Sarkari Nokri - 1 in Marathi Philosophy by Ankush Shingade books and stories PDF | सरकारी नोकरी - 1

Featured Books
Categories
Share

सरकारी नोकरी - 1

सरकारी नोकरी या पुस्तकाविषयी

         सरकारी नोकरी नावाची माझी एकशे अकरावी पुस्तक आणि एक्यांशिवी कादंबरी. ही कादंबरी वाचकांना देतांना अतिशय आनंद होत असून यात दोन शिक्षकाची दयनीय अवस्था वर्णीत केल्या गेली आहे. म्हणतात की शिक्षण खातं चांगलं आहे. परंतु शिक्षण नावाच्या पवित्र खात्यात कोणता त्रास होतो? याचं वर्णन यात आहे. 
           कादंबरी तसं पाहिल्यास जास्त वाचाविशी वाटणार नाही. कारण सत्य परिस्थिती लोकांना वाचणं आवडत नाही. ती कंटाळवाणी वाटते. परंतु अशीही शिक्षकांच्या जीवनाची दुरावस्था राहू शकते काय? याचा बोध या कादंबरीतून होतो. याव्यतिरिक्त या कादंबरीत मराठ्यांच्या आरक्षणाबाबत थोडासा भाग आणल्या गेला आहे. हा भागही तेवढीच मराठ्यांची थोडीफार माहिती देवू शकतो. 
          एकंदरीत सांगायचं झाल्यास कादंबरी सरस झालेली असून पुर्ण वाचावी. जेणेकरुन त्यातील भावार्थ समजू शकेल. तशी त्यात एक शिकवणंही दिली आहे. जी तुम्हाला आवडू शकेल. ती शिकवण कोणती? यासाठी ही कादंबरी वाचणे गरजेचे. आपण ती वाचावी व एक फोन अवश्य करावा ही विनंती. 

             अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

***********************१
        
             मराठवाडा मुक्ती संग्राम. मराठवाडा मुक्ती संग्राम म्हणजे तमाम मराठवाड्याला स्वातंत्र्य देण्याचा संग्राम होता. ज्याठिकाणी आता मराठे राहतात. तसं पाहिल्यास हैदराबाद इथे निजामाची राजवट होती व तेथे बहुसंख्य संख्या ही मुस्लिमांची होती. ज्यात तेथील इतर प्रतिशत संख्या असलेल्या लोकांची इच्छा भारतात विलीन होण्याची होती तर चाळीस प्रतिशत लोकांची इच्छा ही पाकिस्तानात विलीन होण्याची होती. हा लढा सन १७ सप्टेंबर रोजी भारतीय सैन्याने कारवाई करुन संपुष्टात आणला. एवढंच नाही तर मराठवाडा हा भाग भारतात विलीन करण्यात आला. 
          मराठवाड्यात असलेली निजामाची राजवट व त्याच्या तावडीतून मराठवाडा मुक्त करणं ही खरं तर तारेवरची एक कसरतच होती. आज हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा करीत असलो तरी त्यात कितीतरी लोकांचे बळी गेले की जे मराठवाड्याच्या मुक्तीसाठी लढ लढ लढले. या लढ्याचे नेतृत्व केले ते स्वामी रामानंद तीर्थ यांनी. शिवाय या लढ्यात अनेक पुरुषच नाही तर स्रियांनीही पुढाकार घेतला होता.
           भारत हा १५ ऑगस्ट १९४७ ला स्वतंत्र झाला. परंतु भारत स्वतंत्र झाल्यानंतर जो विलिनीकरणाचा प्रश्न आला. त्यानुसार हैदराबादचा निजाम हा संबंधीत भुभाग भारतात विलीन करण्यास तयार नव्हता. मराडवाडा हा निजामाच्या अन्यायकारक राजवटीखाली होता. जो मुक्त करीत असतांना ज्या स्रियांचं योगदान होतं, त्या स्रियात सक्रीय सहभागी होत्या, दुर्गाबाई टेके, सोनाबाई पाटील, कोरडे, आशाबाई वाघमारे, रुख्मिनीबाई कोरडे, त्रिवेणीताई पाटील. त्याही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढल्या होत्या. त्यावेळेस भारतीय सैन्याने मराठवाडा मुक्तीसाठी पोलो नावाचे ऑपरेशन केले होते.
             मराठवाडा मुक्तिसंग्राम हा दिवस म्हटलं तर पश्चिम महाराष्ट्रातील लोकांसाठी एक उत्सवच होता. जे मराठे होते. पंधरा ऑगस्टला जेव्हा भारत स्वतंत्र झाला, तेव्हा भारतात पाचशे पासष्ट संस्थानांपैकी फक्त पाचशे बासष्ट संस्थानांनी भारतात विलीन होवू असं जाहीर केलं होतं. तशी कारवाईही झाली होती. मात्र निजाम, जम्मू काश्मीर आणि जुनागड असे तीन संस्थान होते की त्यांनी तशा स्वरुपाची संमती दिली नव्हती. हैदराबाद मध्ये निजाम मीर उस्मान अली याचं राज्य होयं. त्यातच त्यावेळेस त्याची सातवी पिढी हैदराबाद संस्थानावर राज्य करीत होती. मात्र लोकांच्या इच्छेनुसार लोकांनी स्वामी रामानंद तीर्थच्या नेतृत्वात हैदराबादचा मुक्तिसंग्राम सुरु केला. त्यावेळेस हैदराबादची लोकसंख्या ही दिड कोटी होती. त्यात तेलंगाणा, कर्नाटक व मराठवाड्याचा काही भाग होता. 
          मराठवाड्याचा मुक्तिसंग्राम जेव्हा सुरु झाला. तेव्हा निजामाचा सेनापती कासीम रझवी याने मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन नावाची संघटना स्थापन केली. तशीच त्यात मुस्लिम नवयुवकाची भर्ती करुन जनतेवर अत्याचार सुरु केले. ज्यात मुस्लिमांची संख्या वाढावी म्हणून कितीतरी हिंदू लोकांना कापून काढले. ज्या संघटनेत रझाकार नावाचा एक मुस्लिम समूह होता व त्याची दहशत निर्माण झाली होती. मात्र आपल्या प्राणाची पर्वा न करता मराठवाड्याच्या गावागावात जावून तमाम भारतीय लोकांनी त्या रझाकारांना तोंड देवून तोंडघशी पाडले. ज्यात पूल उडवून देणारे काशिनाथ कुलकर्णी, शस्र पुरविणारे उस्मानाबादचे गणपतराव क्षीरसागर, धोपटेश्वर गावच्या दगडाबाई शेळके, रोहिल्यांना जेरीस आणणारे विठ्ठलराव काटकर, पोलीस ठाणे उडविणारे हरिश्चंद्र जाधव, अशाप्रकारे बऱ्याच लोकांनी निजामाला सळो की पळो करुन सोडले. 
