Fajiti Express - 11 in Marathi Comedy stories by Akshay Varak books and stories PDF | फजिती एक्सप्रेस - भाग 11

Featured Books
Categories
Share

फजिती एक्सप्रेस - भाग 11


कथा क्र.०६: मैत्रीचा कॉन्ट्रॅक्ट

गावातल्या त्या चहा टपरीवर पांड्या आणि भिक्या रोज हजेरी लावायचे. टपरीवाल्याने त्यांच्यासाठी खास बाकडी राखून ठेवली होती. गावकऱ्यांना माहीत होतं,सकाळी पहिल्या “किटलीच्या शिट्टी”सोबतच हे दोघं येणार, आणि मग सुरू होणार गावभरातली पहिली आणि शेवटची “लोकसभा”.

दोघांची मैत्री एवढी घट्ट होती की गावातल्या बायकाही थट्टा करत म्हणायच्या –“देवा, यांचं लग्न झालं असतं तर आज गावातल्या सगळ्या भांड्यांचा वाटा झाला असता!”एखादी चतुर बाई त्यावर ऑडिशन करायची –“आणि घटस्फोट झाला असता तर कोर्टातली वकिलीही बंद पडली असती, रोजचा गोंधळ बघून न्यायाधीशानेही निवृत्ती मागितली असती!”

अशी ही गोड-तिखट जोडी त्या दिवशी मात्र भांडणावर आली. कारण?गावचे पाटील त्यांच्या लग्नात मोठ्ठं जेवण होतं. भात-भाजी, आमटी, मसालेभात… पण गावकऱ्यांसाठी मुख्य आकर्षण एकच होत,गुलाबजाम!गावात गुलाबजाम म्हणजे साधं गोड नाही, तो तर प्रेमाचा टेंडर!कुणाला दोन मिळाले म्हणजे तो दिवस लग्न ठरल्यासारखाच शुभ.

भिक्यानं मात्र इतिहास घडवला. पहिल्यांदा तो सरळ रांगेत जाऊन गुलाबजाम घेतला. मग लगेच दुसऱ्यांदा रुमाल डोक्यावर बांधून, मिशा वाकवून, “मी दुसरा मावशीचा चुलत भाऊ” असं नाटक करत पुन्हा रांगेत उभा राहिला.लोक थोडं हसले, पण गुलाबजाम वाटणाऱ्याने विचार केला, “लग्न आहे, दानधर्म आहे, देऊ दे.” आणि भिक्याच्या ताटात पुन्हा एक “धप्प” करून रसातलेला गोल घसरला.

पांड्या हे सगळं दूरून पाहत होता. त्याच्या डोळ्यात रागाचं वीजांचं वादळ उसळलं.“हा माझ्या वाट्याचा गुलाबजाम खातोय… म्हणजे माझं प्रेम हिसकावतोय!” असा विचार करून दुसऱ्या दिवशी टपरीवर तो तुटूनच पडला.

“अरे, हा कसला दोस्त?” पांड्या थरथरत ओरडला, “प्रेमाचा गुलाबजाम झाला चपटा!”

भिक्या मात्र निवांत, भजीच्या कांद्याचा तुकडा तोंडात टाकत, रसाळ हसून म्हणाला –“अरे पांड्या, तू माझा दोस्त आहेस म्हणून एक जास्त घेतला. जर तू शत्रू असतास ना, तर दोन जास्त खाल्ले असते!”

हे ऐकताच पांड्याचा राग डोक्यातून पायाच्या बोटापर्यंत गेला. तो उठला, शर्टाचे बटणं उघडली, छाती ताणली.भिक्यानेही पायातील चप्पल घट्ट केली, कमरेचा दोरा खेचला. गावकरी टपरीभोवती गोळा झाले. कुणी म्हणालं – “आज मॅच नाही, आज टपरीवर भिक्या-पांड्याची कुस्ती होणार!”

तेवढ्यात टपरीवाला किटली हातात घेऊन मध्ये पडला.“अरे वेड्यांनो, तुम्ही एवढं भांडताय, जणू गव्हर्नमेंटमध्ये पोलीस स्टेशनचं ताबं ह्या गुलाबजामवर आहे!”तो म्हणाला – “पाणी नाही, रस्ता नाही, वीज नाही… आणि तुम्ही इथे गुलाबजामावरून महाभारत लावलंय!”

गावकरी हसून लोळले, पण भांडण थांबायचं नाव घेत नव्हतं.तेव्हा भिक्याच्या डोक्यात अचानक एक भन्नाट कल्पना चमकली. त्याच्या चेहऱ्यावर गंभीरता आली.

“पांड्या,” तो म्हणाला, “असं रोजचं भांडण झालं तर आपली मैत्री संपेल. म्हणून एक काम करू या,आपण मैत्रीचं कॉन्ट्रॅक्ट करू! जसा शेतमालाचा कंत्राट होतो ना, दर ठरतात, सही घेतात… तसंच. नियम असतील, सही असेल, मग काही गोंधळ नाही.”

