प्रकरण 8
पाणिनी धुरीला त्याच्या घरापर्यंत घेऊन आला तेव्हा धुरीची बायको दारातच उभी होती ती पळतच आपल्या नवऱ्याकडे आली
“निनाद सगळं काही ठीक आहे ना?”
धुरीन त्याचं व्यावसायिक हास्य आपल्या चेहऱ्यावर आणलं. “सगळं काही नियंत्रणात आहे काळजी करू नको” तो तिला म्हणाला.
तिच्या चेहऱ्यावर पाणिनीसाठी कृतकृत्यतेची भावना वाढली.
“ खूप वेळेवर आलात तुम्ही.” ती त्याला म्हणाली
“पटवर्धन आले तिथे घाईघाईत पण खरंतर त्याची काही गरज नव्हती. मी व्यवस्थित हाताळली होती परिस्थिती. आणि मिस्टर खांडेकर खूपच सहकार्य करणारे होते आम्ही आता चांगलेच मित्र झालोय.” निनाद म्हणाला.
“निनाद, तू काय सांगितलं त्याना?” त्याच्या पत्नीने विचारलं
“काय म्हणजे? जी काही वस्तुस्थिती होती ती. त्यात दडवण्यासारखं मला काही नव्हतं. म्हणजे मला ती कॅन घेऊन जाताना मुलगी भेटली मी तिला तिच्या गाडीपर्यंत लिफ्ट दिली तेव्हा गाडी जागेवर नव्हती म्हणून मी तिला हॉटेलपर्यंत सोडलं, हॉटेलमध्ये जागा मिळत नव्हती म्हणून आम्ही नवरा-बायको आहत अशी बतावणी करून आम्ही बुकिंग केलं.पण त्याशिवाय तिला खोली मिळवून देण्याचा दुसरा कुठलाच मार्ग माझ्याकडे नव्हता त्याचबरोबर मी हेही सांगितलं की तिचं बुकिंग झाल्यानंतर ती हॉटेलमध्ये एकटीच राहिली आणि मी घरी गेलो.”
“धुरी, पोलिसांनी तुला त्या बाई बद्दल सविस्तर प्रश्न विचारले का ?” पाणिनीने विचारलं.
“अर्थात विचारले तिच्याबद्दल त्यांना संपूर्ण माहिती हवी होती त्यांची अशी कल्पना होती की एका डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्यात ती गुंतली गेली आहे कदाचित ते सिद्ध सुद्धा करतील त्यांनी त्या हॉटेलमधले तिचे ठसे मिळवलेत डॉक्टरांच्या घरातही तिचे काही ठसे मिळालेत म्हणे.” धुरी म्हणाला
“तुला माहितीये की ही खुनाची केस आहे? तुला माहिती होतं डॉक्टर बंब हे मेलेत? मी आता रेडिओवर सुद्धा ऐकलं.” पाणिनी म्हणाला.
“त्यानी मला त्यापैकी काहीच सांगितलं नाही पण मला हे जाणवत होतं ते कुठल्यातरी एका गंभीर घटनेची चौकशी करत आहेत. म्हणजे नार्कोटिक्स किंवा तत्सम मादक द्रव्याच्या सवयी पेक्षाही गंभीर घटनेची. पण ठीक आहे ,मी याच्यातून व्यवस्थित बाहेर पडेन, कारण मी सत्य काय आहे ते सांगितलय. बर ते असू दे ते माझी कार घेऊन गेले का ?”
“हो.” लीना म्हणाली.
“कशी घेऊन गेले? म्हणजे चालवत घेऊन गेले की कशी?”-निनाद धुरीने विचारलं.
“नाही. त्यांनी टोव्ह करून नेली. आतल्या भागाला काही धक्का लागू नये म्हणून त्यांनी ती चालवत नेली नाही. आतले काही काही ठसे त्यांना हवे होते म्हणे.” मिसेस धुरी म्हणाली
“ठीक आहे. एकंदरीत सर्व काही व्यवस्थित आहे .काळजी करायचं कारण नाही. मीच त्यांना कार तपासायला न्यायची परवानगी दिली होती. मी त्यांना म्हणालो की आमच्याकडे आणखीन एक कार आहे, त्यामुळे तुम्ही नेली तरी चालेल. या सगळ्या घटनेत फार काही काळजी करण्याजोगे नाहीये.” धुरी म्हणाला.
