कथा क्र.०७: पोटशुद्धी खाणावळ
गावाच्या चौकात रोजचं दृश्य म्हणजे भाजीवाल्याभोवती गप्पांची मैफल. कोणत्या वांगीला किडे पडले, कोणता टोमॅटो लाल झाला, आणि कोणाच्या घरातल्या बायकोने परवा किती तिखट घातलं, हे सगळं तिथंच ठरत असे. पण त्या सकाळी मात्र चौकात वेगळंच चित्र होतं. भाजीवाल्याच्या टोपल्या रिकाम्या पडल्या होत्या, लोकांनी त्याच्याकडे बघायलाही वेळ नव्हता. सगळा जमाव जमला होता एका नवीन फलकासमोर.
तो फलक अगदी डोळ्यात भरणारा,जाडजूड अक्षरं,आणि चमचमतं रंगकाम केलेला होता. त्यावर लिहिलं होतं –
👉 “पोटशुद्धी खानावळ – जेवल्यावर पश्चात्ताप हमखास!”👉 (संस्थापक: भोंद्या कडूळकर – पोटाचा उद्धारकर्ता)
हे वाचून लोकं अक्षरशः पोट धरून लोळू लागले. कुणी म्हणालं, “हे खानावळ आहे की दवाखाना? नाव तर अगदी औषधाच्या बाटलीसारखं दिसतंय!” दुसरा लगेच खवचटला, “अरे ‘पश्चात्ताप हमखास’ म्हणजे जेवल्यावर पोट भरतंय की थेट धावायला जावं लागतंय? खात्रीच नाही बसत!”
भोंद्या कडूळकर हा असाच गावातला वेडसर शास्त्रज्ञ. कधी बायोगॅस प्लांट बनवतो, पण त्यातून गॅसऐवजी धूर काढतो; कधी कबूतरांना ट्रेनिंग द्यायचं म्हणून दोर बांधतो, पण कबूतरांनी त्याच्या टाळक्यावरच विष्ठा करून आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं. पण भोंद्याचा आत्मविश्वास मात्र कधीच खाली आला नाही.
त्या दिवशी तर तो चौकात उभा राहून टाळ्या वाजवत, घसा काढून जोरात ओरडत होता –“गावकऱ्यांनो! आता शहरात धावायची गरज नाही. माझ्या खानावळीत या. इथे पोट नक्की भरेल… पण त्यासोबत पोटशुद्धीही हमखास होईल. हसून होवो किंवा दुसऱ्या प्रकारे!”
गावकरी खिदळून अक्षरशः डोळ्यांतून पाणी येईपर्यंत हसू लागले. कोणी पोट धरून वाकडलं, तर कोणी अंगणात लोळलं. गावातली वयोवृद्ध आज्जी हात जोडून टाळी वाजवत म्हणाली –“अरे देवा, हे जेवायला बोलवतायत की थेट हगवायला?”
पहिला ग्राहक म्हणून गावचा धिप्पाड पांडू पाटीलच पुढे आला. चौकात उभं राहून तो नेहमी म्हणायचा, “माझ्या अंगात बैलाचं बळ आहे, मी काहीही खाऊ शकतो.” हे ऐकून लोकं बाजूला झाले, “चल, पांडूचं पोट कस आहे ते आज कळणार!”
भोंद्याने थाटामाटात थाळी आणली. लोकं डोळे विस्फारून बघत होती. थाळीत आलेले पदार्थ पाहून मात्र सगळ्यांच्या हसण्याचे फवारे उडाले –भाकरी ऐवजी भोपळ्याचे तुकडे! आणि वरण म्हणून अगदी धुरकट, उकळलेला गरमागरम चहा!
पांडूचा चेहरा लांबच लांब झाला. “हे काय आहे रे भोंद्या? ही थाळी की जोक?” तो चिडून ओरडला.