          निजाम शासन अत्याचार करीत होते लोकांवर. ते अत्याचार एवढे तीव्र होते की लोकांना शस्र हाती घेवू देण्यास स्वतः अहिंसावादी तत्व पाळणाऱ्या महात्मा गांधी यांनी सहमती दिली. शेवटी भारताचे तत्कालीन गृहमंत्री पदावर विराजमान असलेल्या वल्लभभाई पटेल यांनी निजाम शासनाच्या विरोधात पोलीस कारवाईची घोषणा केली. ती तारीख होती अकरा सप्टेंबर एकोणवीसशे अठ्ठेचाळीस. त्या दिवशी ऑपरेशन पोलो अंतर्गत मेजर जनरल जे. एन, चौधरीच्या नेतृत्वाखाली पाच दिशेने निजामावर कारवाई झाली व निजामाची कोंडी करण्यात आली. मुख्य सैन्य सोलापूरकडून शिरले व अवघ्या दोन तासात नळदुर्ग व सायंकाळपर्यंत तुळजापूर, परभणी, मणिगढ, कनेरगाव, बोनाकल ताब्यात घेतले. चाळीसगाव मार्गे आलेल्या तुकडीने कन्नड दौलताबाद, तर बुलढाण्याकडून आलेल्या तुकडीने जालना शहर ताब्यात घेतले. तसेच वारंगळ, बीदर हे विमानतळही उध्वस्त केले. पंधरा सप्टेंबरला औरंगाबाद हस्तगत केले. 
          १७ सप्टेंबर १९४८ उजाडलं. त्या दिवशी हैदराबादचे सैन्यप्रमुख जन अल इद्रीस यांनी शरणागती पत्करत करार करुन हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले. तसंच हैदराबाद संस्थानात तिरंगा लहरला.
            महिलांची कणखर मदत. त्यातच स्वामी रामानंद तीर्थ यांचे विशेष नेतृत्व, तसेच दिंगबरराव बिंदू, गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, देवीसिंग चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, शंकरसिंग नाईक, विजयेंद्ग काबरा, बाबासाहेब परांजपे या आणि इतर अनेक नेत्यांनी आपआपले कौशल्य दाखवत केलेले नेतृत्व, शिवाय मराठवाड्याच्या गावागावात हा संग्राम लढला गेला. यात प्राणाची पर्वा न करता अनेक स्वातंत्र्यवीर पुढे आले. मराठवाड्यात निजामांच्या पंतप्रधानास थांबवण्यासाठी पूल उडवून देणारे काशीनाथ कुलकर्णी, मुक्ती संग्राम लढ्यातील स्वयंसेवकांना शस्त्र बनवून पुरवणारे उस्मानाबाद जिल्ह्यातील भूमचे गणपतराव क्षीरसागर सुतार, मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई म्हणून विख्यात झालेल्या बदनापूर तालुक्यातील धोपटश्र्वर गावच्या दगडाबाई शेळके, रोहिल्यांना जेरीस आणणारे बीडचे विठ्ठलराव काटकर, बर्दापूर पोलीस ठाणे उडवून देणारे लातूरचे हरिश्चंद्गजी जाधव, लातूर येथेल बोरी या ठिकाणाहून निजामाचा बराच कारभार चालायचा. भारतीय सैनिकांनी मराठवाड्यावर धावा बोलताच धोंडिबा शंकर सिरसाट यांनी अजूबाजूच्या निजामांच्या ठाण्यावर हल्ला चढवला व निजामी सैन्याना खदेडून हद्दपार केले. उस्मानाबाद जिल्हयातील होटी गावचे जनार्दन होर्टीकर गुरुजी तसेच परभणीत  रझाकारांना  हुसकावून लावणारे सूर्यभान पवार, विनायकराव चारठाणकर, विश्र्वनाथराव कातनेश्र्वरकर, पालम तालुक्यातील गुळखंड गावचे सुपुत्र मारोतराव पौळ, पाथरी येथील देवरावजी नामदेवराव कांबळे, नांदेड येथील देवरावजी