हे बघ धुरी, तुझ्या एकंदर वागण्यावरून हे लक्षात येते की तू दुसऱ्या कुणाची नाही तर स्वतःचीच फसवणूक करतो आहेस. स्वतःलाच खोटा धीर देतो आहेस. पाणिनी म्हणाला. सोमवारी रात्री साडेअकरा नंतर कोणीतरी डॉक्टर बंब यांच्यावर हल्ला केला. तुझा आणि डॉक्टर बंब यांच्याशी पूर्वी संबंध आला होता. तुमच्या दोघांत काहीतरी व्यवहार झालेला होता. हल्ला झाल्यानंतर डॉक्टर बंब यांच्या ऑफिस मधून एक मुलगी पळून जाताना दिसली आहे. तिला परत बघितलं तर ओळखता येईल असं तिच्या शेजाऱ्यांचं म्हणणं आहे त्याच मुलीला तू ब्युटी रेस्ट हॉटेल आत घेऊन गेलास आणि नवरा बायको म्हणून तुम्ही तिथे बुकिंग केलंत. सगळा पुरावा तुझ्याकडे बोट दाखवतो आहे .परंतु तू एक मोठा बिझनेसमन असल्यामुळे जोपर्यंत त्या मुलीला हॉटेलला नेल्याचं तू स्वतःहून कबूल करत नाहीस तोपर्यंत पोलीस तुझ्यावर थेट दोषारोप करत नाहीयेत. दरम्यान पोलिसांनी डॉक्टर बंब यांच्या ऑफिस मधनं त्या मुलीचे ठसे मिळवलेत तुम्ही राहिलेल्या हॉटेल आतल्या रूम मधूनही ते ठसे त्यांनी मिळवलेत आणि ते दोन्ही ठसे एकच असल्याचा निष्कर्षावरती आले आहेत. आता ते तुझ्या कार मधून तिचे ठसे मिळवतील.
ते मिळवले की ते लगेचच तुझ्यावर महत्त्वाचा पुरावा आणि माहिती लपवणचा आरोप करतील तू कितीही मोठा बिझनेसमन असलस तरी ते मागे हटणार नाहीत. मी तुला खूप संधी दिली होती की तू स्वतःहून मला वस्तुस्थिती सांगशील, त्यामुळे पोलिसांना नक्की काय सांगायचं हे मी तुला व्यवस्थित समजावन सांगू शकलो असतो. पण तू ती संधी नाकारलीस.ज्या मुलीला तू डॉ.बंब यांच्या दवाखान्यात घेऊन गेलास ती प्रज्ञा पांडव होती. ओवी वागळे नाही.नात्याने ती कियान ची सावत्र बहीण लागते.बंब कोणत्या प्रकारचा धंदा चालवतात हे तिला समजलं होतं.” पाणिनी म्हणाला.
धुरी चा चेहेरा बदलत गेला हे त्याच्या बायकोच्या नजरेतून सुटलं नाही.
“ निनाद ! मी काय विचारत्ये, तू घेऊन गेलास तिला तिथे? ” तिने ओरडून विचारलं.
“ हो.. म्हणजे नेलं मी... पण म्हणजे तिने तसं काही बेकायदा कृत्य केलं नाहीये तिथे.हे पटवर्धन कितीही रंगवून सांगत असले तरी ती यातून बाहेर पडेल ...कारण फार तर ते फक्त एवढंच सिद्ध करू शकतील की ती डॉ. बंब यांच्या ऑफिसात गेली होती.”
“ तू निरपराध आहेस असं खांडेकरांना वाटतंय असं जर तुला वाटत असेल तर तो भ्रम आहे तुझा...” पाणिनी म्हणाला.
“ बास! बास.” धुरी ओरडला. “तुम्हाला कल्पना नाहीये की मी या भागातला केवढा मोठा बिझनेस मन आहे ते.माझे खूप मोठ्या नेत्यांशी संबंध आहेत.रोजची ऊठ बस आहे. तुम्हाला वाटतंय तेवढ्या अडचणीत नाहीये मी.आणि आलोच तर गरज वाटली तर एखाद्या आमदाराचा किंवा खासदाराचा फोन येईल मला सोडवायला, इतकी व्यवस्था मी करू शकतो. ”
“ तुझी पत बघूनच ते तुझ्याशी उंदरा-मांजराचा खेळ खेळतायत.गोड बोलून तुझ्या कडूनच तुझ्याच विरोधात जाणारे पुरावे गोळा करतायत.ते एकदा मिळाले की कुणाचीही तमा न बाळगता, ते तुला आत घेतील.” पाणिनी म्हणाला.
“ म्हणजे कोणते पुरावे? त्याच्या बायकोने, लीनाने विचारलं.”