दोघांनी ठरवलं.“आता झालं, आपण आजपासून कॉन्ट्रॅक्टवर चालणार.”पांड्या ओरडला ,“कागद आण, कागद! लिखित पुरावा हवा. उद्या पुन्हा फजिती झाली तर साक्ष कुठे दाखवायची?”

भिक्याने टपरीवाल्याकडे मागणी केली. “काका, एक A4 कागद आहे का? शासकीय कॉन्ट्रॅक्ट करायचंय.”टपरीवाला खदखदून हसला. “अरे बावळटांनो, ही टपरी आहे, ऑफिस नाही. इकडे A4 कागदाऐवजी फक्त भजीचा wrapper मिळतो.”आणि खरंच, त्याने काउंटरखालून तेलकट, पिवळसर, तुपाच्या डागांनी सजलेला एक कागद बाहेर काढला.भिक्या डोळे मिचकावत म्हणाला,“काय भारी आहे! सरकारी स्टॅम्पपेपरपेक्षा हा जास्त मौल्यवान दिसतो. यातून भजीचा सुगंधही येतो… म्हणजे ही सही नेहमी ‘गोड’ राहील.”

पांड्याने गंभीर चेहरा करत तो wrapper उचलला. पण त्याच्याकडे पेन नव्हतं.“आता सही कशी करायची?” तो विचारात पडला.भिक्याने लगेच उपाय काढला, “अरे, हात घासून बोटं चाट, मग जीभेतली चहा-साखर शाई म्हणून वापर.”पांड्याने खरंच बोटं चाटली आणि तेलकट कागदावर ‘पांड्या’ असा मोठ्ठा स्वाक्षरीचा ठसा उमटवला.

भिक्या नियम वाचू लागला जणू तोच संसदेतला स्पीकर आहे तसा.

नियम पहिला:“भेळ, भजी, गुलाबजाम,सगळं 50-50. जर ताटातल्या वाटपात फरक झाला तर उरलेला भाग दोघं मिळून चाटायचा.”

नियम दुसरा:“क्रिकेट मॅच बघताना remote majority vote ने. म्हणजे जर इंडिया-बांगलादेश चालू असेल आणि पांड्याला ‘सासरचं पोळं’ बघायचं असेल, तर भिक्याला दोन मते मिळतील, पांड्याला एकच.”

नियम तिसरा:“प्रेयसी मिळाली तरी दोस्त heavy असावा. म्हणजे प्रेयसीने फोन केला तर आधी ‘पांड्याला भेटलो का?’ असा हाय टाकायचा. जर विसरली तर लगेच break-upची notice मिळेल.”

नियम चौथा:“ब्रेकअप झालं तर दुसऱ्या दोस्ताने किमान दहा विनोद मारून दुःख कमी करावं. आणि तो हसला नाही तर जबरदस्ती करून तरी हसवायचं.”

नियम पाचवा:“भांडण झालं तरी फेसबुकवर status—Bestie Forever ❤️ compulsory. स्टेटस टाकलं नाही तर पुढच्या दिवशी चहात दोन चमचे मीठ घालून शिक्षा!”

हे सगळं झाल्यावर टपरीवाल्याला त्यांनी साक्षीदार म्हणून बोलावलं.तो म्हणाला – “अरे, माझ्याकडे पेन नाही रे! रोज उधारी लिहायला खडू वापरतो.”मग भिक्यानं हुशारी दाखवली,“काही हरकत नाही. काकांच्या बीडीच्या राखेत इतकी ताकद आहे की ती सही एकदा झाली की आयुष्यभर न पुसली जाणार.”

टपरीवाल्याने खरंच बीडी विझवून राख काढली आणि wrapper वर आपली सही केली.तो म्हणाला – “ही सही म्हणजे आता सरकारी शिक्क्यासारखी आहे. उद्या गावात काही तंटा झाला तर ही कागदपत्रं थेट न्यायालयात नेता येतील… आणि नसेल तर भजीत गुंडाळून खाता येईल!”

गावकरी डोळे मोठे करून बघत होते,गावाच्या इतिहासात पहिल्यांदाच कोणीतरी “मैत्रीचं लिखित कॉन्ट्रॅक्ट” तयार केलं होतं.

दुसऱ्याच दिवशी टपरीवरचा “मैत्रीचा कॉन्ट्रॅक्ट” गावभर वाऱ्यासारखा पसरला.कोणी मोबाईलवर फोटो काढून व्हॉट्सअ‍ॅपवर टाकला, तर कोणी कॉपी करून “गावचा कायदा” म्हणून भिंतीवर लावला.