भोंद्या मस्त पोझमध्ये हात कमरेवर ठेवून म्हणाला, “अरे हेच तर माझं फ्युजन! परदेशात हिट झालेलं – चहा-भाकरी थाळी! भाकरीसारखं दिसणारं हेल्दी भोपळा आणि वरणासारखा प्युअर ब्लॅक-टी. एकदम मॉडर्न डिश आहे.”
गावातला गोट्या पोरगा ते बघतच हसून लोळला. लगेच मोबाईल काढून फोटो घेतला आणि WhatsApp ग्रुपवर टाकला –“भोंद्याचं वरण = जगातलं पहिलं WiFi डिश. खाल्लं की पोट नेटवर्किंग सुरू करतं. कनेक्शन थेट टॉयलेटपर्यंत!”
तो फोटो ग्रुपमध्ये पडलाच, आणि गावभर खसखस पसरली. कुणी थाळी बघून हसत होतं, कुणी पांडूचा चेहरा बघून.
पांडूने धाडस करून दोन घास घेतले. पहिल्याच घासाला त्याचं तोंड वाकडं झालं. दुसऱ्या घासानंतर तर थेट पोट धरून उभा राहिला. चेहऱ्यावर घामाचे थेंब, डोळ्यात पाणी आलं.
“गोट्या, पाण्याची बाटली दे रे… नाहीतर सरळ विहिरीत उडी मारतो!” तो बोंबलला.
क्षणात पांडू चौकातून पोट धरून धावत सुटला. मागे गावकरी पोट धरून हसत लोळत पडले. कुणीतरी म्हटलं, “पांडू पाटील बैलासारखा होता खरं, पण भोंद्याच्या खानावळीतला भोपळा पाहून तो सुद्धा पळाला!”
हशा इतका पिकला की भाजीवाल्याच्या टोपल्या सुध्दा हलायला लागल्या. आणि भोंद्या? तो अभिमानाने मुठ आवळून म्हणत होता –“यालाच म्हणतात पोटशुद्धी!”
दुसऱ्याच दिवशी चौकातला मोठ्ठा फलक नव्या ताज्या अक्षरांनी झळकत होता. भोंद्याने रंगीत खडूने मेन्यू लिहिला होता, जणू काही पंचनामाच होता.
सोमवारी – “लाडू पण नको तितके गोड”(एका लाडूत गूळ कमी, दुसऱ्यात मीठ जास्त – खाल्लं की नक्की कळतंय की आयुष्य गोड नाही!)
मंगळवारी – “वरणात वाटाणा नाही… फक्त फोटो”(थाळीत रिकामं वरण आणि बाजूला वॉलपेपरसारखा वाटाण्याचा फोटो. भोंद्या आत्मविश्वासाने सांगतो, “पहा, फोटो क्वालिटी एचडी आहे. खायचं काय गरज आहे?”)
शुक्रवारी – “उपवास स्पेशल: भजी नाही, फक्त तेलाचा वास”(भोंद्या शेंगदाणा तेलाची बाटली हलवतो आणि ग्राहकांना फुंकर घालतो. “पोट उपाशी राहील, पण मन खुश होईल. स्पिरिच्युअल डाएटिंग म्हणतात याला.”)
गावातल्या एका आज्जीने चष्मा चढवून अक्षर न अक्षर वाचुन काढले, मग थाळी उघड्या तोंडाने बघून खिदळली, “उपवासात काही नाही मिळालं तरी वास तरी मिळतो, हेही काही कमी नाही रे!”
लोकं पोट धरून हसू लागले,कुणी म्हनाल, “ही खानावळ नाही, हे तर कॉमेडी थेटर आहे.”
हळूहळू खानावळीत लोकं जेवायला नाही तर फजिती बघायला यायला लागले. पोटासाठी थाळी, पण मनासाठी भोंद्याचा तमाशा. कुणी थाळी घेताच लगेच उधारीवर बसायचं आणि चुपचाप पळून जायचं. कुणी जेवण बाजूला सारून फोटो काढायचं आणि “फोटो भारी, चव भारीच भारी!” म्हणून थट्टा करायचं.
