हरतालिका व्रत करून पार्वतीने शिव शंकराला प्रसन्न करून घेतले होते .
माहेरी हरतालिकेचा उपास कडक नव्हता .
आई खिचडी, दुध फळे असे काही खाऊन उपास करीत असे .
मी मात्र हट्टाने अगदी निर्जळी उपास करीत असे .
मी रात्री झोपी जात असे ,आई मात्र जागी राहून बारा वाजता मला उठवून
दुध प्यायला देत असे .
या दिवसाची एक आठवण मात्र कायम येतेच .
नुकतीच मी नोकरीला लागले होते .
अजुन लग्न व्हायचे होते .
आणि ऑफिसकडून तीन महिन्याच्या ट्रेनिंग ची ओर्डर आली.
मात्र हे ट्रेनिंग नाशिकला होते .
आई वडील जरा बिचकले .
ते दिवस सातच्या आत घरात या पठडीतले होते .
मुलींवर बरीच बंधने असत.
नाशिकला ना कोण ओळखीचे न नात्यातले .
एकट्या अविवाहित मुलीला तिकडे कशी पाठवणार आणि तेसुद्धा तीन महिने .
आई वडिलांना कोडे पडले .
शेजारच्या वहिनींना हे कळले तेव्हा त्या म्हणाल्या काही काळजी करू नका .
माझे माहेर आहे नाशिक .
खुप मोठा वाडा आहे आमचा आणि सख्खे चुलत काका सगळे एकत्र राहतात
आमच्या घरात ..
ही तिकडे आरामात राहू शकते .
हिच्या वयाच्या माझ्या तीन बहिणी आहेत घरात .
मी कळवते माझ्या घरी ही येणार आहे असे .
आई वडील हे ऐकुन थोडे निष्काळजी झाले .
मग वहिनीनी पत्र घालुन घरी कळवले माझ्या येण्याविषयी .
मी नाशिकला गेले ,खरोखर माझी मस्त व्यवस्था झाली त्यांच्याकडे .
मोठे व्यापारी असलेल्या वहिनींच्या वडिलांचा खुप मोठा वाडा
अगदी भद्रकाली देवीच्या देवळाशेजारीच होता .
घरात नोकर चाकर मिळुन चाळीस पन्नासलोक होते .
माझ्या वयाच्या दहा बारा मुली होत्या .
श्रीमंत कुटुंब असल्याने मुली नोकरी वगैरे करीत नव्हत्या .
त्यांच्यावर स्वयंपाक पाणी किंवा इतर कसलीही जबाबदारी नव्हती .
फक्त मजेत राहणे आणि शिकणे .
मी एकटी इतक्या लांबून नोकरी साठी येते आणि राहते याचे सर्वांना भारी कौतुक होते .
मी सकाळी नऊ ला बाहेर पडत असे ते संध्याकाळी सातला येत असे .
इतक्या सकाळी त्यांच्याकडे फक्त चहा झालेला असे .
स्वयंपाकी यायला अजुन उशीर असे .
घरच्या वहिनी माझ्यासाठी रोज उप्पीट किंवा पोहे करून माझ्या डब्यात देत असत .
ऑफिस जवल सुध्दा चहा व्यतिरिक्त काही मिळत नसे
अख्खा दिवस तेव्हढ्या डब्यावर काढायला लागत असे
मला पोळी भाजीचा डबा देता येत नाही याचे त्यांना फार वाईट वाटे .
त्यांची अडचण मला पण समजत असे माझी काहीच तक्रार नव्हती
संध्याकाळी मात्र गेल्यावर चहा सोबत काहीतरी मस्त खाणे तयार असे .
रात्री जेवण पण सगळ्यांच्या सोबत गप्पा करीत होत असे .
त्यांच्या घरात देवधर्म ,पूजा ,अर्चा ,सोवळे, ओवळे अतीशय कडकपाळले जात असे .
आंघोळ केल्या शिवाय घरातल्या कोणालाच चहा पण दिला जात नसे .
त्या दिवशी हरतालिका होती .
सर्व मुलींचा बायकांचा उपास म्हणून घरात असंख्य फळे ,सुका मेवा आणला होता .
सकाळीच भले मोठे दुध आटवायला ठेवले होते .
मी आदल्या दिवशीच घरी सांगितले होते माझा कडक उपास आहे असे .
ते समजल्यावर सगळे माझ्याकडे आणखीनच आदराने पाहु लागले .
आजीनी माझ्या कानशिलावर बोटे मोडली .
मी सकाळी नेहेमीप्रमाणे ट्रेनिंग ला गेले .
दिवसभर उपास होताच ,शिवाय त्या दिवशी घरी यायला सुद्धा बराच उशीर झाला होता
दिवसभराचा उपास आणि नोकरीची दगदग यामुळच मी दमून गेके होतें
माझा कोमेजलेला चेहरा बघुन घरच्या सर्वांना वाईट वाटले .
इतर वेळेस तु कडक उपास करीत असशील पण आता नोकरी आहे
तेव्हा काहीतरी फळे खा किंवा दुध पी असा सर्वांनी आग्रह केला .
शिवाय रात्री जागरणाचा कार्यक्रम पण ठेवला होता .
सखी पार्वतीची पूजा झिम्मा फुगडी गप्पा गोष्टी खेळ वगैरे ..
पण मी माझ्या मताला ठाम होते .
माझा उपास कडक होता .
तेव्हा मात्र घरच्या सगळ्या मुलींना आजी म्हणाल्या बघा ग तुम्ही दिवसभर खा खा करताय
ही मुलगी सुध्दा तुमच्या एवढीच आहे तरी पण पण दिवसभर उपास केलाय
शिवाय ऑफिसला जाऊन आलीय ..
इतका कडक उपास निभावल्या बद्दल रात्री खेळ वगैरे झाल्यावर बरोबर बारा वाजता
आजींनी मला सखी पार्वती शेजारी चौरंगावर बसवले
आणि कुंकू लावुन गरम मसाला दुध मला स्वतःच्या हाताने पाजले .
आणि उपास सोडायला लावला .
सर्व बायकांना माझ्या कडक उपासा विषयी सांगितले
जमलेल्या शेजार पाजारच्या पन्नासभर बायका माझ्याकडे कौतुकाने पाहत होत्या .
इतक्या लोकांच्या समक्ष झालेला हा सन्मान मला फार आवडला.❤️
अजूनही त्यांच्या घरी हरतालीकेला माझी आठवण निघतेच .
क्डक उपास करून माझा शंकर मला मिळाला .🙂🙂
मग लग्नानंतर मात्र मी खिचडी फळे खाऊन उपास करू लागले
दर वर्षी सखी पार्वती ची मूर्ती आणून पूजा करते
दुध साखर आणि फळांचा नेवेद्य दाखवते
गौरी गणपती सोबत त्यांचे ही विधिवत विसर्जन करत