*************** २ *************************
सृष्टी प्रेम करीत होती नोकरीवर. तिला वाटत होतं की सरकारी नोकरी लागावी. ज्यातून तिनं जे आजपर्यंत भोगलं. त्या यातनेतून मुक्ती मिळेल. तशी ती फार शिकली होती व देशात तिच्या समाजाला आरक्षण असल्यानं तिला शिकता आलं होतं. त्यातच नोकरीतही आरक्षण होतंच. तसं पाहिल्यास लवकरच तिला नोकरी लागली होती.
प्रभास हा सृष्टीच्याच वर्गातील एक मुलगा. गावातच राहणारा. तोही बराच शिकला होता. परंतु त्याच्या समाजाला आरक्षण नव्हतं. त्यामुळं त्याला लवकर नोकरी लागली नाही. त्यासाठी त्याला प्रतिक्षाच करावी लागली बराच काळ. तद्नंतर त्यालाही नोकरी लागलीच.
ते सृष्टीचं महाविद्यालय. त्या महाविद्यालयात सृष्टी, प्रभास, अमेय सारखी बरीच मुलं होती. ज्यांच्यात कधीकधी आरक्षणावरुन खडाजंगी होत. ते विचारांचं वादळ असायचं. त्यातच काही महाविद्यालयातील तरुण आरक्षण नसावं असं मानत असत व काही तरुण आरक्षण असायला हवं असं मानत होते.
सृष्टीची शिकण्याची ऐपत नव्हती. कारण तिचे वडील खुप दारु प्यायचे. ज्यातून तिच्या घरी पैसा पुरत नव्हता. त्यातच तिच्या घरी तिच्या आईवडीलांनी अनेक मुलं जन्मास घातली. ज्यातून त्यांचं पोटच भरणं कठीण होतं. अशातच सृष्टी शिकत गेली व ती आज अकरावीला गेली होती.
आरक्षण म्हणजे काय असतं. ते सृष्टीला अद्यापही माहीत नव्हतं. नाही प्रभास आणि अमेयला. कारण तो त्यांचा सुरुवातीचाच प्रवास होता.
तो महाविद्यालयीन काळ व त्या महाविद्यालयात सुरुवातीलाच एका वादविवाद स्पर्धेचं आयोजन झालं होतं. ज्यात आरक्षण नको यावर वादविवाद स्पर्धा होती. तसं पाहिल्यास अकरावीची मुलं त्यात फक्त रसिक श्रोते म्हणून सहभागी झाले होते. तसं पाहिल्यास त्यांना आरक्षण म्हणजे नेमकं काय? हेही समजत नव्हतं.
ती वादविवाद स्पर्धा त्याच काळात घेतली गेली. ज्या काळात आरक्षणासाठी मराठा समाजाची आरक्षणाची लढाई सुरु होती. मराठा समाजाचे नेते मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन व उपोषण करीत होते. ते आंदोलन आरक्षण मिळविण्यासाठी होतं.
ती वादविवाद स्पर्धा व त्या वादविवाद स्पर्धेत वेगवेगळ्या भाग घेतलेल्या मुलांनी आपल्या चांगल्या वक्तृत्वानं वेगवेगळे विषय मांडले. ज्यातून आरक्षण हा विषय सृष्टी, प्रभास आणि अमेयसारख्या मुलांना चांगलाच समजला होता. ज्या स्पर्धेत महाविद्यालयातीलच सिनीयर मुलांनी भाग घेवून तो विषय चांगला समजावून दिला होता. त्यातच आरक्षणाचा दुसरा प्रत्यय सृष्टीला आला तो शिष्यवृत्ती रुपानं. सृष्टीला शिष्यवृत्ती मिळाली होती. तेव्हा महाविद्यालयातील मुलं म्हणाली होती की सृष्टीला आरक्षण आहे म्हणूनच शिष्यवृत्ती मिळाली. तेव्हा तर सृष्टीला आणि प्रभासला खऱ्या स्वरुपानं आरक्षणाचा विषय समजला. त्यातच आपल्याला आरक्षण नाही. ही भावना प्रभासच्या मनात जोर पकडू लागली होती. त्याच्या मनात सृष्टीबाबत तिरस्काराची भावना निर्माण झाली होती.
प्रभास, सृष्टी व अमेय हे तिघे एकाच गावचे होते व गावात महाविद्यालय नसल्यानं ते एकाच बसमधून बाहेरगावच्या महाविद्यालयात जात असत सोबतसोबत.
सृष्टीचं बालपण तसं खेड्यातच गेलं. ती गावात राहात असतांना तिचं घर गावाच्या बाहेर असल्यानं तिची ओळख प्रभाससोबत तेवढी नव्हतीच. तसं पाहिल्यास प्रभास व ती एकाच वर्गात होते. त्यामुळं बालपणात थोडं बोलणं व्हायचं. परंतु वय लहान असल्यानं व प्रेम म्हणजे काय समजत नसल्यानं त्यांची तेवढी फारशा प्रमाणात जवळीक नव्हतीच. परंतु जसे ते महाविद्यालयात गेले आणि महाविद्यालयातील सिनियर विद्यार्थ्यांच्या संपर्कात आले. तेव्हा प्रेम म्हणजे काय हे दोघांनाही समजायला लागलं होतं. त्यातच महाविद्यालयात जात असतांना दोघांमध्ये प्रेम केव्हा निर्माण झालं ते त्यांनाही कळलं नाही. एकवेळ अशी आली होती की दोघंही एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते.
