला.” न्या. कोलवणकर यांनी विचारलं.
“ शेजारी राहणाऱ्या अनुमान डहाणूकर यांनी पोलिसांना नीट माहिती दिली असती तर पुरी आधीच पकडला गेला असता.लीना ने किंकाळी फोडल्यावर मिसेस डहाणूकर काही सेकंद दाराकडे लक्ष ठेऊन होत्या. त्यानंतर त्या पोलिसांना फोन करायला गेल्या.मिस्टर डहाणूकर ने लीनाला दारातून बाहेर येताना पाहिलं होतं.ती किंचाळली तेव्हाच जर खुनी माणूस इमारतीतून बाहेर पडला असता तर मिसेस डहाणूकरने त्याला पाहिलं असतं.तिला तो दिसला नाही याचा अर्थ मी असा घेतला की तो इमारतीच्या बाहेर पडलाच नसावा.मुद्दामच लीना बाहेर जायची वाट बघत तो तिथेच डॉक्टरांच्या घरात लपून बसला असावा. आता माझ्या अंदाजाने घटनाक्रम असा झाला असावा. रात्री अकरा नंतर डॉ.बंब यांनी  दीना पुरी ला घरी जायला सांगितलं असाव.पण त्याला डॉक्टरांकडे असणारी ती गोपनीय डायरी हवी होती. डॉक्टरांचे उद्योग त्याला माहित असावेत आधीपासून किंवा अगदी नुकतेच समजले असावेत. डायरीत काय आहे  हे कोणाकडून तरी कळलं असावं. आणि अगदी काही दिवस आधीच समजलं असावं. त्यातली नावं वाचून तो त्या लोकांना जन्मभर ब्लॅकमेल करू शकला असता. घरी न जाता तो बंब यांच्या बेडरूम मधे गेला.आणि तिथेच बसून राहिला.डॉ.बंब काही कारणास्तव  बेडरूम मधे आले तेव्हा त्यांना पुरी कपाटाजवळ लपून बसलेला दिसला.पुरीला हे अनपेक्षित होतं. कारण डॉ.बंब यांनी रात्री अकरा नंतर अपॉइंटमेंट दिल्याचं त्याला माहित होतं.त्यामुळे ते एवढ्यात झोपायला कसे आले याचं त्याला आश्चर्य वाटलं असाव.त्यांना खुलासा करण्यासारखं कारणही तो देऊ शकत नव्हता.त्याने डॉक्टरांवर हल्ला केला.त्यांच्या डोक्यात जोरात काहीतरी मारलं. त्याच वेळी त्याने मिसेस लीना धुरीचा किंचाळण्याचा आवाज ऐकला. आणि तो एकदम सावध झाला.आपण तिथे नव्हतो हे भासवण्यासाठी म्हणजे अॅलिबी निर्माण करण्यासाठी तो मागच्या दाराकडे धावला पण बाहेर पडला नाही.त्या ऐवजी बेडरूम मधे गेला आणि आपल्या अंगावरचे सर्व कपडे, बूट, काढून डॉ.बंब यांच्या कपाटात ठेवले. पण पँट च्या खिशातून आपल्या घराची किल्ली काढून घेतली. नाहीतर त्याला आपल्या घरात जाताच आलं नसतं.तिथलाच एक टॉवेल घेऊन कमरेला गुंडाळला आणि  तिजोरीतील डायरी काढून घेण्याची संधी मिळण्यासाठी वाट बघत थांबला.पण तेवढ्या कालावधीत म्हणजे तो कपडे काढत असताना प्रज्ञा त्याला हवी असलेली डायरी घेऊन गेली होती. त्यामुळे टॉवेल गुंडाळून तो तिजोरीत डायरी शोधायला गेला तेव्हा त्याला ती मिळाली नाही.पोलीस कधीही येतील याची त्याला खात्री होती म्हणून आपल्या घरात न जाता त्याने सोनेरी मासे असलेल्या तलावात डुबी मारून आपलं अंग ओलं केलं, पोलिसांना भासवण्यासाठी की आपण अंघोळ करून नुकतंच बाहेर आलो आपल्या घरातून, किंकाळी ऐकून.पोलीस या त्याच्या खेळीला बळी पडले कारण तो ओल्या अंगाने बाहेर आला हे त्यांना दिसतच होतं.पोलिसांनी त्याला घरी जाऊन कपडे कर आणि थांबून रहा घरातच असं सांगितलं तेव्हा त्याला माहित होतं की पोलीस कदाचित  आपल्या घरी येऊन बाथरूम तपासतील म्हणून त्याने घरी येऊन आधी अंघोळ केली आणि बाथरूम पासून खिडकी पर्यंत अंगावरून पाणी ओघळू देऊन फरशीवर ते पाणी सांडलेलं दिसेल अशी व्यवस्था केली.”  पाणिनी म्हणाला.