एकदा पोलीस साहेब स्वतः आले. लोकं कानावर हात ठेवून बसली – “बघूया, आता भोंद्याने काय गोंधळ घातला आहे ते.” भोंद्याने थाटामाटात थाळी आणली.
“साहेब, खास तुमच्यासाठी आजची स्पेशल डिश – फटाका मिसळ!”
थाळीत मस्त शेंगदाणे ओतलेले, आणि पावाऐवजी दोन पापड उभे टेकवलेले. साहेब चकित झाले.“हे काय रे भोंद्या?” त्यांनी चिडून विचारले.भोंद्या खदखदून म्हणला, “सर, पापड फोडला म्हणजे तुमचं नाव गावात फोडलं! आता लोक म्हणतील – पोलीस साहेबांनी खानावळीत पापड फोडला.”
गावकरी हसून थरथर कापू लागले.
दुसऱ्याच दिवशी शाळकरी पोरं आली. “भजी द्या हो भजी!” ते ओरडले. प्लेट आली तर त्यात काहीच नाही – फक्त रिकामा टिश्यू पेपर. पोरं बोंबलली, “भोंद्या काका, हे काय गंमत आहे का?”भोंद्या कानामागे पेन्सिल खोचत हसला, “ही आहे डाएट भजी. दिसणार नाही, मिळणार नाही. फक्त वास घ्या, कॅलरी शून्य!”
पोरं टिश्यू हलवून पाहू लागले, थोडे शिंकले आणि पोट धरून हसू लागले.
हळूहळू गावकऱ्यांना कळलं, भोंद्याची खानावळ ही जेवणाची जागा नाहीच. ती तर थेट गावाचा कॉमेडी क्लब झाली होती. थाळीत मिळणाऱ्या जेवणापेक्षा भोंद्याच्या तोंडातून निघणारे डायलॉग लोक जास्त चवीने चाखत होते.
भोंद्या स्वतः खुर्चीवर पाय टाकून, छाती ताठ करून जाहीर करत होता –“अरे माझ्या खानावळीतून उपाशी कोणीच निघत नाही! काहींचं पोट जेवणाने भरतं, काहींचं हसून शुद्ध होतं. आणि काहींचं तर दोन्ही!”
गावकरी डोळ्यात पाणी येईपर्यंत हसत टाळ्या वाजवू लागले. कोणी हातावर थाळी आपटली, कोणी बेंबी फोडेपर्यंत हसलं. आता खानावळीत थाळ्यांपेक्षा जोक्सचीच मागणी जास्त होऊ लागली.“भोंद्या, दोन भाकऱ्या कमी द्या पण चार जोक्स जास्त द्या रे!” कुणीतरी ओरडला.दुसरा म्हणाला, “आज थोडं कमी वरण द्या, पण दोन फटकेदार पंच हवेत.”
इतकंच काय, शाळकरी पोरं Instagram वर #पोटशुद्धीखानावळ हॅशटॅग सुरू करून रोज फोटो टाकू लागली. कुणी भोपळ्याच्या तुकड्याचा फोटो टाकायचं, कुणी टिश्यू पेपराचं ‘डाएट भजी’ दाखवायचं. फॉलोअर्स एवढे वाढले की गावकरी म्हणू लागले,“भोंद्याच्या खानावळीला आता मिचेलिन स्टार नाही, पण मीम स्टार नक्की मिळणार!”
आणि भोंद्या? तो दररोज चौकात उभा राहून, छाती फुगवून अभिमानाने ओरडायचा –👉 “पोटशुद्धी खानावळ – गावाचं पोट भरणार नाही… पण हसू नक्की भरणार!”
गावकरी पुन्हा एकदा पोट धरून हसत लोळायचे, आणि खानावळीतल्या रिकाम्या थाळ्याही त्यांच्यासोबत खणखणू लागायच्या.
समाप्त 🎉
-अक्षय वरक