सगळ्यात भारी प्रकार केला तो गावातल्या सासू-सुनांनी.एका सासूने आपल्या सुनाला म्हणालं –“बघ ग, या पांड्या-भिक्यानं कॉन्ट्रॅक्ट केलंय. चला, आपणही करूया.”त्यांनी नियम लिहिले –१) “सासू भाजी करेल, सुना भांडी घासेल.”२) “सुनानं जर मोबाईलवर तासाभरात ४० रील्स बघितले, तर सासूला १० मिनिटं ‘तुझं तोंड पाहून मला मायाळू वाटतं’ असं म्हणावं लागेल.”३) “भांडण झालं तरी INSTAGRAM duet नक्की. सासू–सुना एकत्र ‘झिंगाट’वर नाचणार!”

गावभर हशा पिकला.पुढे हळदीकुंकूच्या कार्यक्रमात तर एका सासूने अंगठा लाल रंगात बुडवून कॉन्ट्रॅक्टवर सही केली आणि म्हणाली,“माझ्या सुनेनं जर भांडी घासली नाहीत, तर ही सही तिला रोज पाटावर दिसेल!”

गावातला मास्टरसुद्धा मागे राहिला नाही. तो वर्गात मुलांना शिकवत म्हणाला –“मुलांनो, ही आहे खरी लोकशाही! दोन लोक बसले, नियम बनवले, सही केली… म्हणजे सरकार तयार!”एक हुशार पोरगा उठून म्हणाला –“सर, मग homework equal share करू का? गणित मी करतो, निबंध राहुल करेल, आणि मराठीचं वाचन तुम्ही करा!”संपूर्ण वर्ग पोट धरून हसला.मास्टरही हसू आवरू शकला नाही. त्याने रागावल्यासारखा चेहरा करत म्हटलं –“अरे, मला ही आयुष्यात पहिल्यांदा कॉन्ट्रॅक्टचं लोणचं बघायला मिळतंय! आता पासून बेंचवर बसताना पण कॉन्ट्रॅक्ट करून बसा ,कोण खिडकीजवळ, कोण फळ्याजवळ!”

अशी गावभर कॉन्ट्रॅक्टची धूम होती. पण एके दिवशी भिक्याने मोठ्ठा बॉम्ब टाकला.टपरीवर चहा पिताना तो थोडा गंभीर होत म्हणाला –“पांड्या, मी लग्न करतोय.”

पांड्याच्या तोंडातला बिस्किटाचा तुकडा गळ्यात अडकला. तो खोकत खोकत म्हणाला –“काय? लग्न?? अरे बावळटा, कॉन्ट्रॅक्टमध्ये काय लिहिलंय आठवतंय का? ‘प्रेयसी आली तरी दोस्त heavy’. आता तू बायको heavy कसा करतोयस? कॉन्ट्रॅक्ट मोडतोयस!”

भिक्या लाजून म्हणाला –“अरे, तसं नाही… ती मुलगीही म्हणतेय – ‘तुझ्या पांड्यासोबतही मैत्री हवी.’ म्हणजे डील फेअर आहे!”पांड्या फणफणून म्हणाला –“काय फेअर? गुलाबजाम माझा, भजी माझी, आता बायकोही share करशील का?”

हा वाद इतका वाढला की गावात पंचायत बसवावी लागली.संपूर्ण गाव जमलं. पंचांनी भजीच्या रॅपरवर लिहिलेलं कॉन्ट्रॅक्ट वाचायला घेतलं.त्यातला तिसरा नियम मोठ्याने वाचला –“प्रेयसी मिळाली तरी दोस्त heavy असावा.”

पंच एकमेकांकडे बघून हसू दाबत होते. शेवटी पंच म्होरक्यानं निर्णय दिला –“लग्न करायला हरकत नाही. पण कॉन्ट्रॅक्टनुसार प्रेयसी आणि दोस्त हे एकत्र heavy हवेत. म्हणून पहिल्या रात्रीच्या खोलीत पांड्यालाही घेऊन जा. कारण कॉन्ट्रॅक्ट आहे ना!”

गावात एकच गडगडाटी हशा उसळला.बायकांनी ओटीच्या पिशव्या खाली ठेवल्या, पोरे लोळून लोळून हसू लागली, टपरीवाल्याने तर किटली खाली पाडली.भिक्याची होणारी बायको चेहरा झाकून बसली, आणि पांड्या डोकं वर करून विजयी स्मितहास्य करत म्हणाला,“कॉन्ट्रॅक्ट म्हणजे कॉन्ट्रॅक्ट. गुलाबजाम असो की लग्न… दोस्त heavy हवाच!”

म्हणून मित्रानो कोणतंही कॉन्ट्रॅक्ट करताना अनेकदा विचार करा. जर कथा आवडली असेल तर नक्कीच कॉमेंट करा.फजिती एक्सप्रेसमधील पुढची नवीन कथा लवकरच तुमच्या भेटीला येईल.

समाप्त


-अक्षय वरक