ते गाव व त्या गावात भेदभाव होता. साधं सामान घ्यायलाही अस्पृश्य मंडळी भीतभीतच गावात जात असत. तसं पाहिल्यास डॉक्टर बाबासाहेबांनी संविधान लिहून त्यात आरक्षणाची तरतूद केल्यानं भेदभावग्रस्त असलेला समाज वर आला होता व त्यांचं उठणं बसणं गावातील इतर लोकांसोबत होवू लागलं होतं. शहरात अजिबातच भेदभाव नव्हता व गावातूनही भेदभाव मिटू लागला होता. खानपान व एकमेकांच्या घरी जाणं व उठणं फक्त तेवढंच. बाकी सोयरीकीत भेदभाव होता व सोयरीक करतांना जात पाळणं सुरु होतं. एखाद्यावेळेस एखाद्या मुलानं आपल्या जातीची मुलगी न करता वेगळ्या जातीची मुलगी केली तर भेदभाव होता व त्या आधारावर गावात खडाजंगीही होत असे.
सृष्टीसोबत निर्माण झालेलं प्रभासचं प्रेम. ही एक गावात खटकणारी गोष्ट होती. कारण गावाला प्रेम वैगेरे काही मान्य नव्हतं. ना ही आंतरजातीय प्रेम मान्य होतं.
सृष्टी जेव्हा महाविद्यालयात जात असे. तेव्हा जातांना ती बोलत असे प्रभाससोबत. अन् येतांनाही ती प्रभाससोबतच बोलत बोलत येत असे. त्यातच निर्माण झालेलं प्रेम हे वृद्धींगत जावू लागलं होतं.
ते महाविद्यालयातील जीवन व त्याच जीवनात निर्माण झालेला गोडवा. तो गोडवा प्रेममयी असल्यानं सृष्टीला आनंद वाटत होता. तशी ती आता बारावीला गेली होती व त्या दोघांनीही बारावीची परिक्षा दिली. तसेच ते चांगल्या गुणानं बारावीची परिक्षा पास झाले होते.
प्रभास व सृष्टी बारावीची परिक्षा पास झाले होते. त्यातच त्यांना वाटायला लागलं होतं की आपण शिक्षक बनावं. असे शिक्षक बनण्यासाठी त्यांनी शिक्षकांच्या महाविद्यालयात प्रवेश केला व लागलीच ते तशा स्वरुपाचा अभ्यासक्रम पास करुन नोकरीचा शोध घेवू लागले. ज्यात आरक्षण असल्यानं लवकरच सृष्टी नोकरीला लागली होती.
सृष्टी आरक्षणानं एका संस्थेच्या शाळेत नोकरीला लागली होती. तसा प्रभास नोकरीला लागला नव्हता. ती पैसाही कमवू लागली होती. तसा प्रभास पैसा कमवीत नव्हता. परंतु ती जरी पैसा कमवीत असली तरी तिचं प्रभाससोबत असलेलं प्रेम काही कमी झालं नव्हतं. अशातच त्या दोघांचंही वय होत आलं. त्यातच सृष्टीच्या वडिलांनी तिला विवाहाबद्दल विचारलं. तशी सृष्टी आपल्या वडिलांना म्हणाली,
"बाबा, आपण माझा विवाह आताच करु नका. तशी मी कमविणारी आहे. जर आपण आताच माझा विवाह केला तर मी सासरी जाणार. त्यानंतर माझी जी कमाई येईल. ती कमाई मी माझ्या मनात इच्छा असूनही आपल्याला देवू शकणार नाही. तेव्हा माझी इच्छा आहे की माझ्या विवाहापुर्वी माझ्या सर्व बहिणींचा विवाह आपण करावा. तशी मी नोकरीला असल्यानं मला कोणीही मागणी घालेल व माझा विवाह होईल."
सृष्टीनं आपल्या वडिलांना म्हटलेली गोष्ट. ती त्यांना पटली होती. त्यांना सृष्टीचं प्रभाससोबत असलेलं प्रेम माहीत नव्हतं. त्यातच त्यांनी तिच्या बोलण्याला दुजोराच दिला व लागलीच त्यांनी लवकर लवकर एका पाठोपाठ एक आपल्या मुलीचे विवाह पार पाडले व त्यानंतर त्यांनी सृष्टीला तिच्या विवाहाबद्दल विचारलं. त्यावर ती आपलं प्रभाससोबत असलेलं प्रेम न दाखवता ती वडिलांचा मान राखण्यासाठी विवाहासाठी तयार झाली होती.