कवळे, जीवनराव बोधनकर आदींच्या रूपाने मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात स्वातंत्र्य संग्राम तेजस्वीपणे लढला गेला. या मुक्ती संग्रामात श्रीधर वर्तक, जानकीलालजी राठी, शंकरराव जाधव, जालन्याचे जनार्दन मामा, किशनसिंग राजपूत, गोविंदराव पानसरे, बहिर्जी बापटीकर, राजाभाऊ वाकड, विश्र्वनाथ भिसे, जयंतराव पाटील आदींसारख्यांनी आपल्या जीवाची तमा न बाळगता काम केले. या सर्व हुतात्म्यांनी आणि मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या संग्रामाचे मोल काढणे शक्य नाही. यासीन जूबेर हैद्राबादी मंत्री याने मुक्तीसेनेने ताब्यात घेतलेली परत घेण्याची प्रतिज्ञा केली. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालूक्यातील जातेगाव माळावर निजामाच्या सैन्याला पुढे सरकू दिले नाहीत. यामध्ये मानसिंग राजपुत, लक्ष्मण आवचार, रामलाल राजपूत व रामचंद्र धंदेवार हे आघाडीवर होते. यामध्ये रामचंद्र धंदेवार हे बाळगीर मठ सरला येथे बंदुकीच्या गोळीने वेध घेतल्याने हुतात्मा झाले. त्यावेळी गोदामाय दुथडी भरून वाहात होती. रामचंद्र याना क्षीरसागर नावाच्या व्यक्तीने शहीदास आपल्या पाठीवरून पैलतीरी आणून भर पावसात खड्डा केला व त्यांचा अंत्यविधी पूर्ण केला.
           मराठवाड्याचा मुक्तिसंग्राम हा तमाम मराठा समाजासाठी प्रेरणा देणारा मुक्तिसंग्राम होता. त्या मुक्तिसंग्रामानं मराठा समाजास एक प्रकारची प्रेरणा दिली होती. तसं पाहिल्यास मराठा ही जातच पुर्वीपासून लढवय्यी होती. ज्या जातीनं शिवाजी मराराजांच्या काळात शिवरायांसोबत मदतीला राहून स्वराज्य स्थापन करण्याचं काम केलं होतं. मराठे असे वीर होते व त्यांच्याजवळ भरपूर शेतीही होती. अर्थातच त्या समाजाजवळ पुर्वी जमीनदाऱ्या होत्या. त्यातच त्यातील कोणी मनसबदार तर कोणी सरदार असायचे. त्यांची पाटीलकी गावभर चालायची. 
            प्रभास हा मराठा समाजातीलच मुलगा होता. तसा तो लहानपणापासूनच हुशार होता. त्याला आपण मराठा असल्याबाबत गर्व होता. तसाच तो जेव्हा वर्गात इतिहास शिकवायचा. तेव्हा तो शिकवीत असतांना शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकत असे. तेव्हा त्याची छांती इंचभर वाढत असे. जेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला त्याच्या जातीची ओळख करुन दिली होती. त्याला वाटत होतं की आज मराठवाडा भारतात आहे. ते त्यावेळेस लढलेल्या लोकांमुळे. ते जर कदाचित लढले नसते तर आज मराठवाडा पाकिस्तानात असता. त्यातच मराठवाड्याचं चित्र काहिसं वेगळं असतं. दि. १७ सप्टेंबर, याच दिवशी मराठवाडा निजामाच्या बंधनातून मुक्त झाला. हे तमाम महाराष्ट्र भुमीत राहणाऱ्या मराठा लोकांनी विसरु नये. त्यांच्यासाठी लढणाऱ्या व शहीद होणाऱ्या तमाम क्रांतिकारकांनाही विसरु नये. तसाच उत्सव साजरा करावा आणि सुटकेचा श्वास सोडावा की आपण भारतात आहोत. त्यातच एक प्रकारचा उत्सव साजरा करुन शहीद क्रांतिकारकांना नव्हे तर भारतीय सैन्याला श्रद्धांजली वाहावी. जेणेकरुन तमाम सर्व मराठवाड्यात राहणाऱ्या लोकांना प्रेरणा मिळेल. 
          प्रभासला तसं वाटणं साहजीकच होतं. त्याचं कारण होतं, त्याचं पाकिस्तानविषयीची माहिती ऐकणं. पाकिस्तानात भारताएवढं स्वातंत्र्य तेथील हिंदू लोकांना नाही. असं त्यानं कधीकाळी ऐकलं होतं.