“ त्यांना धुरीच्या गाडीत प्रज्ञा पांडव चे ठसे मिळणे आणि त्या आधारे तिला पकडून तिच्या कडून जबाब घेणे.” पाणिनी म्हणाला.
धुरी जरा विचारात पडल्यासारखा झाला.अस्वस्थपणे त्याने आपल्या केसातून हात फिरवला.आपली उजवी मूठ चिडून डाव्या हातावर आपटली आणि स्वत:शीच बोलल्यासारखा म्हणाला,
“ त्या हॉटेलचा ठाव ठिकाणा त्यांना लागलाच कसा पण? ”
“ हे सर्व सवाल या घडीला निरर्थक आहेत. मला एवढंच सांग की वकील म्हणून तू मला ठेवणार आहेस की नाहीस? नसशील तर मी सरळ निघून जाणार आहे. ” पाणिनी म्हणाला.
“ नाही,नाही, पटवर्धन, ” लीना ओरडून म्हणाली. “ त्याला कळत नाहीये.तुम्ही कुठेही जाऊ नका प्लीज. धुरी ला वाचवा आणि कियानच्या जन्माबद्दल पेपरात काहीही प्रसिद्धी मिळणार नाही याची व्यवस्था करा. ”
पाणिनी थोडासा शांत झाला, त्याने धुरीला विचारलं, “ पोलीस तुला पकडायला आले तर तू किमान तुझं तोंड गप्प ठेवशील का? ”
“ ठीक आहे.” त्रोटकपणे धुरी उत्तरला.
“ ठीक आहे लीना, मला आता स्पष्ट झालंय.मी आता निघतोय.” पाणिनी म्हणाला.
“ तुम्ही अत्ता पर्यंत केलेल्या कामाचं बिल पाठवून द्या.”
“ मी प्रज्ञा पांडव ला सांगितलंय तिने स्वत: साठी दुसरा वकील बघावा. आणि मला असं वाटतंय की तिने नेमला असावा एखादा वकील आणि ते तिला तसा सल्ला देतीलच की आपण किती खोल पाण्यात आहोत हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत काहीही बोलू नकोस अगदी किती वाजले विचारलं तरीही सांगू नकोस. तर मग धुरी मी तुला जाता जाता एकच प्रश्न पुन्हा एकदा विचारतोय तुझ्या मुलाचा म्हणजे कियानचं संपूर्ण सुख या प्रश्नाच्या उत्तरावर अवलंबून असणार आहे, तू डॉक्टर बंब यांची सोमवारी रात्रीची अपॉइंटमेंट घेतली होतीस का? कारण तुझं नाव अपॉइंटमेंटच्या रजिस्टर वर होतं.” पाणिनी म्हणाला.
“नाही मी नव्हती घेतली.”
धुरी ची बायको एकदम घाई घाईत म्हणाली,
“ पण पांडव असं पण नाव होतं त्याच्या जोडीने अपॉइंटमेंट रजिस्टर मध्ये. कदाचित या पांडव मुलीने तर ती घेतली नसेल?”
“त्याचाच विचार करतो आहे मी.” पाणिनी म्हणाला.
“कोणीतरी एक खोटं बोलताय ती म्हणते की मी अपॉइंटमेंट घेतली नाही तू म्हणतोयस की तू ही घेतली नाहीस.” पाणिनी म्हणाला.
धुरीने पाणीनीच्या डोळ्याला आपले डोळे थेट मिळवले आणि म्हणाला,
“. मूर्खपणा केला मी तुमच्याशी सतत खोटं बोलत राहिलो ज्यावेळेला मी खरं बोलायला हवं होतं. पण आता मी तुम्हाला सत्य सांगतो मी डॉक्टर बंब यांची अपॉइंटमेंट घेतली नव्हती. बंब आणि माझा काहीही संपर्क झालेला नव्हता. मी फक्त प्रज्ञा पांडव जवळ बोललो होतो. खरं तर मला बोलायची इच्छा होती डॉक्टरांशी, पण मी असा विचार केला की तसं बोलणं म्हणजे त्यांना ब्लॅकमेल केल्यासारखं होईल म्हणून मी बोललो नाही.”
“पोलीस जेव्हा तुला खुनाच्या आरोपाखाली अटक करायला येतील तेव्हा तू त्यांना सांग की मला जे काही बोलायचं होतं ते मी आधीच बोललोय आणि आणखीन मला काहीही बोलायचं नाहीये.” पाणिनी म्हणाला.
“म्हणजे,तुम्हाला असं वाटतय की ते मला अटक करतील?”