“असंच घडलं असाव हा संशय कसा आला तुम्हाला?” न्यायाधीशांनी विचारलं.
“ शेजारच्या डहाणूकर बाईंनी मला सांगितलं होतं की बंब यांच्याकडे एक मांजर आहे त्याचा तळ्यातल्या सोनेरी माशावर डोळा आहे .अत्ता पर्यंत ते त्या माशाला कधीही पकडू शकल नव्हतं पण त्या दिवशी  म्हणजे मी त्यांच्याशी बोलायला त्यांच्या घरी गेलो तेव्हा त्या मांजराने तळ्याजवळ सोनेरी माशाला मारलेलं दिसलं.मला त्या बाई बोलत असताना या घटनेचं महत्व लक्षात नाही आलं कारण त्या फार अघळ पघळ बोलत असतात. पण मी विचार केला की तळ्यातल्या माश्याला मांजर पकडू शकत नसेल तर काहीतरी कारणाने मासा बाहेर आला असावा आणि मग मांजराने त्याला मारले असेल. तो एवढ्या रात्री बाहेर का आला असावा असा विचार केला तेव्हा मला संशय आला की कोणीतरी तळ्यात उडी मारली आणि त्यामुळे जे पाणी बाहेर उडालं, त्यात तो मासा बाहेर पडला असावा. आणि त्या अपरात्री दीना  पुरी शिवाय तळ्यात उडी मारायचं कारण कुणालाच नव्हतं ”  पाणिनी म्हणाला.
एक पोलीस अधिकारी हातात एक पिशवी घेऊन आला आणि त्याने खांडेकरांच्या हातात ती दिली.आतील वस्तू पाहून खांडेकरांचा चेहेरा पडला.
“ अत्यंत तर्क शुद्ध आणि वास्तवाला धरून मांडणी.  पटवर्धन यांनी सांगितल्यानुसार सर्व वस्तू त्या कपाटात मिळाल्या आहेत. आम्ही निनाद धुरी  विरुद्धचा खटला मागे घेतोय.” खांडेकर खिलाडूपणे म्हणाले.
“ मी नेहेमीच म्हणतो की परिस्थितीजन्य पुरावा हा सर्वोत्तम पुरावा असतो.फक्त घडलेल्या घटनेचे सर्व बिंदू जोडले गेले पाहिजेत.माझ्या या तर्क संगतीत ते जोडले गेलेत.”  पाणिनी म्हणाला.
“  छान.” न्यायाधीश म्हणाले. “आरोपी निनाद धुरी खुनी नसल्याचं तुमचेच पुरावे सिद्ध करत आहेत,खांडेकर. तुम्ही स्वत:ही म्हणताय तसं. लीना धुरी संशयित आहे असं दाखवायचा प्रयत्न तुम्ही टेप रेकोर्डिंग दाखवून केलाय पण त्यात घेतलं गेलेलं नाव लीना पेक्षा दीना आहे हे दीना पुरी च्या प्रतिक्रियेतून सिद्ध होतंय. आता  निनाद ला मुक्त करण्याचा आदेश मी देतोय. दरम्यान दीना पुरी विरुद्ध योग्य ती कारवाई करायचे आदेश हे कोर्ट देतय.”
 
( कादंबरी समाप्त.)