“नक्कीच करतील. चल सौम्या निघूया. पाणिनी म्हणाला. आणि दार उघडून ते दोघं बाहेर आले. आपल्या कार मध्ये बसले त्यांच्याबरोबर लीना पण बाहेर आली.
“ प्लीज जाऊ नका तुम्ही पटवर्धन! इथेच थांबा माझ्या सतत संपर्कात रहा. मला भीती वाटते ते कधीही इथे येतील आणि माझ्या नवऱ्याला अटक करतील प्लीज.” लीना ने विचारलं.
“ नेमकं कधी घडू शकते हे?” धुरी ने घाबरून पाणिनीला विचारलं.
“तुझ्या कारची तपासणी झाली आणि त्यांना त्यात ठसे मिळाले की लगेचच. म्हणजे सुरुवातीला ते तुला चौकीत घेऊन जातील आणि ही मुलगी कोण आहे तिची तुझी ओळख काय आहे असे सगळे प्रश्न विचारतील तुझी भंबेरी उडवतील त्यात तू कुठेही काहीही बोलायला चुकलास की ते एक तर तुझ्यावर आणि तिच्यावर एकत्रित खुनाचा आरोप करतील पण मला दुसरी शक्यता जास्त वाटते की ते तिला खुनी म्हणून पकडतील आणि तुला पुरावा किंवा माहिती दडवायचा प्रयत्न केला आणि खुनाला साथ दिली असा आरोप करतील.” पाणिनी म्हणाला.
“आणि तुम्हाला वाटतय की मी त्या मुलीबद्दल काहीच सांगू नये?”
“तुझं वाक्य अजून छोटं कर. मला म्हणायचं की तू कशा बद्दलच काहीच सांगू नयेस.”
पाणिनीने सौंम्याला शेजारी बसायला सांगितलं आणि कार चालू केली.
“किमान आपल्याला आता हे तरी कळलं की आपल्यासमोर काय वाढून ठेवलय.” सौम्या म्हणाली
“मला नाही वाटत त्याची खात्री अजून.”
“म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला ?”
“त्या मुलीचं जॅकेट”
“कोण मुलगी? आणि कसलं जॅकेट?”
“प्रज्ञा पांडवचं जॅकेट”
“त्याचं काय ?”
“जाकिटावरची मोत्याची बटणं”
“मला नाही समजलं.” सौम्या म्हणाली
“तुझ्या लक्षात आलं का धुरीच्या बायकोने त्या बाहेर पडणाऱ्या मुलीचे जे वर्णन केलं, तेव्हा ती म्हणाली होती की तिच्या जाकीटावर मोत्याची बटणं लावली होती. तिला कसं काय कळलं त्या बटनाबद्दल?” पाणिनीने विचारलं.
“अर्थात तिच्या नवऱ्याने सांगितलं असणार तिला.”
“याचा अर्थ तिच्या नवऱ्याने तिला असं काही सांगितले आहे की जे त्याने आपल्याला सांगितलं नाही. या बटणा बद्दल त्याने स्वतःहून आपल्याला काही सांगितलं नाही. आपल्याशी तो बोलत होता तोपर्यंत.”
“आधी काही न समजल्यामुळे सौंम्याचा गोंधळ उडाला नंतर एकदम तिला काहीतरी आठवलं. काहीतरी ती बोलायला गेली आणि एकदम गप्प बसली आणि फक्त एवढेच म्हणाली
“माय गॉड!”
“तेच म्हणायचंय मला.” पाणिनी म्हणाला.
“आता काय करणार आहोत आपण?”
“धुरीला अटक होईपर्यंत आपण थांबूया. एकदा त्याला अटक झाली की तिला शिकवायची संधी त्याला मिळणार नाही नंतर तिला आपण आपल्या ऑफिसला आणू आणि मग शोधून काढू नक्की काय झालं ते.”
“खूप मोठा धोका स्वीकारत आहात सर तुम्ही या सगळ्यांमध्ये. प्रज्ञाला जे रेकॉर्ड किंवा जी डायरी डॉक्टर बंब यांच्या क्लिनिकमध्ये मिळणे, आणि तिने ती घेणे, घरातून एका मुलीने बाहेर पडणे, जॅकेट ला मोत्याची बटणे असणे.... देवा देवा तुम्ही या केस मध्ये भाग घेतला नसता तरच बरं झालं असतं असं मला वाटायला लागलं आहे.”
मलाही असंच वाटलं. पण आता त्याला बराच उशीर झालाय.” पाणिनी म्हणाला.
(प्रकरण ८ समाप्त.)
कथा आवडत असेल तर इतरांनाही सुचवा वाचायला